मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय २१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । नरनारायण पुढती सांगती । स्त्रीधर्म त्या मुनीप्रती । जन्मतःच स्त्रीस भोगिती । तीन देव आदरें ॥१॥
चंद्र गंधर्व वन्हि देव सेविती । दोन वर्षे तियेसी प्रीति । धर्मनियमें सहा वर्षे निश्चिती । त्या आधी कोणा न द्यावी ॥२॥
जरी सहा वर्षांपूर्वी विवाह करिती । तरी देवतांचा क्षोभ ओढविती । धर्मनाशामुळे चित्तीं । दुःखी कन्यापिते ते ॥३॥
सात आठ वा नऊ वर्षाची । कन्या कुलजा वरा द्यायची । संमती घ्यावी सुहृज्जनांची । ऐसें शास्त्र सांगतसे ॥४॥
दहा वर्षांहून वयें वाढत । कन्या तरी रजोयुक्ता होत । त्या पूर्वी जरी न विवाहित । होत महापापवधिनी ॥५॥
तिच्या जनकादींस लाभत । ब्रह्महत्येचें पाप पदापदांत । म्हणोनी विधिपूर्वक कन्या देत । तरी तो स्वर्गप्रदा होतसे ॥६॥
कन्यादानासम पुण्य नसत । कन्येमुळें वंश वृद्धिगंत । सर्वांसी ती सुख देत । कन्येचें महत्त्व फार असे ॥७॥
रजोदर्शन लाभता होत । कन्या स्त्रीपदयुक्त । वश राहून पतीस मानित । दैवत आपुलें ती सदा ॥८॥
भक्तिसंयुत सेवावें । पतीस दासीसम स्वभावें । पति वनांत जाता जावें । तिनेंही त्याच्या मागून ॥९॥
परी पुत्रादी बाल्यावस्थेत । असता पोषणार्थ गृहांत । रहावें न जाता वनांत । पतीसवें त्या नारीनें ॥१०॥
जरी पति संन्यास घेत । तरी स्त्रियेनें आज्ञा तयाप्रत । देऊन रहावे व्रतसंस्थित । पति मरता करावें सहगमन ॥११॥
वनस्थित जरी तो असत । पुत्रादीचें कर्तव्य नसेल युक्त । तरी तिनेही जावें वनांत । कर्तव्य आपुलें करावें ॥१२॥
जरी पति मरता गर्भंयुक्त । असेल वा रजस्वला त्या समयांत । तरी सहगमन न करितां शास्त्रोक्त । विधवाधर्म आचरावा ॥१३॥
चवथ्या दिवशी पतिकर्मांत । पाचव्या दिवशी विप्रादि पूजेंत । रजस्वला स्त्री शुद्ध न होत । विधवेनें रहावें एकभुक्त ॥१४॥
व्रतादींनी शोषवावा स्वदेह । आदरें व्रतपालन निःसंदेह । हा सतींचा धर्म सुखावह । ऐकतां पुण्य स्त्रियांसी ॥१५॥
समस्त पितृदेवतांचें कर्म करावें । मनुजांनी अदरे मानावें । प्रथम पितृकर्म संक्षेपेम ऐकावें । महामुने सांप्रत ॥१६॥
अमावास्या येता श्राद्ध करावें । यथाविधि पिंडदान द्यावें । भुक्तिमुक्ति फलप्रद आघवें । अपराहण काळ श्राद्ध प्रशस्त ॥१७॥
पूर्णिमेपासून अमावास्येपर्यंत । चतुर्दशी वर्ज्य तिथि असत । श्राद्धकार्यार्थ प्रशस्त । धर्मशास्त्र सांगतसे ॥१८॥
शस्त्रादी विषयोगें जे मेले । त्यांचें श्राद्ध कृष्ण चतुर्दशीस प्रशंसिले । अन्यथा चतुर्दशीस वर्ज्य मानिलें । श्राद्धकर्मार्थ शास्त्रांत ॥१९॥
कृष्णपक्षांत तीन अष्टका । पौष मासांत तीन अष्टका । चारही पुण्यप्रद लोकां । श्राद्धकर्मांत सर्वदा ॥२०॥
त्रयोदशी समायुक्त । युगादि तिथि संमत । मन्वादी तिथि प्रशस्त । पुण्यप्रद श्राद्धांत ॥२१॥
व्यतीपात वैद्यृत योगांत । मृत बांधावांचे युक्त । दशपिंडादिक श्राद्ध धर्मसंमत । नैमिक्तिक हें महामुने ॥२२॥
काम्य श्राद्धें ग्रहणादीत । करावी असे प्रशंसित । अयनांत विषुववृत्तांत । तीर्थक्षेत्रीं अनित्यक ॥२३॥
वारतिथीस स्वजन्म दिवसात । नक्षत्रांत सर्व उचित । श्राद्ध करावे विशेषयुक्त । जेणें सुख लाभेल ॥२४॥
अथवा सुख प्राप्तिस्तव । पितृलोक सुखास्तव । श्राद्ध कामप्रद सर्व । नित्यवत्‍ धर्मोक्त महामुने ॥२५॥
अक्षय श्राद्ध गयेंत । अमरकंटकी मयूरेशपुरांत । काशी आदि तीर्थक्षेत्रांत । विशेष फलप्रद होतसे ॥२६॥
पितर गाथा गाती । मनीषी आनंदें नाचती । म्हणोनी बहु पुत्र वांछिती । शीलवंत गुणान्वित ॥२७॥
त्या पुत्रातील एक सुत । श्रद्धेनें जर गयेस जात । यथाविधि श्राध करित । पितर तारिले त्यानें जगीं ॥२८॥
तो स्वतः जाय परम गतीप्रत । जो धर्मोक्त श्राद्ध करित । वराहपर्वंती गयाक्षेत्रांत । मयूरक्षेत्री काशींत ॥२९॥
अष्टविनायकांच्या क्षेत्रांत । गंगाद्वारीं प्रभास क्षेत्रांत । बिल्वकांत नीलपर्वतात । कुरुक्षेत्रीं सेतुबंधीं ॥३०॥
भृगुतुंगीं महालयांत । केदारीं फल्गुतीर्थांत । नैमिषारण्याकादींत । श्राद्ध करितां भुक्तिमुक्तिप्रद ॥३१॥
चतुर्थी शुक्लकृष्णा संमत । एकादशी रविवार प्रशस्त । प्रदोष काळ अष्टमी ख्यात । श्राद्धार्थ सर्वसिद्धिप्रद ॥३२॥
व्रतादींत विशेषें उक्त । नित्य देवार्चन श्रद्धायुत । तैसेंच नाना व्रतांचे पुनीत । आचरण करावें नरांनी ॥३३॥
अग्नि होत्रादींनी देवसेवन । तीर्थादिदान संभवें पावन । इष्टापूर्तादि संमत असून । विधिधकर्म दैव पितृक ॥३४॥
ऐसी शास्त्रोक्त कर्मं करुन । ब्रह्मार्पंण करितां योगप्रद जाण । मायामय वर्णाश्रम वर्ण कर्म महान । रचिलें विश्वयोगीनें ॥३५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते देवपितृकर्मवर्णनं नामैकविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP