मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय १३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । वालखिल्य म्हणती भानूसी । तदनंतर नरनारायण ऋषि । काय करिती तें आम्हांसी । सांगावें समस्त विशेषें ॥१॥
भानु म्हणे तयांप्रत । ते नरनारायण ब्रह्मभूत । विष्णूनें सांगितला आचरित । योग ते परम श्रद्धेनें ॥२॥
क्रमानें शांति तया प्राप्त । ते दोघे गाणपत्य होत । गणेशाचा महामंत्र जपित । शिवानें जो त्यांस दिला ॥३॥
हेरंबाचा मंत्र जपत । चार अक्षरांचा ते पुनीत । रत्नमयी मूर्ति स्थापित । पूजा करित तियेची ॥४॥
ते महामुनी हृदयांत । हेरंबाचे ध्यान करित । शांतिलाभ तयांप्रत । गजानना न सोडिती क्षणभरही ॥५॥
ऐसी शंभर वर्षे उलटत । नरनारायण उपासनारत । तेव्हां त्यांच्या आश्रमांत । हेरंब अवतरे सिंहवाहन ॥६॥
नाग यज्ञोपवीतयुक्त । चतुर्बाहुधर त्रिनेत्रयुत । सिद्धिबुद्धींच्या सहित । लंबोदर भूषित अलंकारें ॥७॥
पुष्पमय माळा त्याच्या गळ्यांत । त्रिशूळ मुद्‌गर हातीं असत । अंकुशही तेजें तळपत । तेजःपुंज हेरंब तो ॥८॥
ऐशा हेरंबा पाहून । मुनिश्रेष्ठ करिती साष्टांग नमन । नंतर करिती यथाविधि पूजन । स्तवन करिती भक्तिभावें ॥९॥
गणनाथासी भक्तसंरक्षकासी । भक्तांसी भक्तिदात्यासी । हेरंबासी अनाथनाथासी । गजवक्त्रासी नमन असो ॥१०॥
चतुर्बाहुधरासी लंबोदरासी । ढुंढीसी सर्व सारासी । नाना भेद प्रचारकासी । भेदहीना देवा नमन ॥११॥
चिंतामणीसी सिद्धिबुद्धिपतीसी । योगासी योगनाथासी । शूर्पकर्णासी सगुणासी । निर्गुणासी नमन असो ॥१२॥
परत्म्यासी सर्वपूज्यासी । सर्वासी देवदेवासी । ब्रह्मांच्या ब्रह्मासी । सदा शांतिप्रदा नमन ॥१३॥
सुखशांतिधारकासी । नाभिशेषासी पूर्णासी । पूर्णनाथासी पूर्णानंदासी । योगमाया चालका नमन ॥१४॥
खेलकासी अनादीसी । आदिमध्यांत मूर्तीसी । स्त्रष्टयासी पात्रासी संहर्त्यासी । सिंहवाहासी नमन असो ॥१५॥
अभिमान रहितांच्या नाथासी । म्हणोनी हेरंबनामें ख्यातासी । विनायकासी गजाननासी । पुनः पुन्हा नमन असो ॥१६॥
योगाभेदमया स्तवन । काय करावें आम्ही दीन । म्हणोनी भक्तिभावें वंदन । करितो आतां तुष्ट व्हावें ॥१७॥
ऐसी स्तुति गाऊन । नरनारायण झाले पदलीन । त्यांसी उठवून गणेशान । घनगंभीर स्वरें म्हणे ॥१८॥
मी तुमचा भक्तियंत्रित । वर देईन जो ईप्सित । महाभागांनो तुम्ही जगांत । योगमार्ग प्रकाशक ॥१९॥
तुम्हीं रचिलेलें स्तोत्र वाचील । अथवा जो हें ऐकेल । त्यांसी भुक्तिमुक्तिप्रद होईल । प्रीतिप्रद मज लागी ॥२०॥
जें जें इच्छिती तें तें देईन । स्तोत्रपाठें मी प्रसन्न । माझी भक्ति लाभून । सिद्धि समस्त प्राप्त होय ॥२१॥
भानु सांगे हेरंबवचन । ऐकून नरनारायण हर्षित मन । आदरें करांजली जोडून । विनविती ते गजाननासी ॥२२॥
जरी विघ्नपा तूं प्रसन्न । वर देण्यासी उद्युक्त मन । तरी देई भक्ति तव पावन । अव्यभिचारिणी दृढतर ॥२३॥
तथास्तु ऐसें वचन । बोलून पावला अन्तर्धान । स्वनंदलोकीं परतून । निजानंदीं निमग्न झाला ॥२४॥
तदनंतर ते अत्यंत । गणेश भजनीं नरनारायण रत । हेरंब हेरंब ऐसा उच्चारित । मंत्र सर्वदा मुखानें ॥२५॥
ऐसा बहुत काळ जात । तदनंतर मार्कंडेयाच्या आश्रमांत । ज्ञानदानार्थ ते जात । करुणायुक्त मानसानें ॥२६॥
नरनारायणांसी पाहून । मार्कंडेय करी साष्टांग नमन । करी भक्तिभावें पूजन । पाद संवाहन तदनंतर ॥२७॥
त्यांसी विनीतात्मा म्हणत । मार्कंडेय महामुनी तृप्त । धन्य माझा जन्म तप वाटत । विद्या ज्ञानादि सर्व ॥२८॥
धन्य माझी मातापिता । तुमचें चरण पाहिले आतां । ऐसी नानाविध स्तुति करिता । भक्तिभावें तुष्ट झाले ॥२९॥
मार्कंडेया मनोवांछित । माग तूं वर त्वरित । तुझ्या अतिथ्यें संतुष्ट चित्त । पुरवूं तुझ्या मनकामना ॥३०॥
त्यांचे वचन ऐकून । मार्कंडेय प्रतापवान । भक्तिपूर्वक मान लपवून । वंदन करुनी म्हणे तयांसी ॥३१॥
ज्ञान पूर्ण शांतिप्रद । सांगावें मजला विशद । त्यानें तृप्त होऊन सुखद । शांतियोग आचरीन ॥३२॥
महामाया मज दाखवावी । तीस जाणून मी त्यागावी । गुरुच्या पायी जडावी । दृढ भक्ति हा वर द्यावा ॥३३॥
रवि म्हणे नरनारायण देत । वरदान तें तयाप्रत । शांति योगप्रद गणेशज्ञान सांगत । मुनिपुंगव उत्तम त्यासी ॥३४॥
ओमिति श्रीमदान्त्यें पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खंडे महोदरचरिते नरनारायणमार्कंडेयसमागमोनाम त्रयोदशोऽध्यायः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP