मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । तदनंतर कामसमायुक्त । शंकर पार्वतीसह रमत । पुत्रकामार्थ हर्षसमन्वित । साठ हजार वर्षे गेलीं ॥१॥
परी देवर्षि सत्तमहो क्रीडारत । महेशाचें रतिसुख अद्‍भुत । महामायायुत न जाणत । शंभू दिवसरात्र कांहीं ॥२॥
तेव्हां महेशाच्या रतिभंगार्थ येत । देव तेथ समस्त । अग्नीस द्विजरुपें ते पाठवित । भिक्षा मागण्या त्या स्थळीं ॥३॥
जेथ शंकर पार्वती रतिमग्न असत । तेथ जाऊन भिक्षा तो मागत । ती याचना ऐकता वीर्य पडत । शिवाचें सत्वर भूतली ॥४॥
शिव वर ती उठता देत । पर्वती भिक्षारुपें तें वीर्य भिक्षुकाप्रत । शिववीर्य तें अग्नि प्राशित । दाह जाहला तयाचा ॥५॥
तेव्हां तो तें गंगेत । सोडुनिया देत । तेथ सहा कृत्तिका येत । स्नान करण्या त्या वेळीं ॥६॥
त्या आचमन समस्त करिती । तेथील गंगाजळ प्राशिती । स्नान करुन स्वगृहीं जाती । तेज उजळें मुखांवर ॥७॥
परवीर्ययुक्त त्यांस पाहत । पती त्यांचा त्याग करित । तेव्हां बांबूच्या बेटांत । महावीर्य त्या टाकिती ॥८॥
पुनरपि स्नान करुन । गुहा जाती त्या परतून । त्या शरस्तंबी बाळ प्रसन्न । सहा मुखांचा जन्मला ॥९॥
नारद त्या जागीं पाहत । शिशु तें ध्यानानें जाणत । कैलासी जाऊन सांगत । मुनिसत्तम तो शक्तीसी ॥१०॥
यदृच्छेनें मी संचार करित । पार्वती मीं पाहिला सुत । तो तुझा असे निश्चित । देवी त्यांस तूं पाळावें ॥११॥
तेव्हां आणून त्या बाळा पाजित । स्तनपान पार्वती स्नेहयुक्त । नंतर अग्नि गंगा कृत्तिकादी जात । त्या बाळास पहावया ॥१२॥
शिव सत्कार सर्व मातांचा करी । त्या परतत्ती स्वगृही नंतरी । ब्रह्मा ईशादी देव मुनिगण करी । अभिषेक त्या बाळातें ॥१३॥
देवसेनापतिपदी नेमित । तो बाळ सेनेसह जात । तारकाचा नाश करण्या त्वरित । देवप्रार्थना ऐकूनी ॥१४॥
स्कंद तारकाचें युद्ध चालत । परम दारुण अद्‌भुत । स्कंद तेव्हा शक्तीनें ताडित । महादैत्य तारक मूर्च्छित झाला ॥१५॥
परी क्षणभरें संज्ञा लाभत । गदेनें स्कंदा मारित । तो अत्यंत क्रोधयुक्त । कार्तिकेय रणीं पडला ॥१६॥
तें पाहून पलायन । देव करिती भयभीत मन । कार्तिकेय बेशुद्ध पाहून । दैत्य गेला स्वस्थाना ॥१७॥
तदनंतर औषधीप्रभावें सावधान । करिती स्कंदास देव उन्मन । स्कंद परम दुःखार्त होऊन । शंकरासी शरण गेला ॥१८॥
जयाचा उपाय सांगावा । शिव शांतिप्रद तो असावा । सर्वसाधक तो बरवा । पूर्णभावें तो मी करीन ॥१९॥
तेव्हां गणेशाचा षडक्षर मंत्र देत । शंभु विशाखास त्या देत । विधीचें ज्ञान सांगत । सविस्तर तयाप्रती ॥२०॥
शंभू तयासी सांगत । ऐक स्कंदा महायोग जेणें शांत । होशील तूं जरी चित्तांत । चिंतामणीस जाणिसी माझ्यासं ॥२१॥
जें जें चित्त वांछित । तें तें पुत्रा लाभत । योगसेवेनें चित्त होत । ब्रह्माकार जाण पुत्रा ॥२२॥
अंतर्बाह्य जे भेद वर्तत । ते सर्व चित्तसंभव असत । ओंकार अर्थसमायुक्त । चित्तरुप निःसंशय ॥२३॥
ब्रह्म स्वकोत्थान परोत्थान । चित्तरुप मोहप्रद करुन । बुद्धीनें त्यात निर्मून । स्वानंद निवृत्ति दोन्हीही ॥२४॥
अधिक काय सांगावें । चित्त झालें सर्वात्मक आघवें । ब्रह्माकार त्या जाणावें । जगदात्या आधारभूत ॥२५॥
ऐसें हें पंचविध चित्त । योगसेवेनें तें सोड त्वरित । ब्रह्म जें बिंबित चित्तांत । तें असतें भ्रमयुक्त ॥२६॥
बिंबभाव सोडून । चित्ताचा त्याग करुन । महाभागा तूं अभिन्न । चिंतामणि होशील पुत्रा ॥२७॥
हेंच हे परम ज्ञान । शांतिरुप जें महान । रवि कथा सांगे ती पावन । पुढें काय झालें असे ॥२८॥
कार्तिकेय शिवा प्रणाम करित । गेला निघून वनांत । विघ्नेशाचें ध्यान करित । विधिपूर्वक षडक्षर मंत्रें ॥२९॥
स्कंद उत्तम तप आचरित । वायु भक्षण करुन राहत । जपध्यान परायण सतत । दंडकारण्य देशांत्र ॥३०॥
वर्ष सहस्त्र ऐसें तप करित । गजानन तेव्हां तोषत । शांतियोग प्राप्त होत । कार्तिकेया तत्कृपेनें ॥३१॥
तरीही करित होता भजन । गणेश देती त्याला दर्शन । त्यांना प्रकट पाहून । प्रणाम करुनी पूजन करी ॥३२॥
कार्तिकेय करसंपुट जोडित । स्वानुभव परायण स्तविता । योगरुपा तुज नमित । संप्रज्ञान शरीरा तुज ॥३३॥
वंदन असंप्रज्ञात मूर्धीसी । तैसें त्या योगमयासी । वामांगीं भ्रांतिरुपा सिद्धीसी । सर्वदा प्रभूं तूं वागविसी ॥३४॥
भ्रांतिधारकरुपा बुद्धि असत । दक्षिणांगी तुझ्या दिसत । माया सिद्धिरुपा वर्तत । देव मायिक बुद्धिसंज्ञ ॥३५॥
त्यांच्या योगें गणेशान स्थित । गकार जगद्‌रुप वर्तत । णकार ब्रह्मवाचक उक्त । त्यांचा योग गणेशांत ॥३६॥
चतुर्विध हें सर्व जगत । ब्रह्मतंत्र सदात्मक अद्‌भुत । म्हणोनि गणेशा तुझे चार हस्त । पुनःपुन्हां तुज नमन ॥३७॥
स्वसंवेद्य जें ब्रह्म । तेथ खेळसी तूं अनुपम । स्वानंदवासी मनोरम । स्वानंदपते तूं तुज नमन ॥३८॥
द्वंद्वरुपें भक्तहृदयीं वसत । चोरासम तुझें मूषकवाहन होत । जगीं ब्रह्मांत राहून भोगित । भोग तूं सारे सुयोगानें ॥३९॥
परी जगांस तैसें ब्रह्मांस अज्ञात । गणेशा तुझें महत्त्व अद्‌भुत । कार्य त्याचें गुप्त असत । चोरासम भोगकर्ता तूं ॥४०॥
म्हणोनि तुझें मूषकवाहन । प्रतीक हें सजलें छान । मूषकावरी आरुढ होऊन । हेरंबा तूं विश्वचालक ॥४१॥
तुज योगशांतिधराचें स्तवन । काय करुं मी पामर जन । वेदादींनीही धरलें मौन । देवा तुला नमन करितों ॥४२॥
ऐसें स्तोत्र ऐकत । तेव्हां गणेश त्यास म्हणत । वर माग महाभागा इच्छित । दुर्लभही सुलभ करीन ॥४३॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र वाचित । अथवा जो हें ऐकत । कार्तिकेया सर्व सिद्धिप्रद होत । सर्व इच्छा मीं पुरवीन त्याच्या ॥४४॥
ऐसें गणेशवाक्य ऐकून । कार्तिकेय हर्षभरित । योगज्ञ तो गणेशां म्हणत । स्कंद परम भक्तिभावें ॥४५॥
काय मागूं मी गजानना । सर्व भ्रांतीची भावना । म्हणोनी दृढ भक्ति माझ्या मन । सदैव देई विघ्नराजा ॥४६॥
माझी उग्र भक्ति तव हृदयांत । निवसेल ऐसें वरदान मीं देत । गणराज भक्तवत्सल त्वरित । तारकादी दैत्यां मारशील तूं ॥४७॥
अन्य जें जें असेल वांछित । तें तें सफल होईल निश्चित । ऐसें बोलून अंतर्हित । जाहला गणेश भक्तोत्तमा तो ॥४८॥
कार्तिकेय तेथ स्थित । गणपाचें स्मरण करित । ब्राह्मणकरांनीं मूर्ति स्थापित । त्या स्थानीं गणपतीची ॥४९॥
लक्षविनायक नाम देत । त्या गणेशरुपा द्विजप्रेरित । गणेशाच्या दर्शनमात्रें होत । तेथ वांछिताचा लाभ ॥५०॥
तेथ मरण येता प्राप्त । होत ब्रह्मपद नराप्रत । तदनंतर स्वगृहीं परतत । कार्तिकेय तो प्रतापी ॥५१॥
देवांसहित युद्ध करित । तारकासुरासी मारित । देवांसी करुनी संकटमुक्त । गणेशक्षेत्रीं तो गेला ॥५२॥
तेथ विध्नेशा आदरें भजत । ऐसें हें स्कंद माहात्म्य कथित । हें वाचिता वा ऐकतां पुनीत । ब्रह्मभूयकर सर्वप्रद ॥५३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते स्कंदमाहात्म्यं नाम पंचमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP