मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|द्वितीय परिच्छेद|
तिथिनिर्णयः

द्वितीय परिच्छेद - तिथिनिर्णयः

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
अथसंवत्सरप्रतिपदमारभ्य तिथिकृत्येचकृष्णादिंव्रतेशुक्लादिमेवच विवाहादौचसौरादिंमासंकृत्येविनिर्दिशेदितिब्राह्मंप्रायशोनुसृत्यतिथिनिर्णयस्तत्कृत्यंचनिरुप्यते तत्रमीनसंक्रांतौपश्चात्षोडशघटिकाः पुण्यकालः रात्रौतुनिशीथात्प्राक्परतश्चसंक्रमेपूर्वोत्तरदिनार्धंपुण्यंनिशीथेतुदिनद्वयंपुण्यमितिसामान्यनिर्णयादवसेयम् ।


आतां “ तिथिकृत्याविषयीं कृष्णपक्षादि, व्रतांविषयीं शुक्लपक्षादि व विवाहादिकार्यांविषयीं सौरादि महिना घ्यावा ” ह्या ब्राह्मवचनाला प्रायशः अनुसरुन संवत्सर प्रतिपदेला आरंभ करुन तिथिनिर्णय व तिथिकृत्यें सांगतो. चैत्रमासनिर्णय - त्यांत मीनसंक्रांतीचे ठिकाणीं पुढच्या सोळा घटका पुण्यकाळ. रात्रीं मीनसंक्रांत असतां मध्यरात्रीच्या पूर्वीं असेल तर पूर्व दिवसाचें उत्तरार्ध पुण्यकाळ, मध्यरात्रीच्या पुढें संक्रांत असेल तर पुढच्या दिवसाचें पूर्वार्ध पुण्यकाळ, मध्यरात्रीं झाली तर पूर्व दिवशीं व पर दिवशीं दोन्ही दिवशीं पुण्यकाळ, असा सामान्य निर्णयावरुन हा पुण्यकाळ समजावा.

अथतिथिनिर्णयः तत्रचैत्रशुक्लप्रतिपदिवत्सरारंभः तत्रौदयिकीग्राह्या चैत्रेमासिजगद्ब्रह्माससर्जप्रथमेहनि शुक्लपक्षेसमग्रंतुतदासूर्योदयेसतीतिहेमाद्रौब्राह्मोक्तेः दिनद्वयेतव्द्याप्तावव्याप्तौवापूर्वैव तदुक्तं ज्योतिर्निबंधे चैत्रेसितप्रतिपदियोवारोर्कोदयेसवर्षेशः उदयद्वितयेपूर्वोनोदययुगुलेपिपूर्वः स्यात् यस्माच्चैत्रसितादेरुदयाद्भानोः प्रवृत्तिरब्दादेरिति वत्सरादौवसंतादौबलिराज्येतथैवच पूर्वविद्धैवकर्तव्याप्रतिपत्सर्वदाबुधैरितिवृद्धवसिष्ठोक्तेः चैत्रमासस्ययाशुक्लप्रथमाप्रतिपद्भवेत् तदह्निब्रह्मणः कृत्वासोपवासस्तुपूजनं संवत्सरमवाप्नोतिसौख्यानिभृगुनंदनेतिहेमाद्रौविष्णुधर्मोक्तेः यदातुचैत्रोमलमासोभवतितदादैव कार्यस्यतत्रनिषिद्धत्वाच्छुद्धेमासिसंवत्सरारंभः कार्यइतिकेचिदाहुः निष्कर्षस्तु शुक्लादेर्मलमासस्यसोंतर्भवतिचोत्तरइत्यादिवचनादग्रिमवर्षांतः पातान्मलमासमारभ्यैववर्षप्रवृत्तेः शुक्रास्तादाविवमलमासएवकार्यइतिवयंप्रतीमः ननुशुक्रास्तादौचैत्रशुक्लप्रतिपदंतरस्याभावाद्युक्तंतन्मध्यएवानुष्ठानं मलमासेतुशुद्धप्रतिपदंतरस्यसंभवात् शुद्धएववत्सरारंभोयुक्तइतिचेत्‍ भ्रांतोसि नहिप्रतिपदंतरसत्त्वंप्रयोजकं द्विःकरणापत्तेः वर्षेशद्वयापत्तेश्च अपितुवत्सरारंभः सतुमलमासेपीत्युक्तंप्राक नहिचैत्रशुक्लादिर्मलमासः पूर्ववर्षेंऽतर्भवतीतिब्रह्मणापिसुवचम्‍ तत्रतैलाभ्यंगोनित्यः वत्सरादौवसंतादौवलिराज्येतथैवच तैलाभ्यंगमकुर्वाणोनरकंप्रतिपद्यतइतिवसिष्ठोक्तः ।

आतां तिथिनिर्णय सांगतो - चैत्रशुक्लप्रतिपदेंस संवत्सराचा आरंभ होतो, त्या विषयीं प्रतिपदा सूर्योदयव्यापिनी घ्यावी; कारण, “ चैत्रमासीं शुक्लपक्षीं प्रथम दिवशीं सूर्योदयीं ब्रह्मदेवानें सर्व जग निर्माण केलें ” असें हेमाद्रींत ब्राह्मवचन आहे. दोन दिवशीं उदयव्यापिनी असो किंवा नसो तथापि पूर्वदिवशींच करावी. तेंच ज्योतिर्निबंधांत सांगितलें, तें असें :- “ चैत्रशुद्ध प्रतिपदेस सूर्योदयीं जो वार तो वर्षेश ( वर्षपति ) होय. दोन दिवशीं सूर्योदयीं प्रतिपदेस वार असतां पूर्व घ्यावा, व नसतांही पूर्व घ्यावा; कारण, चैत्रशुक्लाचा आदि जो सूर्योदय, त्यापासून वर्षाचे आदीची प्रवृत्ति ( आरंभ ) होते. ” “ वर्षप्रतिपदा, वसंतऋतूचा आरंभ, बलिप्रतिपदा यांचे ठायीं पूर्वविद्धा प्रतिपदा घ्यावी ” असें वृद्धवसिष्ठवचन आहे. “ चैत्रमासाचे शुक्लपक्षाची जी पहिली प्रतिपदा, त्या दिवशीं उपोषण करुन ब्रह्मदेवाचें पूजन करावें. तेणेंकरुन वर्षपर्यंत अनेक सुखें प्राप्त होतात ” असें हेमाद्रींत विष्णुधर्मवचन आहे, यास्तव पूर्वविद्धाच करावी. जेव्हां चैत्र मलमास होईल तेव्हां देवकार्यें त्या मलमासांत करण्याविषयीं निषिद्ध असल्यामुळें शुद्धमासीं संवत्सरारंभ करावा, असें केचित्‍ सांगतात. खरोखर म्हटलें म्हणजे - “ शुक्लपक्षादि मलमास प्राप्त असतां तो मलमास पुढच्या शुद्ध मासांत अंतर्भूत होतो ” इत्यादि वचनांवरुन तो मलमास पुढच्या वर्षांत पडल्यामुळें मलमास धरुनच वर्षाची प्रवृत्ति ( प्रारंभ ) झाल्यानें - शुक्र, गुरु यांचे अस्तादिकांमध्यें जसा संवत्सरारंभ होतो तसा - मलमासांतच संवत्सरारंभ करावा, असें आम्हीं ( कमलाकरभट्ट ) समजतों. शंका - शुक्रादिकांचे अस्तादिकांत दुसरी चैत्रशुक्लप्रतिपदा नसल्याकारणानें अस्तादिकांमध्येंच वर्षारंभ करावा हें युक्त आहे. मलमासांत तर दुसर्‍या शुद्ध प्रतिपदेचा संभव असल्यामुळें शुद्धमासींच नवीन वर्षाला आरंभ करावा हें योग्य आहे, असें म्हणूं ? समाधान - असें जर म्हणशील तर तूं भ्रांत आहेस. कारण, दुसर्‍या प्रतिपदेस वर्षारंभ करण्यास दुसरी प्रतिपदा असणें हें प्रयोजक आहे काय ? नाहीं; कारण, तें प्रयोजक मानलें तर दोन वेळां संवत्सरारंभ करावा, असें प्राप्त होईल. आणि वर्षेशही दोन प्राप्त होतील. तर संवत्सराचा आरंभ तो मलमासांतही होतो, असें पूर्वीं सांगितलें आहे. चैत्रशुक्लादि मलमास पूर्व वर्षांत अंतर्भूत होतो, असें ब्रह्मदेवास तरी सांगतां येईल काय ? कोणासही सांगतां येणार नाहीं. चैत्रशुद्धप्रतिपदेस तैलाभ्यंग नित्य आहे; कारण, “ वर्षाचा प्रथम दिवस, वसंताचा प्रथम दिवस, बलिराज्य ( बलिप्रतिपदा ) यांचे ठायीं तैलाभ्यंग न करणारा नरकार जातो ” असें वसिष्ठवचन आहे.

अस्यामेवनवरात्रारंभः तदुक्तंमार्कंडेयपुराणे शरत्कालेमहापूजाक्रियतेयाचवार्षिकीति तत्रपरयुतैव ग्राह्या अमायुक्तानकर्तव्याप्रतिपच्चंडिकार्चने मुहूर्तमात्राकर्तव्याद्वितीयादिगुणान्वितेतिदेवीपुराणात् तिस्रोह्येताः पराः प्रोक्तास्तिथयः कुरुनंदन कार्तिकाश्वयुजोर्मासोश्चैत्रेमासिचभारतेतिहेमाद्रौब्राह्मोक्तेः पराः परयुताः अत्रविशेषः पारणानिर्णयश्चशारदनवरात्रेवक्ष्यते ।

याच प्रतिपदेस नवरात्रारंभ. तें मार्कंडेयपुराणांत सांगितलें आहे. तें असें - “ शरत्कालीं व वर्षारंभकालीं महापूजा करितात. ” त्या नवरात्राविषयीं प्रतिपदा द्वितीयायुक्तच घ्यावी; कारण, “ चंडिकार्चनाविषयीं अमायुक्त प्रतिपदा न करावी, मुहूर्तमात्र असली तरी द्वितीयायुक्त करावी ” असें देवीपुराणांत वचन आहे; आणि “ कार्तिक, आश्विन, व चैत्र ह्या तीन महिन्यांच्या प्रतिपदा तिथि परा कराव्या. ” असें हेमाद्रींत ब्राह्मवचन आहे. येथें सांगावयाचा विशेष व पारणानिर्णय हा आश्विनमासांत पुढें सांगूं.

अत्रप्रपादानमुक्तमपरार्केभविष्ये अतीतेफाल्गुनेमासिप्राप्तेचैत्रमहोत्सवे पुण्येह्निविप्रकथितेप्रपादानंसमारभेदित्युपक्रम्य ततश्चोत्सर्जयेद्विद्वान्मंत्रेणानेनमानवः प्रपेयंसर्वसामान्याभूतेभ्यः प्रतिपादिता अस्याः प्रदानात्पितरस्तृप्यंतुहिपितामहाः अनिवार्यंततोदेयंजलंमासचतुष्ट्यमिति तथा प्रपांदातुमशक्तेनविशेषाद्धर्ममीप्सुना प्रत्यहंधर्मघटकोवस्त्रसंवेष्टिताननः ब्राह्मणस्यगृहेदेयः शीतामलजलः शुचिः तत्रमंत्रः एषधर्मघटो दत्तोब्रह्मविष्णुशिवात्मकः अस्यप्रदानात्सकलाममसंतुमनोरथाः अनेनविधिनायस्तुधर्मकुंभंप्रयच्छति प्रपादानफलंसोऽपिप्राप्नोतीहनसंशयइति ।

या प्रतिपदेस प्रपादान ( वाटसरांस पाणी देणें ) सांगतो - अपरार्कांत - भविष्यांत “ फाल्गुनमास जाऊन चैत्रमहोत्सव प्राप्त झाला असतां ब्राह्मणानें सांगितलेल्या शुभ दिवशीं प्रपादानाचा आरंभ करावा. ” असा उपक्रम करुन पुढें सांगतो “ या ( पुढें सांगितलेल्या ) मंत्रानें तिचा उत्सर्ग करावा, तो मंत्र असा - प्रपेयं सर्वसामान्या भूतेभ्यः प्रतिपादिता ॥ अस्याः प्रदानात्पितरस्तृप्यंतु हि पितामहाः ॥  या मंत्रानें उत्सर्ग करुन चार महिने प्राणिमात्रांस जल द्यावें. ” तसेंच “ चार महिने प्रपादान करण्याला शक्ति नाहीं, पण विशेष धर्म व्हावा अशी इच्छा करणारानें प्रतिदिवशीं वस्त्रानें मुखाला वेष्टन केलेला असा धर्मघट ब्राह्मणाच्या घरीं द्यावा, तो थंड स्वच्छ पाण्यानें भरलेला व शुद्ध असावा. त्याचा मंत्र - एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ॥ अस्य प्रदानात्सकला मम संतु मनोरथाः ॥ या विधीनें जो धर्मघट देईल तोही प्रपादानाचें फल पावेल यांत संशय नाहीं. ”

चैत्रशुक्लतृतीयायां गौरीमीश्वरसंयुतांसंपूज्यदोलोत्सवंकुर्यात् तदुक्तंनिर्णयामृतेदेवीपुराणे तृतीयायांयजेद्देवींशंकरेणसमन्वितां कुंकुमागरुकर्पूरमणिवस्त्रसुगंधकैः स्रग्गंधधूपदीपैश्चदमनेनविशेषतः आंदोलयेत्ततोवत्सशिवोमातृष्ट्येसदेति अत्रचतुर्थीयुताग्राह्या मुहूर्तमात्रसत्त्वेपिदिनेगौरीव्रतंपर इतिमाधवोक्तेः अत्रैवसौभाग्यशयनव्रतमुक्तंमात्स्ये वसंतमासमासाद्यतृतीयायांजनप्रिये सौभाग्यायसदास्त्रीभिः कार्यंपुत्रसुखेप्सुभिरिति तत्रापिपरयुतैव ।

तृतीया - चैत्रशुक्ल तृतीयेस ईश्वरयुक्त गौरीचें पूजन करुन मासपर्यंत दोलोत्सव करावा. तो निर्णयामृतांत देवी - पुराणांत उक्त आहे, तो असा - “ तृतीयेस शिवयुक्तदेवीचें कुंकुम, अगुरु, कर्पूर, मणि, वस्त्र, सुगंधिद्रव्यें, माला, गंध, धूप, दीप व दमनक ( दवणा ) यांनीं पूजन करुन शिवपार्वतींच्या संतोषार्थ शिवयुक्त देवीला पाळण्यांत घालून आंदोलन करावें. ” ह्या दोलोत्सवाविषयीं चतुर्थीयुक्त तृतीया घ्यावी; कारण, “ दुसर्‍या दिवशीं जरी तृतीया एक मुहूर्त उर्वरित असली तरी त्या दिवशींच गौरीव्रत करावें ” असें माधववचन आहे. याच तृतीयेस सौभाग्यशयनव्रत सांगतों - मत्स्यपुराणांत - “ वसंतमास प्राप्त झाला असतां तृतीयेस पुत्रसुखेच्छु स्त्रियांनीं सौभाग्य प्राप्त होण्यासाठीं सौभाग्यशयनव्रत करावें. ” - ह्याविषयींही चतुर्थीयुक्तच तृतीया घ्यावी.

इयंचमन्वादिरपि अत्रैवप्रसंगात्सर्वमन्वादिनिर्णय उच्यते ताश्चोक्तादीपिकायां तिथ्यग्नीनतिथिस्तिथ्याशेकृष्णेभोनलोग्रहः तिथ्यर्कौनशिवोश्वोमातिथीमन्वादयोमधोरिति तिथिः पूर्णिमा अग्निस्तृतींया नेतिवैशाखेनास्तीत्यर्थः आशादशमी कृष्णेभःकृष्णाष्टमी अनलस्तृतीया ग्रहोनवमी अर्कोद्वादशी नेतिमार्गशीर्षेनास्तीत्यर्थः शिवएकादशी अश्वःसप्तमी मघोश्चैत्रादारभ्यैतामन्बादय इत्यर्थः अत्रमूलवचनानिहेमान्द्यादेर्ज्ञेयानि एताश्चमन्वादयोहेमाद्रिमतेशुक्लपक्षस्थाः पौर्वाह्णिकाः कृष्णपक्षस्थाआपराह्णिकाग्राह्याः पूर्वाह्णेतुसदाग्राह्याः शुक्लामनुयुगादयः दैवेकर्मणिपित्र्येचकृष्णेचैवापराह्णिकाइतिगारुडवचनात् अथोमन्वादियुगादिकर्मतिथयः पूर्वाह्णिकाः स्युः सितेविज्ञेयाअपराह्णिकाश्चबहुलेइतिदीपिकोक्तेश्च कालादर्शेत्वपराह्णव्यापित्वंमन्वादिषूक्तंतत्त्वयुक्तमितियुगादिनिर्णयेवक्ष्यामः ।

ही तृतीया मन्वादिकही आहे. येथेंच प्रसंगेंकरुन सर्व मन्वादितिथींचा निर्णय सांगतों. त्या सांगतो - दीपिकेंत “ चैत्रांत शुक्लतृतीया व पौर्णिमासी, वैशाखांत नाहीं, ज्येष्ठांत पौर्णिमा, आषाढांत शुक्लदशमी व पौर्णमासी, श्रावणकृष्ण अष्टमी, भाद्रपदांत शुक्लतृतीया, आश्विनांत शुक्लनवमी, कार्तिकांत शुक्लद्वादशी व पौर्णिमा, मार्गशीर्षांत नाहीं, पौषांत शुक्ल एकादशी, माघांत शुक्लसप्तमी, फाल्गुनांत पौर्णमासी व अमावास्या, ह्या तिथि मन्वादिक होत. याविषयीं मूलवचनें हेमाद्रि इत्यादि ग्रंथीं पाहावीं. ह्या मन्वादितिथि हेमाद्रिमतीं शुक्लपक्षांतल्या पौर्वाह्णिका व कृष्णपक्षांतील आपराह्णिका घ्याव्या; कारण, “ मन्वादि व युगादि तिथि दैवपित्र्यकर्माविषयीं शुक्लपक्षांतील पूर्वाह्णव्यापिनी व कृष्णपक्षांतील अपराह्णव्यापिनी घ्याव्या ” असें गरुडपुराणांत वचन आहे. व “ मन्वादि युगादि कर्मतिथि शुक्लपक्षीं पूर्वाह्णव्यापिनी व कृष्णपक्षीं अपराह्णव्यापिनी घ्याव्या ” असें दीपिकेंतही सांगितलें आहे. कालादर्शांत तर  मन्वादितिथि अपराह्णव्यापिनी घ्याव्या असें सांगितलें आहे; परंतु तें योग्य नाहीं, असें युगादिनिर्णयांत पुढें सांगूं.

अत्रचश्राद्धमुक्तंमात्स्ये कृतंश्राद्धंविधानेनमन्वादिषुयुगादिषु हायनानिद्विसाहस्रंपितृणांतृप्तिदंभवेदिति मन्वादिश्राद्धंचमलमासेसतिमासद्वयेपिकार्यं मन्वादिकंतैर्थिकंचकुर्यान्मासद्वयेपिचेतिस्मृतिचंद्रिकोक्तेः अत्रपिंडरहितंश्राद्धंकुर्यात् तदुक्तंकालादर्शे विषुवायनसंक्रांतिमन्वादिषुयुगादिषु विहायपिंडनिर्वापंसर्वंश्राद्धंसमाचरेदिति मन्वादिश्राद्धंनित्यं अकरणेप्रायश्चित्तदर्शनात् तदुक्तमृग्विधाने त्वंभुवःप्रतिमंत्रंचशतवारंजलेजपेत् मन्वादयोयदान्यूनाःकुरुतेनैवचापिय इति एवंयत्रप्रायश्चित्तवीप्सादिदर्शनंतानिषण्णवतिश्राद्धानिनित्यानि तानितु अमायुगमनुक्रांतिधृतिपातमहालयाः अन्वष्टक्यंचपूर्वेद्युः षण्णवत्यः प्रकीर्तिताइत्युक्तानि चकारादष्टकाग्रहणम् ।

या मन्वादितिथींचे ठायीं श्राद्ध सांगितलें आहे - मत्स्यपुराणांत -  “ मन्वादि व युगादि तिथींचे ठायीं यथाविधि श्राद्ध केलें असतां दोन हजार वर्षैपर्यंत पितर तृप्त होतात. ” मन्वादिश्राद्ध मलमास असतां दोनही महिन्यांत करावें; कारण, “ मन्वादिक व तीर्थसंबंधीं हीं श्राद्धें दोनही महिन्यांत करावीं ” असें स्मृतिचंद्रिकेंत सांगितलें आहे. ह्या मन्वादितिथींचे ठायीं पिंडरहित श्राद्ध करावें, तें कालादर्शांत सांगतो - “ विषुवसंक्रांति व अयनसंक्रांति ( मकर व कर्क ), मन्वादिक व युगादिक तिथि यांचे ठायीं पिंडदानावांचून सर्व श्राद्ध करावें. ” मन्वादिश्राद्ध नित्य; कारण, न केलें तर प्रायश्चित्त आहे. तें प्रायश्चित्त सांगतो - ऋग्विधानांत “ मन्वादिश्राद्ध न केलें किंवा करुन न्यून झालें तर जलांत बसून “ त्वंब्झुवः प्रति० ” हा मंत्र शंभर वेळ जपावा. ” असें जेथें अकरणे प्रायश्चित्त किंवा करण्याविषयीं पुनः पुनः सांगितलें आहे तीं षण्णवति ( ९६ ) श्राद्धे नित्य होत. तीं षण्णवतिश्राद्धें अशीं - “ अमावास्या १२, युगादि ४, मन्वादि १४, संक्रांति १२, वैधृति १२, व्यतीपात १२, महालय १५, अन्वष्टक्य ५, पूर्वद्यु ५, अष्टका ५, हीं होत. ”

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP