मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ४९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । श्रीकृष्ण युधिष्ठिरासी सांगती । शुक्रशिष्य ते तेथ जाती । जेथ दैत्याधिपतीची वसती । भयसमन्वित तदनंतर ॥१॥
ज्ञानारी बैसला होता सभेंत । शुक्रशिष्य त्यास सांगत । म्हणती वृत्तान्त विपरीत । ऐक दैत्येंद्रा क्षमा करी ॥२॥
तुझा पुत्र मदोन्मत्त । आमुची उपेक्षा सदा करित । आमुच्या वचनाचें उल्लंघन सतत । जातिदूषण तो करीतसे ॥३॥
आपुल्या मनाचें करित । अन्यांसही तैसेंचि शिकवीत । पितृहत्यार्‍यास सदा स्मरत । भक्तिपूर्वक सर्वकाळ ॥४॥
आमचा तिरस्कार करित । तुलाही तो न मानित । म्हणोनि सांगण्या आलों वृत्तान्त । शिकव तुझ्या तूं पुत्रास ॥५॥
त्या अविनीता शिकविणें । तें आम्हां न जमणें । त्यंचें हें वचन ऐकून म्हणे । प्रक्षुब्ध दैत्यनायक तो ॥६॥
त्वरित पाठवा दूत । पकडून आणा माझा सुत । राजाज्ञेचें पालत होत । सत्वरी पुत्रा आणिती ॥७॥
त्या सुताचें होता आगमन । महासुर स्वीकारी त्याचें वंदन । क्रोधयुक्त परी त्याचें मन । महासुर ज्ञानारी म्हणे तयासी ॥८॥
अरे कुलकलंका तिरस्कारुन । गुरुंसी कोणाचें करतोस स्मरण । तुझ्या हृदयांत काय दारुण । अहित भरलें तें सांग ॥९॥
पित्याचें वचन ऐकत । सुबोध म्हणे क्रोधयुक्त । गणेशमायेनें जो भरांत । ऐश्या स्वजनका तो सांगे ॥१०॥
ताता मी गणनायका भजतों । जो सर्वांचा कुलदेव नांदतो । सर्वांचे हित सदैव करतो । भुक्तिमुक्ती त्यांस देई ॥११॥
ब्रह्म विष्णू आदि देव । कश्यपादी मुनी पूजिती सदैव । कुलवृद्धयर्थ योगशांतिभाव । प्राप्त व्हावा म्हणोनी ॥१२॥
कश्यपासून आपण उत्पन्न । देव दैत्य विविध जन । त्या सर्व प्राण्यांचा स्वामी गजानन । म्हणोनि भजतो तयासी ॥१३॥
त्याचा अनादर जो करी । त्यास सिद्धी होती दुरे । सर्वभावें पूजन करी । त्यास लाभती सकलार्थ ॥१४॥
त्याचें तें वचन ऐकून । क्रोधयुक्त बोले वचन । महाअसुर तो आग ओकी दारुण । मुखांतून त्या वेळीं ॥१५॥
त्या धर्मराजास स्वपुत्रास । म्हणे ज्ञानारी वचनास । आमुचे शत्रू देव विशेष । दैत्यांस असे हा अनुभव ॥१६॥
सुर असुरांचा हा भेद सांगत । वेद प्रत्यक्ष जगांत । यांत संशय अल्प नसत । त्यांतून हा मम पितृहन्ता ॥१७॥
त्यासीच वृथा तूं भजत । बाल्यापासून हें मी जाणत । तूं आहेस रिपूचा आश्रित । परी दुष्टा मी दुर्लक्षिलें ॥१८॥
बाळ म्हणोनी न मारिलें । शठा मझें हृदय द्रवलें । कृपेनें जरी त्या वेळे । आता न सोडीन तुजला मी ॥१९॥
सांप्रत तैसा विचार सोडून । तुजसी करीन शासन । अन्यथा शत्रूचा पक्ष दे सोडून । महामूर्खा सुबोधा ॥२०॥
नाहींतर मी तुज मारीन । परी सुबोध कांहीं न बोले वचन । तेव्हां आपुलें खड्‌ग उगारुन । धावला तो तनयावरी ॥२१॥
दैत्यराजास तो पुत्र म्हणत । ताता व्यर्थ कां तूं शिणत । मज कां ऐसा धाक दावित । भरांतिभावें मोहित तूं? ॥२२॥
सर्वसत्ताधारी ख्यात । गणनायक वेदांत । त्याची सत्ता अवहेलून जगांत । मज काय तूं मारणार? ॥२३॥
सुरअसुरमय वर्तत । गणेश प्रभु हा साक्षात । जो असेल जगीं उद्धत । त्यास मारी तो वेगानें ॥२४॥
नानारुपधारी तो असत । ऐसें जेव्हां बोले सुत । भयहीन तें क्रोधयुक्त । जाहला बहु दैत्यराज ॥२५॥
दूतांसी आज्ञा देत । शस्त्रास्त्रांनी मारा त्वरित । या सुताचा वध करा तुम्ही समस्त । दैत्यगण तें ऐकती ॥२६॥
ते सर्व अत्यंत क्रोधयुक्त । नाना प्रचंड नाद करित । नग्नशस्त्रधर धावत । सुबोधासी मारावया ॥२७॥
परी सुबोध होता भयहीन । गणेशाचें करी भजन । जराही न हले आसनापासून । होणार तें होवो म्हणे ॥२८॥
देहप्रारब्धभावें गजानना । ज्या होणार मज यातना । विघ्नेशा हेरंबा पावना । त्या सर्व मी सहन करीन ॥२९॥
जय अखिलेशा स्वानंदनिवासा । वक्रतुंडा ढुंढे सुखवासा । लंबोदरा ब्रह्मसुता तुजसा । अन्य कोणी नाथ नसे ॥३०॥
ऐशा विविध वाक्यांनी स्तवित । जेव्हां तो असुरसुत । ते क्रोधांध दैत्य त्यास मारित । नाना शस्त्राघातांनी ॥३१॥
देहावरी सर्वत्र हाणिती । परी त्यास न होय कांही क्षती । त्याच्या देहस्थ गणपति । निष्फल करी शस्त्रास्त्रें ॥३२॥
तो विघ्नप सर्वांस जाळित । क्रोधाग्नीनें त्या सर्व दैत्यांप्रत । तेव्हां ते प्रान वाचविण्या करित । दैत्यवीर पलायन ॥३३॥
ते परम आश्चर्य पाहून । ज्ञानारी क्रोधें मूर्च्छित होऊन । श्रेष्ठास नंतर आज्ञापी उन्मन । वध करण्यास स्वपुत्राचा ॥३४॥
चतुरंग बळानें युक्त । दैत्येश वीर तेव्हां हल्ला करित । अमोघ अस्त्रांनी मारण्या उद्यत । सुबोधासी ते परम दारुण ॥३५॥
गणेशभक्ती तथापि करित । जयजयकार विघ्नेशाचा उच्चारित । महोदरासी तो नमित । तेव्हां आश्चर्य एक घडलें ॥३६॥
त्याच्या देहांतून महा अग्नी प्रकटून । दैत्येशाचें करी दहन । मेघास्त्रें झणीं सोडून । शांत करण्या बघती ते ॥३७॥
परी तो प्रलयाग्नीसम जाळित । त्या सकळांस न शमत । असुरांचे नायक मरत । समस्त त्या अग्नितेजीं ॥३८॥
ज्ञानारे परम आश्चर्ययुक्त । तैसाचि झाला खेदसंयुत । प्रधानांचा सल्ला घेत । तत्क्षणीं त्यागी पुत्रासी ॥३९॥
शुक्र होता मग्न तपांत । हें जाणून क्रोध आवरित । मेधावी ते चित्तीं म्हणत । शुक्र येतां पुढे बघू ॥४०॥
शुक्राचार्याची तपस्या संपेल । तें ते राजसदनीं येतील । त्यांच्यासह मारावा हा बाळ । कुलघातक भयंकर ॥४१॥
ऐसा विचार करुन निश्चित । त्या क्षणीं ते माघार घेत । दैत्यनायक समस्त । ज्ञानारीनें तें मान्य केलें ॥४२॥
हृदयी तो दुःखित झाला । परी अन्य उपाय नव्हता उरला । सुबोध करितचि राहिला । गणपाचें नित्य भजन ॥४३॥
अनन्यमानस निर्भय । सर्व दानव तृणासम मानी ज्ञानमय । दैत्यपुत्रास युधिष्ठिरा, भक्तिमय । गणेशभजन तो शिकवी ॥४४॥
गणेश माहात्म्य हे सत्य असत । तिळमात्र संशय नसे यांत । अनेक दैत्यभूपाल मेले क्षणांत । सुबोधाचा विरोध करती ॥४५॥
ऐसा विचार करुन अन्य दैत्यसुत । विघ्नेशास आदरें भजत । सर्वभावें तिरस्कारित । असुरगुरुंच्या सुतांसी ॥४६॥
सुबोध समन्वय करित  तें दैत्य पुत्र सर्वत्र आचरित । जिथें तिथें कीर्तन अर्चनांत । मग्न ते सर्व जाहले ॥४७॥
नमो विघ्नपती गणेशा । स्वसंवेद्य पुरनिवासा । अनादि मध्यांतहीना ईशा । सुशांतिप्रदा सर्वपूज्या ॥४८॥
ऐसें दृश्य सर्वत्र पाहून। ज्ञानारीचा क्रोध वाढून । त्यासी तो सहन न होऊन । स्वपुत्रवधाचा निश्चय करी ॥४९॥
मजला वरदान उत्तम असत । म्हणोनी मृत्यूचें भय नसत । तरी मीं मारीन दुष्ट सुत । ऐसा निश्चय दृढ केला ॥५०॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि । श्रीमन्मौद्‍गले महापुराणे तृतीये खंडे महोदरचरिते सुबोधभक्तिवर्णन नामैकोनपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP