मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । वालखिल्य ऋषि सूर्यास म्हणत । महाभागा ब्रह्मचरित । परी आम्हां न झालों तृप्त । अमृतपानासम कथाश्रवण ॥१॥
आता मोहासुराचें माहात्म्य सांगावें । जगदीश्वरा तें बरवें । शिवतीर्थापासून स्वभावें । जन्मून त्यानें काय केलें? ॥२॥
मुनींचें वचन ऐकत । महामति सूर्य त्यांसी सांगत । मोहासुराचें अद्‌भुत चरित । मुद्‌गले सांगती दक्षासी ॥३॥
शिववीर्यापासून जन्मत । स्नेह तो परमशोभन शरण जात । शुक्राचार्यासी जो वेदवादरत । त्यास वंदून म्हणे त्याला ॥४॥
आपुला जन्मवृत्तान्त । सर्व त्यास निवेदित । शिष्य म्हणोनी स्वीकारा सांप्रत । विनाथ मी तवाधीन ॥५॥
ऐसें त्याचें ऐकून वचन । शुक्र दयायुक्त होऊन । मौंजीबंधनादिक करुन । जंभासुरा देत पुत्रत्वें ॥६॥
त्य मोहासुरानें अध्ययन । केलें वेदादि शास्त्रांचें पावन । प्रमादासुरनामें असुर महान । आपुली कन्या त्यास देई ॥७॥
मदिरा नामक ती सुता । तपलावण्य संयुक्ता । मोहासुराची होय कान्ता । प्रमाद असुर संतोषला ॥८॥
आपुल्या तातास नमन करुन । मंत्र घेत शुक्रापासून । सूर्याच्या सदनीं जाऊन । करुं लागला परम तप ॥९॥
ऊर्ध्वंदृष्टि तो लावित । सूर्यमंडळी एकटक पाहत । मंत्र जपत भक्तियुक्त । निराहार पारायणें ॥१०॥
दिव्य वर्ष सहस्त्रें उलटत । तेव्हां दिवाकर प्रसन्न होत । त्यास वर देण्या प्रकटात । स्वभक्तानुकंपी त्या वेळीं ॥११॥
केवळ अस्थिपंजरयुक्त । मोहासुरासी पाहत । त्याचें परम धैर्य पाहून विस्मित । जाहला तेव्हा अर्यमा ॥१२॥
रवि देववर त्यास जाग करित । तपश्चर्या ध्यान स्थित । तो ध्यानांतून बाहेर येत । तेव्हां त्यास म्हणे वर माग ॥१३॥
प्रत्यक्ष रवीसी पुढती । पाहुनी विस्मित तो चित्तीं । करोनिया भावभक्तई । पूजी मग नानाविधि ॥१४॥
कृतांजलि तो स्तवन करित । मोहासुर म्हणें मजप्रत । नमन सूर्या सर्वरुप तुजप्रत । भानूसी तुज भास्करासी ॥१५॥
ग्रहश्रेष्ठासी रवीसी । कर्मफलदात्या तुजसी । कर्मफल धारकासी । कर्माकारा देवा नमन ॥१६॥
नाना भेदधरासी । नानाभेद वर्णतासी । सदा अमृतस्वरुपासी । स्वात्मरुपा तुला नमन ॥१७॥
परमात्मा तुज नमन । अनंतरुपा रुज वंदन । जगजीवनरुपा अभिवादन । सत्या सत्यपाला तुला ॥१८॥
दिवाकरासी त्रयीबोधासी । त्रयीकर्मं प्रवर्तकासी । सर्व अहंकार मुळासी । अहंकार विनाशका नमन ॥१९॥
ज्ञानदाता तू अससी । सर्व जगा प्रकाश देसी । ग्रहगोलां तेज देशी । अनादी महेशा तुला नमन ॥२०॥
परेशा वृष्टिबीजासी । सर्वांच्या कालकर्मप्रवर्तकासी । मायाधारासी मायाचालकासी । नमो नमः पुनः पुन्हां ॥२१॥
दिवानाथा किती स्तुति करावी । आत्माकारधरा तुझी भक्ति बरवी । ज्ञानप्रमाण्यें मानून घ्यावी । स्तवन केलें यथाशक्ति ॥२२॥
जरी तुष्ट तूं देवेशा मजप्रत । तरी मज अमर करी जगांत । जें जें नाम रुपधर असत । त्यापासून मज मृत्यु नसो ॥२३॥
त्रैलोक्याचें राज्य लाभावें । उत्तम आरोग्य लाभावें । सर्वांवरी प्रभुत्व मिळावे । संग्रामीं विजय अतुल्य ॥२४॥
जगदीश्वरा जें जें इच्छित । तें तें लाभावें त्वरित । तुझ्या पादपद्माची भक्ति मनांत । दृढ होई ऐसें करी ॥२५॥
ऐसें वरदान मागत । महादेवा भास्करा तो नमित । उठून समीप बसत । विनयपूर्वक तो महासुर ॥२६॥
सविता विस्मय वाटून म्हणत । प्रार्थिलें तें मिळेल तुज प्रत । तूं रचिलेलें स्तोत्र मजप्रत । प्रीतिवर्धक सर्वकामप्रद ॥२७॥
ऐसें सांगून अन्तर्धान । सत्वर पावला सविता महान । स्वर्लोकीं जात परतून । दैत्यही हर्षित जाहला ॥२८॥
स्वगृहीं तो परतत । मातापित्यासी वंदित । महासुर मित्रांसी भेटत । नंतर जाई शुक्रदर्शना ॥२९॥
त्यास प्रणाम करित । मोहासुर सर्व सांगें वृत्तान्त । उपचारें त्यास पूजित । नंतर स्वगृहीं परतला ॥३०॥
तदनंतर तो नगर निर्मित । विषयावासकनाम अद्‌भुत । शुक्र तेथ निवास करित । परम तेजयुक्त जो ॥३१॥
असुरादीस कळता वृत्तान्त । ते सर्व येती त्या नगरांत । त्या नगरातं वसती करित । मोहासुराच्या आज्ञेनें ॥३२॥
चातुर्वर्ण्य समायुक्त । नगर त्याचें शोभत । अनुपम सर्व पृथ्वींत । पूर्ण भोगद सुखप्रद ॥३३॥
दैत्यगण श्रेष्ठ येत । नंतर त्या स्थानाप्रत । शुक्राचार्य त्यांना प्रेरित । प्रणाम करिती ते सारे ॥३४॥
प्रचंड चंड महाकाल । वीर्यशाली कालांतकारी प्रबल । अन्यही दैत्य नायक बाहुबल । अनेक जमले त्या स्थळीं ॥३५॥
दैत्य संयुक्त ते एकत्र येत । मोहासुराच्या आज्ञेंत राहत । दैत्याधिपासी अभिषेक करित । शुक्राचार्य महर्षी ॥३६॥
द्विजांसह यांच्यावर । स्थापन करी मोहासुरासी अमर । सर्वदैत्य मुदित फार । होउनी गेले स्वस्थानीं ॥३७॥
जे मुख होते ते राहत । त्याच नगरींत सेवा लालसायुत । ऐशापरी मोहासुर होत । असुरांचा श्रेष्ठ नायक ॥३८॥
त्याचा आश्रय घेऊन । महादैत्य हर्षित होऊन । महीवरती संचार भयहीन । अधिकार मदें राज्य करिती सदा ॥३९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीयेखण्डे महोदरचरिते मोहासुरराज्याभिषेको नाम षष्ठोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP