TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ६४

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६४

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


॥ अभिमानदंभादिकं त्याजम् ॥६४॥
तैसाचि सांडावा अभिमान । तो देहामाजीं राहिला दडून । अज्ञानाचा आश्रय करोन । पाश घाली सर्वांशी ॥७१९॥
देह असे तोंवरी । अभिमान न सांडी क्षणभरीं । लहानथोरां व्याकुळ करी । नाचवीतसे चहूकडे ॥७२०॥
अज्ञान आणि सज्ञानासी । तेणें जाकळिलें सर्वांसी । जखडोनिया देहासी । केलें आपुल्या स्वाधीन ॥७२१॥
अभिमान जडला सर्वांसी । परी तो न खपे कोणासी । वैर आणि द्वेषासी । मूळ तोचि जाणावा ॥७२२॥
अभिमान धरोनि दर्पोक्ति करितां न साहे कोणाप्रति । सहज उक्ति वरून उक्ति । वाढतां वाढे कलह ॥७२३॥
तोचि मग दुणावों लागे । सर्वांचिया लागे मागे । जन्मवरी धावतां वेगे । पाठ कांही सोडीना ॥७२४॥
अंतकालींही मोकलीना । देह पडला तरी पडेना । अनेक जन्मीच्या यातना । अजाणतणें भोगवी ॥७२५॥
देहामाजी वस्ती करी । आंत राहून पोखरी । सकल जीवांचा परम वैरी । तोचि एक जाणावा ॥७२६॥
आतां यातें कैसें त्यजावें । तेंही लागे जाणावें । अभिमान टाकून मुक्त व्हावें । बोलणें सोपें वाटलें ॥७२७॥
परी करूं जातां अति कठिण । ईश्वरसाह्य घेतल्या वीण । नव्हे कदा सोडवण । म्हणूनि त्यातें स्मरावें ॥७२८॥
त्याचें करूं लागतां स्मरण । होय आपण शक्तिहीन । हळुहळु भगवद अर्पण । होतां समूळ मावळे ॥७२९॥
ईश्वरस्मरणें होय दर्शन । सर्वांठायी त्याचेंचि ध्यान । सर्व कर्मीं सत्ता पूर्ण त्याची येई अनुभवा ॥७३०॥
सकल सत्ता तयाची । दिसों लागतां अभिमानाची । वार्ता नुरे कोठेची । ऐसा प्रभाव तयाचा ॥७३१॥
तयासी गेलिया शरण । तोचि करि निरभिमान । जन्ममरणाची सोडवण । होय तेणें केलिया ॥७३२॥
म्हणोनि अभिमान टाकावा । म्हणजे तयासी अर्पावा । देहाभिमान न धरावा । देह अर्पावा तयासी ॥७३३॥
सकल देहांचा नियंता । तोचि जाणोनि तत्वतां । त्याचे स्मरणीं निश्चलतां । पावोनि सुखें असावें ॥७३४॥
तरीच अभिमान सुटेल । नाहीं तरी बोकांडी बसेल । धिंडवडे करोनि नाडील । ऐसा जाणा निश्चय ॥ ७३५॥
तैसाचि दंभ सांडावा । सत्कर्माचा उच्चार न करावा । जगासी कांही दिसो न द्यावा । गुप्त राखावा परमार्थ ॥७३६॥
गुप्तपणें राहील । तरीच फलद्रूप होईल । उघड करितां कीड लागेल । नासूनि जाईल तात्काळ ॥७३७॥
शब्दानें अथवा कृतीनें । तयाचा बोभाटा न करणें । जगासी सोंग दाविणें । वायांवीण निष्फळ ॥७३८॥
या दांभिकपणामुळें । झालें बहुतेकांचें वाटोळे । सत्य काय तें न कळे । असत्यावरी पडिभरू ॥७३९॥
जगासी दावितां आलें । तरी आपुले कार्य झालें । ऐसिया भ्रांतिनें नाडिले । लहान थोर सर्वही ॥७४०॥
जगासी फसवितां आलें । तरी देवासी फसवितां नये भलें । तयासी अंतर्यामीचें कळे । खरें खोटें बिनचूक ॥७४१॥
तो न फसे कशाने । भीड मुरवत काहीं नेणे । जैसें कर्म तैसें देणें । हा स्वभाव तयाचा ॥७४२॥
देवासी प्रिय शुध्दभाव । न सरती आणिक उपाव । जैसा भाव तैसा देव । ठाऊकें असो सकळां ॥७४३॥
यालागीं दांभिकपणें । काहींही न करणें । दंभ अभिमान टाकिल्यावीणें । नव्हे भेटी तयाची ॥७४४॥
भाव शुध्द अंत:करण । एकाग्रमनें तयासी शरण । जातां सकळ सिध्दि पूर्ण । ऐसा नियम तेथिंचा ॥७४५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-11-24T03:22:23.6970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मुदल नासून कळांतर बुडतां

  • ( गो.) मुदलच गमावून वर आणखी व्याज बुडाल्याबद्दल हांकाटी करणें. 
RANDOM WORD

Did you know?

How I do save the text on my computer?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.