मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय १६

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । नरनारायण पुढें सांगती । चार युगांची काल मिति । दिव्य द्वादश वर्षे सहस्त्र ऐसी गणती । विबुधांनी जाणावी ॥१॥
चार सहस्त्र वर्षांचे कृत युग होत । आठशें वर्षें संधिकाल होत । तीन वर्ष सहस्त्र त्रेतायुग कीर्तित । संध्यांश द्विगुण जाणावा ॥२॥
दोन सहस्त्र वर्षें द्वापार युग असत । संधिकाळ द्विगुण असे युक्त । एक सहस्त्र वर्षें कलियुग नांदत । येथहीं संधि द्विगुण असत ॥३॥
ऐसे द्वादश सहस्त्र देववर्षेपर्यन्त । चतुर्युगांचे प्रमाण कथित । कृत त्रेता द्वापार कलि ऐसा असत । क्रम हा चार युगांचा ॥४॥
कृत युगांत मुख्य ध्यान । त्रेता युगांत तप यज्ञ याजन । द्वापारांत आचार असे पूजन । कलियुगीं स्तवन मुख्य असे ॥५॥
ब्राह्मधर्म कृतयुगांत । चतुष्पाद सनातन प्रख्यात । त्रेता युगांत त्रिपद तो होत । ऐसे धर्मवेत्ते सांगती ॥६॥
द्वापारांयुगीं द्विपद धर्म असत । ऐसें सर्व शास्त्रांत संमत । एक पद धर्म कलियुगांत । तोही अंतीं नाश पावे ॥७॥
कृत युगांत ज्ञान पूज्य असत । रवि मान्य होय त्रेतायुगांत । द्वापारांत विष्णु दैवत । कलियुगी शंभु मुख्य म्हणती ॥८॥
परी चतुर्युगांच्या कालावधीत । गणेश मुख्य भावें सर्व पूजित । आपुली सिद्धि प्राप्त होण्या जगांत । मानव प्राणी सर्वकाळ ॥९॥
कश्यपाचा सुत विनायक ख्यात । सिंहारुढ दिक्‌बाहु तेजयुक्त । षड्‌भुज मयुरेश पूजिती भक्त । त्रेतायुगांत आदरें ॥१०॥
शिवाचा सुत मयूरवाहन । शशिवर्ण त्याचा कांतिमान । द्वापारांत पूजिती गजानन । मूषकारुढ चतुर्बाहु ॥११॥
वरेण्य नृपतीचा सुत । रक्तवर्ण तो ख्यात । कलियुगांत अवतार घेत । धूम्रवर्ण नामें तो ॥१२॥
अश्वावरी तो बसेल । द्विबाहु युक्त असेल । सर्व भावतारक होईल । पूजनीय गणेश देव ॥१३॥
परिब्रह्माकारें अभिन्न असत । सिद्धिदाता चार युगांत । एक लक्ष वर्ष ख्यात । मानव आयुष्य कृत युगांत ॥१४॥
दहा हजार वर्षे त्रेता युगांत । सहस्त्र वर्षे द्वापारांत । शंभर वर्षे कलियुगांत । अंतीं पंधरा वर्षे न्यून होय ॥१५॥
स्वधर्मनिष्ठ सर्वहितरत । ऐसे जन कृतयुगांत । भेदहीन ते सन्मान करित । भक्तिभावें परस्परांचा ॥१६॥
कलहादि वर्जित मत्सर विहीन असत । बाल्यापासून धर्मरत । सदा आनंदयुक्त चित्त । विषय सुखा तुच्छ मानिती ॥१७॥
सदा असती ज्ञानयुक्त । ध्यानपरायण सुखांत । वर्णाश्रम धर्म पालन करित । आपुले विचार श्रद्धेनें ॥१८॥
योगाभ्यास परायण असती । ब्रह्मावरी श्रद्धा ठेविती । केवळ ऋतुकाळी भोगिती । विषयसुख शास्त्रसंमत ॥१९॥
अंतर्बाह्य एकभाव राहून । सुखें भोगिती आसक्ती सोडून । ऐसे श्रेष्ठ धार्मिक जन । कृत युगांतले वर्णले ॥२०॥
त्रेतायुगांत नरकपाद हीन । धर्म असतो म्हणून । अंतर्बाह्य भाव भिन्न । लोक होती त्या वेळीं ॥२१॥
स्वार्थ परार्थी न ते समान । विषयेच्छायुत असती जन । संध्यांश मार्गाचें प्रमाण । आठशें वर्षें मानिलें असे ॥२२॥
कृतयुगांती चार शत । त्रेता युगांती तीन शत । शत सप्तक वर्षे संघ्यांश ख्यात । कृत धर्म क्रमें विनाश पावे ॥२३॥
सातशें वर्षें समाप्त होत । तेव्हां त्रेता धर्म होय उपस्थित । संध्यांश होता समाज । प्रभाव दुसर्‍या युगाचा ॥२४॥
द्वापारांत द्विपद धर्म । स्वार्थ परायण करिती कर्म । छंद असती कलहादिसम । ऐसे मानव त्या युगीं ॥२५॥
बाह्य भावें साधूंचे सेवक । धर्मपरायण निःशंक । लज्जायुक्त असती इच्छुक । अंतरी विषयसुखाचे ॥२६॥
दुसर्‍यांच्या लज्जेस्तव धर्म आचरिती । परि स्वगृहीं विषयेच्छायुत असती । धर्मलोपक ते मलिन चित्तीं । ऐसे नर द्वापार युगीं ॥२७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते युगधर्मवर्णनं नाम षोडशोऽध्यायः समाप्तः श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP