मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
रूढि-सृष्टि-कलि

रूढि-सृष्टि-कलि

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( रूढि राज्य करीत आहे, तिच्या जुलमी अंमलाखालीं लोक नाडले
जात आहेत, तरी ते सृष्टीच्या नियमांस अनुसरण्यास नाखूष असून
‘ शास्त्राद्रूढिर्बलीयसी ’ असलीं वेडगळ मतें अलंघनीय मानीत आहेत. लोक,
ज्याला कलि म्हणून भितात, तो त्यांच्या बर्‍याकरितां रूढीचा पाडाव
करण्यासाठीं झपाटयानें ग्रंथप्रसार करीत आहे. तेव्हां लौकरच रूढिअक्का
राम म्हणतील; आणि सृष्टीला लोक भजूं लागतील, असा रंग दिसत आहे. )

( शार्दूलविक्रीडित )

अज्ञानें फुगली, कुरूप अगदीं झाली, दुरी चालली
सृष्टीपासुनि रूढि; ती मग असत्सिंहासनीं बैसली.
सारे लोक पहा ! परंतु तिचिया पायीं कसे लागती,
ही कन्या दितिची असूनि इजला देवीच कीं मानिती !

देते शाप जनांप घोर, जुलमी ही दुष्ट राणी जरी,
तीं आशीर्वचनें शुभेंच गमती या मूर्ख लोकां तरी !
सृष्टीचे अमृतध्वनि दुरुनि जे कानांवरी त्यांचिया,
येती, ते परिसूनि मूर्ख सगळे घेतात चित्तीं भया !

सृष्टीनें निज भृत्य एक बलवान‍ रूढीवरी प्रेषिला,
त्याला लौकिक मूर्ख हा ‘ कलि ’ अशा नांवें म्हणूं लागला !
त्यानें कागद घेउनी सहज जे रूढीकडे फेंकिले,
त्यांहीं आसन तें तिचें डळमळूं आहे पहा लागलें !

येवी तूर्ण कले ! तुझ्या विजय तो अस्त्रांस त्या कागदी,
गाडूं ही मग रूढि विस्मृतिचिया त्या खोल खाडयामधीं !
साधो ! नांव तुझें खचीत बदलूं, बोलूं न तूतें ’ कली ’
जैजैकारुनि सृष्टिला, घ्वनि तिचा तो एक मानूं बली

दादर, ९ मार्च १८९१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP