मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ३४

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । एक वर्षंभरी आचरित । कृतवीर्य तें उत्तम व्रत । पाप त्याचें लया जात । बारा ब्राह्मण हत्येचें ॥१॥
व्रत पुण्य प्रभावें होत । नृपांगना तें गर्भवती पुनीत । पुण्यवेळीं जन्म देत । तेजस्वी पुत्रास एका ॥२॥
परी तो पुत्र हातपायविहीन पाहून । माता करी रुदन । कृतवीर्य नृपही दुःखमग्न । प्रधान सारे सांत्वन करिती ॥३॥
तदनंतर शोक त्यागून । राजा करी जातकर्मादी उन्मन । महोत्सव नगरांत घडवून । सात्वन करी पत्नीचें ॥४॥
रात्रीं दत्तात्रेय योगी येत । त्या नृपाच्या स्वप्नांत । ते त्यास जे सांगत । तें ऐक आतां दक्षा तूं ॥५॥
तुझ्या सुतास बारा वर्षे होत । तेव्हां मी तव सदनीं निश्चित । येऊन करीन अंगयुक्त । हातपाय त्याद देउनी ॥६॥
राजेंद्रा तूं चिंता न करी । तुझा हया पुत्राची थोरवी । देवमान्य होईल कालांतरी । महातेजस्वी तो होईल ॥७॥
तदनंतर अंतर्धान होत । योगी दत्तात्रेय त्वरित । राजा जागा होऊन स्मरत । स्वप्न तें हर्षप्रद सारें ॥८॥
गणेशासी तो ध्यात । पृथ्वीवरी दवंडी  पिटवीत । कृष्णचतुर्थीचे व्रत । करावें सर्व लोकांनी ॥९॥
जो हें न करील व्रत । त्यासी मी ठार मारीन निश्चित । म्हणोनी चांडालावी द्विजपर्यंत । समस्त जन तें आचरिती ॥१०॥
आठ वर्षांचे नरनारी करिती । व्रत तें विधिपूर्वक प्रीती । गणेश्वर कृपाप्रसाद पावती । तेणें कोणा दुःख नसे ॥११॥
कोणी स्त्री वंध्या नसत । रोगादींचे भय अज्ञात । ऐसीं बारा वर्षें लोटत । तेव्हा प्रकटले दत्त योगींद्र ॥१२॥
नराधिप त्यांसी वंदित । भक्तिभावें पूजा करित । तेव्हां दत्तात्रेय म्हणत । दाखवी राजा पुत्र तुझा ॥१३॥
मी पाहण्या आलों अद्‍भुत । हातपायाविण बाळ जगांत । तें ऐकतां हर्षित । राजा आणि स्वपुत्रातें ॥१४॥
दत्तात्रेयांच्या करीं देत । ते त्यास अंकावरी घेत । योगीन्द्र राजासी म्हणत । राजा व्रत तूं आचरिलें ॥१५॥
परी तें व्रत अंगहीन । होतें म्हणून पुत्रास न्यून । हातपायांचे झालें जाण । कोणतें न्यून ऐक तें ॥१६॥
व्रताच्या जागरणांत । जांभया दिल्यास तूं संभेंत । जांभयीनंतर न केलेस त्वरित । आचमन तों तें पुन्हा ॥१७॥
म्हणोनी हें ऐसे घडत । व्रतप्रभावें विष्णु साक्षात । नररुपें हा तव गुहांत । अवतरलासे जाण नृपा ॥१८॥
त्यांच्या अंशे हा विख्यात । होईल समस्त जगांत । ऐसें बोलून कृतवीर्याच्या सुताप्रत । एकाक्षरमंत्र महामुनी ॥१९॥
विधियुक्त गणेशमंत्र अर्पित । त्या कार्तवीर्यास तो पुनीत । द्वादश वर्षांचे अनुष्ठान ख्यात । उपदेशून परतला ॥२०॥
दत्तात्रेय होता अंतर्धान । राजा हर्षला मनोमन । प्रवालक्षेत्रासमीप जाऊन । राजा स्थापित स्वपुत्रातें ॥२१॥
व्याघ्रादि हिंस्त्र प्राणी त्या वनांत । जरी होते संचार करित । तरी तो कृतवीर्याचा सुत तप करित । सुदारुण श्रद्धेनें ॥२२॥
वारा पिऊन तो राहत । गजाननास चित्तीं ध्यात । हातपाय विहीन असत । काष्ठवत्‍ झालें शरीर ॥२३॥
देहभावातीत होत । तप जेथ तो करित । तें वन निर्वेर होत । गजसिंहादी संचरती ॥२४॥
वैरभाव सोडून प्राणी समस्त । फिरती त्या वनांत । ऐसीं बारा वर्षे लोटत । तेव्हा ढूंढी तोषला ॥२५॥
परमभाविक त्या भक्ताप्रत । स्नेहानें तो प्रकटत । तलावातून वरती येत । पाहून हर्षला कार्तवीर्य ॥२६॥
प्रणाम करुन करी पुजन । हर्षे करी त्याचेम स्तवन । रोमांच अंगीं दाटून । महायश स्तुति करी ॥२७॥
गणनाथासी सर्वादिपूज्यासी । सर्वपूज्यासी हेरंबासी । दीनपालासी ब्रह्मासी । ब्रह्मदात्या तुज नमन ॥२८॥
निराकारासी साकाररुपासी । परमात्म्यासी योगासी । योगदात्यासी शांतिरुपासी । सदा ज्ञानघना नमन ॥२९॥
कर्ममार्ग प्रवर्तकासी । आनंदासी आनंदकंदरुपासी । रजोगुणें सृष्टिकर्त्यासी । सत्त्वगुणें पालका नमन ॥३०॥
तमोगुणें संहारकरासी । गुणेशासी नानामायाधरासी । नानामाया विवर्जितासी । मायामायिकासी नमन ॥३१॥
स्वानंदपतीसीए मोहदात्यासी । सिद्धिबुद्धींच्या वरासी । सिद्धिबुद्धिप्रदात्यासी । लंबोदरा तुज नमन ॥३२॥
गणनाथा जेथ वेद थकत । तेथ मी काय स्तवन गात । शिवविष्णु आदी देव समस्त । योगीही जेथ मौन धरिती ॥३३॥
ऐसी स्तुति ऐकून म्हणत । गणनाथ त्या भक्तोत्तमाप्रत । वर माग महाभागा त्वरित । कार्तवीर्या मनोवांछित ॥३४॥
तूं रचिलेलें हें स्तोत्र जगांत । वाचितां सर्वप्रद होईल निश्चित । अंगहीनास अंगलाभ होत । भावबळें स्तोत्र वाचितां ॥३५॥
त्याच्या अंगीं जें जें न्यून । तें तें मीं दूर करीन । इहलोकांत भोग लाभून । पुत्रपौत्रादि समवेत ॥३६॥
अंतीं तो नर स्वानंदांत । ब्रह्मभूत विलीन होत । ऐसें वरदान देऊन तयाप्रत । गणनायक कृपा करी ॥३७॥
तदनंतर कार्तवीर्य प्रार्थित । हर्ष युक्त तो महाभक्त । भक्तेशा गणाधीशाप्रत । काय वरदान मागूं मी? ॥३८॥
सर्व हें मायामय असत । तुझ्या दर्शनें हें ज्ञात । परी सुहृदांच्या संतोषास्तव मागत । शरीर माझें सुंदर करा ॥३९॥
तुझ्या चरणीं भक्ति द्यावी । माझी इच्छा पुरवावी । तुझ्या प्रसादें मज व्हावी । पूर्ण राज्याची प्राप्ति ॥४०॥
या क्षेत्रांत स्थिर होऊन । भक्तांसी रक्षी निर्विघ्न । धर्म, अर्थ, काम, मोक्ष देऊन । ब्रह्मभूयप्रद करावें ॥४१॥
प्रवालमय रुपांत । मी गजानना पाहिला क्षेत्रांत । म्हणोनी प्रवाल नामें ख्यात । होवों नित्य हें क्षेत्र ॥४२॥
सदा विजयसंयुक्त । करी मजला सहस्त्रभुजयुक्त । विष्णुतुल्य पराक्रमी जगांत । दयासिंधो करी मजला ॥४३॥
माझें सर्व सेवन । होवो सदा देवांसमान । मंत्रादिकांत सिद्धिलाभ महान । मिळो मज तव प्रसादें ॥४४॥
माझ्या स्मरणें होवो प्राप्त । जें जें नष्ट गत जगांत । माझ्या सम बलवंत । इंद्रादीही नसावे ॥४५॥
तेव्हां गणनाथ तयाप्रत । म्हणे हें सर्व होईल निश्चित । माझा प्रसादें समस्त । वांछित तुजला लाभेल ॥४६॥
माझ्या स्मरणमात्रें सेवाव्रत । मंत्रादींनी आचरित । तरी तुज निर्विघ्नता प्राप्त । राजेंद्रा होय निरंतर ॥४७॥
ऐसें वरदान देऊन । गणेश पावले अंतर्धान । तदनंतर त्याचा देह पूर्ण । अवयव पूर्ववत्‍ जाहले ॥४८॥
हजार भुज हजार हात । लाभले तया कार्तवीर्याप्रत । महाबळवंत महावीर्ययुक्त । तेजःपुंज जाहला ॥४९॥
देवादींही दर्शनार्थ येत । त्या राजासी भेटत । साक्षात्‍ विष्णु तो प्रकटत । कलांशानें कार्तवीर्य ॥५०॥
नंतर द्विजसाहाय्यें स्थापित । गणेश्वर मूर्ति भक्तिसंयुत । राजा त्या क्षेत्रांत । पूजार्थ ब्राह्मण नेमिले ॥५१॥
यथाविधि द्विजांस पूजित । भक्तिभावें त्यांस नमत । तेही त्यास वर् देत । देव परतले स्वर्गी तें ॥५२॥
इंद्रासह्त सर्व देव हर्षित । स्वर्गीं उत्सव करित । कार्तवीर्य रथीं बसून जात । आपुल्या नगराकडे तेव्हां ॥५३॥
दूत सांगती वृत्तान्त । तो ऐकतां नागर समस्त । त्याचें स्वागत करण्या जात । आनंद झाला सर्वासी ॥५४॥
प्रधानादी झणीं जात । नगरीच्या द्वाराप्रत । मित्रपरिवार प्रमुदित । स्वागत करिती राजपुत्राचें ॥५५॥
समस्त पुर केलें मंडित । नंतर त्यास नेत नगरांत । राजपुत्र प्रवेशून राजसदनांत । प्रणाम करी मातापित्यांसी ॥५६॥
तीं मातापितरें मुदित । आशीर्वाद त्यास देत । त्यासंगें राहून सुखित । जाहला कृतवीर्य नृपती ॥५७॥
कार्तवीर्यासी बैसवित । राज्यावरी कालोचित । स्त्रीसहित जात वनांत । कृतवीर्य वानप्रस्थाश्रमीं ॥५८॥
गणपतीस भजत ध्यात । सस्त्रीक कालांतरें जात । गणेशलोकीं तो पुनीत । प्रजानन सारे व्रत करिती ॥५९॥
तेही क्रमें गणनाथाप्रत । अभेद अंतीं दक्षा पावत । वाचील ऐकेल कृतवीर्यचरित । चतुर्विध संकट नष्ट त्याचें ॥६०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते कृतवीर्यचरितं नाम चतुस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP