मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र २, ३

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २, ३

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


भक्ति म्हणिपे तें कवण । तियेचें मुख्य लक्षण । तेंचि करूं आतां विवरण । निश्चयात्मक अवधारा ॥५३॥
तरी भक्ति म्हणिजे तें प्रेम । ईश्वरावरी निरूपम । अस्मिन शब्दें दाविलें सुगम । अन्य विषय निषेधार्थ ॥५४॥
ईश्वर, सर्वांचे ह्रदयीं । नित्य नांदे सर्वांठायी । त्याची जाणीव कोणा नाहीं । काय नवल सांगावें ॥५५॥
देह जड अचेतन । त्याचें कोण करी चलन ।  वायुतत्वाचें स्फुरण । कोणापासव होतसे ॥५६॥
सकल इंद्रियाचें व्यापार । अथवा मनबुध्दीचे व्यवहार । चित्त अथवा अहंकार । कैसेन होती उद्यत ॥५७॥
खाल्लें अन्न पचोनिं जाते । शरीराचें शोषण करितें । पाठी शरीर निमोनी जातें । ठायीचें ठायीं ॥५८॥
निद्रा लागते सर्वांशी पुन्हा जागृती येते त्यांसी । कोण जागवी आपणासी । हें तों कोणा कळेना ॥५९॥
मातेचिये उदरांतुनी । जन्मा येताति सर्व प्राणी । दुग्ध उपजे मातेचे स्तनीं । अद्भुत करणी कोणाची ॥६०॥
नासिकेतूंन श्वासोच्छवास । वाहों लागती सावकाश । कोणें गति दिधली त्यांस । सांगा नीट विचारोनी ॥६१॥
सुषुप्तिकालीं अचेतन । जड देह राहिला पडोन । त्या कालीं साक्षित्व घेऊन । कोण राहिला त्या माजिं ॥६२॥
ऐसा साक्षी असंग चिद्रूप । ज्यासी न लगे पुण्यपाप । उपाधिचा नाहीं लेप । तें स्वरूप ईश्वराचें ॥६३॥
ईश्वर नित्य आनंदघन । प्रपंच सर्व दु:खासी कारण । व्हावया त्याचें निरसन । ईश्वरकृपा पाहिजे ॥६४॥
कृपासंपादन करावयालागीं । त्याचें प्रेम पाहिजे आंगीं । विरक्तता सर्व संगीं । असेल तरी साधेल ॥६५॥
प्रेम पाहिजे नि:सीम । तुच्छ करोनि सकळ काम । आवडी असेल निरुपम । सर्व काळ अबाधित ॥६६॥
तरीच ते म्हणजे भक्ति । जेणें होय ईश्वरप्राप्ति । प्राप्तीस्तव निश्चिती । अमरत्व पावे तत्काळ ॥६७॥
देह तव क्षणभंगुर । तो केविं होईल अमर । अमृतत्वासी ज्ञान साचार । कारण असे निश्चयें ॥६८॥
आजवरी अमर झाले । ते ज्ञानें अमरत्व पावले । पंच भौतिक अमर झाले । हे तों न घडे कल्पांती ॥६९॥
शरीर तव नाशिवंत । नासूनि जाईल क्षणांत । तयातें अमरत्वाची मात । नये बोलों सर्वथा ॥७०॥
आत्मासाक्षी नित्यमुक्त । चैतन्य घन अविरत । त्यासी अमरत्व आणावें लागत । नाहीं जाणा सत्यवें ॥७१॥
देहाभिमान आत्मयासी । तेणें नाशिवंतपण ये तयाशीं । तो गेलिया सहजेसी । अमरत्व बाणे आपैसे ॥७२॥
आत्म्यासी देहभावना । अविद्या कल्पित कल्पना । देहानुबंधे उपजवी जाणा । नाना क्लेश यातना ॥७३॥
तो देहाभिमान गेलिया । स्वरूप उरे आपैसया । अमरत्व तें ये ठाया । ठायें ठाव निश्चयें ॥७४॥
देह निरास व्हावयासी । भक्तीच कारण परियेसीं । वांचूनि अन्य उपायासी । काहीं लाग लागेना ॥७५॥
म्हणोनि भक्तीच येथ प्रमाण । जिवासी अमरत्व देऊन । निजपदी बैसवून । स्वात्मत्वेसीं मेळवी ॥७६॥
यालागीं भक्तीच अमृत स्वरूप । भगवंताचें प्रेम अमूप । असेल तरी आपेंआप । होय आत्मज्ञानीं कृतार्थ ॥७७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP