मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
मरणकाल

मरणकाल

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


[ याचें मूळ The Death Bed हें काव्य Thomas Hood यानें आपल्या एका बहिणीच्या मरणसमयीं लिहिलें. ]
साकी
आम्हीं तीचें श्वसन रात्रभर सचिंत हो निरखियलें,
श्वसन तिचें मृदु मन्द मन्द जें अमुच्या कानीं पडलें - ॥१॥
अह्मां त्यामुळें, तीचे वक्षीं आयुष्याची लाट
हेलकावते खालवर, असें समजायाला वाट. ॥२॥
तेव्हां आम्हीं कितीतरी पण हलक्यानें बोलावें,
सावकाशही तसें भोंवतीं फिरतांना चालावें ! ॥३॥
जाणों तीचें लांबवावया आयुष्य अम्हीं अपुल्या
अर्ध्या किम्बहुना सगळ्याही शक्ति तिला अर्पियल्या. ॥४॥
अमुच्या आशांनीं भीतीला खोटसाळ हो म्हटलें,
जसें आमच्या भीतींनेंही आशांला ठरवियलें ! ॥५॥
आम्हांला ती भासे मेली जेव्हां ती निजलेली,
आणि अहह ! निजलेली जेव्हां ती हाय ! हाय ! ती मेली. ॥६॥
कारण, नंतर पहांट आली अंधुक उदास तैशी
आणि हिभाच्या वर्षावानें काकडलेली ऐशी, ॥७॥
शिव ! शिव ! तेव्हां स्तब्धें पक्ष्में तिचीं सर्वथा मिटलीं,
- तिची आमुच्याहुनी निराळिच पहाट तेव्हां झाली ! ॥८॥
मार्च किंवा एप्रिल, १८८६.

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP