मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ४७

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीशुकाचार्य प्रल्हादा सांगती । ब्रह्मयज्ञार्थ जे जमले असती । ते नानाविध कथा सांगती । मनोरंजक परस्परांसी ॥१॥
नाना मतें ते मांडित । स्वबुद्धीनें विवरण करित । कोणी विधात्यास स्तवित । कोणी प्रशंसी विष्णूसी ॥२॥
कोणी शक्तीस श्रेष्ठ म्हणत । कोणास रवि श्रेष्ठ वाटत । ब्रह्मरुप गणेश सर्वांत । श्रेष्ठ वाटे अन्यांसी ॥३॥
कोणी अन्न कोणी प्राण । कोणी मनोविज्ञान । कोणी सोऽहं आनंद ज्ञान । चैतन्य तैसा बिंदुक ॥४॥
बोध आत्मा अन्य प्रशंसिती । कोणी सांख्य कोणी कर्म बाणिती । सम अव्यक्तरुपे ते वर्णितो । परब्रह्म स्वसंवेद्य ॥५॥
कोणी निवृत्ति शांतिरुपक । कोणी योगमध्यात्मस्वरुपक । असत्य सत्य पूर्णानंदक । वेदपरायण वर्णिती ॥६॥
असुरा, सहज परब्रह्म रुप वर्णित । तेव्हां त्यांच्यात वाद होत । त्यांचा निश्चय न होत । मतमतांची गलबला ॥७॥
आपापल्या ज्ञानें युक्त । वाद करिती पंडित । तेव्हां वाद शांतीस्तव बोलत । विष्णु अव्यक्त सनातन ॥८॥
शंकरप्रेरित विष्णू म्हणत । सर्व श्रोतृवृंदाप्रत । वेद गुरु स्वरुप निश्चित । समस्तांसी निःसंशय ॥९॥
त्यांनी जें असेल संपादित । तें सर्व देव मुनीस प्रशंसित । तेंच आचरावें नेमें व्रत । निश्चयें सुख लाभण्यास ॥१०॥
तेंच सर्वमान्य होईल । वेदांनी जें कथिलें अमल । स्वानुभव गाऊन सरल । याथातथ्य मुनीश्वरांनो ॥११॥
म्हणून वेदांमुळे सर्वांस प्राप्त । ज्ञान परम होत जगांत । योगादि साहाय्यानें करित । साक्षात्कार ब्रह्माचा ॥१२॥
कांहीं मुनी देव राक्षस आचरित । ऐसी योगादी साधनें जगांत । तथापि वेदसमान नसत । अधिकारी त्यांचें वचन ॥१३॥
वेदांसम कोणी न दिसत । योगेश विप्रांनो जगांत । म्हणून संपूर्ण योगी वेदस्तुत । गुरुरुपें सर्वांचे ॥१४॥
आपण महाभागांनो करा स्मरण । तेणें होईल संशयहरण । तें ऐकून योगी देव मुनिगण । योग्य अतियोग्य ऐसें स्तविती ॥१५॥
बुद्धिमंता विष्णो तूं सांगितलें । तें आम्हां शोभन वाटलें । ऐसें बोलून शंकराप्रमुखांनी स्तविलें । सांगवेद त्या वेळीं ॥१६॥
ते सर्वांगसहित ओंकारयुक्त । वेद त्यांच्या पुढें प्रकटत । त्यांस पाहून त्वरित उठत । देवऋषिगणांसह ॥१७॥
प्रणाम करुन करिती पूजन । स्तविती उभय कर जोडून । आसनावरी विराजमान । ॐकारासह वेदमुख्य ॥१८॥
त्या शिवमुख्य देवांस विचारित । आम्हांस कां स्मरिलें चित्तांत । देव मुनींनो लोकांनो विनीत । काय कार्य तें सांगावें ॥१९॥
तें निःसंशय पूर्ण करुन । आम्ही करुं समाधान । ऐसें ऐकतां वेदवचन । शिव शंकर त्यांस म्हणती ॥२०॥
विनयपूर्वक तें म्हणत । विशेषज्ञ त्या वेदांप्रत । आमुचें कार्य सांगा निश्चित । करुं तें आम्हीं निःसंशय ॥२१॥
सर्वांचे हित चिंतून । ब्रह्मयज्ञ आरंभिला आम्हीम महान । तेथ वाद प्रारंभ होऊन । तत्त्वरहस्य अंत न लागे ॥२२॥
म्हणोनी वेदांनो तुमची स्मृती । केली आम्हीं भावबळें सांप्रती । तुम्हीं विश्वगुरु निश्चिती । भेदनाशक तत्त्व सांगा ॥२३॥
आपणासम योगी जगांत । अन्य कोणीही नसत । आपुलें वचन प्रमाण असत । योगज्ञ आम्हीं तेणें होऊं ॥२४॥
शिवाचें वचन ऐकती । तेव्हां वेद तयांस म्हणती । देवासी मुनींसी जनांसे प्रीती । दीनपालका असुरेश्वरा ॥२५॥
अक्षरात्मक देह आमुचा । अधिकार न ब्रह्मयज्ञाचा पार करण्याचा । तथापि यथामति तयाचा । आशय आम्हीं सांगतों ॥२६॥
आम्हीं ब्रह्मरुप नसत । किंचित्‍ ब्रह्मज्ञ जगांत । योगमार्ग बळें सांगू यथार्थ हित । ऐका आपण सर्वांनी ॥२७॥
प्रत्येक प्रश्नाचें उत्तर । सांगू आम्हीं ब्रह्मधारक उदार । जेणें संशय होऊन दूर । परम गतीस प्राप्त व्हाल ॥२८॥
ब्रह्म नानाविध उक्त । योगबळें आम्ही सतत । प्रज्ञावादी महावाक्यांत । योगाचा विशेष सांगितलासे ॥२९॥
सर्व ब्रह्म सुयोगांचे स्थान । योगात्मक तें महान । योगांत सर्व ब्रह्मे असून । तदाकार तीं वर्णिलीं असती ॥३०॥
योगाहून ब्रह्म न परम । ते योगशॉंतीने लाभे अनुपम । ब्रह्मणस्पति एक उत्तम । आम्ही गणेश्वर वर्णिला ॥३१॥
सकल ब्रह्मांचा पालक । संरक्षक जो जगीं एक । त्यासी भजा सुरश्रेष्ठहो पावक । मुनींनो भक्तिपूर्वक तुम्हीं ॥३२॥
त्याच्या भक्तीनें ब्रह्मभूत । सारे जन होती निश्चित । ऐसे बोलून बहवृच ऋग्वेद शांत । होऊन बसला त्या वेळीं ॥३३॥
नंतर यजुर्वेद साक्षात । बोले त्या संसदेंत । ब्रह्मप्रद वचन जे असत । स्वानुभवात्मक बळयुक्त ॥३४॥
नानाविध ब्रह्म मी वर्णिलें । योगसेवेंच्या प्रभावें आगळें । महावाक्यांच्या साहाय्यें केलें । निरुपण तें क्रमार्थ ॥३५॥
तेथ योगस्वरुपाख्य विशेष युक्त । आंत्य ब्रह्म सर्वज्ञ मानित । सर्व ब्रह्म सुयोगे होत । योग तो अपूर्व म्हणती ज्ञाते ॥३६॥
तदर्थ गणराजासी प्रार्थिलें । भक्तांनी पूर्वीं स्तविले । योगप्राप्तीस्तव विनविलें । म्हणून साकार तो झाला ॥३७॥
गण समूहरुप असत । समूह तें ब्रह्मरुप साक्षात । त्यांचा स्वामी गणेश वर्तत । त्यास भजावें विधिपूर्वक ॥३८॥
यांत संदेह नसत । सकल अन्नांच्या समूहांत । सद्य एक अनेक रुप वसत । अन्नात्मक ब्रह्म जाण ॥३९॥
 ऐसें श्रुती सांगत । नानाविध ब्रह्में त्यांत उक्त । देवता ऋषींनो जगांत । गणरुप तीं जाणावीं ॥४०॥
म्हणोनि भक्तीनें होत । सकलही सुलभ जगांत । ब्रह्म भूयप्रद ऐसें वर्णित । योगानें मीं योगपासी ॥४१॥
ऐसें बोलून विराम घेत । यजुर्वेद योगवेत्ता उदात्त । तदनंतर सामवेद सांगत । निर्णयकारण ब्रह्माचें ॥४२॥
योगसेवन मी केलें । म्हणून वर्णन करण्या बळ मिळालें । किंचित ऐकावें देवेश भले । ब्राह्मणांनी मुनींनी ॥४३॥
महावाक्यांच्या आधारें सांगत । नाना ब्रह्में मीं योगसेवारत । पात्रभेदार्थ अत्यंत । हें जाणावें श्रद्धेनें ॥४४॥
त्यांत ब्रह्म शांतिप्रद । योगाख्य जाणा विशद । ब्रह्मासह साधे योग ते आनंदद । योगक तेणें ते ज्ञात ॥४५॥
योगाहून अन्य नसत । ते शांतिमार्गे लाभत । तेंच योगब्रह्म गणेश प्रख्यात । यात संशय कांहीं नसे ॥४६॥
मनोवाणीमय देवांनो कीर्तित । तें तें गकाराक्षर संभूत । विबुधांनी जाणावें जगांत । मनोवाणीविहीन आतां ॥४७॥
जें जें मनोवाणीविहीन । तें तें उद्‌भवे णकाराक्षरापासून । त्यांचा स्वामी गणेशान । योगाकार तो प्रकीर्तित ॥४८॥
त्यासी भजावें विशेषें युत । ब्रह्मभूतप्रद जो विश्वांत । नानभावांनी जें युक्त । त्यास देई तो योग ॥४९॥
ऐसें बोलून सामवेद थांबत । तेव्हां अथर्वां सकलां म्हणत । ब्रह्मायज्ञाचा तो जाणकर असत । त्याचें वचन ऐक आतां ॥५०॥
आत्मा मी ऐश्या वाक्यांत । नानाविध ब्रह्म मी सांगत । तें योगानें संपादित । तेंच उपाधिसंयुत ॥५१॥
योगाख्य ब्रह्म परम । योगानें लाभते अनुपम । संयोग अयोग हीन । ऐसा हा योग ब्रह्माधिष्ठित ॥५२॥
शांति त्या योगांत । लाभे ऐसे योगेज्ञ सांगत । तोच गणनाथ विश्वांत । शांतिप्रद जाहला ॥५३॥
एकला गणेशान असत । ईश जगांचा ब्रह्मांचा विश्वांत । समूहरुपांचा स्वामी ख्यात । योगरुप तो जाणिला ॥५४॥
सर्वांचा आदिरुप योगाकार । नानाविध मध्यांत स्वअंशे उदार । अन्तीं स्वतःत लयकर । आदिपूज्य तो झाला ॥५५॥
सर्वपूज्य तो देवेशांनो जाणावा । मुनींनो तोच पूजावा । जो आदि तोच अंती बरवा । सर्वसंमत तुम्हांसी ॥५६॥
मध्यांत मायाविहारें होत । भेद अभेदांनी युक्त । म्हणोनी त्या योगरुपाप्रत । योगसेवेनें भजावें ॥५७॥
तरीच ब्रह्मभूत ब्रह्मयज्ञ पारग । तुम्ही व्हाल हो सुभग । ऐसें बोलून महायोगी पारग । अथर्वंवेद विरमला ॥५८॥
नंतर ओंकार सर्वयोगज्ञ सांगत । मी प्रकट चार वेदांत । योगसेवेनें मज साक्षात । ब्रह्मदर्शन जाहले ॥५९॥
त्यानें झालों योगमित । वेदांसी मीच उपदेश करित । ते प्रतिदिन साधना करित । योग ब्रह्मप्रद त्यास लाभला ॥६०॥
ते ब्रह्मज्ञ झाले सर्वसंमत । योगाहून अन्य ब्रह्म नसत । जग हें सुब्रह्म ख्यात । योगानें शाश्वत ब्रह्म लाभे ॥६१॥
तें ब्रह्म हाच गणराज निश्चित । ऐसें योगी सांगस । संयोग अयोग भावें खेळत । योगरुपधारी तो ॥६२॥
सिद्धि भरांतिमयी माया । बुद्धि भरांतिधरा जाया । त्यांचा स्वामी खेळवी तयां । विभू जो सदा गजानना ॥६३॥
भुक्ति सिद्धीनें लाभत । मुक्ति सिद्धि ब्रह्मप्रद देत । बुद्धि पंचविध असे चित्त । त्यांच्या योगें लाभेल ॥६४॥
स्वसंवेद्यात्मक ब्रह्म । वेद ऐसें कथिती परम । सर्व संयोगरुप अनुपम । तेथ हा स्वयं दिसतसे ॥६५॥
त्यानें स्वानंदवासी मायायुक्त । ऐसा हा प्रकीर्तित । त्याचें दर्शन अयोगांत । कदापिही न लाभे ॥६६॥
निर्मायिक म्हणोनि ख्यात । सिद्धिबुद्धियोगें लाभत । गकार हा संयोग असत । ‘ण’ कार हा अयोग असे ॥६७॥
त्या नावानें वेदवादी संबोधित । गणेशास जगांत । त्यास भजा विशेषयुत । ब्रह्मीभूताचे कारण जो ॥६८॥
ऐसी उपासना त्याची कराल । तरी द्विजदेवांनो व्हाल । ब्रह्मभूत जगीं विमल । ओंकार थांबला बोलून इतकें ॥६९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते ब्रह्मयज्ञे वेदनिर्णयो नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP