मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय २२

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । नरनारायण पुढे सांगती । चतुर्दश मनूंची षट्‍कें असती । त्यांनी घोर तप केलें जगतीं । महात्मा गणेश देवाचे ॥१॥
नाना मंत्र जपांनी ध्यान । निराहार राहून करिती स्तवन । पूर्ण वर्षे सहस्त्रानंतर प्रसन्न । गजानन त्यांसी जाहला ॥२॥
विघ्नपति प्रभु त्यास म्हणत । वरदान मागा मनोवांछित । देईन तें मी तुम्हांप्रत । स्तविती गजानना ते तेधवां ॥३॥
बहुप्रकारें स्तवन करिती । त्याची गणना अशक्य जगतीं । सर्वांचें ईप्सित पुरवून जाती । स्वानंदपुरी गजानन ॥४॥
ते मनूही स्वस्वकर्मांत । निमग्न होऊन गणेशा आराधित । मन्वांतरें ऐसी उलटत । योगशांति ते इच्छिती ॥५॥
क्रमानें होऊन ब्रह्मभूत । ते गणेशाप्रत जात । एकभावें योगज्ञ होत । योगाकार महामुने ॥६॥
त्यांसी झाले बहुत सुत । त्यांचें वर्णन अश्यक असत । पौत्रादिक्रमें ते पाळित । वसुंधरा धर्मन्याये ॥७॥
वैवस्वत मन्वंतर होता प्राप्त । मनुपुत्रांचें जीवित । कैसे चालले तें संक्षेपें तुजप्रत । महामुने मी सांगतो ॥८॥
मनूचे दहा पुत्र ख्यात । पितृसम ते प्रतापवंत । सुद्युम्न पहिला त्यांच्यात । ज्येष्ठ पुत्र कन्या जाहली ॥९॥
इक्ष्वाकु नृग शर्याति । दिष्ट धृष्ण करुषक जगती । नरिष्यंत पृषध्र नगभ नामें ख्याती । नव पुत्रांची मनूच्या ॥१०॥
नऊ पुत्र सूर्यवंशात । शक्रतुल्य पराक्रमयुत । ज्येष्ठ तो चंद्रवंशांत । स्त्रीरुपानें जन्मला ॥११॥
त्याची कथा ऐसी असत । सुद्युम्न वनांत । होता मृगयार्थ हिंडत । अमित विक्रम सैन्यासह ॥१२॥
दैवयोगें सुद्युम्ननृप प्रवेशत । तेव्हा गौरीच्या वनांत । प्रवेश करितां तत्क्षणीं प्राप्त । झाले स्त्रीरुप तयासी ॥१३॥
शैल पुत्रीच्या साठीं शापित । होते तें वन शिवानें समस्त । अरे मार्कंडेया कारण असत । अति उग्र तयाचें ॥१४॥
गौरी वनीं मानवा होते वसत । शंभु गौरी मोदयुक्त । नग्न राहून विषयसुख भोगित । दोघेंही तीं परमानंदें ॥१५॥
एकदा वसिष्ठादी मुनि जात । महेशदर्शनार्थ गौरीवनांत । अकस्मात्‍ त्यांस पाहून वाटत । लज्जा नग्न त्या पतिपत्नीला ॥१६॥
ते मुनीही विमुख परतत । होउनी मनीं अति लज्जित । तेव्हां शिव त्या वना शापित । पुरुषांसी प्रवेश वर्ज्य करी ॥१७॥
जो कोणी पुरुष करेल। हया गौरी वनांत तो पावेल । स्त्रीरुप ऐसा शाप सबल । शंभूने दिला त्या वेळी ॥१८॥
त्या शापानुसार लाभत । सुद्युम्नासी नारीरुप क्षणांत । पुष्ट स्तनभारें तो शोभत । यौवनानें मुसुमुसला ॥१९॥
तेव्हां तेथ दैवयोगें येत । चंद्रपुत्र बुध त्या स्थानांत । पाहोनी सुंदर नारी होत । अति आसक्त तिच्यावरी ॥२०॥
तिचेंही मन जडलें तयावर । त्यानें भोगिली ती नारी सुंदर । आपुल्या स्थानी नंतर । परतून गेला चंद्रसुत ॥२१॥
ती नारी झाली लज्जित । पुढे तिच्या उदरीं जन्मत । चंद्रवंशधर पुरुरवा प्रख्यात । पितृभक्तिपरायण ॥२२॥
श्राद्धकर्मांत विख्यात । ऐसा पुत्र तिज होत । नारीरुप सुद्युम्ना देत । वसिष्ठमुनी गणेशमंत्र ॥२३॥
विनायकाय नमः हा मंत्रा देऊन । केलें राजपुत्रीस पावन । तिनेही वनांत जाऊन । केलें अति उत्तम तप ॥२४॥
एकशत वर्षे तप करित । तेव्हां गणाध्यक्ष प्रसन्न होत । तिच्यापुढें तें प्रकट होत । तिनें पूजिलें तयासी ॥२५॥
त्याचें केलें स्तवन । तेव्हां ढुंढी देत वरदान । मागितला पुरुषभाव शोभन । तथास्तु म्हणे विनायक ॥२६॥
तत्क्षणीं नररुप देऊन । गणेश जाय परतून । भक्तवत्सल गजानन । आपुल्या स्वानंदलोकांत ॥२७॥
तदनंतर सुद्युम्नरुपें जगांत । पुनरपी तो झाला ख्यात । त्यास जाहले तीन सुत । उत्कल गया विनीत नाम ॥२८॥
पुत्र तरुण होता देत । आपुलें राज्य तयाप्रत । स्वयं जाऊन वनांत । गणेशा तोषवी योगमार्गे ॥२९॥
शांति योगधर तो वनसंस्थित । अंतीं सायुज्यता लाभत । गणेशाची परम पुनीत । महाबळ तो सद्युम्न ॥३०॥
सुद्युम्न जेव्हां स्त्रीरुपांत । इला नामें होता निवसत । तेव्हां इक्वाकूस राज्यावरी नेमित । मनु धर्मानुसार ॥३१॥
महाभाग तो वनीं जात । वैवस्वत मनु महामंत्र जपत । सूर्यापासून जो मिळाला तयाप्रत । षडक्षर बळयुक्त ॥३२॥
सूर्ये तया सांगितला । योगमार्ग गणेशाचा भला । त्यानें शांतिलाभार्य सेविला । जाहला शांत अंतीं तो ॥३३॥
स्वर्गी नित्य श्रद्धेनें भजत । महायोगी गणपति देवाप्रत । मनू न सोडी स्मरे अविरत । विघ्नराज गणेशासी ॥३४॥
इक्ष्वाकू पुत्रलाभ इच्छित । वसिष्ठ त्यास उपदेश देत  अष्टाक्षर मंत्रें तोषवित । गणनायकासी इक्ष्वाकू ॥३५॥
शंभर वर्षे मंत्र जपत । तेव्हां गजानन प्रसन्न होत । उत्तम वर त्यास देत । इक्ष्वाकू पूजी गणेश्वरा ॥३६॥
वरदान तया देऊन । गणेश गेला परतून । विकुक्षि नामक सुत लाभून । इक्ष्वाकु सुख तें पावला ॥३७॥
तेजस्वी दृढ पराक्रमी सुत । जेव्हां यौवनीं पदार्पण करित । तेव्हां त्यास राज्यावरी स्थापित । स्वयं गेला वनांत ॥३८॥
इक्ष्वाकु पुन्हा तप करित । मंत्र नेमें तो जपत । नेणें विघ्नपासी तोषवित । क्रमें शांतियुक्त तो झाला ॥३९॥
ब्रह्मभूत स्वभावस्थ होत । स्वानंदलोकांत तो जात । गणेशासायुज्य लाभत । इक्ष्वाकु मुक्त जाहला ॥४०॥
विकुक्षीस पंधरा सुत । लाभले त्यांत ज्येष्ठ असत । ककुत्स्थ नामें प्रख्यात । त्याची कथा ऐक आतां ॥४१॥
दैत्य एकदा पीडा देत । समस्त देवगण तेणें त्रस्त । त्या नृप सुताप्रत जात । साहाय्य त्याचें मागती ॥४२॥
तोही महा तेजस्वी लढत । दैत्यांसवें बळवंत । तेव्हां इंद्र बैलाचें रुप घेत । त्याच्या कोवळ्यावरी नृप आरुढ ॥४३॥
ऐसा जाऊन रणांत । तो सर्व दैत्यांसी मारित । विजयश्री बैसोनि आणित । ककुदावरी इंद्रवृषभाच्या ॥४४॥
म्हणोनि ककुत्स्थ नामें ख्यात । तो नृप सर्व देवगणांत । गणेश्वरभक्त तो उपासना करित । विघ्नेश्वर देवाची ॥४५॥
त्यापासून पृथु होत । विश्वरंधि पृथूचा सुत । त्यापासून चंद्र जन्मत । युवनाश्वक त्याचा सुत ॥४६॥
तदनंतर शाबन जन्मत । शाबनाचा बृहदश्व सुत । त्याचा पुत्र कुवलयाश्व ख्यात । धुंधुहा सुत कुवलयाश्वाचा ॥४७॥
धुंधू नामक महादैत्य मारिला । म्हणोनी धुंधुमार नावें ख्यात झाला । तीन पुत्र धुंधुमाराला । दृढाश्व कपिलाश्व भद्राश्व हे ॥४८॥
दृढाश्वाचा हर्यश्व सुत । महाबळ पराक्रमयुक्त । हर्थश्वाचा निकुंभ सुत । त्याचा सुत बर्हणाश्वक ॥४९॥
त्यास जाहले दोन सुत । कुशाश्व रणाश्व नामें ख्यात । कृशाश्वाचा पुत्र असत । युवनाश्व नावें ज्ञात जगीं ॥५०॥
तो युवनाश्व युद्धांत । देवतुल्य परम द्युतिमंत । पुत्रार्थ यज्ञ करित । वरुनदेवासी तोषवाया ॥५१॥
यज्ञकर्म करुन मंत्रित । यज्ञजल तें राजा पीत । दैवयोगें होऊन तृषार्त । ब्राह्मण तेव्हां विचारिती ॥५२॥
कोणी प्याले मंत्रजल । राजानें प्यालें हें समजता विकल । विस्मित जाहले ब्राह्मण सकल । म्हणती नृपा हे काय केलेंस ॥५३॥
आता तुझ्या उदरांत । गर्भ वाढेल निश्चित । यज्ञ पूर्ण करुन स्वगृहाप्रत । परतून गेले महामुनी ॥५४॥
युवनाश्वाच्या उदरांत । गर्भ वाढूं लागला अद्‍भुत । गर्भाची वाढ संपूर्ण होत । पोट फाडून बाहेर आला ॥५५॥
पुनरपी उदर दिले सांधून । तेव्हा कोणाचा आश्रय यास पावन । मिळेल ऐसें विचारता वचन । इंद्र म्हणे मी पाळीन यास ॥५६॥
धास्यति ऐसें विचारित । तेव्हां इंद्र ‘मां धास्यति’ म्हणत । म्हणोनी मांधाता नाम जगात । त्या पुत्राचें रुढ झालें ॥५७॥
इंद्रानें त्यास वाढविलें । परम द्युतियुक्त त्याचें शरीर शोभलें । सर्वांसी वश करुन प्राप्त केलें । सार्वभौमपद तयानें ॥५८॥
अव्याहत गति होऊन । देवतुल्य स्थिति लाभून । असंख्यात गुणयुक्त महामन । मांधाता तो जाहला ॥५९॥
वसिष्ठापासून योग लाभत । गणराजाची भक्ति अविरत । पुरुकुलीं सूता राज्यीं स्थापित । अंती ब्रह्मभूत स्वानंद लाभे ॥६०॥
ओमिती श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते मांधातुश्चरित्रकथनं नाम द्वाविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP