मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । सूर्याचें ऐकून चरित । वालखिल्य गणेशभक्तियुत । पुन्हा विनविती सूर्याप्रत । मुद्‌गल कथा ती सांगती ॥१॥
सूर्यदेवा तुझें चरित्र ऐकिलें । त्या कथामृतानें तोषलें । चित्त आमुचें सांप्रत पहिलें । गणेशचरित आम्हां सांगा ॥२॥
जें मोह पाशांचें निकृन्तन । जेणें जन होत भ्रांतिहीन । मोह जो भुलवी सर्वांचें मन । त्याचें चरित्र सांगावें ॥३॥
त्या मोहानें संछादित । जन होती जेव्हां संभ्रान्त । गजानना न ओळखित । गणेशाची ते त्या वेळीं ॥४॥
ऐसें तें ऋषि विचारित । तेव्हां महातेज भानु म्हणत । गाणपत्य तो तेजयुक्त । आनंदून स्वचित्तांत ॥५॥
सांप्रत तुम्हांसी सांगेन । इतिहास जो पुरातन । मोहासुर चरित्र पावन । गणेशज्ञान संयुत ॥६॥
एकदा तारक नामा दैत्य होत । ब्रह्मदेवाच्या वरदानें सत्तायुक्त । त्रैलोक्याचें आधिपत्य लाभत । पीडा देत देवगणांसी ॥७॥
समस्त मुनिजनही संत्रस्त । राहूं लागले वनांतरांत । नंतर बहुत काळ जात । तें शरण जाती पार्वतीसी ॥८॥
देवगण ऋषिगणांसहित । शिवध्यान करिती सतत । तेव्हां वरदान ते करिती प्राप्त । शिवपुत्र मारील तारका ॥९॥
शिववीर्यसंभूत सेनाधीश । पुत्र वधील दैत्येश । यांत न धरा संदेहास । आश्वासन हें देवां मिळे ॥१०॥
परी महादेव वनांत । मग्न होता तपांत । पार्वतीसी देवगण प्रार्थित । शंकराचें मन वळविण्या ॥११॥
तेव्हां भिल्लिणीचा वेष घेऊन । शंभूस मोहविण्य़ा उत्सुक मन । शंकराश्रमीं जात प्रसन्न । इतस्ततः हिंडत होती ॥१२॥
अतीव मोहक रुप घेऊन । फुलें तोडण्या जात आश्रमांतून । त्या वेळीं ध्यान संपून । शिवें एकदां तिज पाहिलें ॥१३॥
रुपयौवनशालिनी पाहिली । शिवासी मोहिनी पडली । आदि मायेनें तें केलीं । चित्तवृत्ति त्याची कामविहवल ॥१४॥
हावभाव भिल्लिणीचे पाहत । शिव झाला परममोहित । तिज पकडण्या जात । भिल्लिण दूर पळू लागे ॥१५॥
तिचा पाठलाग करित । शंकर झाला कामसंत्रस्त । जेथ ती जात संचरत । नग्न शंभू कामासक्त ॥१६॥
ऐशा प्रकारें तो धावत । तिज पकडण्या वनांत । परी ती न होय हस्तगत । शिववीर्य गळून पडलें ॥१७॥
तत्क्षणीं ती भिल्ली होत । अन्तर्धान तें शिव पाहत । तें शिवही शांति लाभत । विकारशमन जाहलें ॥१८॥
अद्‌भुत त्या शिववीर्यांतून परम । एक पुरुष घेत जन्म । मोहरुप जो उग्र परम । चार बाहू तयासी ॥१९॥
तो संस्थित वनांत । एकाकी श्रेष्ठ तेजरुपांत । चारु रुप सर्व अवयव संयुत । महामानी तो शिवपुत्र ॥२०॥
तो कंदमूळ फळें खात । इतस्ततः वनांत हिंडत । शिव तेव्हां होत दुःखित । ध्यानबळें सर्व जाणून ॥२१॥
पार्वतीचे तें कृत्य जाणून । मनीं क्रोध त्याच्या दाटून । तो कामास जाळीं तत्क्षण । स्वस्थानीं मग परतला ॥२२॥
पार्वती त्यास प्रार्थित । देवांचें साहाय्य करा म्हणत । शंभू कामदेवा स्मरत । पुढयांत पाही तें अनंगासी ॥२३॥
महेशास तो प्रणाम करित । महायशा रुद्रासी स्तवित । म्हणे पुन्हा करावें देहयुक्त । मजला आपण महेश्वरा ॥२४॥
कामाची प्रार्थना ऐकत । त्यांस गणेशमंत्र विधिसंयुत । एकाक्षर परम देत । सदाशिव त्यांसी उपदेशी ॥२५॥
म्हणे या मंत्रानें आराधना । करुन तोषवी गजानना । तो पुरवील तुझी मनकामना । यांत संशय अल्प नसे ॥२६॥
नाशिक क्षेत्रीं कामदेव जात । स्त्रीसहित तप करित । ध्यान तैसा जप करित । गणपतीचा भक्तिभावें ॥२७॥
ऐसीं वर्षे सहस्त्र जात । तेव्हां गणनायक प्रकटत । माग वरदान म्हणें जें ईप्सित । पुरवीन मीं तें सत्वर ॥२८॥
गणेशासी पाहून उठत । स्तुति करी होऊन प्रणत । भक्तिभावें मान वाकवित । कामदेव त्यासमयीं ॥२९॥
गणेशासी पाशांकुशधारकासी । दंताभयधरासी मूषकषासी । गजवक्त्रासी देवासी । शूर्पकर्णा तुज नमन माझें ॥३०॥
महोदरासी पूर्णासी । पूर्णानंदासी सर्वाकारासी । सर्वासी गुणेशासी । स्थूल सूक्ष्मादि भेदासी नमन ॥३१॥
गुण चालकासी देह देहिमयासी । प्रकृतीच्या लयरुपासी । विदेहासी स्वसंवेद्यपतीसी । गणेशा तुज नमोनमः ॥३२॥
रजोगुणें सृष्टि निर्मिसी । सत्त्वगुणें तूं पाळिसी । तमोगुणें संहार करिसी । कर्माकारा तुज नमन ॥३३॥
जगद्‌रुपासी स्थावरासी । चरासी अनाकारासी । हेरंबासी ब्रह्मपतीसी । योगदायका तुज नमन ॥३४॥
वेदादि अगम्यरुपासी । योग्यांसी योगप्रदासी । काय स्तवूं मी तुजसी । गणाधीशा अल्पज्ञ मी ॥३५॥
आता मज वर दे गजानना । दृढ भक्ति व्हावी तुझी प्रसन्ना । माझें अंग पुनरपि सूक्ष्मनयना । मजला जगीं प्राप्त व्हावें ॥३६॥
गणेश त्यासी वरदान देत । माझी भक्ति रतिपते चित्तांत । तुझ्या दृढ होऊन त्वरित । शिवदग्ध देह जरी तुझा ॥३७॥
पूर्ववत देह संजीवन । करण्या मी असमर्थ मान । पूर्वी शंकरा वरदान । दिलें म्हणोनी याविषयीं ॥३८॥
माझ्या वरानें सामर्थ्ययुत । शिव झाला सर्वार्थयुक्त । म्हणोनि तुजसी मे देत । अद्‌भुत भिन्न नवीन देह ॥३९॥
यौवन स्त्रीजन पुष्पें सुवास । गायन मधुरसीं निवास । मुदुल अंडज शब्द सुरस । उद्यानें वसंत सुवासादी ॥४०॥
चंदन विषयासक्तांचा संग । नरांच्या गृह्य दर्शनें विकार तरंग । मृदु पवन नव वस्त्रें चांग । भूषणादिक हे नूतन देह ॥४१॥
ऐश्या हितावह देहें युक्त । तूं शंकरादींसी जगांत । जिंकशील होऊन ख्यात । मनोभूः स्मृतिभू ऐश्या नावें ॥४२॥
तूं रचिलें हें स्तोत्र । सर्वप्रद होईल पवित्र । दग्धमूळ काष्ठां अंकुर पत्र । फुटतील याच्या प्रभावानें ॥४३॥
ऐसें गणेशवाक्य ऐकून । काम म्हणे देवा तूं प्रसन्न । माझें हित केलेंस पावन । नूतन देह देऊनिया ॥४४॥
परी पूर्ववत्‍ देह द्यावा । ढुंढे मनोरथ माझा पुरवावा । शंकरें दग्ध करिता देवा । अनंगा मज तूं रक्षावें ॥४५॥
मुद्‌गल म्हणती दक्षाप्रत । कामाचें वचन ऐकून संतोषित । भक्तिभावें तपें प्रसन्न होत । कामदेवासी म्हणतसे ॥४६॥
तूं मागितलें जें अघटित । परी तूं अससी भक्तियुक्त । मनोभवा तुझें हित । प्रिय वांछित पूर्ण करीन ॥४७॥
यादवांत स्वयं विष्णु घेईल । कृष्ण अवतार विमल । लक्ष्मी रुक्मिणी होईल । त्यांचा पुत्र तूं होशील ॥४८॥
प्रद्युम्ननामें विख्यांत । सर्वमान्य सुंदर देहयुक्त । ही रती तुझी वल्लभा होत । भार्या त्यावेळीं तुझी ॥४९॥
ऐसा वर देऊन अन्तर्धात । पावला देव गजानन । स्वानंदलोकीं जात पावन । काम परतला मयूरक्षेत्रीं ॥५०॥
तेथ आपुल्या पत्नीसहित । यात्राविधानें विघ्नपा पूजित । गणनाथा प्रीत्यर्थ तप आचरित । एक वर्षभर भक्तीनें ॥५१॥
विघ्ननायक संतुष्ट होत । तेव्हां त्यास दर्शन देत । कामदेव त्यासी प्रार्थित । देहादींचें जाणी सत्यरुप ॥५२॥
म्हणे भूस्वानंद हे क्षेत्र असत । येथ मी निवास इच्छित । स्थान देई मजप्रत । सेवा करण्या गणाधीशा ॥५३॥
येथ मृत्यू पावता लाभत । ब्रह्मपद प्राणी पुनीत । म्हणोनी मज रक्षावें सतत । गणनाथा आदिदेवा ॥५४॥
गणनाथ तथाऽस्तु म्हणत । पश्चिमद्वारीं जी शक्ति स्थित । विघ्नप तिजला आज्ञापित । कामदेवासी स्थान द्यावें ॥५५॥
तुझ्या वामभागांत रतीस । दक्षिणांगीं कामदेवास । देई जागा करण्या निवास । या क्षेत्रांत सर्वदा ॥५६॥
शक्ति ती आज्ञा पाळित । रतीसह काम देवा आश्रय देत । ऐशा रीतीं मयूरक्षेत्रांत । निवास घडे रतिकामांचा ॥५७॥
तेव्हांपासून सर्वमान्य होत । महर्षींनो कामदेव जगांत । त्रैलोक्य विजयी मोहप्रदे सर्वांप्रत । निर्भय सुंदर स्वरुप ॥५८॥
हें कामदेवाचें चरित । जो वाचित अथवा ऐकत । त्यास काम मोह न होत । कदापीही जगतांत ॥५९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते कामचरितं नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP