मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
बलसागर भारत होवो विश्वात ...

बलसागर भारत होवो! - बलसागर भारत होवो विश्वात ...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


बलसागर भारत होवो
विश्वात शोभुनी राहो॥
बलसागर....॥

हे कंकण करि बांधियले
जनसेवे जीवन दिधले
देशार्थ प्राण हे उरले
मी सिद्ध मरायाला हो॥
बलसागर....॥

वैभवी देश चढवीन
स्वातंत्र्य त्यासि अर्पीन
हा तिमिर घोर संहरिन
या बंधु साहाय्याला हो॥
बलसागर....॥

हातात हात घेऊन
हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायाला हो॥
बलसागर....॥

करि दिव्य पताका घेऊ
प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू
ही माय निजपदा लाहो॥
बलसागर....॥

या उठा करु हो शर्थ
संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो॥
बलसागर....॥

ही मुक्त माय होईल
वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल
तो सोन्याचा दिन येवो॥
बलसागर....॥

हा देश वैभवी न्यावा!

जगदीश दयाघन देवा
हा देश वैभवी न्यावा॥

तू सुंदर मंगलमूर्ती
पुरवावी मनीची आर्ती
हे दीन धरावे हाती
तू सकळ सिद्धिचा ठेवा॥ हा देश....॥

बलदाता तू मतिदाता
तू गणपती ऐक्य-विधाता
भयहर्ता तू सुखकर्ता
आम्हांस समयि या पावा॥ हा देश....॥

तू कलह सकळ हे मिटवी
तू प्रेम आम्हांला शिकवी
तूत्याग तपस्या शिकवी
जनमनि न तिमिर उरवावा॥ हा देश....॥

करु देत माय निज मुक्त
उठु देत सर्व सत्पुत्र
ते सकल निज समर्पोत
हा लोभ सकळ हटवावा॥ हा देश....॥

जरि होइल भारत मुक्त
तरि होइल जग सुखभरित
पावेल विषमता अस्त
आनंद जगी पिकवावा॥ हा देश....॥

-अमळनेर, ऑगस्ट १९३१

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP