मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ४४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । युधिष्ठिर कृष्णास प्रार्थित । तुझ्या मुखकमलातून निःसृत । जी कथा पुण्यपावन अद्‌भुत । अमृतपानासम ती वाटे ॥१॥
ऐकून माझें मन न धालें । तरी पुढती पाहिजे कथन केलें । ज्ञानादि नाम ज्यास लाभलें । कोण तो दैत्य सुत कोणाचा ॥२॥
त्याचें कोणतें कर्म असत । तें सर्व कृष्णा सांग मजप्रत । ज्या कारणें गणराज होत । देहधारी या जगीं ॥३॥
त्याचें चरित्र न सामान्य । गणेश विष्णूचा सुत असामान्य । ब्रह्मनायक अवतार मान्य । घेऊन काय करिता झाला ॥४॥
मुद्‌गल दक्षास सांगती । युधिष्ठिराची ऐकून उक्ती । वृष्णि कुलोद्‌भव नारायण सांगती । भवनाशिनी पूर्वकथा ॥५॥
युधिष्ठिरा रमणीय पावन । कथा ऐक जी रम्य प्रसन्न । ब्रह्मभूयप्रद चरित महान । ढुंढि देवाचें असामान्य ॥६॥
दुर्बुद्धि नाम देत्येशा मारित । विघ्नहर शिवपुत्र रुपांत । त्रैलोक्यीं विजय पावत । त्या दुर्बद्धीचा सुत ज्ञानारी ॥७॥
बाल्यापासून तो ख्यात । ज्ञानारि नामें जगांत । प्रल्हाद आपुली सुता देत । हर्षसमन्वित तयासी ॥८॥
रुपलावण्यसंयुक्त । प्रल्हादाची पुत्री ख्यात । सुकला नामा ती स्त्री भजत । ज्ञानारीस मनोभावें ॥९॥
परी यौवनयुत तो स्मरत । सदैव दुर्मति पित्यास मनांत । गणेशाच्या हस्तें मृत । जाहला होता जो पूर्वी ॥१०॥
ज्ञानारि शुक्राचार्यास शरण जात । विद्यां पंचाक्षरी अभ्यासित । वनांत जाऊन आराधित । शंकरासी भक्तीनें ॥११॥
वायुभक्षण करुन राहत । महादैत्य तो तपश्चर्यारत । उग्र तप आचरित । अयुतवर्षे श्रद्धाभावें ॥१२॥
तदनंतर शंभू पार्वती सहित । त्याच्यासमोर उपस्थित । त्या महाभक्तासी म्हणत । भक्तवांआ पूरक जो ॥१३॥
महाभागा तपें तोषविलें मजप्रत । आतां सांत मनोगत । जें जें तुझें वांछित । तें तें दुर्लभही तुज देईन ॥१४॥
शिवाचें वचन ऐकून । दैत्यपुंगव जागृत होऊन । शंभूस करी मोदें वंदन । पूजा करी मनोभावें ॥१५॥
तदनंतर स्थिरचित्तें स्तवित । भक्तवत्सला शंकरा विनत । पार्वतीसहिता शंकरा तुज नमित । वृषभध्वजा तुज वंदन ॥१६॥
शैलादिवाहनासी अव्यक्तदेवासी । शिवासी शूलधारकासी । निगुंणासी गुणचालकासी । सदाशिवासी नमन माझें ॥१७॥
मायेच्या आधारासी । मायामोहविहीनासी । शंभो वृष्टिकर्त्या तुजसी । नमन सृष्टिपालका ॥१८॥
संहारकर्त्यासी स्त्रिस्वरुपासी । अनाथासी सर्वनाथासी । परमात्म्याची चराचर स्वरुपासी । चराचरात्म्यासी नमन ॥१९॥
महादेवासी देवपतीसी । मनवाणी अतिरुपासी । योगिध्येयासी योगपतीसी । महेश्वरा तुज नमन ॥२०॥
धन्य वंश माझा झाला । सर्व दर्शनाचा लाभ जाहला । तप ज्ञान पितरें मला । धन्य वाटतो आज माझीं ॥२१॥
जरी तूं महादेवा प्रसन्न । तरी देई मज वरदान । चराचराचें राज्य लाभून । त्यापासून मला मरण नसे ॥२२॥
जें जें मी इच्छीन । तें तें सिद्ध होवो कार्य महान । आरोग्यादिकें युक्त करुन । अमर करीं मज सदाशिवा ॥२३॥
‘तथास्तु’ ऐसें बोलून । शिव पावला अंतर्धान । तदनंतर ज्ञानारि हर्षित मन । गेहीं आपुल्या परतला ॥२४॥
ज्ञानारीकृत हें स्तोत्र वाचित । अथवा जो हें ऐकत । त्यास वांछित सर्व देत । श्रीशंकर प्रसन्नचित्तें ॥२५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खंडे महोदरचरिते ज्ञानारिवरप्राप्तिवर्णनं नाम चतुचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP