मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
प्रयाणगीत

प्रयाणगीत

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


चाल - [ पांडुकुमारा पार्थ नरवरा० ]
तुजविण मजला कांहि असेना प्रिय या गे जगतीं;
तूं मम जीवित, तूं मम आत्मा, तूं माझी शक्ती ! ॥१॥
तुजला सोडुनि जाणें येई, सखे ! जिवावरती,
परी ओढुनी दूर नेति या, निर्दय दैवगती ! ॥२॥
प्रीति जगाचें वसन विणितसे, वामांगीं ढकली -
धागा, परि तो परतुनि उजविस भेटतसे कुशली ! ॥३॥
मेघ विजेला नभीं सोडुनी खालीं ये, परि तो
रविदीप्तीच्या दिव्यरथीं तिज भेटाया वळतो ! ॥४॥
रवि, पूर्वेला रडत सोडुनी कष्टें मार्ग धरी,
प्रहरामागें प्रहर लोटतां तिजला घे स्वकरीं ! ॥५॥
धरेस सोडुनि गिरि जरि वरि ते उंच नभीं चढले
तरे खालते कालगतीने येती प्रेमकले ! ॥६॥
प्रीतीचा पथ वर्तुळ आहे, नर त्यानें जातां
मागें असल्या प्रियेचिया तो सहजचि ये हाता ! ॥७॥
धीर धरोनी आटप, म्हणुनी, बाष्पें मजसाठीं,
ठसा प्रीतिचा ठेवुं शेवटीं ये ग गडे ! स्वोष्ठीं ! ॥८॥
११ जानेवारीं, १८८९.

N/A

References : N/A
Last Updated : March 15, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP