मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
दूर कोठें एकला जाउनीयां

दूर कोठें एकला जाउनीयां

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( दिंडी )

दूर कोठें एकला जाउनीयां,
एकतारी आपली घेउनीयां,
स्वेच्छें होतों छेडीत ती, मनाला
दुःखिताला आराम व्यावयाला,

आजवेरी बहु मनोभंग झाले
बहुत आशांचे प्राण निघुनि गेले
तयां शोचाया निर्जनांत जावें,
एकतारी छेडीत मीं बसावें

आजदेखिल मी तसा अस्तमानीं
वाद्य वेडें वांकुडें वाजवूनी
दंग झालों स्वच्छन्द गायनानें;
खरें संगीतज्ञान कोण जाणे !

ह्रदय आत्म्याला जधीं खेळवीतें,
ह्रदय आत्म्याला जधीं आळवीतें;
तधीं तुमचें तें नको कलाज्ञान,
तधीं ह्र्दयासन नसे तानसेन !

असो; असतां मन गायनांत लीन,
रात्र झाल्याचें भान राहिलें न;
असें कलहंसा वाहतां प्रवाहीं
प्राप्त मरणाचें ज्ञान नसे कांहीं !

अहा ! अद्‍भुत तों काय एक झालें ---
‘ धन्य बन्धो ! ’ हे शब्द वरुनि आले !
बरी बघतां, तारका उंच आहे,
सदय सस्मित मजकडे वरुनि पाहे !

प्रसादें त्या वांकतां, काजव्याचें
स्फुरण खालीं बघुनि मी म्हणें---” याचें
साम्य कांहींतरि असे तुशीं तारे !
माझिया तर जीवितीं तिमिर सारे !”

“ नको ऐसें रे वदूं बन्धुराया !”
म्हणुनि लागे ती मला आश्वसाया ---
“ तुझ्या दिव्यत्वापुढें जग भिकारी !
कासया ही खिन्नता---दूर सारीं !”

अशा भगिनीचा लाभ मला झाला;
तिचा आभारी दुवा देत तीतें,
समाधानी मी पातलों घरातें !

२७ ऑगस्ट १९०३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP