मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय १५

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मार्कंडेय म्हणे सूर्याप्रत । मायारुप विचित्र उक्त । तें ऐकून तृप्ति संयुक्त । जाहलों मी हर्षित ॥१॥
परी मायेचें रुप न जाणिलें । पूर्णभावे जरी मीं चिंतिले । म्हणोनि विस्तारें पाहिजे कथिलें । योगिश्रेष्ठहो पुनरपि ॥२॥
वर्णाश्रम विभाग स्व आचार समन्वित । युगमान तैसें समस्त । युगधर्म विशेषें सांगा मजप्रत । पितृदेवासुरांचा कर्ममार्ग ॥३॥
सूर्याचंद्रापासून प्रसूत । जे जे राजे त्यांचे चरित । ह्या सर्व प्रश्नांचे उत्तर सुविहित । इंद्रादिक ज्ञानसहित द्यावें ॥४॥
हें ऐकून प्रार्थित । नरनारायण मार्कंडेया सांगत । महाभागा सांगूं समस्त । मायाचरित्रांचे ज्ञान आम्हीं ॥५॥
लघु अक्षर समन्वित । निमेष मात्र काळ म्हणत । दशपंच निमेष प्रमाण असत । काष्ठाकाल समयाचें ॥६॥
तीस काष्ठांचा कलाकाल होत । तीस कलांनी मुहूर्त घडत । तीस मुहूर्तांनी दिवा नक्त । तीस दिवसांचा मास होय ॥७॥
एका मासांत पक्षद्वय असत । शुक्ल कृष्ण विभागें ख्यात । ऐसे बारा मास पूर्ण होत । संवत्सर तेव्हां होतसे ॥८॥
दोन महिन्यांचा एक ऋतु होत । सहा ऋतु संवत्सरांत । ऐसे कालज्ञ कथित । नाना भावयुक्त कालधर्म ॥९॥
संवत्सर पंचधा परिकीर्तित । पहिला संवत्सर दुसरा परिवत्सर असत । इडा वत्सर तिसरा असत । अनुवत्सर चवथा असे ॥१०॥
पांचवा वत्सर नाम असत । त्यांच्या गती आता सांगत । अंग प्रत्यंग संयोग घडत । काळ प्रभावें सर्वदा ॥११॥
अग्नि जो असे जठरांत । तो सर्व क्रिया घडवीत । देहाची उत्पत्ति स्थिति होत । नाशही कालप्रभावें ॥१२॥
काळामुळे सर्व घडत । तो अग्नि संवत्सर नामें ख्यात । पाचांत मुख्य रुप असत । कालकर्म प्रवर्तक ॥१३॥
महायोगी जो देहांत संस्थित । पंडित त्यासी काल म्हणत । परिवत्सर नाम सूर्य असत । कालमय महामुने ॥१४॥
अयनादि स्वभावें काळाचा चालक । काल धर्म प्रवर्तक । वर्षा शीत उष्णकालिक । ऋतु मासादि क्रमांत ॥१५॥
इडा वत्सर नामा चंद्र  असत । ऐसें बुधजन सांगत । तारा नक्षत्रांचा चालक असत । पितरांचे ज्ञान तया असे ॥१६॥
अमृत साठवी आपुल्या किरणांत । सोम हा कालक्रमें वर्तत । औषधींचे भाव प्रकटवित । किरणांनी आपुल्या तो ॥१७॥
देवजनांसी अमृतपान देत । ऐसा हा चंद्र इडावत्सर असत । अनुवत्सर नामा वायु ख्यात । प्राण अपनादि भावें चालक ॥१८॥
आवह प्रवह नेमि ज्योतिषयुक्तां । संचालन घडवितो कालज्ञयुक्त । वत्सर तो रुद्ररुप असत । महालयात औषधि उदय पावती ॥१९॥
तेथ कालप्रमानें निर्मित । त्र्यंबक औषधिसी कालसंस्थित । गायत्री जगती त्रिष्टुप्‍ प्रख्यात । अंबिका नामें प्रसिद्ध असती ॥२०॥
त्या तिघांचे एकरुप घडत । तेव्हां स्ववीर्ये रुद्र निर्मित । पुन्हां औषधि बहुविध जगांत । कालभावें उद्‌भावन करी ॥२१॥
ऐसा पंचविध काल जो जाणत । कालभावाचें दुःख न होत । स्वभावें त्यास दुःख न होत । कदापिहि निःसंशय ॥२२॥
सहा महिन्यांचे अयन असत । उत्तरायण दक्षीनायन ऐसें ख्यात । कालमान द्विविध जगांत । विप्रर्षे ऐसें जाणावें ॥२३॥
दोन अयनांचा दिवस होत । देवतांचा ऐसे ख्यात । उत्तरायण दिवस असत । दक्षिणायन रात्र असे ॥२४॥
ऐशा तीस दिवसांचा मास होत । द्वादश मास एका वर्षांत । ऐसी कालगणना सर्वत्र असत । विप्रश्रेष्ठा जगतांत ॥२५॥
शुक्लपक्षमयी रात्री असत । कृष्ण पक्ष तो दिवस ख्यात । पितरांसी सुखदायी निश्चित । ऐसें रहस्य जाणावें ॥२६॥
द्विविध असती ख्यात । सौरमास चांद्रमास ऐसे उक्त । संक्रमणानें रविमास प्रख्यात । रविज ऐसें नाव तया ॥२७॥
पौर्णिमेसी पूर्ण चंद्र दिसत । त्या आधारें चांद्रमास ख्यात । अथवा क्षीण चंद्र जेव्हां होत । अमावास्या ती प्रमाण ॥२८॥
ऐसा चांद्रमास द्विविध कीर्तित । त्याचें कारण सांगतों तुम्हांप्रत । अधिमास तैसा क्षयमास असत । मलात्मक तो ख्यात असे ॥२९॥
चंद्र केवळ ज्ञात । चंद्राचें रुप अमावस्येंत । स्नानार्थ मासमाहात्म्य प्रसृत । पौर्णिमेचें विशेषें ॥३०॥
चांद्रमासानें असे ज्ञात । पितरांचा काल जगतांत । देव पितर स्वर्गांत । सुधा पान सर्वदा करिती ॥३१॥
पूर्ण सोमकला भूत । चांद्रमासांत न घडत । देवांचा दिवस होई ख्यात । सूय चिन्हें जगतांत ॥३२॥
शुक्ल कृष्णगति कारण असती । ऐसें जाणावें स्वचित्तीं । तीन हर्ष सहस्त्रें मानवांची होती । तेव्हा एक दिव्य दिवस ॥३३॥
तीनशे वर्षांहून अधिक असत । सप्तर्षींचा दिवस ख्यात । मानवांची नऊ सहस्त्र नव्वद वर्षे होत । तेव्हां एक ध्रुव संवत्सर ॥३४॥
ऐसें हें कालप्रमाण सांगितले । द्विजोत्तमा तें मृत्युयुक्त झालें । द्वंद्व संयुत भरांति पावलें । ऐसें रहस्य जाणावें ॥३५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते कालगतिवर्णनं नाम पंचदशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP