मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
फुलांची पखरण

फुलांची पखरण

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


टिप्‍ फुलें टिप्‍ ! माझे गडे ग ! टिप्‍ फुलें टिप्‍ !
पहा फुलांची पखरण झिप ! ॥ध्रु०॥

किती सुखाची सकाळ
किती मौजेची ही वेळ;
दिशा या फांकती,
फुलें हीं फुलतीं,
पक्षी हे बोलती;

सगळयाही सृष्टिनें पहा निद्रा ती टाकिली,
प्रीती ती आशेसंगें खेळाया लागली;
तर, आनन्दें या झाडांखालीं

टिप्‍ फुलें टिप्‍ !

किती सकाळ ही सुन्दर,
जसें मुलींचें माहेर ---
जगाचे ते व्याप
दुरि तैसे संताप
मनिं न शिरे मुळिं पाप,
पुण्याची ही वेळ पहा गें ! सूर्यानें उजळीली,
आशेचिया ग वेलीवरती गाणीं तीं फुललीं;
तर, मौजेनें या वेलींखालीं

टिप्‍ फुलें टिप्‍ !

सकाळ जाइल संपून,
मग तापेल तें ऊन;
मग धन्दे कराल,
पण, फुलें हीं विसराल !
सूख कैसें पावाल ?

फिरूनी ऐशीं वेळ गडे ग ! कधिं तरि ती येइल का ?
गडे !

आनन्दामधिं आस आपुला काळ कधीं जाइल का ?
म्हणुनिम, असे जों बहर तोंवरी

टिप्‍ फुलें टिप्‍ !

पहा फुलांचि पखरण छिपू !
माझे गडे ग !
टिप्‍ फुलें टिप्‍ !

५-१२-९१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP