मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय १

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । शौनक म्हणती सूतास । द्विजा तूं मज तारिलेस । सर्वार्थतत्त्वज्ञा सांगितलेंस । गणेशचरित परमाद्‌भुत पुण्य ॥१॥
एकदंताचें माहात्म्य ऐकलें । परी द्विजोत्तमा कर्ण ना संतोषले । महोदराचें महिमान भलें । विस्तार करुनी मज सांग ॥२॥
तो कोणत्या स्वरुपाचा असत । त्याचे अवतार किती जगांत । त्याचें क्षेत्र कोणतें असत । भूमीवरी कां अवतरला? ॥३॥
हें सर्व मज सांगावें । तुज म्हणे शौनका ऐकावें । विप्रेन्द्रा धन्य तूं स्वभावें । ढुंढीचे रहस्य वाढविसी ॥४॥
म्हणोनी मी हर्षित । सर्व सांगेन विस्तारें तुजप्रत । महोदराचें माहात्म्य अद्‌भुत । व्यासमुखांतून जें ऐकिलें ॥५॥
दक्ष तुजसम विचारित । तेव्हां मुद्‌गल त्याला जे सांगत । तें सारें मीं तुजप्रत । सांगतों आतां ऐकावें ॥६॥
दक्ष म्हणे मुद्‌गला तारिलें । मंगल कथामृत मज पाजिलें । आतां महोदरचरित्र जें घडलें । भवबंधमोचक तें सांगा ॥७॥
मुद्‌ग म्हणती धन्य अससी । गणेशाची अमृतकथा विचारिसी । भावयुक्त मनें ती प्राशन करिसी । सांगतों तुज ऐक आतां ॥८॥
महोदराचें माहात्म्य सविस्तर । वर्णन करण्या असमर्थ सुरवर । कोण तरी नर भूमिवर । सर्व विस्तारें वर्णू शके? ॥९॥
सर्वसिद्धिप्रदायक । महोदर माहात्म्य हें निःशंक । ऐसाच प्रश्न एक । सूर्या विचारिला वालखिल्यांनी ॥१०॥
दक्ष विचारी वालखिल्य कोण । काय विचारिती सूर्या प्रश्न । तें सर्व विस्तारें सांगून । कुतूहल करा दूर मुद्‌गला ॥११॥
मुद्‌गल सांगतीं ऐक सांप्रत । वालखिल्य महर्षी असत । ते नित्य उपासना करित । रथस्थ भास्कराची भक्तीनें ॥१२॥
ते महाभाग एकदां पहात । सूर्यास गणेशकीर्तनीं रत । ते पाहून झाले विस्मित । विचारिती ते सूर्यासी ॥१३॥
भानुदेवा तूं ब्रह्म असत । ऐसें वेदांत प्रतिपादित । एक तूं अद्वितीय ख्यात । अमृतात्मा निःसंशय ॥१४॥
तुझ्या भजनें सिद्ध होत । परम योगी विष्णू मुख्य देव जगांत । तैसेचि विविध जन पावत । फळ आपुल्या कार्याचें ॥१५॥
कर्माच्या मूळ रुपें सगुण । ज्ञानरुपें तूं सर्वत्र निर्गुण । दिवाकरा तुजहून अधिक गुण । वेदादींत अन्य न कोणी ॥१६॥
तथापि तूं विशेष भजत । गणनायका कां सतत । हा कोण गणेश नाम वर्तत । देव त्यास तूं कां भजिसी ॥१७॥
हें पाहून आम्हीं मोहयुक्त । जाहलों उत्सुक चित्तांत । म्हणोनी तेजाच्या नाथ त्वरित । तत्त्व सत्य सांगावें ॥१८॥
गणेशाचें स्तवन करुन । कां भ्रमविता सर्व जन । ऐसें तयाचें वचन । ऐकून सूर्य म्हणे त्यांना ॥१९॥
सर्व प्राण्यांच्या आत्मा सांगत । त्यांना दक्षा रहस्य पुनीत । महाभागांनो ऐका सर्वसंमत । वालखिल्य मुनींद्रहो ॥२०॥
गणनाथाचें ऐकून चरित । योगी व्हाल भविष्यंत । मीं आत्मा जगताचा वर्तत । वेद ऐसें वर्णिती ॥२१॥
तें सर्व असत्य नसत । ज्ञान परी तुम्हां सांगत । तेणें भ्रमाचा नाश क्षणांत । होईल ऐसें जाणावें ॥२२॥
असत्य ब्रह्म जें उक्त । तेथ मीं जीवधारक असत । एक एव अद्वितीय जगांत । सत्यरुप महर्षीनो ॥२३॥
वेदादि भाव भिन्नांत । आत्माकार मीं व्यवस्थित । सत्य असत्य हें द्वंद्व चित्तांत ।जाणून घ्यावें विबुधोत्तमांनी ॥२४॥
त्या सत्य असत्याचा अभेद । समरुप परात्मा आनंद । उभय त्या आनंदानें ब्रह्मवरद विष्णू ऐसें होत ख्यात ॥२५॥
सम आनंदाहून परम । अव्यक्त स्वरुप जें तुरीय ब्रह्म । सर्वांचा नेति स्वरुप कर्ता अभिराम । शंकर हें नांव तयासी ॥२६॥
चौघांचा हया संयोग करित । तो स्वानंद प्रख्यात । सर्वंसंयोग रुप वर्णित । वेदांत तें ब्रह्मजाणा ॥२७॥
स्वपदाहून न अन्य योग । संयोगात्मक तो सुयोग । तोच गणनाथ मायायुक्त पारग । संसाराच्या जाणावा ॥२८॥
मायेनें सर्व भावांत । संयोग अभेदें स्वयं निवसत । विप्रेशांनो ब्रह्म वर्णित । म्हणोनि मायेनें युक्त ॥२९॥
अयोग परता संयोगाहून । निर्मायिक तें ब्रह्म महान । वेदांत कथिलें असे पावन । महर्षींनो तत्त्व ऐका ॥३०॥
तेथ कोणशीही संयोग । कोणातही होत न तो अयोग । अभिन्न तो परमयोग । गणेश हा योगवाचक ॥३१॥
संयोग अयोगांचा योग । तोच हा गणेशरुपी प्रयोग । शांतिप्रद ब्रह्म भावांत सुभग । ब्रह्मणस्पती म्हणती तया ॥३२॥
सर्व ब्रह्मांचा जो पति । तो हा जाणावा ब्रह्मणस्पती । त्या गणेशाची सदा भक्ति । भजन पूजन करतो मी ॥३३॥
गण धातू समूहरुप असत । ऐसें व्याकरणज्ञ सांगत । बाह्यांतर योगे समूह ख्यात । म्हणून हा गणराज ॥३४॥
ब्रह्मरुप गण मानित । त्यांचा स्वामी तो गणेश ख्यात । त्यासी भजत मी संशयातीत । विशेष भक्तीनें द्विज हो ॥३५॥
आत्माकार जें ब्रह्म असत । तेंच तें एक गणात्मक जगांत । ‘तो मी’ हें जाणून भजत । स्वामीस त्या मीं भक्तिपूर्ण ॥३६॥
मुद्‌गल म्हणती दक्षाप्रत । ऐकून सूर्याचें वचन सूक्त । वालखिल्य महर्षी विस्मित । हात जोडुनी तया म्हणती ॥३७॥
रविदेवा गणेशाचें माहात्म्य योगद । सांगावें संपूर्ण तें विशद । जेणें तत्त्वार्थज्ञानकोविद । होऊ आम्हीं निःसंशय ॥३८॥
रवी तेव्हां त्यास म्हणत । ऐका ही सकल सिद्धिदा कथा अद्‍भुत । सर्व पापें नष्ट करित । जैसी विधीनें मज सांगितली ॥३९॥
ओमिति श्रीमदात्न्ये पुराणोपनिषदि श्रीमन्‍मौद्‌गले महापुराणे तृतीय खण्डे महोदरचरिते रविवालखिल्यप्रश्नवर्णनं नाम प्रथमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP