मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ४६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । युधिष्ठिर म्हणे कृष्णा मजप्रती । सांग त्या दैत्याची कृती । पूर्णानंदहस्तें जगतीं । मरण त्यासी कैसें लाभे? ॥१॥
हें सर्व कौतुक महान । सांगावें मजला समजावून । चराचरापासून अभय असून  ज्ञानारीस कैसा मृत्यु आला ॥२॥
हें सर्व वाटै आश्चर्यभूत । म्हणोनि सांगा सर्व चरित । मुद्‌गल सांगती दक्षाप्रत । कृष्ण काय म्हणती युधिष्ठिरासी ॥३॥
ज्ञानारीचा पुत्र सर्वंसंमत । सर्व जन त्यासी प्रशंसित । अकराव्या दिवशीं ते जात । आपापल्या गृहासी ॥४॥
सुबोध ऐसें त्याचें नाम । दैत्येश ठेविती उत्तम । द्विज स्तुती करिती अनुपम । दानें तयां देती बहुत ॥५॥
तो दैत्यसुत ज्ञानयुक्त । बाल्यातही विघ्नेशा चिंतित । स्तनपानादिकही न स्मरत । ध्यान करी सदा गणेशाचें ॥६॥
ऐसे पांच तसे मास सात । जेव्हां पूर्ण होती त्या काळांत । त्याचे खेळ चालती अद्‌भुत । मित्रांसवे ते ऐक आता ॥७॥
धुळींत स्वहस्तें काढित । गणेशाची आकृति पूजीत । पूजा उपचारार्थ घालित । धूलिकर्णची त्यावरती ॥८॥
तें पाहून अति कुपित । ज्ञानारी म्हणे स्वपत्नीप्रत । माझ्या पित्याचा हत्या घडत । ज्याच्या हस्तें पूर्व काळीं ॥९॥
त्यासीच हा आपुला सुत पूजी । तेणें क्रोधोमीं उसळे हृदयामाजी । सांप्रत शमवीन दुःखद जी । प्रिये हया पुत्रासी मारुनिया ॥१०॥
तरी सावधान मन करुन । परावृत्त करी हया कृत्यापासून । तरीच त्याचा वाचेल प्राण । अन्यथा घेईन प्राण त्याचा ॥११॥
माझ्या पित्याच्या हत्यार्‍यास भजत । हा पुत्र जरीं ये दृष्टिपथांत । पुनरपि तरी त्वरित । वधीन त्यास प्रिये मी ॥१२॥
ती विनयसंयुत बोले वचन । ज्ञानारीची पत्नी नमून । मी बाळास परावृत्त करीन । ऐश्या संकल्पापासून ॥१३॥
ती महाभागा पतिव्रता । पतिवाक्याचा आदर करी तत्त्वर्ता । म्हणोनि पतीच्या गमनकाळीं सुता । न पाठवी समोर तें ॥१४॥
पुत्राचे लाड करी ती सती । परी पतीची जें अनुपस्थिती । सुबोध पुत्र ऐशा रीती । एक वर्षाचा जाहला ॥१५॥
बोबडया बोलें तो म्हणत । नमो हेलंबा विघ्नेशा सतत । गणेशा महोदला अविरत । लंबोदला विकटा नमन ॥१६॥
ढुंढीस करी नमस्कार । ऐशा भावें मनोहर । गणपासी स्मरे तो उदार । अनन्यमनें धर्मपरायण ॥१७॥
माता स्नेहवश होऊन । पतीच्या समीप कटाक्षें करुन । पुत्रास त्या दूर ठेवून । सखीजन साहाय्यें वाचवी ॥१८॥
यत्नपूर्वक ती रक्षित । पतीपासून आपुला सुत । जरी पती तिज आज्ञापीत । समोर आणी पुत्र आपुला ॥१९॥
तरी ती असत्य सांगत । म्हणे तो आहे निद्रित । ऐशापरी कालहरण करित । दुःखपूर्ण मनानें ॥२०॥
ऐसी पांच वर्षे जात । तेव्हा ज्ञानारी अति हर्षित  व्रतबंध करी धर्मसंमत । सुबोधपुत्राचा प्रेमानें ॥२१॥
परी सुबोध स्मरी गणेशास । चित्तीं भक्तियुक्त विशेष । कर्मभङ्गभयानें सोल्हास । मानसी पूजा करितसे ॥२२॥
कर्मसमाप्तीनंतर नमन । सर्वांस करी सुबोध सुमन । नंतर गुरुकुलीं गमन । करी पित्याच्या आज्ञेनें ॥२३॥
तेथ नानारुपी दैत्यसुत । निवास करिती अद्‍भुत । शुक्रशिष्य जे महाभाग शिकत । आसुरी विद्या देवमोहिनी ॥२४॥
शुक्र शिकवी राजपुत्राप्रत । आसुरी विद्या अविरत । परी विघ्नराजाचे स्मरण करित । भक्तिभावें तें सुबोध ॥२५॥
जेव्हां गुरु त्यास संमानिती । विद्या शिकविण्या ते उत्सुकमती । त्यांसी प्रणाम करुन पुढती । उभा राहे कर जोडूनी ॥२६॥
गुरु त्यास जें सांगत । तें ऐकून तो विस्मितचित्त । महाबुद्धि त्यास म्हणत । सुबोध विषयमग्नां तयासी ॥२७॥
ब्राह्मण जे ब्रह्मानिष्ठ जगतीं । ते योगपरायण गणेशा भजती । गाणपत्या विशेषें पूजिती । भेदाभेदादी सोडून ॥२८॥
मोहमयी आसुरी विद्या सोडून । गणेशार्थी घाला मन । आपण ज्ञानशील ब्राह्मण । तरीच वंद्य जगीं व्हाल ॥२९॥
गणेशा सर्वपूज्यास सोडून । मोहप्रद अन्य भजावें म्हणून । कां मज सांगता पापवचन । विचार करा स्वमानसीं ॥३०॥
स्वधर्मनिष्ठ जे ब्राह्मण असत । त्यांचें वचन ग्राह्य जगांत । ह्यांत संदेह अल्पही नसत । परी अन्यथा न ऐकवें ॥३१॥
गुणहीन जरी ब्राह्मण जन । तरी ते वंदनीय हें वेदवचन । सर्वत्र त्यांचा होय संमान । म्हणोनि नमितो मीं तुम्हांसी ॥३२॥
आपुलें वचन जरी हितयुक्त । तें मी स्वीकारीन त्वरित । परी अन्य उपदेश मोहसंयुत । कदापि मीं न मानीन ॥३३॥
श्रीकृष्ण म्हणती युधिष्ठिराप्रत । सुबोधचें वचन जें ऐकत । तेव्हां तो ब्राह्मण गुरु विस्मित । दैत्यपुत्रा समजाविती ॥३४॥
अरे दैत्यसुता सुखप्रद धर्म । ऐक बाळा सुबोधा कर्म । असुरजातीस जो अनुपम । तो आचार तूं पाळावा ॥३५॥
तूं असुनी बालक लहान । योग सांगासी उत्तम । स्वधर्मादि विवेचन । करिसी योगीश्वरासम ॥३६॥
तूं शिकला नाहींस वेदविद्या । महामते जी ज्ञानदा आद्या । तथापि हें ज्ञान असुराद्या । कैसें तुज प्राप्त झालें? ॥३७॥
सुबोध म्हणे तयाप्रत । माता गर्भंवती एकदा जात । आपुल्या पित्याच्या सदनांत । मी होतों उदरीं गर्भरुपें तें ॥३८॥
तेथ महाभाग सर्वकोविद । शुकमुनी आले ज्ञानप्रद । त्यास नमून विनयविशद । प्रल्हाद पूजी हर्षभरें ॥३९॥
त्या महात्म्यास पुजून । विनयान्वित तो बोले वचन । व्यासपुत्रा शुका महान । आपण साक्षात शिवशंकर ॥४०॥
महायोगी आपण संदेहातीत । योगींद्राचे परम गुरु जगांत । पूर्वपुण्यें आज मज लाभत । दर्शन आपुलें सुदुर्लभ ॥४१॥
म्हणोनि आपणास विचारित । करुणानिधे सांगा मजप्रत । सर्वमान्य योगशांतिप्रद असत । ऐसें तत्त्व अद्वितीय ॥४२॥
नाना मतांचा विमोह छेदी । संशय सारा क्षणांत भेदी । ऐसा योग सांगावा बुद्धी । जेणें शांति लाभेल ॥४३॥
प्रल्हादाचें ऐकून रम्य वचन । योगींद्रसत्तम शुक्राचार्य बोले प्रसन्न । योगशांतिपरायण व्रत सुमन । हितकारक सर्वमान्य ॥४४॥
प्रल्हादा तूं महाभागा जगांत । योग जाणण्या सुपात्र विनत । म्हणोनि हितकारक अद्‌भुत । सांगतों तुज विशेष तत्त्व ॥४५॥
नाना मतांतरांत जें मान्यतम । सर्वांस शांतिप्रद जें अनुपम । ऐसें जें सेव्य परम । तें तुजला मीं सांगतो ॥४६॥
एकदा नैमिषारण्यांत । महर्षी सगळे उपस्थित । ब्रह्मांड मालांतले ज्ञानरत । ब्रह्मयज्ञ करण्या आले ॥४७॥
जेथ योगमयी गाथा । दानवोत्तमा ती ब्रह्मयज्ञाची कथा । वेदांतीं सांगितलीं ही प्रथा । थोर महर्षि तेथ आले ॥४८॥
मरीची कश्यप आणि कण्व । पुलह क्रतु विश्वामित्र अभिनव । महातेजी याज्ञवल्क्य मुनि देव । अरुणीही तेथ होते ॥४९॥
अष्टावक्र वसिष्ठ भरद्वाज । पराशर व्यास परशुराम महासतेज । श्वेतकेतु मुद्‌गल अगस्त्य सतेज । हनुमंत तैसा बिभीषण ॥५०॥
अश्वत्थामा गृत्समद कृप । प्रतापी मार्कंडेअय मृकंड गाणप । बक दाल्भ्य नारद कपिल अमाप । तप ज्यांचे ते उपस्थित ॥५१॥
रैभ्य महाशय कर्दम  एक द्वित मित देवल अनुपम । असित पुलस्त्य भृगू उत्तम । च्य्वन गौतम तेथ जमले ॥५२॥
अंगिरा दीर्घतमा उतथ्य गालव । दधीची ऊशना जीव अपूर्व । जमदग्नी महामुनि वैशंपायन सुदैव । शौनक शूनक वामदेव ॥५३॥
समंतु पैल शाकलक मुनि । धौम्यकादी शिष्यसहित जैमिनी । अन्यही मुनिवर तेथ येउनी । ब्रह्मयज्ञीं भाग घेती ॥५४॥
दत्तात्रेय दुर्वास निदाध जडभरत । सनत्कुमार सनातन विख्यात । सनंद अहंरिभू सनक येत । हर्षयुक्त त्या वेळीं ॥५५॥
अवधूत योगी सर्व येत । यज्ञदर्शना उत्कंठित । इंद्र ब्रह्मा विष्णू विराजत । शंकर भानू सस्त्रीक ॥५६॥
अन्य देवराज देवांसहित । शेष वासुकी कबल बलवंत । अश्वतर तक्षकादि येत । महाभाग नागश्रेष्ठ ॥५७॥
गंधर्व चारण सिद्धजन । साध्यगण आदित्य वसून प्रसन्न । यक्ष अप्सरागण उत्सुक मन । जमले तेथ यज्ञार्थ ॥५८॥
कर्मनिष्ठ तपोनिष्ठ । योगी जे होते ज्ञाननिष्ठ । नाना देवरत मानश्रेष्ठ । सर्वही आले त्या स्थळीं ॥५९॥
प्रल्हादा, ब्रह्मयज्ञ पाहण्यास । सर्व ते उत्सुक विशेष । निश्चयपूर्वक अति सुरस । जमले सोत्कंठ अति प्रसन्न ॥६०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते ब्रह्मयज्ञवर्णन नाम षट्‍चत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP