मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ७८

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७८

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


आतां व्यवहारीं वर्तावें कैसें । तेही सांगति प्रसंगविशेषें । आचरणाचे नियम तैसे । सर्वांनी अवश्य पाळावे ॥९५५॥
पांचच गोष्टी सांगितल्या । तितुक्याच जरी पूर्ण पटल्या । तरी नलगे लागे करावया ।चिंता स्वहित साधनाची ॥९५६॥
तयामाजी प्रथम । अहिंसा हाचि परमधर्म । सांगोनि करिती उपक्रम । कल्याण साधनमार्गाचा ॥९५७॥
हिंसा म्हणजे दु:ख देणें । इतरांसी काया वाचा मनें । प्राणियांचा प्राण घेणें । ऐसी स्थूल परिभाषा ॥९५८॥
क्वचित प्रसंगीं प्राणही घेतां । हिंसा नये बोलतां । बाळंतीण अडली असतां । मूल लागे मारावें ॥९५९॥
जरी हिंसा झाली मुलाची । तरी सोडवण बाळंतिणीची । वैद्यानें करितां तयाची । निंदा कोणी न करिती ॥९६०॥
सापेक्ष दृष्टया पाहातां । योग्यायोग्य विचारितां । मुलाहूनि श्रेष्ठता । दिसों आली मातेची ॥९६१॥
म्हणोनि मूल मेलें तरी मरोद्यां । परी बाळंतीण आधीं जगोद्या । ऐसा निर्णयो लवलाह्या । सर्वहीजण देताती ॥९६२॥
लौकिकदृष्टया मूल मारिलें । परी हिंसेत नाहीं जमा झालें । सापेक्षदृष्ट्या योग्य केलें । ऐसें म्हणति सर्वजण ॥९६३॥
तैसेचिं एका राजासी । जरा पातली शरीरासी । पुत्र होते बहुत त्यासी । परी गेले सर्व मरोनि ॥९६४॥
अखेरीस पट्टराणी । गरोदर बहुंता दिसांनी । पुत्र प्रसवेल या आशेनी । राजा सदैव संचिंत ॥९६५॥
तंब खबर येऊनि पोचली । प्रसूति वेदना सुरुं झाली । परी पटटराणी व्याकूल झाली । सुटका लवकर होईना ॥९६६॥
सर्वांसी प्रश्न पडला । वांचवावें कवणाला । राणिसी किंवा पुत्राला । दोहीं ठायीं अवघड ॥९६७॥
राणी वांचतां पुत्र मरेल । पुत्रासी मारितां राणी वांचेल । दोघेही जिवंत राहतील । ऐसा न संपडे उपाय ॥९६८॥
तंव त्या राणीनें सांगितले । पुत्रासीच वाचवा भलें । राजाचें मन संतोषिलें । राणीचा लोभ टाकिला ॥९६९॥
राणीचें उदर फाडून । पुत्र वांचविला बाहेर काढोन । साखर पेढे ह्त्तीवरून । राजा वांटी सर्वांसी ॥९७०॥
राजासी पुत्राची जरूरी होती । म्हणोनि राणीची सांडोनि प्रीति । वांचविले पुत्राप्रति । राज्याधार जाणोनि ॥९७१॥
येथें राणीची हिंसा घडली । परी सर्वत्र तिची ख्याति झाली । पुत्राकारणें उदार झाली । जीवितावरी आपुल्या ॥९७२॥
ऐसें हें हिसेंचे प्रकर्णं । सापेक्षतां विचारें गहन । निर्भेळ अहिंसेचे व्याख्यान । केशापरी करावें ॥९७३॥
जगांतील लौकिक मतें । ऐसेचिं हें ठरों पाहतें । अहिंसा ऐसें न्यून हिंसतें । नांव दिधले सुज्ञांनी ॥९७४॥
कमी हिंसा तेचि अहिंसा । ऐसा जगीं पडिला ठसा । हिंसा मुळीच न घडे ऐसा । नाहीं व्यवहार देखिला ॥९७५॥
स्वार्थबुध्दि जोंवरी । हिंसा घडणार तोंवरी । हिंसा अजिबात निवारी । ऐसा प्राणी दुर्लभ ॥९७६॥
देहाहंकारें स्वार्थबुध्दि । सर्वांसी जडली आधीं । अहंतेची परमावधी । आत्मज्ञाने होतसे ॥९७७॥
म्हणोनि अहिंसा खरी साधावया । आत्मज्ञान पहिजे व्हाया । त्यांवाचून केलें वांया । उपाय अहिंसा साधनार्थ ॥९७८॥
आत्मज्ञान नोहे सहज । कैसें अहिंसेचे साधेल काज । यालागीं उपजली लाज । सत्यार्थ कथनाची ॥९७९॥
परी लौकिक मतानुसारें । अहिंसा साधणें तेंचि बरें । काया वाचा मनोव्यापारें । पीडा न करणें कोणासी ॥९८०॥
ऐसा निश्चय करावा । कवणासी त्रास न व्हावा । परोपकारार्थ वेंचावा । सर्व संभार साधकें ॥९८१॥
इतरांसी दु:ख न होईल । ऐसें जरी वागतां येईल । तरी सर्वत्र समाधान नांदेल । कृपा होईल विश्वाची ॥९८२॥
आतां सत्यपदाचें व्याख्यान । मन करून सावधान । ऐका तुम्ही सकळजन । सत्य तेचि परब्रह्म ॥९८३॥
सत्य तेचि शाश्वत । तेचिं विश्वाचा आदि अंत । भगवंताचें स्वरूप सतत । तयामाजी प्रगट ॥९८४॥
सत्यमेव जयते । ऐसे सर्वत्र बोलिले जाते । सत्य तेचि टिकोनि राहतें । असत्याच्या विनाशीं ॥९८५॥
सत्यासी रिझे परमात्मा । सत्य तोचि अंतरात्मा । सत्याचा अनंत अपार महिमा । कोठावरी वर्णावा ॥९८६॥
सत्य असावें निर्भेळ । त्यासी असत्याचा लागतां मळ । दुग्धपात्रीं लवण केवळ । अणुमात्रही न साहे ॥९८७॥
सत्यासाठीं असत्य । बोलेणें नव्हे धर्मनीत । असत्यानें सत्य निपजत ऐसें । नोहे कदापि ॥९८८॥
परिणामी सत्य निपजत ऐसें । असत्य लागे वोलावया । ऐसें प्रतिपादिती वायां । विश्वासूं नये तयांवरी ॥९८९॥
सत्य त्रिकालाबाधीत । वर्तमान भविष्य भूत । सर्वकाळ अखंडित । शाश्वत स्वरूप तयाचें ॥९९०॥
असत्य पेरितां सत्य उगवें । ऐसें कोणाही नव्हे ठावें । विषवृक्षासी फल यावें । अमृताचें कैसेनि ॥९९१॥
असत्याचा व्यवहार करितां । असत्यचि उपजेल तत्वतां । म्हणोनि असत्य सांडोनि सत्यपथा ।
सत्याकारणें धरावें ॥९९२॥
सर्वकाल सत्यभाषण । सत्य मार्गाचें आचरण । सर्व व्यवहार सत्य स्मरून । साधकें करीत राहावें ॥९९३॥
सत्य सांगतां जनासी । दुखवूं नये कवणासी । कठोर भाषणें सत्यासी । बाध होईल निश्वयें ॥९९४॥
जन मन रंजनासाठीं । असत्य न बोलावी गोष्टी । माधुर्य आणि सत्य एके गांठी । जगध्दितार्थ साधितें ॥९९५॥
व्यवहार सत्याचा करावा । सत्य बोल बोलत जावा । सत्य तेचि येईल अनुभवा । सत्यमार्ग आचरतां ॥९९६॥
खोटी साक्ष देऊं नये । खोटे कागद करूं नये । विनोदार्थही बोलों नये । खोटें थट्टा मस्करीत ॥९९७॥
सहजही बोलों जातां । तीच संवय लागतां । जाणून असत्य वदतां । मन निर्ढावो लागेल ॥९९८॥
असत्याचें भय उडेल । तेचि प्रिय वाटों लागेल । तोचि प्रकृतिस्वभाव बनेल । नाश होईल परिणामी ॥९९९॥
म्हणोनि सत्यपालनाचें व्रत । आपण पाळावें सुनिश्चित । ऐसा नियम सांगितला येथ ।हितार्थ सकल जनांच्या॥१०००॥
आतां शुचिर्भूतपणाचा विचार । तोही परिसा सादर । शुध्द राखावें बाह्य शरीर । अंतर निर्मळ विवेकें ॥१००१॥
शुचिता सवाह्याभ्यंतर । हाचि शौच साधनाचा प्रकार । तेणेंवीण ज्ञानाधिकार । प्राप्त नव्हे कवणासी ॥१००२॥
शरीर आणि मन । दोन्ही शुध्द राखावीं आपण । तरीच शुचिर्भूतपण । लाभलें ऐसें जाणावे ॥१००३॥
पापकर्मापासून अलिप्त । शरीर शुध्र राखावें नित्य । पापवासनेविरहित । मन असावें आपुलें ॥१००४॥
शरीरशुध्दि होय स्वधर्माचरणें । मनाची शुध्दि विवेकश्रवणें । सत्यमागमीं नित्य राहणें ।
तेणें शुचित्व उभयंता ॥१००५॥
संताची संगति करितां । धर्मश्रध्दा वाढों लागतां । सदाचरणी मन रमतां । शरीरशुध्दि तात्काळ ॥१००६॥
शस्त्रांचे वचनानुसार । करावा सर्व बाह्याचार । स्नान संध्या वंदनादि प्रकार । यथोचित यथाकाळीं ॥१००७॥
तैसेचि नैमित्तिक उपोषणें । व्रतादिक आचरणें । भजन पूजन कीर्तन करणें । तत्पर असावें ते ठायीं ॥१००८॥
मृत्तिका जल इत्यादिकांहीं । शरीर शुध्द ठेवा ठायीं । अध्यात्म श्रवण कीर्तन उपायीं । मनाची शुध्दि साधावी ॥१००९॥
शरीर आणि मन । एके ठायीं असतीं संलग्न । एकमेकांवरी अवलंबून । असे शुचित्व तयांचें ॥१०१०॥
शरीर मलिन राह्तां । मनही अनुसर त्याचि पंथा । मन मलिन झाल्या तत्वतां । शरीरशुध्दि न साधे ॥१०११॥
शरीराहूनि मनाचें । शुचित्व साधणें महत्वाचें । मन शुध्द राहिल्या शरीराचें । शुचित्व नोहे अवघड ॥१०१२॥
केवळ शरीराचे शुचिर्भूतपण । उपयोगार्थ नव्हे जाण । पापसंकल्पें मन मलिन । जाहल्या दोन्ही बिघडती ॥१०१३॥
म्हणोनि या दोहींचे शुध्द्यर्थ । सत्समागम बोलिला यथार्थ । तेणेचि साधेल परमार्थ ।कर्म उपासना ज्ञानमार्गे ॥१०१४॥
आचरणासी लागेल वळण । एकाग्र करितां होईल मन । परोक्ष अपरोक्ष ज्ञानसाधन । होईल संतसंगति ॥१०१५॥
असो आतां चतुर्थ साधन । दया ऐसें कथिलें जाण । त्याचेंही करूं विवेचन । स्वस्थचित्तें आईका ॥१०१६॥
दया ऐसी जे म्हणितली । ते अंत:करणी पाहिजे उदयिली । वरिवरि दावितां नये भली । अकल्पितपणें ॥१०१७॥
हा तो धर्म मनाचा । आपणाविरहित भावनेचा । व्यापक स्वरूप प्रत्ययाचा । आत्मविकासासी मूळ ॥१०१८॥
आत्मा एक चराचरीं । विश्वव्यापक विश्वंभरी । त्याचीं रूपें नानापरी । सर्वत्र राहिलीं भरोनि ॥१०१९॥
श्रीमंत आणि दरिद्री । संपन्न आणि भिकारी । सज्ञान अज्ञान ऐशापरी । विखुरलीं आहेति सर्वत्र ॥१०२०॥
हा भेद पूर्वकर्मानुसार । कोणी नाहीं गुन्हेगार । आपआपुला प्रारब्ध प्रकार । भोग भोगवीं सकळा ॥१०२१॥
ज्याचें कर्म तयासी । भोग भोगवी निश्चयेंसी । काय प्रयोजन दयेसी । किं निमित्त करावी? ॥१०२२॥
दरिद्री जे असतील । किंवा रोगें पीडित होतील । ते भोग भोगूनि मोकळे होतील । तेव्हां सुटका तयाची ॥१०२३॥
तयांवरी दया करणें । त्यांसी साह्य करावया धावणें । म्हणजे ईश्वरासी विरोध करणें । जेणें नेमिले फलभोगा ॥१०२४॥
यालागीं दया करणें अनुचित । भोग भोगूं द्यावे नियमित । आड येऊं नये किंचित । ऐसें मत कांहीचें ॥१०२५॥
परी येथ उठिली कल्पना । प्रारब्धभोग तो कळेना । आगाऊ त्याची सूचना । केली नाहीं ईश्वरें ॥१०२६॥
ज्या ईश्वरें भोग निर्मिले । तेणेचि सुटकेचे उपाय भले । काहीं नसतील । योजिले । ऐसें म्हणों येईना ॥१०२७॥
भोगांचा जो नियमिता । तोचि सुटकेचा मार्ग दाविता । कां न व्हावा हा प्रश्न चित्ता । समोर येऊन उभा ठाके ॥१०२८॥
प्रारब्धानें भोग भोगिती । तैसेचि सुटका कां न पावती । काहीचिं आधीं न कळे निश्चिति ।
मग प्रयत्न कां न करावा ॥१०२९॥
फलप्राप्ति ईश्वराधीन । परि कर्तव्य असे मनुष्याधीन । ईश्वर आज्ञा प्रमाण मानून । सदा वर्तत असावें ॥१०३०॥
ईश्वराज्ञा पाहों जाता । भूतमात्रीं सदयता । दु:खिताकारणें विशेषता । अहोरात्र कष्टावें ॥१०३१॥
असावे परोपकाररत । दु:खनिवारणीं उद्यत । काया वाचा मन संतत । परिहारार्थ वेचावें ॥१०३२॥
तेणें होय प्रसन्न ईश्वर । चालवी योगक्षेमभार । चिंता करावी अणुमात्र । सांकडें घालितां ॥१०३३॥
कर्मानुसार भोग भोगिती । परि तोचि सोडवितो निश्चिति । कर्तव्य करितां आठवण ॥१०३४॥
दैव संपत्तीचें लक्षण । भूतमात्रीं दया पूर्ण । लहान थोर हा भेद सांडून । सदा तत्पर असावें ॥१०३५॥
आणिकही एक असे । दया उपजे स्वभाववशें । तेथ कृत्रिमता काहीं नसे । सहज प्रवेशे शुध्दहृदयीं ॥१०३६॥
दुसर्‍याचे दु:खे होणें । किंवा इतराचें सुखें संतोष पावणें । ही सामान्य नव्हेति लक्षणें ।
असाध्य ईश्वरकृपेविण ॥१०३७॥
म्हणोनि दया बोलिला दैवी गुण । जयापासीं येईल दिसोन । तो ईश्वरांश जाणा खुण । पूर्ण प्रसादलक्षण ॥१०३८॥
आतां राहिलें अस्तिक्य । जेणें साधे ईश्वरैक्य । नारदमुनीचें मधुर वाक्य । श्रवणीं असा सादर ॥१०३९॥
आस्तिक्य म्हणजे ईश्वरनिष्ठा । सकल गुणांमाजी वरिष्ठा । जेणें पाविजे परमश्रेष्ठा । पदवी भगवतंकृपेची ॥१०४०॥
ईश्वर आहे किंवा नाही । ऐसिया संदेहप्रवाहीं । वाहवले बहुत नरदेही । संशयमाजीं बुडाले ॥१०४१॥
प्रत्यक्ष तो दिसत नाहीं । आजवर कोणीं पाहिला नाहीं । पहिला ऐसा जे म्हणिति । तेही दाखवूं न शकति ॥१०४२॥
असेल खरा तरी दावा । न दावितां व्यर्थ हांवा । मानवेल त्यानें मानावा । व्यर्थ वाद ते विषयीं ॥१०४३॥
पहिला ऐसा जे म्हणति । तेही दाखवूं न शकति । न पाहतां व्यर्थ शिणति । वादावादीं सामान्य जन ॥१०४४॥
ईश्वर जड वस्तूं नाहीं । जें दावितां येईल कहीं । अनुमानानें सिध्दि कांहीं । करों येते तयाची ॥१०४५॥
तो तरी सर्वभूतहृदयस्थ । सर्वांचें ठायीं नित्य वसत । परी कैसे प्राणी दैवहत । तयांसीच नोळखती ॥१०४६॥
ज्ञान सकळ जीवाठायीं । अमूर्त राहाटे सर्वेंद्रियी । श्रवण नेत्र हातपायीं । व्यवहारसिध्दि करी तसे ॥१०४७॥
ज्ञानधर्म तेंचि चैतन्य । सर्वांठायी त्याचें प्राधान्य । नलगे कांहीं प्रमाण अन्य । सिध्दि त्याची करावया ॥१०४८॥
व्यष्टि रूपें जे ज्ञान । तोचि समिष्टिरूपें ईश्वर जाण । सर्वज्ञ सकळ सामर्थ्यवान् । हेचि खूण वयाची ॥१०४९॥
तोचि व्यापक सर्वगत । सर्वांचें अंतर्याम जाणत । आपणचि बनूनि सकल जगत । सर्वाचें करी रक्षण ॥१०५०॥
तो कधीं नाहीं जन्मला । त्यासी मृत्यु नये आणिला । अमूर्तपणें शाश्वत पदाला । पावला आपण अनायासें ॥१०५१॥
ज्यासी जन्ममरण नाहीं । ज्ञान जया विरहित नाहीं । त्याचे आनंदासी पार नाहीं ।सच्चिदानंद स्वरूप तयाचें ॥१०५२।
जोंवरीं स्वदेहाची ममता । विषयांची लोलिंगता । तोंवरी नये ओळखतां । बहिर्मुखपणें तयासी ॥१०५३॥
जोंवरी मन विषयासक्त । तोंवरी कहीं दिसों न येत । त्याचें ठायीं जडल्या चित्त । न लगे आन उपाय ॥१०५४॥
तो सकळ सत्ताधीश । प्राणियांचे निवारी क्लेश । स्मरण करितां सावकाश । सकल आपदा परिहारी ॥१०५५॥
तो तरी नित्य सिध्द । स्मरण होतां नुरे भेद । भक्तां देऊनि अभयपद । मुक्त करी संसारीं ॥१०५६॥
त्यासी सर्व समसमान । जे जन्मा आले अवघे जन । तयांसी वेद दिधलें शासन । तदनुसार वर्ताया ॥१०५७॥
वेदाचें स्पष्ट विवरण । कराया झालीं शास्त्रें निर्माण । मंत्रद्रष्टे ऋषीं जाण । तेणें निर्मिलें संकल्पमात्रें ॥१०५८॥
तिहीं धर्म दिधला नेमून । प्राण्याचें साधिलें कल्याण । तदनुसार वर्ततां जाण । ऐहिक परत्रीं होय सुख ॥१०५९॥
ईश्वरावरी दृढ विश्वास । आज्ञापालनीं सतत हव्यास । तेचिं आस्तिक्य बोलिले खास । संदेह नाहीं येविषयीं ॥१०६०॥
त्याचें मूळ स्वरूप निर्गुण । भक्तकार्यार्थ होय सगुण । निर्गुण तोचि झाला सगुण । सगुण निर्गुण एकरूप ॥१०६१॥
पाण्याचें बर्फ झालें । थंडपणें गोठून राहिलें । पाठीं उष्णतेनें वितुळलें । नव्हे उदकपणाविरहिता ॥१०६२।
सगुण निर्गुणरूपें एक । ईश्वरचि विश्वव्यापक । धर्मरक्षणार्थ वेगळिक । दावी साकार बनूनि ॥१०६३॥
साकार तोचि निराकार । येथें भेदासी नाहीं थार । कनक झाले कुंडलाकार । न मुके सुवर्णपणासी ॥१०६४॥
गीतेमाजी प्रतिपादलें । निर्गुण तेचि सगुण झालें । मायायोगें जन्म पावलें । ऐसें दिसे प्रत्यक्ष ॥१०६५॥
परि मरण नाहीं तयासी । नाश न पावे निश्वयेंसी । आधार सकल जगतासी । आपण होऊनि राहिले ॥१०६६॥
तो जरी दिसते नाही । तरी त्यासी दिसे सर्व काही । त्याचे आज्ञें वर्ततां पाहीं । साधे आपुलें कल्याण ॥१०६७॥
तो सर्वव्यापी सर्वगत । सर्वाचें हृदयीं नांदत । त्यावरि ठेवोनियां हेत । सर्वकाळ रमावें ॥१०६८॥
सतत स्मरावें तयासी । असावें दृढ विश्वासी । आज्ञापालन निश्वयेंसी । आस्तिक्य तेचिं अवधारा ॥१०६९॥
या पांचही गुणांचे आचरणें । अनुषंगिक इतर लक्षणें । सात्विक कर्म अनुष्ठानें । बहुतेक उध्दरिलें ॥१०७०॥
असो आतां मुख्य धर्म । सर्वधर्माचे निजवर्म । जेणें सकल जन्मकर्म । सांग होय सार्थक ॥१०७१॥
ते सांगति प्रतिज्ञेसी । ऐका पूर्ण आदरेसी । जेणें सकल कार्यासी । होय सिध्दि सफलता ॥१०७२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP