मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय १९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । नरनारायण आश्रमधर्म वर्णित । पितृमातृपरायण द्विज राहत । क्षौर करोनी स्वगृहांत । द्विजदेवपरायण ॥१॥
आपणाहून जी वर्ये लहान । कुलशीलादींनी संपन्न । सर्व अवयवयुक्त शोभन । ऐशी वधू वरावी ॥२॥
संतानार्थ ऋतुगमन करित । गृहस्थ कलत्रवंत । देव विप्र अतिर्थींचे स्वागत । गृहाश्रमीं करितसे ॥३॥
यजन याजन दान अध्ययन । प्रतिग्रह तैसे अध्यापन । ही सहा कर्म पावन । गृहस्थाश्रीं करीतसे ॥४॥
स्नानसंध्या जप होम । आतिथ्य तैसें देवतार्चन क्षेम । स्वाध्याय वैश्वदेवादी आश्रमघर्म । गृहस्थें नित्य आचरावे ॥५॥
चतुर्थीव्रत आद्य पावन । तैसीच अन्य व्रतें शोभन । जो चतुर्थी व्रतहीन । त्यास अधिकार नसे अन्य व्रतांत ॥६॥
तो सदा शौची चतुष्पदविवर्जित । शुक्लचतुर्थीस जो अन्न जेवित । मांसाहार वा करित । तो प्राणी जाय नरकांत ॥७॥
अग्निहोम नित्य आचरावें । श्राद्धादिक सर्व करावें । दयायुक्त होऊन रहावें । गृहामाजीं आनंदित ॥८॥
अभक्षभक्षण न करावें । नियम सर्वही पाळावे । पितृदेवमुनितर्पण करावें । गृहस्थानें निष्ठेनें ॥९॥
आचारशुचितायुक्त । पंचयज्ञादिक नित्य करित । जे प्रकीर्तित शास्त्रांत । आपुल्या सत्तेप्रमाणें ॥१०॥
गृहमेधी जो असत । त्याचा धर्म आता सांगत । अर्ध्यानें पुत्रांदीस पालन करित । चतुर्थांस सुहृदां देई ॥११॥
चतुर्थाशें देवादींस तोषवित । आपुल्या आयुष्यानें गृहस्थ जगांत । ऐसे नानाविध धर्म आचरत । वृद्धपकाळीं वनीं जाई ॥१२॥
आपुल्या स्त्रीस पुत्रासमीप सोडून । अथवा आपुल्या सवें घेऊन । धर्मार्थ आश्रया शरण वन । तपस्वी मग करीतसे ॥१३॥
पुत्रयुक्त असेल वा पुत्रहीन । तप आचरी वनांत जाऊन । फलकंदादींचें भक्षण करुन । वन्य विधीनें अग्निहोत्र करी ॥१४॥
अतिथींचे यथाशक्ति पूजन । नाना तपांचे आचरण पावन । पत्नीसमीप संस्थित असून । मैथूनसुख न भोगावें ॥१५॥
मनानें ही तें न भोगावें । वानप्रस्थानें स्वभावें । वायुभक्षणादिक करावें । वायुसाधन ही वनीं ॥१६॥
प्राणायाम करुन । पंचाग्नींचे ग्रीष्मीं साधन । हेमंतीं जळांत निवसत । वर्षाऋतूंत आकाशवासीं ॥१७॥
संकटातही राही वनांत । वानप्रस्थ न जाय ग्रामांत । प्रवेशही वर्ज मानावा त्यांत । महात्म्या वानप्रस्थानें ॥१८॥
ऐसें नानाविध धर्माचरण । वानप्रस्थ करी धर्मप्रमाण । आयुष्याचे तीन भाग सरता क्षण । संन्यास घ्यावा तयानें ॥१९॥
तेव्हां स्त्रीनें आज्ञा द्यावी त्यास । आपण शोषावावे तपें देहास । मरणावधी करुन सायास । परी पतीसी न थांबवावें ॥२०॥
अग्निहोत्र स्वदेहीं आचरत । एकाग्र होई स्वात्म्यांत । निस्पृह होऊन संचार करित । पृथ्वीवरी सर्वत्र तो ॥२१॥
मी ब्रह्म ह्या भावें होत । संन्यासी चित्तभूमि वर्जित । योगी योगभूमिभावें फिरत । कर्मादिन्यास संयुक्त ॥२२॥
एक रात्र एका ग्रामांत । न्यास परायण तो राहत । द्वंद्वभाव सोडून मागत । भिक्षा करपात्री संन्यासी ॥२३॥
हातांची ओंजळ जोडून । भिक्षा मागून ग्रास भोजन । करिता अश्वामेधादिकाहून । अधिक पुण्य तया लाभे ॥२४॥
तीर्थक्षेत्रादि भूमींत । रहावें त्यानें चातुर्मास्यांत । जितेंद्रियें जितप्राणें सर्व कर्मांत । निःसंगपणें वर्तावें ॥२५॥
अहिंसा परम धर्म संमत । संन्याश्यांचा अभिमत । तृणादींचे छेदन न करित । संन्यासधर्मानुसार ॥२६॥
त्रिदंडी जो संन्यासी असत । कुटीचक असें नाम तयाप्रत । त्याचा आचार विधि सांगत । मुनिसत्तमा ऐक तूं ॥२७॥
स्वधर्माचरण प्रथम नित्य देहदंड । मौन धारण दुसरा वाचामय दंड । तिसरा तो मनोदंड । सर्वत्र रसहीन करावें मन ॥२८॥
देहमयी कुटी चालवावी । योग्यानें-बिंबभावें बरवी । ब्रह्यांत ब्रह्मभूत व्हावी । वृत्ति तेव्हां कुटीचक म्हणती ॥२९॥
त्यानंतर बहूदक योगी असत । द्विदंडी तो जगांत । त्यासी देहदंड नसत । स्वेच्छाचारी तो विशेषें ॥३०॥
एका विहिरीतील पाणी प्राशिती । अनेक नर आपुल्या हातीं  । त्यांच्या दोषे विहिरीप्रती । दोष जैसा न लागत ॥३१॥
तैसा आत्मा देहांत । चतुर्देही आकार घेत । त्यांच्याहून भिन्न असत । दोषांनी लिप्त न होय ॥३२॥
सोऽहं ब्रह्मात संस्थित । भेदहीन महामुनि ख्यात । बहूदक तो संगरहित । देहाहून भिन्न असे ॥३३॥
तदनंतर हंसाश्रम असत । जो असे मानसदंड युक्त । देहवाणी दंडहीन असत । स्वेच्छाचारी असे तो ॥३४॥
देह देहीं समायोगांत । ब्रह्मबोधात्मक तें असत । त्या द्विविध ब्रह्मांत जो स्थित । तो योगी तन्मय होईल ॥३५॥
देह देहीरुप जळ असत । त्यांत ब्रह्म हें दुग्ध असत । हंस त्याचा ग्राहक होत । ब्रह्मरुप म्हणोनि ॥३६॥
त्यानंतर परमहंस ख्यात । ज्ञानदंडपरायण जो असत । देहवाणी मन दंडें विहित । संन्यासाश्रमीं विशुद्ध ॥३७॥
देह देहीमय ते भरांति युक्त । ब्रह्म विशेषें असे वर्णित । तेंच सविषय वर्णित । हंस कर्म परायण ॥३८॥
सदा जे साक्षी स्वरुप असत । परब्रह्म महामुने जगांत । त्यांच्यात होता संस्थित । विभागातील महायोगी ॥३९॥
न मी देह मी देहस्थ असत । देह देहीमय नसत । सदा साक्षी स्वरुप स्थित । ज्ञान आनंदमय असे ॥४०॥
जें जें असते अज्ञान । ते ते जन्मतें विकारांपासून । तें तें सोडून द्वंद्वहीन । स्वेच्छाचारी संन्यासी ॥४१॥
चतुर्विध संन्यासाश्रम असत । त्याचें पालन विधियुक्त । मी ब्रह्म ह्या योगें युत । ब्रह्मभूत व्हावें नरे ॥४२॥
जरी विषयांत रसयुक्त । असेल संन्याशाचें चित्त । तरी तो जाय नरकांत । ऐसें शास्त्र सांगतसे ॥४३॥
जरी एक कवडीही लोभे घेत । तरी तो संन्यासी कुंभीपाक नरकांत । एक सहस्त्र वर्षे निवसत । ह्यांत संशय कांहीं नसे ॥४४॥
स्त्री संभोगाची इच्छा होता । क्षणभरही मानसीं तत्त्वतां । तरी गोसहस्त्र वधाची शिक्षा पतिता । त्या यतीला संभवेल ॥४५॥
कृत युगांत मानवांचे मन । सदा होय धर्माधीन । म्हणोनि मुख्य कथिलें ध्यान । त्यांनें सर्व लाभतसे ॥४६॥
त्रेता युगांत चंचल चित्त । धर्माचा एक पाय न्यून होत । म्हणोनि तप हें साधन होत । त्यानें लाभतें सर्व कांहीं ॥४७॥
द्वापारांत देह कष्ट न सोसत । म्हणोनि स्वधर्माचार साधन ख्यात । तें करिता सर्वही लाभत । द्वापरांतील नरनारो ॥४८॥
असुरभावें कलियुगांत । धर्म नष्टप्राय होत । तेथ नामस्मरणें लाभत । सर्व ईप्सित नरांसी ॥४९॥
वर्णाश्रम विभाग नसत । नामस्मरण मार्गांत । सदाचार हाच संन्यास होत । आसुरभावं नष्ट तो ॥५०॥
आसुरबाहुल्यें कलियुगांत । संन्यास योग्यता न पावत । देह चित्तादि चंचल असत । तेणें नष्ट तो होईल ॥५१॥
जो असे वर्णाश्रम विहीन । त्यासी नसे दंड म्हणून । अदंडी असे त्याचें वर्णन । वेद वाङ्ममयीं केले असे ॥५२॥
ज्ञान दंड परित्यागें होत । स्वयं योगी स्वेच्छारत । निषेध विधिहीन तो होत । स्वेच्छाधर्म परायण ॥५३॥
वेदांत जे असे उक्त । तें करी तो विधि समायुक्त । वेदोक्त किंचितही न करित । तो निषेध संयुक्त नर ॥५४॥
म्हणून विधि निषेध हीन । ऐसा योगी म्हणून । त्याचा आचार आदर्श पावन । योगप्रद जगतांत ॥५५॥
म्हणोनि महाभागा दंडहीन । ऐसा योगी वर्णश्रम विहीन । ब्रह्मभूत तो महान । वंदनीय सर्वांसी ॥५६॥
विनायक नामा तो तो नायकें वर्जित । स्वयमेव सर्वांचा नायक असत । विशेष नायक म्हणून ख्यात । विनायक तो महायोगी ॥५७॥
योगसेवेनें ब्रह्मभूत । ब्रह्यांत असे जो संस्थित । स्वेच्छेनें वर्णाश्रम हो आचरित । लोकसंग्रहार्थ धर्मपर ॥५८॥
परिधर्मभोगांत निस्पृह असत । ऐसेंही असे एकमत । नरनारायण महामुनीस म्हणत । मायारचित्त हा आश्रममार्ग ॥५९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खंडे महोदरचरिते आश्रमधर्मवर्णनं नाम एकोनविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP