मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ३५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल सांगती कथा पुढती । कार्तवीर्याची अति प्रीति । धर्म नीती राज्य करी जगतीं । कार्तवीर्य पाळी प्रजेसी ॥१॥
तदनंतर तो भूप जिंकित । सर्व राजांसी जगांत । सप्त द्वीपवती पृथ्वी भोगित । बलसंयुत तो नृप ॥२॥
त्याचेम नाव सहस्त्रार्जुन । देवें ठेविलें आदरें करुन । त्याच्या सम क्षात्रमंडळीं जन । अन्य कोणीही न दिसे ॥३॥
देवादी झाले भयभीत । जरी हा नृप क्रोधयुक्त । झाला तर स्वर्ग जिंकील क्षणांत । असंख्य सेना तयाची ॥४॥
त्याच्या यशें तेजें पूरित । जग झालें समस्त । स्त्री सहित नर्मदा नदींत । एकदा जलविहार तो करी ॥५॥
तेव्हां हजार करांनी थांबवित । नदीचा ओघ तो त्वरित । म्हणोनी नदीची प्रवाह वळत । रावण जेथ बसला होता ॥६॥
शिवलिंग पूजनीं होता सक्त । तेथ जलौघ वाहत । पूजाविधि संपवून क्षणांत । राक्षसाधिप शोध करी ॥७॥
म्हणे दूतेशांनो सांगा त्वरित । कोणी वळविला जलौध या स्थळाप्रत । जाऊन पहा त्वरित । राग त्याचा बहु मजला ॥८॥
त्यास मी ठार मारीन । पूजाभंग हा अपराध महान । तेव्हां दूत जाती त्वरा करुन । पाहती त्या कार्तवीर्यासी ॥९॥
परतून सांगती ते विस्मित । महादैत्या रावणाप्रत । ऐकून तो वृत्तान्त समस्त । रावण क्रोधें निघाला ॥१०॥
सहा प्रधानांसहित । रावण जाई क्रोधयुक्त । असुरराज तो प्रतापवंत । जेथ होता सहस्त्रार्जुंन ॥११॥
रावणास सहसा पाहत । तेव्हां गदा घेऊन करांत । भिजल्या वस्त्रांनी युक्त । लढे तैसाचि सहस्त्रार्जुन ॥१२॥
महाघोर गदायुद्ध त्या दोघांत । तेव्हां तेथें जुंपलें अद्‌भुत । गदाघातें करी व्यथित । रावणासी त्या वेळीं ॥१३॥
कवचादी रावणाचें फोडित । तेव्हां दक्षा रणांगणांत । रावण पडला विवश दुःखित । सहस्त्रार्जुनें पकडला ॥१४॥
पकडून आपुल्या गृहाप्रत । कार्तवीर्य तयास नेत । तेथ नेऊन बांधून ठेवित । सभेमाजीं खेळ करण्या ॥१५॥
रावणाची दहा तोंडे पाहत । तें पाहून राजा चेष्टा करित । तेव्हा तेथ पुलस्त्य मुनि येत । गाणपत्य जो महाभागा ॥१६॥
त्यास प्रणाम करित । सहस्त्रार्जुन आदरें पूजित । भक्तिभावें भोजन अर्पित । कर जोडून पुढे उभा ॥१७॥
मुनि पुलस्त्य त्यास म्हणत । राजेंन्द्रा रावणा सोडी त्वरित । माझा तो पौत्र प्रिय मजप्रत । मित्रभावे वाग त्यासवें ॥१८॥
सहस्त्रार्जुन तें ऐकत । रावणासी त्वरित सोडून देत । पुलस्त्य आशीर्वाद नॄपा देत । अभिनंदून जात स्वगृहीं ॥१९॥
ऐसा तो कार्तवीर्य तेजयुक्त । विष्णुतेजें असे युक्त । धर्मशील तो त्याचें चरित । वर्णन करण्या अशक्य असे ॥२०॥
दिग्विजयास तो निघत । तेव्हां समुद्रास ताडित । पादाघातें तें भयभीत । शीर्ण जाहला सागर ॥२१॥
विपुल यज्ञ तो करित । भूयसी दक्षिणा वाटित । स्वाहा स्वधा वषट्‌कारें तोषवित । देवतादींस कार्तवीर्य ॥२२॥
जो द्विज जें जें मागत । तें तें नृप त्यास देत । लोकांसी स्वधर्मरत करित । सदा गणेशभक्ति करी ॥२३॥
गाणपत्य त्यास आवडत । तीर्थदेवता अतिथि असत । प्रिय त्या कार्तवीर्याप्रत । मयूरेश क्षेत्रीं तो गेला ॥२४॥
तेथ यात्रा तो करित । एक वर्ष क्षेत्री त्याचा निवास असत । ब्राह्मण बोलावून स्थापित । प्रवाळ गणनाथ गणेश मूर्ति ॥२५॥
मंत्र कोविद विप्र करिती । प्राण प्रतिष्ठा भावभक्ति । नंतर नृप करी पूजा आरती । नानाविध भावें पूजन करी ॥२६॥
गणेशभजनीं आसक्त । तो नृप त्रिलोक कीर्तियुक्त । चतुर्थी व्रत तेजयुक्त । मोहयुक्त अंगाचा ॥२७॥
देवादींसही मान्य होत । परम श्रीयुक्त भोगयुक्त । पुढे विसरला सुखासक्त । गजाननासी दुर्दैवें ॥२८॥
ब्रह्मज्ञानमदें गणेश मंत्र त्यागून । म्हणे मीच गजानन । कोणास भजू सांगा वंदन । कोणा करुं ऐसे विचारी ॥२९॥
तेव्हां तो खल विघ्नयुक्त । सहस्त्रार्जुन होत । महाभागा तो वृत्तान्त । सांगतों तुज ऐक आता ॥३०॥
एकदा सैन्यासवें जात । मृगयेसाठीं वनांत । नील वेषधारी होत । सैनिकही तैसेचि ॥३१॥
विविध प्राणी तेथ मारित । ते स्वनगराप्रत पाठवित । दूतांकरवी स्वतः फिरत । वनामाजीं इतस्ततः ॥३२॥
नंतर महाराज तो अकस्मात । आश्रम उत्तम पाहात । सचिवांसी आपुल्या विचारित । कोणत्या मुनीचा हा आश्रम ॥३३॥
ते म्हणतो जमदग्नीच्या आश्रमात । आपण आलों सांप्रत । तेव्हां दक्षा तो नृप जात । हर्षभरित मनें मुनिदर्शना ॥३४॥
मुख्य सचिवां समवेत । प्रणाम करुन हात जोडित । मूनिशार्दूलास विनवीत । महायश कार्तवीर्य ॥३५॥
धन्य माझा जन्म ज्ञान । कुळ मातापिता पावन । तुझ्या अंध्रियुगाचें झालें दर्शन । धन्य मी एक संसारीं ॥३६॥
ते ऐकून मुनिमुख्य देत । आसनादिक नृपाप्रत । शिष्यांकरवी पुजून विचारित । कुशल प्रश्न नृपासी ॥३७॥
विष्णुअंशें जो जन्मला । त्या राजसत्तमाचा सत्कार केला । प्रयोजन कारण विचारी तयाला । विनयभावें विश्वामित्र ॥३८॥
राजा प्रीतियुक्त दक्षा म्हणत । मुनिवरा सारें कुशल असत । आपुल्या आशीर्वाद सतत । आनंदानें मी जीवनीं ॥३९॥
मृगयासक्त झालें चित्त । म्हणोनि येथ आलों अंकस्मात । पूर्व पुण्यबळें लाभलें अवचित । मुनिसत्तमा आपुलें दर्शन ॥४०॥
सर्वांसह महाभागा पुनीत । तुमच्या दर्शनमात्रें होत । आता आज्ञा द्यावी सांप्रत । परत जाण्या स्वनगरासी ॥४१॥
सैन्यासहित महामते परतेन । संतुष्ट झालें माझें मन । तुझ्यासम योगांत वा तपांत समान । मजला अन्य दिसेना ॥४२॥
मुनिमुख्य हर्षभरित । तेव्हा कार्तवीर्यास म्हणत । विष्णूचा तूं अंश प्रख्यात । आलास भाग्यें आश्रमीं ॥४३॥
सांप्रत असे माध्यान्हकाळ । म्हणोनि प्रार्थी मी तुज प्रेमळ । अन्नप्रसाद काही भक्षून निर्मळ । नंतर जाई स्वनगरासी ॥४४॥
राजा म्हणे प्रणाम करुन । वनांत भुकेलें असे सैन्य महान । त्या सर्व सैनिकांस सोडून । एकटा भोजन कैसें करु? ॥४५॥
सर्वांसी भोजन देण्यास नसत । शक्ति मुनिसत्तमा तुझ्यांत । म्हणोनि विनवी तुजप्रत । आज्ञा देई परतण्या ॥४६॥
योगींद्रा मीं सैन्यासहित । स्वनगरासी परतेन त्वरित । राजशार्दूलास तें जमदग्नी सांगत । राजेंद्रा चिंता करु नको ॥४७॥
तुझ्या सर्व संन्यासहित । भोजन देईन तुज त्वरित । माझ्या ब्रह्मांडमंडळ वश असत । तपप्रभावें सर्वदा ॥४८॥
तरी आतां सैन्यासहित । स्नानार्थ जावें नदीतीराप्रत । सहस्त्रार्जुन होवोनि विस्मित । प्रणाम करुन स्नानास गेला ॥४९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते सहस्त्रार्जुननिमंत्रण नाम पंचमत्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP