मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय २६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । नरनारायण कथा सांगती । मार्कंडेय मुनी ऐकती । श्रुताचा पुत्र नाभा जगतीं । त्याचा सुत सिंधुद्वीप ॥१॥
अयुतायू त्याचा सुत । ऋतुवर्णक त्यापासून संभवत । त्यापासून नलसखा जन्मत । अश्वविद्यापरायण ॥२॥
सर्वकाम त्याचा सुत । सुदासक त्यापासून संजात । सौदास त्याचा पुत्र ख्यात । पुढला वंशज कल्माषपाद ॥३॥
कल्माषपाद क्षेत्रांत । वसिष्ठ मुनिसत्तम निर्मित । ईश्वाककुळ वर्धक अश्मक ख्यात । त्याचा सुत मूलक ॥४॥
तो रामभयें वनांत । जाऊन राहिला सुदुःखित । तेथ नारीरुपें राहत । नारीजनांनी परिरक्षित ॥५॥
म्हणोनी नारीक वचन नामें ज्ञात । त्या कृतीनें तो जगांत । त्यापासून शतरथ जन्मत । त्याचा वंशज ऐलानिल ॥६॥
त्यापासून विश्वसह जन्मत । खट्‌वांग ढुंढी ख्यात । दीर्गबाहू त्याचा सुत । त्याचा पुत्र अज नृपति ॥७॥
अजाचा दशरथ सुत । कश्यपाचा अंश स्मृत । त्याच्या भार्या तीन असत । रुपें सर्वही अप्रतिम ॥८॥
कौसल्या कैकेयी सुमित्रा नामें ज्ञात । सार्‍या होत्या धर्मसंयुत । यौवनीं पदार्पण करित । परी न झाली सुतप्राप्ति ॥९॥
व्रततीर्थादिक नाना यत्न । केले नृपतीनें महान । परी सुत लाभ न होतां उन्मन । सस्त्रीक वसिष्ठां भेटण्या गेला ॥१०॥
प्रधानांवरी राज्य धुरा । ठेवून गेला वनांतरा । शरण जात मुनीश्वरा । वसिष्ठांसी दशरथ नृप ॥११॥
दशाक्षर गणेशमंत्र देत । तेव्हां तया नृपाप्रत । त्याच्या पत्नीसहित पुनीत । दशरथें तो स्वीकारला ॥१२॥
प्राचीन परंपरेनें सूर्यकुळांत । गजानन कुलदैवत । जन्मलास तूं त्याच्या वंशांत । विसरलास परी गजाननासी ॥१३॥
त्याची विस्मृति होतां न लाभत । सिद्धि इहपरत्र अद्‍भुत । विघ्नपीडा बाधे अवचित । म्हणोनी भजावें तूं गणाधिपासी ॥१४॥
हा मंत्रराज कुलपरंपरागत । न सोडावा जगांत । सोडता हानि होत निश्चित । ऐसें  जाण दशरथा तूं ॥१५॥
तें ऐकून वसिष्ठवचन । नृप करी वनांतरीं गमन । उग्र तप करी महायश एकमन । वायुमात्र भक्षून राहे ॥१६॥
पत्नीसहित गणनायका पूजित । विनीतभावें मंत्र जपत । ऐशापरी एक वर्ष शत । पूर्ण होता काय जाहलें ॥१७॥
गणेश झाले प्रसन्न । मूषकारुढ ते होऊन । प्रकटले देण्या वरदान । दशरथाच्या संमुख ॥१८॥
त्यास पाहून वरती उठत । स्त्रियांसहित तया पूजित । विविध स्तोत्रांनी स्तवित । प्रणाम करी पुनःपुन्हा ॥१९॥
तेव्हां गणराज त्यास म्हणत । नृपोत्तमा मनोवांछित । वर माग मी देईन निश्चित । प्रसन्न तुझ्या तपानें ॥२०॥
त्यांचें तें वचन ऐकून । दशरथ म्हणे जरी देवेशा प्रसन्न । तुझी भक्ति देई मजलागुन । जेणें अज्ञान नाश पावे ॥२१॥
गणाधीश दुसरें मागत । पृथुल कीर्ति द्यावा सुत । जो अप्रतिम बळें युक्त । तुझ्या भक्तींत परायण ॥२२॥
मी जेथ तप आचरित । तेथ तूं व्हावें सुस्थिर स्थित । लोकांचे पुरवावें मनोवांछित । मागणें हें पुरवावें ॥२३॥
तथास्तु गणनायक म्हणत । अंतर्धान नंतर पावत । स्वानंद लोकीं परतत । नंतर नृपें काय केलें? ॥२४॥
वसिष्ठ हस्तें मूर्ति स्थापित । गणेशाची आदरयुक्त । तें सकल सिद्धिप्रद क्षेत्र प्रख्यात । तदनंतर जाहलें ॥२५॥
गजाननास भावें पुजून । अयोध्येत दशरथ नृप परतून । सर्व प्रजेस हर्षित मन । संतोषविलें तयानें ॥२६॥
नंतर रावणनाशास्तव आज्ञापित । विष्णूस गणेश प्रभु बळवंत । तेव्हां विष्णू अवतार घेत । दशरथाचा पुत्र म्हणोनी ॥२७॥
अव्यय हरि विभागीत । आपुलें स्वरुप चार रुपांत । कौसल्येचा पुत्र होत । राम श्रेष्ठ शस्त्रधारी ॥२८॥
कैकेयीचा भरत सुत । सुमित्रेचें दोन पुत्र ख्यात । लक्ष्मण शत्रुध्न सर्वही असत । विपेंद्रा विष्णुसम तेजें ॥२९॥
नंतर दशरथ नृप कामासक्त । गणनायकाते न स्मरत । रामाचें उपनयनादी करीत । विश्वामित्र तेथ येई ॥३०॥
विश्वामित्र यज्ञरक्षणार्थ मागत । रामाचें साहाय्य नृपाप्रत । तेव्हां लक्ष्मणही सवें जात । यज्ञरक्षण ते करिती ॥३१॥
सुबाहुक नाम दारुण असुर । मारिला तेव्हां मुनिवरा उग्र । विश्वामित्र प्रसन्न झाला थोर । महायोगी रामावरी ॥३२॥
त्यास अस्त्रविद्या सकल शिकवित । जनकयज्ञीं होत उपस्थित । रामलक्ष्मणीं समवेत । मुनि कौशिक तदनंतर ॥३३॥
जनक त्याची पूजा करित । माहेश्वर बाण लावित । श्रीराम तेव्हां तें मध्ये मोडत । जिंकला पण ऐशा रीतीं ॥३४॥
तदनंतर जनक नृप देत । सीता श्रीरामाप्रत । ऊर्मिला अर्पिली लक्ष्मणाप्रत । सोहळा अपूर्व तो झाला ॥३५॥
भावाच्या मुली तेव्हां अर्पित । एकेक भरत शत्रुघ्ना प्रत । नंतर अयोध्येस परतत । दशरथ नृप आनंदे ॥३६॥
कैकेयी दशरथासी प्रार्थित । रामास पाठवा वनवासांत । राज्य द्यावें भरताप्रत । वरदान हें मागत मीं ॥३७॥
पूर्वी तुम्हीं वचन दिलें । तें पाहिजे आता पूर्ण केलें । दशरथें विवशपणें मान्य केलें । कैकेयीचें तें वचन ॥३८॥
श्रीराम पितृआज्ञा मानित । सीता लक्ष्मणासह जात वनांत । प्रथम नाशिक क्षेत्रांत । निवास करी हर्षांनें ॥३९॥
तेथ अतिथिरुपें येत । लंकेचा रावण द्वेषयुक्त । एकाकिनी सीतेस पळवित । लंकेत घेऊन तुज गेला ॥४०॥
राम लक्ष्मण जेव्हा आश्रमांत । परतले तेव्हां त्यास ज्ञात । सीता कोठेही न दिसत । राम मूर्च्छित जाहला तें ॥४१॥
नंतर जेव्हां सावध होत । तेव्हां विलाप बहु करित । सीतेच्या शोधार्थ जात । वनांतरीं लक्ष्मणासह ॥४२॥
कर्णाटांत शैवक्षेत्रांत । जेव्हां लक्ष्मणासंगे जात । तेव्हां शंभूस आराधित । भावभक्तीनें मास एक ॥४३॥
संतुष्ट होऊन वर देत । सदाशिव रामासी मनोवांछित । सीताप्राप्तीसाठी उपदेशित । श्रीरामासी त्या वेळीं ॥४४॥
ऐक रामा महाभागा वृत्तान्त । तूं सनातन विष्णु जगांत । भृगुशापें मानुष देहांत । अवतरलासी हें सत्य ॥४५॥
सीता वियोगाचे दुःख तुजप्रत । झालें आता भक्तिसंयुक्त । गणराजासी भज निश्चित । तेणे होईल पूर्वज्ञान ॥४६॥
रामा सीतेची होईल प्राप्ति । संशयातीत तुजप्रती । तें ऐकून करी विनंती । राम परम शोकार्त ॥४७॥
विनयें समन्वित प्रार्थित । शंभो महेशा सांगा वृत्तान्त । गणेशाचें स्वरुप काय असत । सर्वाधीश ज्यास म्हणती ॥४८॥
रामाची प्रार्थना ऐकून । शंभु सांगे तयास पावन । गणेशयोग अतिप्रसन्न । मुनिसत्तमा त्या वेळीं ॥४९॥
ऐक रामा सांगतों ज्ञान । जें ऐकता पावन । सर्वभावज्ञा शांति लाभून । कृतकृत्य तूं होशील ॥५०॥
पंचधा बुद्धि हृदयीं संस्थित । जी चित्तरुप हे महाभागा असत । ती त्याचीच प्रकृति जगांत । ऐसें रहस्य जाणावें ॥५१॥
नाना भ्रमकरी माया दिसत । सिद्धि ती मोहक जनांप्रत । सिद्धिप्राप्तीस्तव प्रयत । सर्वलोक सर्वकाळ ॥५२॥
ती त्याची प्रकृति वर्णित । डाव्या बाजूस संस्थित । उजव्या बाजूस बुद्धि वर्तत । माया ऐसें तिज म्हणती ॥५३॥
त्यांचा स्वामी गणेश ख्यात । योगशांतिमय मत । जाणून त्यास आम्हां प्राप्त । शांति सदा जगतांत ॥५४॥
बुद्धीने जो जाणला जात । तेंच त्याचें रुप असत । योगादि साधनांनी न लाभत । तें सिद्धिज जाणावें ॥५५॥
द्विविध माया सोडून । करी तूं गणनायकाचें पूजन । त्यानें तूं योगमार्गज्ञ होऊन । गणेशरुप होशील ॥५६॥
वेदवादी त्यास वर्णिती । विघ्नराज नामें स्तविती । त्याचा अनादर जे करिती । विघ्नहीन तो कैसा होय? ॥५७॥
त्याच्या अधीन विघ्नें असत । म्हणोनि तो विघ्नसंयुक्त । तैसाचि विघ्नहीन ख्यात । प्रभाववान जगामध्यें ॥५८॥
विघ्नें सत्तात्मक असती । त्यांचा स्वामी गणपति । गणेश्वरा त्या विधिवत्‍ भजती । ते होती विघ्नहीन ॥५९॥
हेरंबा त्या भक्तिभावें भजावें । भक्तिमार्गाचें रुप जाणावें । तेणें तुज गणेशदेव स्वभावें । लाभेल हें निःसंशय ॥६०॥
जेव्हां मानव स्वसत्ताहीन । तेव्हां त्यास म्हणती पराधीन । दीनांचे जे रक्षक महान । ते ईश्वर परमेश्वर ॥६१॥
दीनांचे ते पालक असत । दीनार्थवाचक राम ख्यात । हें शब्दें ज्ञात वेदांत । रंब म्हणजे नाथ जाण ॥६२॥
त्यांच्या संयोगें हेरंब म्हणत । दीन सत्ताहीन जे असत । तैसेचि ज सत्तायुक्त । त्यांचा स्वामी हेरंब ॥६३॥
त्यास विधानपूर्वक भजून । द्विविध अभिमान त्यागून । राघवा पूर्णपालनात्मक अभिमान । दीनात्मक हाही भ्रम ॥६४॥
ज्यानें जीव केले दीन । परमेश्वर पालक पावन । जगद्‍ ब्रह्म त्याच्या अधीन । त्यासी शरण तूं जाई ॥६५॥
ऐसें सांगून महादेव क्षणांत । राघवा लक्ष्मणांसी रहस्य अद्‌भुत । अंतर्धान तो पावत । राघव तेथेंचि राहिला ॥६६॥
विद्याधीश पुरांत । राम उत्तम तप आचरित । शिवोदिष्टें मंत्रें तोषवित । विघ्नपा त्या हेरंबासी ॥६७॥
हेरंबासी राम लक्ष्मण पूजिती । निराहार भावभक्ति । त्याच्या ध्यानें होत प्राप्ति । शांती त्यास स्वल्पकाळें ॥६८॥
योगसेवेनें राम पूजित । जाणूनि त्याचा निश्चय प्रकटत । सहा महिन्यांनी प्रसन्नचित्त । करुणानिधि वर देण्यासी ॥६९॥
रामास लक्ष्मणासहित । विघ्नप तेव्हां जागें करित । तेव्हां ध्यान सोडून नमित । गणपासी ते भक्तिभावें ॥७०॥
हे मुने तेव्हां पूजित । राम विघ्नपासी स्तवित । गणाधीशा प्रणाम करित । भक्तिनम्र नतमस्तक ॥७१॥
राम गणपतीचें स्तवन करित । हेरंबा मी तुज नमित । दीनकर्त्या कृपालवा विनीत । दीनानाथ स्वरुपकरासी ॥७२॥
ईश्वरदीसी अभेदमयासी । विघ्नेशासी गणपतीसी । अनादीसी सर्वादिरुपासी । लंबोदरासी नमन असो ॥७३॥
अंतमध्य प्रतिष्ठितासे । चिंतामणीसी चित्त पालकासी । भेदाभेदादि हीनासी । तदाकारासी नमन असो ॥७४॥
सर्वपूज्यासी सर्वादिपूज्यासी । परमात्म्यासी अनंतासी । परेशासी ढुंढिराजासी । पूर्णासी पूर्णनाथा नमन ॥७५॥
स्वानंदस्थासी । सिद्धिबुद्धि प्रदात्यासी । सिद्धिबुद्धि वरासी । भक्तिहीना दैन्यदात्या नमन ॥७६॥
दीनां भक्तियुक्तां सामर्थ्यदात्यासी । दीनत्व सामर्थ्य ईशासी । सर्वाधीना योगेशा तुजसी । किती स्तवूं मी अल्पमति ॥७७॥
वेदादी तैसे योगींद्र न शकती । तुझी कराया पूर्ण स्तुति । तेथ काय माझी मति । तुझ्या वर्णनी गणाधीशा ॥७८॥
शांतियोग स्वरुपा तुज नमन । ऐसें करिता गणेशवर्णन । रोमांच शरीरीं दाटून । कंठ दाटला रामाचा ॥७९॥
तेव्हां भक्तिरसांत मग्न । त्यास पाहे गजानन । म्हणे वर माग जो वांछी मन । देईन तो मी प्रसन्न ॥८०॥
तूं रचिलेले स्तोत्र होईल । मजला हितकर विमल । शांतियोगप्रद अमल । भक्तिलक्षण वर्धक ॥८१॥
हया स्तोत्राचा पाठ करित । त्यास सर्व लाभेल ईप्सित । हया श्रवणे भक्त होत । माझा प्रिय जगतांत ॥८२॥
हेरंबाचें ऐकून वचन । त्यास म्हणे जनार्दन । परमभावयुक्त प्रसन्न । भक्तीनें ओंजळ जोडून ॥८३॥
जरी गजानना तूं प्रसन्न । तरी तव पदकमलीं पावन । देई शाश्वत भक्ति मजलागुन । योगेंद्रवंद्य करी मला ॥८४॥
योगशांति तैशी स्मृति । शंकरें सांगितलें जें मजप्रती । तें तें मज द्यावें जगतीं । गणपति तूं महाप्रभु ॥८५॥
रावणें हरण केली सीता । त्याच्या वधार्थ मी जातां । मिळावा जय मजला तत्त्वतां । ऐसें करी हेरंबा ॥८६॥
माझ्या नावाचें महिमान । महा अद्‌भुत जगतीं पावन । सर्वत्र करावें मान्य प्रसन्न । मजला कीर्ति लाभावी ॥८७॥
ऐसें त्याचें ऐकून वचन । रामास म्हणे गजानन । जें जें प्रार्थिलें विष्णो मनोमन । तें तें सर्व तुज लाभेल ॥८८॥
माझ्या स्मरणमात्रें होईल । सुलभ सर्व तुज निर्मल । तुझ्या नामप्रभावें तरतील । प्राणिमात्र जगतांत ॥८९॥
ऐसें वरदान देऊन । गणेश पावला अंतर्धान । रामलक्ष्मण भक्तियुक्तमन । तेथेंचि राहिले आनंदे ॥९०॥
नंतर अगस्त्यासी बोलावित । विप्रेंद्रसत्तमांसहित । मूर्ति हेरंबाची स्थापित । विधिपूर्वक श्रीराम ॥९१॥
तो आदि गणनाथ संस्थित । हेरंब विद्याधीश पुरात । मार्कंडेया भक्तांप्रत । सर्व सिद्धि प्रदाता जो ॥९२॥
त्यास पूजून राम होत । शोकहीन सीताविरहांत । लक्ष्मणसहित तें जात । राक्षसांचा वध करण्या ॥९३॥
सुग्रीवाशी मैत्री करुन । दुष्ट वालीस मारुन । वानरांसहित बलवान । लंकानगरींत राम जाई ॥९४॥
हनूमंत अंगदादींनी संवृत । सुग्रीव जांबवंतांसहित । देवरुप वानरांच्या समवेत । लक्ष्मणासह राम लढे ॥९५॥
राक्षस संघाते मारुन । कुंभकर्णाचें केलें हनन । इंद्रजितासी मारी लक्ष्मण । रामरावणांचे युद्ध चाले ॥९६॥
अति कोपयुक्त लढत । रावण पराक्रम गाजवित । अनेक कपींद्र झाले हत । पडले मूर्च्छित कितेक ॥९७॥
लक्ष्मण पडला मूर्च्छित । रामही अत्यंत पीडायुक्त । रामाची शस्त्रास्त्रें कुंठित । विशेषें तेव्हां जाहली ॥९८॥
तेव्हां अति विहवल स्मरे राम । गणनायक अभिराम । स्मरणमात्रें गजानन । राहहृदयीं प्रकटला ॥९९॥
चिंतामणि स्वयं देत । तेव्हां स्फूर्ति रामाप्रत । त्यायोगें तो रावणा मारित । मार्कंडेया अनायासें ॥१००॥
स्वयें श्रीबुद्धिपति होत । बुद्धिदाता रामाप्रत । बुद्धि अधीन जगद्‌ब्रह्म असत । विशेषाने महामुने ॥१०१॥
महावीर रावणासी मारुन । विभीषणा लंकाधीश करुन । सीतेसहित विमानीं बसून । अयोध्येसी परतला ॥१०२॥
धर्मनीति राज्य करित । सीतासक्त त्याचें चित्त । ज्ञान विसरता होत । सीताविरहदुःख पूर्वीं ॥१०३॥
परी आता अश्वमेधादि करुन । राज्य करी धर्मयुक्तमन । वसिष्ठांच्या योगें ज्ञान । पुनरपी झालें रामासी ॥१०४॥
नंतर शांति संयुक्त । मनीं गणेशासी ध्यात । भक्तिभावें त्यास पूजित । बाह्यात्कार धारका त्या ॥१०५॥
अंतीं राम वैकुंठा जात । विष्णु तो अव्यय अव्यक्त । अनन्यभावें गणेशा भजत । सर्वकाळ स्वचित्तानें ॥१०६॥
जो हें रामचरित वाचित । किंवा भक्तिभावें ऐकत । त्यासी मुक्तिलाभ होत । ऐसें रहस्य जाणावें ॥१०७॥
हा महोदराचा अवतार । हेरंबाख्य कथिला समग्र । महामुने ऐकतां सत्वर । सर्वसिद्धि लाभती ॥१०८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खंडे महोदरचरिते रामंचंद्राचरितं नाम षड्‌विंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP