मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ४१

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल कथा पुढती सांगत । पांडूसी ब्राह्मण राजा करित । धृतराष्ट्र जन्मांध असत । म्हणोनि त्यासी न राज्यपद ॥१॥
पांडू सिंहासनीं बैसत । समस्त वसुंधरा जिंकित । तेव्हां राजछत्रादी चिन्हें देत । ज्येष्ठ भ्रात्यासी भक्तीनें ॥२॥
परपुरंजय पांडू करी सम्मान । धृतराष्ट्राचा तें महान । त्या धृतराष्ट्राची भार्या पावन । गांधारी नामें पतिव्रता ॥३॥
पांडूच्या दोन कांता । कुंती माद्री नामें ख्याता । एकदा वनांत मृगयेकरितां । त्या दोघींसह तो गेला ॥४॥
तेथ त्यांच्यासह रममाण । करी आनंदे क्रीडन । मृगरुपधर मुनींचा घेतला प्राण । तेव्हां त्यानें अजाणता ॥५॥
तो मृत होता कामासक्त । आपुल्या मृगीशी संग करित । मरणोन्मुख तो शाप देत । तया पांडू नृपासी ॥६॥
भार्येच्या मी संगांत । असतां मारिलेस तूं अवचित । म्हणोनि नराधमा जगतांत । मैथुनसुख तुज न मिळेल ॥७॥
जरी होशील मैथुनासक्त । त्या समयीं मरशीस त्वरित । हा माझा शाप निश्चित । ऐसें बोलून प्राण सोडी ॥८॥
त्या द्विजसत्तमाचा घोर शाप ऐकत । पांडू तेव्हां दुःखी होत । राज्य सोडून जात वनांत । महाघोर जें श्वापदमय ॥९॥
तेथ दोन्ही भार्यांसहित । मनःसंयमन करुन राहत । कंदमूळादी भक्षित । विषयोपभोग त्यानें सोडिले ॥१०॥
नंतर मंत्रसामर्थ्ये जन्मत । यमधर्मांपासून कुंती सुत । युधिष्ठिर नामें प्रख्यात । महाभाग सत्यव्रत ॥११॥
वायूपासून भीमसेन जन्मत । पराक्रमी जो बलवंत । इंद्रापासून अर्जुन समुद्‍भुत । धनुर्विद्यापरायण जो ॥१२॥
माद्रीपासून जन्म पावत । अश्विनमंत्रें रुपलावण्ययुत । नकुल सहदेव वीर्यवंत । ऐसे पांच सुत पांडूचे ॥१३॥
गांधारी शतपुत्रांस जन्म देत । अमितओज ते शक्तियुक्त । एक पुत्रिका तिज होत । लावण्यसंयुत प्रजापते ॥१४॥
पांडू शापप्रभावें माद्रीसहित । विषयसुखाचा आस्वाद घेत । तें शापप्रभावें मृत्यु पावत । सहगमन केलें माद्रीनें ॥१५॥
कुतींनें करण्या पुत्रांचें पालन । नाहीं केलें सहगमन । ब्राह्मणांसहित करी गमन  हस्तिनापुराप्रती तदा ॥१६॥
भीष्मादि तिचा संमान करिती । परी कौरव पांडवांचा द्वेष करिती । विषप्रयोगादि आचरती । पांडवांस नष्ट करण्यासी ॥१७॥
परी पांडव सुरक्षित । राहिले दैवयोगें हस्तिनापुरांत । म्हणोनि लाक्षागृहांत । त्यांसी कौरव घेऊन जाती ॥१८॥
लाक्षागृहासी आग लाविती । पांडव दहन करण्या वांछिती । परी अनुकूल कर्मगती । म्हणोनि पांडव वाचले ॥१९॥
मातेसह पांडव सुरक्षित । दुर्योधन पीडा करी द्वेषयुक्त । तेव्हां भीष्म कौरवासी सांगत । अर्धे राज्य द्या पांडवांसी ॥२०॥
धृतराष्ट्र तें वचन ऐकत । पांडवांसी अर्धराज्य देत । तेव्हा ते इंद्रप्रस्थीं जात । धृतराष्ट्राच्या आज्ञेनें ॥२१॥
तेथ दिग्विजय करित । पांडव श्रीसंपन्न होत । महाभाग कृष्ण असत । पक्षग्राही तयांचा ॥२२॥
राजसूय यज्ञ करुन । पांडव झाले शोभायमान । दुर्योधन रागानें पाहून । दुःखित झाला मानसीं ॥२३॥
तो धृतराष्ट्रास सांगत । बोलवा द्यूत खेळण्या पांडवास राज्यांत । दुर्बुद्धी तो सांगे सुत । धुतराष्ट्रे तें मानिलें ॥२४॥
पांडवांसी जिंकी द्यूतांत । दुर्योधन झाला अतिहर्षित । साहसप्रिय पांडव जात । वनवासांत द्यूतजित ॥२५॥
बारा वर्षे वनवासांत । एक वर्षे रहावें अज्ञात । ऐसें द्यूत हरता पांडवाप्रत । दुरवस्था ही ओढवली ॥२६॥
राज्यादिक सारें सोडून । पांडव करिती वनांत गमन । तेथ श्रीकृष्ण करी आगमन । बलभद्रासह त्या समयीं ॥२७॥
पांडवांचें सांत्वन करित । म्हणे तयांसी क्रोधयुक्त । दुर्योधना महादुष्टा मारीन निश्चित । युधिष्ठिरा मीं निःसंशय ॥२८॥
नंतर राज्य तुम्हांस देईन । आनंदे नंतर शत्रुविहीन । घालवा तुम्हीं जीवन । युधिष्ठिर तेव्हां त्यास म्हणे ॥२९॥
जनार्दना राज्य करीन । धर्मयुक्त मीं सत्यवचन । अधर्मयुक्त राज्यदान । पापद मजला करुं नको ॥३०॥
माझी प्रार्थना ऐकून । कोप न धरावा तूं उन्मन । धर्मसंयुक्त उपाय सांगून । आमुचें सांत्वन करावें ॥३१॥
राज्यलाभद उपाय असत । जरी धर्मसंमत तुज ज्ञात । तरी तो सांगा आम्हांप्रत । युधिष्ठिर ऐसें प्रार्थितसे ॥३२॥
तें ऐकून कृष्ण सांगत । युधिष्ठिरासी जो भातृसहित । द्रौपदीच्या संगतींत । धर्मसंमत उपाय जो ॥३३॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुरणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते युधिष्ठिरकृष्णसमागमो नामैकचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP