मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ११

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । सूर्य कथा पुढती सांगत । मोहासुर जेव्हां स्वगृहीं परतत । होऊनिया शांतिचित्त । देवमुनी महोदरा पूजिती ॥१॥
पूजा करुनी भक्तिसंयुक्त । गणेशासी नमन करित । विविध प्रकारें स्तुति करित । हर्षयुक्त ते देवऋषि ॥२॥
अमित विक्रमा निरंजना । अमेयामायिका गजानना । गणेश्वरा मायिकमोहना । नमन तुजला वारंवार ॥३॥
मनोवाणी विहीना । मनोवाचायुक्ता गजानना । अयोगसंयोगमया ढुंढे वंदना । महोदरा तुज वारंवार ॥४॥
विदेहरुपासी बोधकासी । सोऽहंपद भोक्त्यासी । सुबिंदु आत्मक देहगासी । महोदरा तुज नमन असो ॥५॥
गुणेशरुपासी सुषुप्तीकासी । सुसूक्ष्मासी जागृतासी । हरीश ब्रह्मादिक संस्थितासी । महोदरा तुज नमन असो ॥६॥
शुभअशुभ आकार धारकासी । शुभअशुभांत प्रथम पूज्यासी । शुभाशुभकर्मांत सिद्धिप्रदासी । महोदरा तुज नमन असो ॥७॥
कालप्रकाशरुपासी । कर्त्यासी क्रियास्वरुपासी । भानूसी शक्तिप्रदहत्यासी । महोदरा तुज नमन असो ॥८॥
यम चंद्र वायुरुपासी । कुबेरासी पुरंदरासी । शिवरुपासी वह्रिरुपासी । महोदरा तुज नमन असो ॥९॥
नैऋतासी अनंतरुपासी । प्रजापतीसी पाशधरासी । जलेशकायासी दिशामयासी । महोदरा तुज नम असो ॥१०॥
दिगीशपालासी सुरासुरसमासी । सुरासुर आकारधारकासी । पिशाच्च गंधर्वमयासी । महोदरा तुज नमन असो ॥११॥
धरास्वरुपासी जलप्रकाशासी । जलस्वरुपासी तेजासी । वायूसी आकाशमयधारासी । महोदरा तुज नमन असो ॥१२॥
अनादि मध्यान्त विहारकासी । सदा आदि मध्यान्तमयासी । तत्त्वप्रकाशासीं तत्त्वमूर्तीसी । महोदरा तुज नमन असो ॥१३॥
नरासी वर्णाश्रम संस्थितासी । द्विजस्वरुपासी नराधिपासी । वैश्य शूद्रासी अंतिमासी । महोदरा तुज नमन असो ॥१४॥
गुरुच्या अधीन स्वरुपासी । गृहस्थ वानप्रस्थ परिव्राज कासी । तैसेचि वर्णाश्रमहीन योग्यासी । महोदरा तुज नमन असो ॥१५॥
वृक्षलता तृण संस्थितासी । धराधराकारमयासी । पशुअस्वरुपासी पक्ष्यासी । महोदरा तुज नमन असो ॥१६॥
रसस्वरुपासी रसाधिपासी । अन्नरुपासी जीवनासी । चराचराकारमय नागासी । महोदरा तुज नमन असो ॥१७॥
अंकुशादि सुचिन्ह शोभितासी । मूषक ध्वजासी मूषकवाहनासी । त्रिनेत्रधरासी शूर्पकर्णासी । महोदरा तुज नमन असो ॥१८॥
स्वानंद लोकाधिपासी । देवदेवासी परात्म्यासी । सिद्धिबुद्धी प्रभवासी । महोदरा तुज नमन असो ॥१९॥
एकदंतासी चतुर्भुजासी । आदिपूज्यासी वस्त्रभुषितासी । प्रमोदामोदादि गणस्तुतासी । महोदरा तुज नमन असो ॥२०॥
सदा अमृत समुद्रपाणीसी । गणेशासी हेरंबासी । भक्तपोषकासी विकारहीनासी । महोदरा तुज नमन असो ॥२१॥
विश्वोदरीं प्रवेश करुन । भोग भोगिसी सुबोध मन । विश्वमया अल्पोदरा हो प्रसन्न । महोदरा तुज नमन असो ॥२२॥
देवमुख्य जे भोग भोगिती । त्यांच्या रुपें ते तुलाचि पावती । तूंच सुखभोग भोगिसी जगतीं । महोदरा तुज नमन असो ॥२३॥
ऐसी स्तुति जे करित । सुरऋषि भक्तिरसयुक्त । आनंदानें ते नाचत । रोमांच उठले सर्वांगी ॥२४॥
कंठ आला दाटून । डोळ्यांतून आनंदाश्रूंचे पतन । तयांसी म्हणे गजानन । भक्तवत्सल महोदर ॥२५॥
देवांनो, मुनिगणांनो मागावें । जें जें इच्छित स्वभावें । तें सर्वही मी पूर्ण करावें । भक्तिस्तोत्रें संतुष्ट मी ॥२६॥
गणेशाचे वचन ऐकून । सुरऋषि म्हणती हर्षित मन । पुनःपुन्हां प्रणाम करुन । गणनाथा तुझी भक्ति देई ॥२७॥
तुझ्या भक्तीनें व्हावें तृप्त । मोहासुरा केलेंस शांतियुक्त । दुष्ट असुनी झाला पुनीत । सर्व जगाचें पालन केलें ॥२८॥
आतां आम्हां तापहीन । केलेत गजानना होऊन प्रसन्न । अनाथांचा नाथ तूं मनमोहन । प्रणाम करितों मनोभावें ॥२९॥
त्यांसी वरदान देऊन । गणेश पावले अंतर्धान । देवमुनि जाती परतून । आपापल्या सदनांत ॥३०॥
लोक झाले स्वधर्मरत । त्यांचा संताप दूर होत । जगासी मोहहीन करित । मोहासुरासी देत शांति ॥३१॥
ऐसा हा प्रतापी महोदर । तयाचे विविधा अवतार । वर्णन करण्या अशक्य समग्र । चरित्र त्याचें अद्‍भुत ॥३२॥
सीतावियोगें जेव्हां आर्त । राम तेव्हां शरण जात । अंतीं महोदर शांत करित । भक्ति त्याची पाहुनि ॥३३॥
सीतेसहित भजन करित । महोदराची मूर्ति स्थापित । श्रीराम दक्षिण दिशेंत । प्रसिद्ध झालें तें स्थान ॥३४॥
ऐसें हें महोदराचें चरित । मोहनाशक शांतिप्रद पुनीत । द्विजांनो सांगितलें तुम्हांप्रत । पाठका वाचका शांति लाभे ॥३५॥
भुक्तिमुक्ति लाभेल । संशय मनींचा नष्ट होईल । सूर्य म्हणे विप्र विफल । मजला परात्परमानिती जें ॥३६॥
तयांसी स्वलोपयोग ज्ञान । ऐका ऐसें माझें वचन । म्हणोनि भक्तिभावें भजन । करितों मी गणेशाचें ॥३७॥
ऐसें हें माझें चरित । सांगितलें तुम्हां समस्त । वालखिल्य मुनींनो सुविहित । मनन करा तयाचें ॥३८॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खंडे महोदरचरिते महोदरांऽतर्धान नामैकादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननर्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP