मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|साने गुरूजी|
ध्येय देईन दिव्य मी स्वर्...

दिव्य मी स्वर्ग निर्मीन - ध्येय देईन दिव्य मी स्वर्...

साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने


ध्येय देईन
दिव्य मी स्वर्ग निर्मीन
सचिंत सगळे दिसती लोक
जिकडे तिकडे भरला शोक
करुन तयांवर अमृतसेक
तया उठवीन॥ दिव्य....॥

मेल्यापरि हे दिसती बंधू
उरला न दिसे जीवनबिंदु
निर्मुन मी संजीवनसिंधु
तया जिववीन॥ दिव्य....॥

गुलामवृत्ती जिकडे तिकडे
दुबळी वृत्ती जिकडे तिकडे
चैतन्याचे भरभरुन घडे
तया पाजीन॥ दिव्य....॥

स्वातंत्र्याची लाविन ज्योत
स्फूर्तीचा मी निर्मिन स्त्रोत
तेजाचा मी सोडिन झोत
दैन्य दवडीन॥ दिव्य....॥

भेदभाव मी जाळिन सारे
ऐक्याचे मी सोडिन वारे
दिव्यबळाच्या जयजयकारे
राष्ट्र उठवीन॥ दिव्य....॥

करिन त्यागा ते उद्युक्त
निर्भयतेचे शिकविन मंत्र
नि:शस्त्राचे देइन शस्त्र
पंथ दावीन॥ दिव्य....॥

आळस दवडून सेवा देइन
विलास दवडून विकास देइन
खेदा दवडून बोध देइन
भाग्य देईन॥ दिव्य....॥

कळकळ शिकविन तळमळ शिकविन
सदगुण संघटना मी वितरिन
सत्याचा सत्त्वाचा शोभन
ध्वज उभवीन॥ दिव्य....॥

रुढी जाळुन विचार देइन
हृदयमतीला निर्मळ करिन
श्रद्धा सद्धर्माला देइन
मोक्ष देईन॥ दिव्य....॥

मंगल उज्वल ते देइन
पावन निर्मळ ते देइन
सुंदर सत्य शिवा देइन
देव देईन॥ दिव्य....॥

-धुळे तुरुंग, मे १९३२

N/A

References : N/A
Last Updated : April 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP