मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
नैऋत्येकडील वारा

नैऋत्येकडील वारा

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( शार्दूलविक्रीडित )

जे जे वात नभांत या विचरती पुण्यप्रदेशावरी
नैऋंत्येकडला तयांत वितरी सौख्यास या अंतरीं;
येतां तो मम चित्त हें विसरुनी प्रत्यक्ष वस्तूंप्रति
अर्धोन्मीलित लोचनीं अनुभवी स्वप्नस्थिती आगुती !

तो वारा मम जन्मभूमिवरुनी येतो जवें वाहत,
हें माझ्या ह्रदयांत येउनि सवें मी ठाकलों चिन्तित;
माझ्या जन्मधरेचिया मग मनीं रूपास मी आणितों,
तीचे डोंगर उंच खोलहि नद्या डोळयांपुढें पाहतों,

मोठे उच्च, शिला किती पसरल्या सर्वत्र ज्यांच्यावरी,
तुंगे तीं शिरलीं यदीय शिखरें तैशीं नभाभीतरीं,
आस्वर्गांत चढती सदोदित महात्म्यांचीं जशीं मानसें,
या दृष्टीपुढते पुनः बघतसें अद्रीय ते हो असे !

ज्यांच्या रम्य तटांवरी पसरल्या झाडया किती सुन्दर,
ज्यांच्या थोर शिलांतुनी धबधबां जाती तसे निर्झर
वाणीचे कविदुर्दशांमधुनिया ते ओघ यावे जसे;---
या दृष्टीपुढते पुनः बघतसें अद्रीय ते हो असे !

त्यांचे उंच शिरांवरी विलसती किल्ले मराठी जुने,
देवी पालक त्यांतल्या मज पुनः धिक्कारिती भाषणें !---
“ कोठें पूर्वज वीर धीर तव ! तूं कोणीकडे पामरा !
ये येथें इतिहासपत्र पडकें वाचूनि पाहीं जरा !”

जागोजाग विराजती चलजलें पाटस्थलें तीं किती,
केळी, नारळि, पोफळी, फणस ते, आंबे तिथे शोभती;
पक्षी त्यांवरुनी नितान्त करिती तें आपुलें कुजित,
स्वप्नीं हे बघतां फिरूनि, मन हे होतें समुत्कण्ठित.

जागोजागहि दाटल्या निबिड कीं त्या राहटया रानटी.
रे पाईरहि, खैर, किंजळ, तिथें आईनही वाढती,
वेली थोर इतस्ततः पसरुनी जातात गुंतून रे,
चेष्टा त्यांमधुनी यथेष्ट करिती नानापरी वानरें !

जन्मस्थान मदीय सुन्दर असे त्या माल्यकूटांतल्या
आनन्दें वनदेवता मधुर जीं गानें भलीं गाइल्या
मज्जन्मावसरास, तीं पवन हा वेगें महा तेथुनी
मातें पोंचवितो, तयां अपुलिया पंखावरी बाहुनी !

“ गाऊं या ! ह्रदयांत या अमुचिया प्रीती असे दाटली !
गाऊं या ! ह्रदयांत या अमुचिया कां स्फूर्ति ही बाढली ?
वाग्देवीसुत जन्मला अपुलिया ग्रामांत; यालगुनी
जैजैकार करा, सुरां परिसवा हा मंगलाचा ध्वनि !”

वेगानें जगदुद्धरानदिचिया तीरांहुती वात तो
आशीर्वाद मदीय तातजननी यांचे मला आणितो;
वात्सल्यांस तयांचिया परिसुनी माझ्या मनीं येतसें---
‘ तान्हा बाळचि राहतों तर किती तें गोड होतें असें !’

आईच्या नयनांत नित्य मग मी स्वर्गास त्या पाहतों,
ताताकावरि नित्य मी मग जगद्राज्यासना भावितों,
कां हो यापरि वाढलों फुकट मी ? हा---हंत ! मी नष्ट हा !
तान्हा बाळचि राहतों तर किती तें गोड होतें अहा !

जन्मा येउनि मी उगा शिगविलें आई ! तुला हाय गे !
ताता ! भागविलें तुला फुकट मीं मत्पोषणीं हाय रे !
वार्धक्यीं सुख राहिलें, विसरणें तुम्हांस कोणीकडे !
झालों कष्टद मात्र---या मम शिरीं कां वीज ती ना पडे ?

पुष्पें वेंचित आणि गोड सुफलें चाखीत बागांतुनी
जेथें हिंडत शैशवीं विहरलों निश्चिन्त मी, तेथूनी ---
हा वारा ममताप्रसाद मजला आजोळचा आणितो;
चित्तीं विव्हल होतसें स्मरुनि, मी मातामहां वन्दितों !

बन्धूचींहि मला तशीं पवन हा आशीर्वचें आणितो,
चिन्ताग्रस्त तदीय पाहुनि मुखा अश्रूंस मी गाळितों !
भाऊ रे ! तुजलागिं लाविन कधीं मी हातभारा निज ?
तूतें सेवुनि मी सुखें मग कधीं घेईन का रे निज ?

श्वासांहीं लिहिलीं, विराम दिसती ज्यामाजि बाष्पीय ते
प्रीतीचें बरचें समर्थन असे संस्पृह्य ज्यामाजि तें,
कान्तेचीं असलीं मला पवन हा पत्रें अतां देतसे;
डोळे झांकुनि वाचितां त्वरित तीं सम्मूढ मी होतसे !

आतां प्रेमळ तीं पुनः परिसतों थोडीं तिचीं भाषणें,
चित्तीं आणुनि मी तिला अनुभवीं गोडीं तिचीं चुम्बनें !
ओठां हालवितां न मी वदतसें मागील संवाद तो;
मी काल क्रमुनी असा, जड जगा काडीवजा लेखितों !

नाहीं चैन तुला मुळी पडत ना माझ्याविना मत्प्रिये ?
तूतें आठविल्याविना दिवसही माझा न जाई सये !
केव्हां येतिल तीं दिनें न करण्या ताटातुटी आपुली ?
केव्हां त्या रजनी ?--- जियांत विसरूं मीतूंपणाला मुळीं !

माझ्या जन्मधरेपुढें दिसतसे वार्राशि विस्तीर्ण तो,
त्याचें रम्य तरंगतांडर पुनः पाहुनि आल्हादतों,
जें ह्रद्रम्य तरंगतांडव मला तैशापरी वाटतें,
अज्ञेयावरतीं जसें क्षणिक हें अस्तित्व हो खेळतें !

या अब्धीवरतूनि जात असतां बाल्यांत नौकेंतुनी,
गाणीं जीं म्हटलीं मला निजविण्या वारिस्थ देवीगणीं,
त्यांचे सूर अतां अलौकिक असे जे वात हा आणितो ---
ते ऐकून अहा ! सुषुप्ति चिर ती ध्यायास मी इच्छितों !

प्रीति या जगतांत कंटकयुता ही एक बल्ली असे,
शूलालोपणयूप त्यावरिल ही कीर्ति ध्वजा कीं दिसे;
तेव्हां या जगतीं नकोत मजला ते भोग भोगायला,
वाटे नाटक शोकसंकुल असें जीवित्व हें जायला !

देवी सागरिका ! तुम्हीं तर अतां गायनें गाइजे,
त्यांच्या धुंद अफुगुणें किरकिर्‍या बाळास या आणिजे
निद्रा दीर्घ---जिच्यामधी न कसली स्वप्नें कधी येतिल,
ती निद्रा निजतां न मन्नयन हे ओले मुळी होतिल !

१८९८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP