मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ६८

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६८

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


बोलों जातां बोलतां नये । रोमांच अंगावरी ये । नेत्रांतून जल वाहे । कळवळा उपजे जीवांचा ॥७८८॥
म्हणे प्राणी अज्ञानी । आपलें स्वहित नेणती कोणी । संसाराचें दुर्गमवनीं । फसोनि राहिले व्यामोहें ॥७८९॥
स्त्री पुत्र गृह धन । यावरी ममता धरून । प्रपंचाशी अडकले पूर्ण । माझें माझें म्हणोनि ॥७९०॥
ऐसियांची सोडवण । कैसेनि होईल जाण । यालागीं भक्तिमार्गासी लावून । उपदेशित परोपरी ॥७९१॥
कथाकीर्तन प्रवचन । करूनि सर्वांचें अंत:करण । वेधूनि करविती भगवत्स्मरण । उपाय एकचि एकला ॥७९२॥
म्हणति ईश्वरातें । ओळखाल त्याचें चिंतन करीत राहाल । तरी तो तुम्हांसी सोडवील । या प्रपंचपाशापासोनि ॥७९३॥
सकल दु:ख हरील तुमचें । योगक्षेम चालवील साचें । मग कारण नाहीं चिंतेचे । व्हाल निर्भय त्याचेनि ॥७९४॥
प्रपंचाची चिंता वाहतां । आणि ईश्वरातें विसरूनि जातां । तेणें काहीं नये हातां । पश्चात्तापासी पावाल ॥७९५॥
जितुकी आस संसाराची । तितुक्याहून अर्ध साची । जरी राखाल ईश्वराची । तरी चिंता करणें नलगे ॥७९६॥
भगवद् चिंतन न करितां । नुसधीच करीत बसाल चिंता । तरी ते न सरे कल्पांता । दु:ख दारुण भोगाला ॥७९७॥
यालागीं स्मरावें तयासी । तेणें कार्यसिध्दि अपैसी । ऐसा उपदेश सर्वांसी । शुध्दभावें आचरा ॥७९८॥
तैसेचि शुध्द आचरण । ईश्वर आज्ञेचें करा पालन । तेणें होईल निर्दळण । कामकोधादि षड्वर्गा ॥७९९॥
निर्मळ आचरण जयाचें । तयावरी प्रेम भगंवताचें । जाणोनि नियम सदा तयाचे । करा निश्चयें पालन ॥८००॥
शुध्द आचरण सत्संगति । अखंड नामस्मरणीं रति । हेचि मार्ग साधकांप्रति । संत महंति निरूपलें ॥८०१॥
ज्ञान नसेल तरी नसो । परि ईश्वरप्रेम हृदयीं वसो । ऐसा हा निर्धार ठसो । तुमचे हृदयीं सर्वकाळ ॥८०२॥
येणेचिं मार्गें बहुत । आजवरि गेले साधुसंत । उपेक्षा न करितां येथ । निश्चयेंसी तराल ॥८०३॥
ऐसें बहुत कळवळ्यानें । सांगतीं परम आस्थेनें । सद्गदित कंठमनें । नेत्रीं अश्रु आणोनि ॥८०४॥
उपदेश नित्य ऐसा करिती । कांही न मागति कोणाप्रति । कोणाचेही न दुखविती । अंत:करण कटु शब्दें ॥८०५॥
ऐकतांचि श्रोतेजन । पावोनि परम समाधान वर्तोहीं लागती तत्क्षण । निश्चित निर्भय होवोनि ॥८०६॥
निर्लोभ आनि निरपेक्ष । श्रवणीं पडतां उपदेश । मानों लागे सावकाश । सुख वाटे सकलांसी ॥८०७॥
अहंता सांडोनि बोलती । ते सकलांसी प्रिय होती । अभिमान श्रोत्यांचा हारविती । मुक्त करिती तात्काळ ॥८०८॥
श्रोते म्हणिति नवल झालें । आजि परब्रह्म फळलें । घरच्या घरीं आम्हां लाधलें । परमकल्याण निधान ॥८०९॥
त्यांचिये देखी इतरजन । तेही करूं लागती भजन । पावोनियां समाधान । म्हणति धन्य भाग्य आमुचें ॥८१०॥
ऐसी समस्तही धरणी । पावन होय त्यांचेनि । एक हरिभक्त जन्मतां जनीं । सकळ पृथ्वी पावन ॥८११॥
पृथ्वीचा भार होय हलका । तेणें संतोष पावोनि निका । प्रसन्न होय जनलोकां । सर्वत्र सुखसमृध्दि करी ॥८१२॥
पृथ्वी म्हणे मी पावन । झालें सद्भक्तां जन्म देऊन । जे इतरांसीही उध्दरून । स्वयें आपणा उध्दरिती ॥८१३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP