मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ३२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल कथाभाग पुढें सांगती । यदूचे चार पुत्र असती । देवसन्निभ ते समस्त असती । सहस्त्रजित हा ज्येष्ठ पुत्र ॥१॥
त्याचा सुत शतजिन्नाम असत । तयास झाले तीन सुत । हिहय, हय वर्पुहय नामें ख्यात । हिहयाचा पुत्र धर्म होता ॥२॥
त्याचा सुत नेत्र ख्यात । कुंति तयाचा पुत्र ज्ञात । सोहंजि त्याचा सुत । त्याचा पुत्र महिष्मान नाम ॥३॥
माहिष्मती नगरी तो वसवित । त्याचा पुत्र भद्रसेन ख्यात । दुर्मद त्याचा पुत्र विख्यात । धनक हा श्रीमंत अन्य होता ॥४॥
धनकाचे चार सुत विश्रुत । कुतवीर्य, कृताग्नी, कृतवर्मा नामयुत । कृतौजा हा चौथा असत । दक्षा तेथ ज्येष्ठ प्रतापी ॥५॥
कृतवीर्य दानशील महीपति । कृष्ण चतुर्थी ख्यात करी जगतीं । प्रजापाला दक्षा ती । स्वर्गाहूनही सर्व शुभ्रप्रद ॥६॥
दक्ष तेव्हां विचारित । ही कथा सांगा मजप्रत । त्या राजानें भूमंडळात । कैसीं रुढ केली कृष्ण चतुर्थी ॥७॥
हें ऐकून कथामृत । माझ्या हृदयीं हर्ष वाढत । म्हणोनी विस्तारशः समस्त । सांगा तुम्हीं कथानक ॥८॥
मुद्‌गल तेव्हां सांगती । अद्‌भुत कथा ती तयाप्रती । माहिष्मती महापुरी जगतीं । तेथ अंत्यज भीमनाम ॥९॥
तो द्रव्यलुब्ध पापकर्मरत । तो वाटमारीचा धंदा करित । प्रत्येक दिवशीं लोकांसी मारित । पशुहत्या निरंतर करी ॥१०॥
मांसविक्रय तो करित । अति क्रूरपणें लोकांस मारित । एकदा माघमास कृष्णपक्षांत । चतुर्थी तिथि पवित्र होती ॥११॥
त्या दिवशीं वनात्नरांत । महापर्वतावरी भीम संचार करित । जनांचा वध करण्या उद्युक्त । दैवयोगें कोणी तेथ न आला ॥१२॥
तेव्हां अन्नजलविहीन । भटकला तो इतस्ततः उन्मन । सूर्य अस्तासी जाता गमन । गृहाप्रती करुं लागे ॥१३॥
मार्गीं तो दुष्ट पाहत । बारा ब्राह्मण अवचित । त्यांसी ठार करुन लुटित । सर्वस्व त्यांचें निर्घृणपणें ॥१४॥
घरीं जाऊन क्षुधार्त । भोजन करी चंद्रोदय होतां त्वरित । त्याचा पुत्र गणेशनामक असत । हाक त्यासी मारिली ॥१५॥
नंतर पुन्हां एकदा पाप भयंकर । घडलें त्या अंत्यजहस्तें उग्र । कृष्णपक्षीं चतुर्थी असता व्यग्र । मृत्यू त्यास ये चंद्रोदयीं ॥१६॥
गणेशदूत विमानांतून येऊन । कैलासीं त्यास जाती घेऊन । गणपस्तानीं पोहचवून । गौरव त्याचा बहू करिती ॥१७॥
स्वर्गमार्गांत स्तुति करिती । ब्रह्मा विष्णु आदी प्रीती । विमानसंचारी पूजिती । भीम नामक त्या अंत्यजासी ॥१८॥
नंतर शिवलोकांत । भोगून भाग हृदयोप्सित । पृथिवीतलावरी पडत । पुनरपि तो अंत्यज ॥१९॥
माहिष्मती नगरींत । धनक एक विख्यात । त्यांचा तो सुत होत । कृतवीर्य नामें ख्यात ॥२०॥
नानाधर्मपरायण होत । देव विप्र अतिथींस पूजित । यज्ञ करी भक्तियुत । परी त्यास पुत्र नसे ॥२१॥
कृतवीर्य प्रतापवंत । पुत्रलाभार्थ प्रयत्न करित । नाना दानधर्म आचरित । परी संतती न लाभली ॥२२॥
तेव्हां तो राजा अतिदुःखित । प्रधानावरी राज्य सोपवित । निष्कंटक राज्य असत । सपत्नीक वनीं गेला ॥२३॥
तेथ तो तपश्चर्येत । पूर्वसंस्कारे गणेशासी चिंतित । नाना तपें आचरित । परी न लाभे संतती ॥२४॥
प्राण आणोनी नेत्रांत । पुत्रासाठीं आतुर होत । अस्थि त्वचा समायुक्त । प्रजानाथ कार्तवीर्य ॥२५॥
दैवयोगें तेथ येत । नारदमुनि त्या वनांत । त्या कृतवीर्या पाहून परतत । स्वर्गात कांहीं योजूनी ॥२६॥
कृतवीर्याचा पिता असत । धनक नामा स्वर्गांत । त्यास वृत्तान्त समग्र सांगत । कृतवीर्य पुत्राचा ॥२७॥
अरे धनका तुझा सुत । पुत्रार्थं तप करी वनांत । केवळ अस्थिपंजरुपें असत । नाना यत्न त्यानें केलें ॥२८॥
संतती त्यास अल्पकाळांत । न होतां होईल दिवंगत । पुत्रहीनास गति काय लाभत । तें सांग धनका तूं ॥२९॥
धनकास ऐसें सांगून । नारद कैलासीं करित गमन । धनक विचार करी उन्मन । पुत्रा साहाय्य कैसें करु ॥३०॥
सर्वज्ञ ब्रह्मदेवासी शरण जाता । ईप्सित सिद्ध होईल तत्त्वता । यांत संदेहलव न वाट चित्ता । त्या धनकाच्या त्या वेळीं ॥३१॥
ऐसा विचार करुन जात । धनक तो ब्रह्मदेवाप्रत । नाना स्तोत्रें त्यास स्तवित । विनयपूर्वक म्हणे त्यासी ॥३२॥
माझा पुत्र धर्मशील असत । परी त्यास पुत्र नसत । पुत्रलाभार्थ प्रयत्न करित । नाना व्रेतें करुनियां ॥३३॥
राज्यादिक सारें सोडून । तप करी वनांत जाऊन । अस्थिपंजर देह होऊन । मरणोन्मुख तो जाहलासे ॥३४॥
कोणत्या उपायें सुत । होईल तयासी तें मजप्रत । सांगावें ब्रह्मदेवा त्वरित । कळवीन मी तें तयासी ॥३५॥
तेव्हां तयासी चतुरानन । सांगे संतुष्ट होऊन वचन । द्विजहत्यादी पापें घडून । पूर्वजन्म बिघडला त्याचा ॥३६॥
पुन्हा तयासी विधि सांगत । देव जो सर्वार्थ जाणत । पुत्रप्राप्तीचा उपाय निश्चित । सर्वसिद्धिप्रद जो असे ॥३७॥
तुझ्या सुतानें संकष्टीचें व्रत । साधिलें पूर्वी नकळत । संकष्टी दिवशी जें केलें असत । तें महापाप नष्ट न होय ॥३८॥
महापापें अन्य नष्ट होती । परी कृष्णचतुर्थीस जीं घडतीं । त्या पापांतून न मिळे मुक्ति । अक्षय तीं राहतात ॥३९॥
म्हणोनी कृष्णचतुर्थी असत । तेव्हां पुण्यच आचरावेम जगांत । तुझा पुत्र राजेंद्र विनाशित । ब्राह्मण बारा त्याच दिवशीं ॥४०॥
तें महापाप असे संचित । नाना तपांनीं तें न लुप्त । व्रततीर्तादिक समस्त । यज्ञादि असमर्थ तें फेडण्या ॥४१॥
संकष्टी दिनीं जें घडत । तें पाप वज्रलेप होत । तें दूर करण्या उपाय नसत । तथापि ऐसे करी तूम ॥४२॥
पुण्य चतुर्थी संकष्टी साधित । त्याला जन्मादिक न उरत । चतुर्विध हें जग समस्त । मायामय जाणावें ॥४३॥
तें जीवांसी संकट असत । मोहमग्न त्यांत भ्रमत । चतुर्थी व्रत जो आचरित । चतुर्विध कष्ट नष्ट त्याचें ॥४४॥
ब्रह्मभूत होऊन स्वानंदात । ब्रह्मांत तो वर्तत । व्रतप्रभावें इहलोकांत । सुखप्राप्ति नरांसी ॥४५॥
जे चतुर्थी दिनीं पाप करित । तयांसी मुक्ति न लाभत । अन्य पुण्यप्रभावें स्वर्गपर्यंत । झेप असे तयांची ॥४६॥
स्वर्गवास उपभोगित । परी पुण्य जेव्हां होत समाप्त । तेव्हां पुन्हा भूलोकीं जन्मत । पाप फळें भोगिती ॥४७॥
पापें भोगून नष्ट होत । तेव्हां ते गाणपत्य पुनीत । या न्यायें गणेशदूत । अंत्यजास एका घेऊन गेले ॥४८॥
पूर्वी जो होता पापी बहुत । परी संकष्टी व्रत घडलें नकळत । म्हणोनी कैलासीं त्यास नेत । प्रथम भोगण्या पुण्यफल ॥४९॥
नंतर तो अंत्यज जन्मत । पुत्ररुपें तुझ्या घरांत । पाप भोगण्या समस्त । म्हणोनी तयासी अनपत्यता ॥५०॥
चतुर्थीस जें पाप घडत । तें चतुर्थी व्रत नष्ट करित । म्हणोनी नेमें चतुर्थी व्रत । करिताअ तो पापमुक्त ॥५१॥
पाप सारेम जाऊन । पुत्रयुक्त तो होऊन । सुखमय होईल जीवन । यांत संशय कांहीं नसे ॥५२॥
जेवढें घडलें पापकर्म जगांत । तें दूर करण्या पुण्यसंचित । करिता नष्ट होतें दुरित । गजाननाच्या कृपाप्रभावें ॥५३॥
हया कारणें बारा संकष्टया करील । तरी तें पाप जाईल । बारा विप्रांच्या वधोद्‍भव । ऐसें जाण तूं धनक नृपा ॥५४॥
नंतर होऊन करुणायुक्त । संपूर्ण व्रतविधि त्यास सांगत । विधीचें वचन ऐकून जात । धनक राजा स्वस्थानीं ॥५५॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते धनकस्य व्रतोपदेशो नाम द्वात्रिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP