मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय १२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल म्हणती दक्ष प्रजापतीस । सूर्ये सांगितलें सुरस । महोदर कथानक वालखिल्यांस । ऐकून विस्मित ते झाले ॥१॥
धारण करिती मानसांत । गणेश सुशांतिप्रद योगरुप युक्त । भानू नें बोधितां संदेह नसत । अल्पही त्यांच्या मानसीं ॥२॥
हर्षयुक्त होऊन विचारिती । वालखिल्य ते सूर्याप्रती । महोदराचें चरित्र प्रीति । पुनरपि भक्तिभावानें ॥३॥
वालखिल्य सूर्यासी म्हणत । रवे तूं धन्य जगतांत । योगशांति प्रकाशक बलयुक्त । बोध आम्हांसी आपण केला ॥४॥
गणेशाच्या धन्य जन्म । कथा त्याच्या उत्तम । महाप्रभो त्या ऐकून । मानसीं संतुष्ट जाहलों ॥५॥
महाभागा तूं सर्वज्ञ अससी । साक्षात्‍ गणपति वाटसी । आत्माकारें सूर्य तूं जगासी । यांत अद्‌भुत कांहीं नसे ॥६॥
आतां देवेशा आम्हांप्रत । सांगावा समग्र वृत्तान्त । राम केव्हां भजन करित । गणपतीचें भक्तिभावें ॥७॥
धन्य ते पुरुष जगांत । जे गणेशकथांत मग्न होत । तैसेचि जे त्या सांगत । ऐकतां योगशांति लाभ ॥८॥
मुद्‌गल म्हणती दक्षाप्रत । वालखिल्य ऐसें जेव्हां विनवित । रविदेव होऊन हर्षित । म्हणे सांगेन तो वृत्तान्त ॥९॥
येथ इतिहास पुरातन । नारायण मार्कडेय संवाद पावन । मृकंडाचा सुत महान । तोचि मार्कंडेय मुनी ॥१०॥
मौंजीबंधनानंतर आचरित । परम तप तो ब्रह्मचर्ययुत । वेदशास्त्रज्ञ मोक्ष वांछित । गायत्री जप विशेष करी ॥११॥
अयुत वर्षें ऐसीं जात । तेव्हां त्याच्या आश्रमांत । पार्वतीसहित शंकर येत । गणांसह आपुल्या ॥१२॥
निमग्न विष्णूच्या ध्यानांत । मार्कंडेय बसला होता नितान्त । त्यांस आगमन न कळत । महेशाचें त्या वेळीं ॥१३॥
तेव्हां शिव काय करित । योगमायाबळें प्रवेशत । मार्कंडेयाच्या हृदयांत । आश्चयर्यकारक कृत्य तें ॥१४॥
विष्णूस लोपवी हृदयांतून । शंकरास पाहून विस्मितमन । सोडोनियां त्वरित ध्यान । प्रणाम करी तो शंकरासी ॥१५॥
अथर्वशीर्ष स्तवन करुन । शंभूस भक्तिभावें पूजून । तयाच्या पुढती उभा राहून । प्रणाम करी पुनरपि ॥१६॥
महादेव तयासी म्हणत । वर माग मनोवांछित । तुझ्या तपें मीं संतुष्ट असत । गायत्रीजप माहात्म्यें ॥१७॥
गायत्री असे वेदमाता । ॐकार हा म्हणती पिता । ॐकारापासून तत्त्वता । तापसोत्तमा जन्म आमुचा ॥१८॥
म्हणोनि गायत्रीच्या जपानें होत । संतोष माझ्या मनांत । गंभीर स्तुतीनें मी सुप्रीत । वांछित विप्रा देईन ॥१९॥
यांत कांहीं संशय नसत । ऐसें शिवाचें वचन ऐकत । तेव्हा महामुनी त्यासी म्हणत । भक्ति तुझी दे मजला ॥२०॥
संसार सागरांतून मुक्ति । मिळावी ही इच्छा चित्तीं । तेव्हां आपुल्या भक्ताप्रती । शिव वरदान देता झाला ॥२१॥
माझी भक्ति दृढ होईल । शाश्वत मुक्ति तुज लाभेल । सप्तकल्प जीवन होईल । इच्छिसी तें तें सफल होय ॥२२॥
ऐसें वरदान देऊन । शक्तिसहित पावला अन्तर्धान । मार्कंडेय खिन्न मन । महर्षीनो बसला तेव्हां ॥२३॥
गायत्री रुपधारी मंत्रशक्ति । देवता शंभुरुपा ती कल्पिती । शैवमार्गे शंभूची महती । मार्कंडेय मुनी गाती ॥२४॥
कलात्मक महेशान । तैसाचि तो मोहहीन । तेव्हां शिवशक्ति । माहात्म्ययुत वचन । पुराण त्यासी सांगितलें ॥२५॥
ऐसा बहुकाळ जात । तेव्हां नरनारायण उभय जात । मार्कंडेयाच्या आश्रमांत । परमेश्वर देवर्षींस भेटण्यासी ॥२६॥
वालखिल्य सूर्यास विनविती । महाभागा वर्णावी त्यांची महती । परमेश्वरसंज्ञ ते असती । नरनारायण कां जगतां? ॥२७॥
भानू तयांसी सांगत । माझा पुत्र धर्म आचरित । विष्णूचें तप अविरत । तेणें तोषला विष्णुदेव ॥२८॥
कीर्ति पत्नीसहित । विष्णुसी धर्म विनवित । आमुचा पुत्र व्हावें आचरित । त्यानें तें मान्य केलें ॥२९॥
नरनारायण तयांचें सुत । नर जीवमय ख्यात । परमात्मा नारायण असत । त्यांच्या योगें वैष्णवब्रह्म ॥३०॥
म्हणून मी नरनारायणासी म्हणत । परमेश्वर ऐसें आदरयुक्त । धर्माची आज्ञा घेऊन जात । ते दोघे निमिषारण्यीं ॥३१॥
तेथ ते परम तप आचरित । स्वयं विष्णु तेथ अवतरत । त्यांस पाहून दोघे स्तवित । केशवासी स्तोत्रांनी ॥३२॥
भक्तिभावें प्रणाम करिती । महाविष्णु तयांसी म्हणती । महामुनींनो जें जें चित्तीं । तें तें सर्वही मागून घ्या ॥३३॥
तेव्हां ते दोघे केशवाप्रत । परम धार्मिक नमरत्वें प्रार्थित । महाभागा सर्व शांतिकर जगांत । ऐसा योग सांगावा ॥३४॥
महायोगी गाणपत्य प्रिय सांगत । शांतिप्रद योग तयांसीं हर्षित । चित्त पंचविध ख्यात । त्याचें ऐश्वर्य मायावी ॥३५॥
त्याचा त्याग करुन । शांतियोगाची प्राप्ति पावन । जें जें चित्त वांछी उन्मन । तें तें योगरुप करावें ॥३६॥
तदाकार समाधीनें ऐसे करावें । जें जें चित्तासी न ज्ञात । तें तें मानावें निवृत्तिवाचक । योगरुप करावें योगसेवेनें ॥३७॥
चित्तांत चिंतामणि विराजत । नित्य चित्तचालक तो असत । त्याचें भजन करितां चित्त । शांतिरुप होईल ॥३८॥
चित्त इच्छितें धर्म अर्थ काम । ब्रह्मभूतत्व मोक्ष अनुपम । भरमयुक्त तें संशय परम । मायामोहयुत चित्त ॥३९॥
नाना भावांत लालस । मायाहीन चित्त सुरस । तेचि शांतिरुप होण्यास । पात्र मानिती जाणते ॥४०॥
मी चिंतामणि स्वयं असता । अभिन्नत्व माझें तत्त्वता । तरी भरमात्मिका माया आतां । का भुलविते मजलागीं ॥४१॥
ऐसा विचार करुन । योगमार्गानें चित्त त्यजून । महामुनींनो शांतियोग स्वरुप शोभन । व्हाल तुम्हीं निःसंशय ॥४२॥
ऐसें बोलून अंतर्धान । विष्णु पावले प्रसन्न । वैकुंठांत ते जाती तत्क्षण । नरनारायण शांति लाभले ॥४३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते नरनारयणविष्णुसंवादो नाम द्वादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP