मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ८

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ८

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


मनुष्यप्राणी जन्मासि येतो । विविध कर्में करूं लागतो । पूर्वसंस्कारानुरूप वर्ततो । हें निश्चित सर्वांशी ॥१२३॥
कर्माचे प्रकार दोन । लौकिक आणि वैदिक जाण । लौकिक ते पोटालागून वैदिक आत्मोध्दारार्थ ॥१२४॥
उदरभरणाची व्यथा । बैसली सर्वांचे माथां । लौकिक संभाळून सर्वथा । वर्तणें लागे सर्वांशी ॥१२५॥
परी तो कोणा राखवेना । लोकापवाद चुकवेना । कोणेहि परी संतोष मना । उपजों नये संसारीं ॥१२६॥
जें जें काहीं करूं जावे । तयांसी कोणी म्हणती वरवें । कोणी कांही ठेविती नांवें । संबंध नसता काहीहीं ॥१२७॥
आपुल्या पदरचें खावें । दुसर्‍यासी निंदित जावें । उठाठेवी करीत राहावें । विनाकारण दुसर्‍याच्या ॥१२८॥
ऐसा स्वभाव जगाचा । आवरितां नावरे साचा । दोष दाविती दुसर्‍याचा । परि आपण असती तैसेची ॥१२९॥
ज्यासी सर्वत्र भगवददर्शन । तो दुसर्‍याचे दोष न पाहे जाण । सद्गुण मात्र स्वीकारून । सुधारणा करी आपुली ॥१३०॥
कर्तव्य तें मनुष्याधीन । परि फलप्राप्ति ईश्वराधीन । मनें निश्चय केला पूर्ण । सदा चित्तीं समाधान ॥१३१॥
कर्तव्य करितां चुकेना । फलापेक्षा धरीना । अनायासें संतोष मना । भार सर्व देवावरीं ॥१३२॥
व्यवहार तरी करीत आहे । परि बध्द होऊनि न राहे । अहंकार मनीं न वाहे । काहीं केल्या न केल्याचा ॥१३३॥
देवामुळें सर्व घडतें । त्याचे नि सर्व निर्वाहातें । शेखी त्यासी अर्पण होतें । मी त्याहूनि निराळा ॥१३४॥
मजवरी कांहीं बोजा नाहीं । जबाबदारी मुळीचं नाही । ईश्वरसत्तेनं सर्व काहीं । चालिले असे जगांत ॥१३५॥
ऐसी भावना धरून । अहंकारातें सांडून । लौकिक कर्माचा न्यास करोन । रत राहे चिंतनी ॥१३६॥
यासी म्हणति लोकन्यास । जेथ अहंभावाचा पूर्ण निरास । मना न शिवे अभिलाष । बाह्य विषय संगतीचा ॥१३७॥
आतां वेदोक्त जें विहित । तें वैदिक कर्म निश्चित । आचरावें हा संकेत । सृष्टिकर्त्या ईश्वराचा ॥१३८॥
जयाचें जें विहित । तें ईश्वराचें मनोगत । ऐसें बोलती निवृत्तिसुत । भगवद्बचनानुरोधें ॥१३९॥
स्वे स्वे कर्मण्यभिरत: । संसिध्दिं लभते नर: । अठरावे अध्यायीं श्रीकृष्णनाथ । अर्जुनाप्रति सांगति ॥१४०॥
स्वकर्म आपुलें आचरावें । आणि त्यांतचि रंगून जावें । तेणे संसिध्दिसि प्राप्त व्हावें । हा दंडक ईश्वराचा ॥१४१॥
विहित मार्ग आचरावा । परी अहंकारासी थारा न द्यावा । फलप्राप्तिचा लोभ न धरावा । मनामाजीं ॥१४२॥
ऐसीया बुध्दि कर्म करणें । तेंचि ब्रह्मार्पण होणें । श्रीहरीसी न विसंबणें । वैदिक कर्मप्रवाहीं ॥१४३॥
यासीच बोलिजे वेदव्यास । वैदिक कर्मीं निरलभाष । वृत्ति निरहंकार उदास । निरोध बोलिजे या नांव ॥१४४॥
भगवत्प्रेम उपजलें अंतरीं । तेणें सर्व कर्मा जाहली बोहरी । वृत्ति नये विषयावरी । अखंड ऐक्य स्वरूपीं ॥१४५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP