मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ८०

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ८०

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


भक्तश्रेष्ठ नारदमुनि । भक्तांचे मनोगत जाणोनि । आतां सांगति निर्भयपणीं । फलश्रुति भजनाची ॥११०४॥
भक्ताचें परम वांच्छित । भगवद्दर्शनीं जडला हेत । तो सफळ व्हावा मनोरथ । यालागीं नित्यसायासी ॥११०५॥
कोणे तरी प्रकारें । ईश्वरदर्शन व्हावें खरें । जेणें मनीं संदेह नुरे । सफलत होय जन्माची ॥११०६॥
तयासी व्हावें संभाषण । सकल संशयाचें छेदन । भ्रांतिचें संपूर्ण निरसन । व्हावें हाचि हव्यासा ॥११०७॥
परी हे अघटित गोष्टी । कैसेनि घडों येईल सृष्टि । यालागीं परम कष्टी । सदैव होऊनि राहिले ॥११०८॥
नाना उपाय योजिती । जो जें सांगेल तें करिती । हिंपुटी होऊनि मागुति । येती परतोनि निजठायां ॥११०९॥
परी ईश्वरदर्शन न होतां । स्वस्थता न ये त्यांचे चित्ता । पुन:पुन: तेचि आस्था । हृदयामाजी वळावे ॥१११०॥
जो जो कोणी देव दावील । अथवा दावितो असे म्हणेल । त्याचे सत्य मानोनि बोल । श्रध्दा ठेविती तयावरी ॥११११॥
आचरण करोनि पाहति । जरी नये कांहीं हातीं । तरी तयावरी न कोपती । म्हणती आपुलें दैव उणें ॥१११२॥
ऐसें एक वेळ फसले । तरी न होती हिरमुसले । आणिक कोणी सांगता भलें । नादीं लागति तयाच्या ॥१११३॥
आयुष्य वेचिति बहुमोल । द्रव्य खर्चिती बहुसाल । लोकनिंदा ऐकतां बहुल । मनीं खंति न मानिती ॥१११४॥
म्हणति आपलें काहीं चुकलें । म्हणोनि फल नाहीं लाभले । प्रयत्न करितां वाया गेले । तरी नये कंटाळा ॥१११५॥
प्रयत्न करितां कचरों नये । इतरांवरी रुसों नये । निराश कधीं होऊं नये । ऐसा निश्चय तयांचा ॥१११६॥
लोक म्हणती व्यर्थ आशा । ईश्वर तो भेटेल कैसा । योग्यतेवांचून सहसा । न ये भरीं पडों त्याच्या ॥१११७॥
परि योग्यता ते म्हणावी कैसी । कोणासी सांगतां नये सरिसी । फलासिध्दि पूर्वी कैसी ।
योग्यता आली म्हणावी ॥१११८॥
म्हणोनि प्रयत्न सिध्दिवेरी । करणे ऐसी या निर्धारी । कष्टत राहिले जन्मवरी । तयासी म्हणावें साधक ॥१११९॥
पूर्वेतिहास पाहतां । देव भेटला असे बहुतां । वायां गेला श्रम करितां । ऐसा नाही देखिला ॥११२०॥
ज्ञानी अज्ञानी जीवासी । सधन आणी निर्धनासी । लहान थोर सकलांसी । करुणा दर्शन दिधलें ॥११२१॥
देवासी आवडे भक्तिप्रेम । भावना धरील निष्काम । तरी सिध्दिसी जाईल नेम । ऐसा ठसा येथींचा ॥११२२॥
तेतुला निश्चय नाहीं । तोंवरी सिध्द नव्हे कांही । परिच्छिन्नता तेथ नाहीं । नि:सीम अमर्याद परमात्मा ॥११२३॥
म्हणोनि धीर धरावा लागतो । तेणें कार्यभाग सिध्द होतो । सकल यत्न सफळ होतो । तयाचिये कृपेंने ॥११२४॥
ईश्वरासी नित्य भजावें । संतांसी अनन्य शरण व्हावें । आचरण शुध्द राखावें । सफलता तेणें होईल ॥११२५॥
अखंड मुखीं नामस्मरण । हृदयीं त्याचें जडेल ध्यान । मन राहील एकवटून । तैं येईल प्रत्यय ॥११२६॥
सतत त्याचें स्मरण करितां । चित्तासी येईल तदाकारता । चित्त चिद्रूप हो लागतां । प्रकाश अंतरीं पडेल ॥११२७॥
न दिसें तें दिसों येईल । न भेटें तें भेंटो लागेल । न कळें तें कळों येईल । अखंड स्मरणें तयाच्या ॥११२८॥
तयासी कांहीं न लगे वेळ । ज्या क्षणीं चित्त एकवटेल । त्या क्षणीं मनीं उमटेल । सत्य साचा अनुभव ॥११२९॥
मन पावेल समाधान । स्वानुभवाची बाणेल खूण । भक्तांचे सकळ मनोरथ पूर्ण । होतील जान निश्चयें ॥११३०॥
तयाचें अखंड चिंतन । हेंचि मुख्य अंतरंग साधन । तेणेचिं तो सच्चिदानंदघन । परमात्मा संतुष्टे ॥११३१॥
येर वरकड सर्व बहिरंग । तेणें नातुडे तो श्रीरंग । स्मरणकीर्तनें होय सांग । सफळ पूर्ण मनोरथ ॥११३२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP