मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ३३

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‌गल दक्ष प्रजापतीस सांगती । धनिक झाला हर्शित चित्तीं । व्रतांचा विधि पुस्तकांत प्रीतीं । लिहून नेई पुत्र स्वप्नांत ॥१॥
कृतवीर्यांच्या स्वप्नांत । धनक जाई तेव्हां त्वरित । पित्यास पाहून प्रणाम करित । राजा तयासी उठवीत करीं ॥२॥
नंतर आलिंगून मांडीवर । बैसवोनी सांगे समग्र । वृत्तांत घडला जो हितकर । आपुल्या पुत्रास स्नेहानें ॥३॥
मुला तूं नानाविध यत्न करित । पुत्रलाभार्थ श्रद्धायुक्त । परी तुज यश न लाभत । आता ऐक माझें वचन ॥४॥
माझ्या आज्ञेवरुन व्रत । आचरण करी तूं भक्तियुत । त्या पुण्यें तुज निश्चित । पुत्र होईल कार्तवीयी ॥५॥
ब्रह्मदेवें मज सांगितलें । तें व्रत मीं ह्या पुस्तकीं लिहिलें । तें तुज देण्या आणिलें । स्वीकार करी सत्वर ॥६॥
ऐसें सांगून पुस्तक देत । धनिक नंतर होत अंतर्हित । कृतवीर्यास जाग येत । करांत पुस्तक पाहतसे ॥७॥
तेव्हां मनीं होत विस्मित । तैसाचि तो प्रहर्षित । पित्याच्या स्मृतीनें दुःखित । रोदन करी मायावश ॥८॥
सपत्नीक तो परत जात । जेव्हां नंतर स्वनगरांत । तेव्हां प्रधानादि करिती स्वागत । प्रजाजन सम्मानिती ॥९॥
तदनंतर ब्राह्मणांसी बोलावून । सांगे राजा वृत्तांत महान । ब्राह्मणां त्या प्रणाम करुन । पुस्तक तें त्यांस दाखवी तें ॥१०॥
पुस्तक तें अद्‌भुत । आणून दिलें जें जनकें स्वप्नांत । वाचून ब्राह्मण सांगत । राजा हें पुस्तक अपूर्व ॥११॥
उत्तम व्रत वर्णिलें ह्यांत । सर्व संकष्टहारक निश्चित । सर्वप्रद जें कृष्ण चतुर्थीस पुनीत । आचरावेम चंद्रोदयीं ॥१२॥
सिद्धिदायक गणेश । जो ख्यात असे विघ्नेश । पुजून तो जगदीश । नंतर अर्ध्य तिथीस द्यावे ॥१३॥
गणेशास चंद्रास देत । व्रतकर्ता अर्घ्य भक्तियुत । सूर्योदयापासून ध्यात । गणेशास मनोभावें ॥१४॥
जलपानादी वर्ज करुन । चंद्रोदयापर्यंत पुजून । नंतर चंद्रास अर्घ्यदान । सात वेळा नृपा द्यावें ॥१५॥
ब्राह्मण पूजन तदनंतर । सपत्नीक त्यांचा योग्य आदर । करुन भोजन मधुर । मोदकादींचे त्यांस द्यावें ॥१६॥
शर्करायुक्त खीर मधुर । भोजनांत त्यास द्यावी रुचिर । मित्रांसवें समग्र । स्वयं भोजन करावें ॥१७॥
विप्रांसी द्यावें दान । सुवासिनींस कचुंकादी प्रदान । त्यानंतर जागरण करुन । गणेशस्तुति मोदें गावी ॥१८॥
पंचमी तिथीची प्रभात । होतां स्नानादि कर्मे करित । पूर्ववत्‍ गणेशासी पूजित । भोजन प्रसाद तया दाखवी ॥१९॥
ब्राह्मणां पुनरपि भोजन । भूयसी दक्षिणा देऊन । प्रतिमासीं हें नितनेम । संकष्टीव्रत आचरावें ॥२०॥
ऐसें आचरता व्रत । सकल संकटें दूर होत । अंतीं स्वानंदलोकीं जात ।अपार महिमा व्रताचा ॥२१॥
नृपा तुझ्या योगें लोकांत । व्रत होईल हें ज्ञात । जें कोणासी न ज्ञात । न पाहिलें वा ऐकिलें ॥२२॥
लोकांसी उपकार होईल । चतुविंध सुख जग पावेल । संकष्टकर व्रते या घडेल । बंधनांचा नाश शीघ्र ॥२३॥
अखिल भोग इहलोकांत । दुर्लभ देवभोग्य या योगें लाभत । अंतीं मुक्ति होत प्राप्त । या व्रताच्या प्रभावानें ॥२४॥
ऐसें सांगून आश्रमीं परतत । ब्राह्मण नंतर आचरित । उत्तम तें अपूर्व व्रत । कृतवीर्य राजा श्रद्धेने ॥२५॥
नंतर सूत शौनकादीस सांगत । मुद्‌गल वचनें दक्ष हर्षित । संशय छेदनार्थ विचारित । प्रश्न आपुला तयासी ॥२६॥
कृतवीर्यापासून लोकांत । व्रत जाहलें हें ख्यात । तरी भीम अंत्यज आचरित । हें कैसें शक्य झालें? ॥२७॥
कृष्णचतुर्थी व्रत घडत । भीमअंत्यजहस्तें न कळत । म्हणोनि तो कृतवीर्य होत । ऐसें आपण सांगितलें ॥२८॥
तरी भीमें हे व्रत । कैसें आचरिलें हें न समजत । तरी सत्य सांगून संशयमुक्त । करावें मजला मुद्‌गला ॥२९॥
तूं सर्वज्ञ साक्षात्‍ योगीश्वर । माझा संशय करी दूर । मुद्‌गल सांगे तयास उत्तर । प्रजापते ऐक महामती तूं ॥३०॥
दक्षा पूर्वी गाणेश्वर व्रत । चतुर्थी संज्ञक होतें ख्यात । संकष्टहरण तें ज्ञात । पुरातन तें होतें ॥३१॥
पृथ्वीपरि स्वर्गांत । तैसेचि पाताळ लोकांत । हें चतुर्थीव्रत सर्वसंमत । कृतवीयामुळें झाले ॥३२॥
तोपर्यंत हें व्रत । लोकांत नव्हतें ऐसें ज्ञात । भीमें जें आचरिलें नकळत । चतुर्थी व्रत ऐसें न जाणतां ॥३३॥
कृतवीर्यानंतर प्रसिद्ध होत । विशेषें हें व्रत ख्यात । हें सर्व तुज सांगत । कथानक कृतवीर्थाचें ॥३४॥
हें श्रोत्यांस पुण्यद असत । म्हणोनि ऐक तूं समस्त । तेणें तुजही लाभेल समस्त । मनोवांछित दक्षा झणी ॥३५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीय खण्डे महोदरचरिते कृतवीर्यव्रतप्राप्तिवर्णन नाम त्रयस्त्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP