मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ४५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्ण कथा पुढें सांगती । ज्ञानारि प्रबळ जगतीं । दैत्य तयासी पूजिती । शुक्राचार्या बोलाविती ॥१॥
त्यानें विप्रांसह येऊन । अभिषेक केला ज्ञानारीस प्रसन्न । पांच प्रधान बळवंत नेमून । राज्यकार्य सुरु केलें ॥२॥
नमुचि शंबर कलासुर । प्रतापवंत जंभ बलासुर । हे ते पांच प्रधान उत्तर । दिग्विजयास निघाले ॥३॥
नानाविध दैत्यगणांनी युक्त । ते जिंकिती पृथ्वी समस्त । सप्त सागरें वलयांकित । नंतर गेले पाताळीं ॥४॥
पाताळ जिंकून स्वर्गांत । ज्ञानारी दैत्यांसह जात । तेव्हां इंद्र सुरगणांसहित । पळाला भयभीत होऊन ॥५॥
ज्ञानारी जिंकून स्वर्गलोक । जिंकण्या गेला सत्यलोक । तेव्हां देवांसह ब्रह्मा पळत साशंक । ज्ञानारी गेला वैकुंठी ॥६॥
वैकुंठ सोडून विष्णू पळाला । युधिष्ठिरा हाहाकार माजला । दैत्यें वैकुंठ जिंकला । अत्यानंद दैत्यांसी ॥७॥
नंतर असुर कैलासांत । दिग्विजयार्थ जात । दैत्यनायक शंकरा नमित । म्हणे कैलास दे मजला ॥८॥
अन्यथा युद्ध करुन जिंकीन । तुजसी मीं बळवंत महान । यात संशय काहीच न । ऐकता शंकर क्षोभला ॥९॥
परी होऊन भयकंपित । कैलास तयास देत । होउनी तो भयभीत । देवांसहित वनीं गेला ॥१०॥
कैलासांत ज्ञानारी मोदांत । राहिला असुरवीरांसहित । नंतर देत्येशां स्वर्गी स्थापित । निर्भंय झाले सर्व असुर ॥११॥
आपण स्वनगरीं परतत । दैत्यवीरांच्या सहित । सुकलेपासून ज्ञानारीस होत । महातेजस्वी एक सुत ॥१२॥
युधिष्ठिरा सुमुहूर्तीं जन्मला । तो रुपें अप्रतिम पुत्र भला । पुत्रजन्मानें आनंदला । असुरेंद्र देई विविध दानें ॥१३॥
पुत्राचें जातकर्मादि करित । कर्मविनाशा दैत्यां पाठवित । ते सर्वत्र विनाश आचरित । भूमंडळीं कर्मांचा ॥१४॥
स्वाहा स्वधा वषट्‌कार । सर्वांचा लोप अनिवार । कर्महीनतेनें दुःख अपार । देवांस तेव्हां जाहलें ॥१५॥
उपोषणपर ते विचार करिती । ज्ञानारीच्या नाशाची युक्ती । परी कांहीं न सुचे चित्तीं । ऐसा काळ बहु लोटला ॥१६॥
तेव्हां काय करावें म्हणती । मनीं जाहलें विह्रल अती । विष्णू तयांसी म्हणती । हितकारक वचन तेव्हां ॥१७॥
चराचरमय जें समस्त । त्यापासून ज्ञानारीस भय नसत । म्हणून विघ्नेश्वरा देवाप्रत । आतां शरण जाऊंया ॥१८॥
जो बुद्धिपती साक्षात । बुद्धीनें छिद्र प्रकाशवील क्षणांत । त्यास भजून तें ज्ञात । करुंया आपण रहस्य ॥१९॥
नंतर त्या ज्ञानारीस मारुं । आपण सिद्धिदात्यास स्मरुं । तेणें सर्व संकटें दूर करुं । सुंदर उपदेश देवा वाटे ॥२०॥
दिवौकस ऐकून विष्णुवचन । करिती ढुंढीचें पूजन । दशाक्षर मंत्राचें ध्यान करुन । गजाननासी तोषविती ॥२१॥
नाना तपें ते आचरती । भक्तिभाव दाटला चित्तीं । ऐसें एक वर्ष करिती । उपासना गणेशाची ॥२२॥
तेव्हां रात्रीं स्वप्नांत । येऊन लक्ष्मीच्या तो सांगत । हितकारक वचन उदात्त । ऐक माते सावधान ॥२३॥
पूर्वी तूं सांगितलें मजप्रत । तुझा पुत्र मीं व्हावें जगांत । तें वचन मीं पूर्ण करित । पुत्रभावेन प्रकटेन ॥२४॥
ऐसें त्या भामिनीस सांगून । गणवल्लभ पावला अंतर्धान । लक्ष्मीच्या मांडीवर बाळ होऊन । नंतर खेळूं लागला ॥२५॥
महालक्ष्मीस जाग येत । ती गणेशाचे बोल आठवित । तोंच आपुल्या शय्येवर पहात । शुंडाधर बाळ गणेश ॥२६॥
विस्मित होऊन अत्यंत । नारायणासी सांगे वृत्तान्त । विघ्नपासी त्यास दाखवित । तेव्हां सर्व त्यास नमिती ॥२७॥
स्त्रीसहित नारायण । भक्तिभावें करी वंदन । प्रभूस त्या गाणप्त्य सूक्तें म्हणून । माधव स्तवूं लागला ॥२८॥
धन्य मीं सर्व भावें जगांत । देवा तुझें अंघ्रियुगदर्शन होत । पुत्रभावें पावशील आम्हां सतत । यांत संशय मुळीं नसे ॥२९॥
नंतर तेथ येत समस्त । अमर मुनी ऋषिजन त्वरित । त्या बालका पाहून विस्मित । स्तविती नाना स्तोत्रांनी ॥३०॥
त्याचें जातकर्मादी करिती । अकराव्या दिवशीं नांव ठेविती । द्वंद्वभाव विहीन हा निश्चिती । म्हणोनी पूर्णानंद हें नांव ॥३१॥
साक्षात आनंददायक । सर्व द्वंद्वांत विकारवर्जित एक । सर्वंदा प्रमोददायक । हा होईल निःसंशय ॥३२॥
त्यापरी पूर्णानंद नाम ख्यात । त्या महात्म्याचें जगांत । पांचव्या वर्षी व्रतबंध करित । अव्यय विष्णू तयाचा ॥३३॥
कश्यपाच्या घरी जन्मत । दोन मुली विद्या अविद्या ख्यात । अदिती तप करुन देत । त्या पूर्णांनंद वरासी ॥३४॥
तो पूर्णानंदासे भक्तिसंयुत । श्रद्धापूर्वक प्रणाम करित । गणनायक बारा वर्षांचा होत । तेव्हां बालक्रीडा करी ॥३५॥
त्या क्रीडांनी मोहित । होती देवगण समस्त । स्तनपानादिक भोजनाच्छादनादी करित । लक्ष्मी स्वतः तयाचें ॥३६॥
विष्णू देवगणांनी युक्त । नित्य त्याचे लाड करित । कश्यपही करी कौतुक बहुत । जावयाचें विप्रांसवं ॥३७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते पूर्णानंदावतारो नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP