मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्‍गल पुराण|खंड ३|

खंड ३ - अध्याय ४८

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


श्रीगणेशाय नमः । ॐकार वेद मुख्यांचे वचन ऐकून । मुदित झाले नाग ऋषिगण । तैसेचि सर्व देवगण । प्रणाम करुन पूजिती त्यांसी ॥१॥
आपुलें मत त्यागून । ॐकारादीस म्हणती कर जोडून । आपण सांगितलें जें वचन । तें सर्व मान्य ब्रह्मयप्रभूद ॥२॥
वेद सर्वांचें गुरु ख्यात । त्यांनी सांगितलें तें करणें उचित । तेंच गतिप्रद सर्वसंमत । वेदाधारविहीन त्याज्य ॥३॥
जो वेदवचन न मानित । त्यासम आचरण न करित । तो नरकलोकीं जात । यातना भोगी बहु तेथे ॥४॥
आतां तुम्ही समस्त । देवनायक मुनि जनसंघासहित । ब्रह्मयज्ञाच्या पार निश्चित । जाणार निश्चित हें असे ॥५॥
देवही ऐसे बोलती । महाभाग ते वेद मुख्यांस स्तविती । तेव्हां ते हर्षित होती । ओंकारसहित चार वेद ॥६॥
महाभाग देव त्यांसी पूजिती । नंतर वेद ओंकारासह अंतर्धान पावती । आपापल्या स्थानीं परतती । ब्रह्मयज्ञ पूर्ण करिती सारे ॥७॥
ऐशापरी हे साधो होत । ब्रह्मयज्ञाची पूर्तीं पुनीत । संशय सोडून सारे भजत । ते सारे गणनायकासी ॥८॥
हें सारें योगशांतिप्रद । रहस्य कथिलें तुज सुखद । सर्वमान्य मुक्तिप्रद । आतां तूही भज गणनायकासी ॥९॥
सुबोध कथा पुढती सांगता । ऐसे सांगून शुक्राचार्य अंतर्हित । झाले परी प्रल्हाद भक्तियुक्त । भजे तया गणनाया कासी ॥१०॥
मातेच्या उदरांत ऐकलें । जें रहस्य मी गर्भरुपीं चिंतिलें । विशेषानें जतन केलें । तेंच मज योगदायक ॥११॥
सर्व पुण्याच्या बळें स्मृती । माझी या जन्मी होती । जागृती हयास्तव मी जन्मापासून चित्तीं । भजतों तया गणनायका ॥१२॥
गुरुदेवांनो मी सांगितलें । आपल्या प्रश्नाचें उत्तर भलें । जें जें मज आठवलें । शिकवूं नका मज मोहविद्या ॥१३॥
श्रीकृष्ण म्हणती सुबोधाचें वचन । ऐकून हर्षयुक्त विप्रजन । म्हणती त्यासी भावज्ञ । भावसिद्धीस्तव ऐसें ॥१४॥
सुबोधा जें तूं कथिलेस । तें अन्यथा न वाटे चित्तास । परी तूं वत्सा ऐकविलेंस । हितकारक वचन उत्तम ॥१५॥
तुझे पितामह महाभाग । दुर्बुद्धी ते महासुर मुभग । त्यांसी  गणेश हस्ते मृत्युयोग । ओढवला भूतकाळी ॥१६॥
गणेशानें देवपक्ष घेऊन । केलें त्याचें तदा हनन । म्हणून पितृवत्सल तव जनक महान । द्वेष करी गणेशाचा ॥१७॥
जो तुझ्या पित्याचा द्रोही । त्यासी त्यागावें तूही प्रत्यही । नाही तरी ठार मारील पाही । पिता तुजसी निःसंशय ॥१८॥
महामते म्हणोनि दुराग्रह । करुं नको तूं ऐसा निग्रह । असुर कुळांत हिताकह । जन्म झाला तुझा असे ॥१९॥
तरी तूं आपुले कुळाचार । पालन करी बुद्धिपुरसर । हे त्यांचें ऐकून उद्‌गार । सुबोध बहु क्रुद्ध झाला ॥२०॥
त्याचे नयन रक्त झाले । तो त्वेषानें द्विजांसी बोले । धर्मसंयुत । जें वचन असलें । अशक्य त्या बाल्यांत ॥२१॥
म्हणे सर्वत्र गणेश वसत । योगरुपें द्विजांनो जगांत । स्वस्वधर्माचा नियंता असत । नाना क्रीडापरायण ॥२२॥
स्वर्गांत देव पृथ्वीवरी नर । पाताळांत स्थापिले त्यानें असुर । आपापल्या मार्गांत रहावें स्थिर । हितेच्छूंनी सर्वदा ॥२३॥
माझ्या पितामहें राज्य केले । त्रैलोक्याचें जरी तें झालें । धर्महीनतेनें दूषण असले । म्हणोनि वधिले गणेशें तया ॥२४॥
तैसाचि माझा पिता जगांत । धर्म सोडून वागत । त्यासही मारील त्वरित । गणेश यांत संशय नसे ॥२५॥
आतां सांग मजप्रत । गणराजें काय केलें विपरीत । स्वधर्म त्यासी प्रिय बहुत । सर्वांचा हितकर्ता तो ॥२६॥
विघ्नराज तो संशयातीत । त्यांसीच मी भजेन निश्चित । वडिलांसही त्यागीन जगांत । दुष्टवृत्ती जे असती ॥२७॥
जरी मज गणेशभजनीं रता । मारील तो तें तत्त्वता । ब्रह्मप्रद होईल मरण सर्वथा । आपण चिंता करुं नका ॥२८॥
माशांचा त्रास बहु होत । तैसेचि डास घोंघावत । म्हणोनी कोणी का घर त्यागित । सांग पंडित विप्रांनो ॥२९॥
बुद्धिपति गणेशाची सत्ता । सर्वत्र चालते ही महत्ता । त्या सिद्धिपतीची हानि तत्त्वता । काय करील माझा पिता? ॥३०॥
गणेशभजन हाच स्वधर्म । सर्वं भूतांस पुरुषार्थप्रद अनुपम । ब्रह्मलाभार्थ मनोरम । तोचि तुम्हीं आचरावा ॥३१॥
आपण ब्राह्मण न राहिलात । विषयपरायण तुम्ही समस्त । धर्म सोडून वास केलात । दैत्याधीन येथ होऊनियां ॥३२॥
जे गणेशाच्या भजनीं आसक्त । ब्रह्मपरायण पुनीत । तेच ब्राह्मण सत्यार्थे जगांत । काय बालिश अन्य सांगता ॥३३॥
शुक्रशिष्यांस ऐसें सांगून । सुबोध करी गणेशाचें भजन । एकनिष्ठ त्याचें मन । तत्पर गणेशभक्तींत तो ॥३४॥
नमन गणेशासी महात्म्यासी । परेशासी परात्परासी । अनादिमध्यांतमासी ।ढुंढें तुजसी नमस्कार ॥३५॥
विघ्नपते तुज वंदन । सुशांतिप्रदा तुज नमन । ऐसा विवाद घाली म्हणून । भयभीत झाले असुरगण ॥३६॥
ते शुक्राचार्यांचे शिष्य चित्तांत । जाहले बहुत चिंतायुक्त । ज्ञानारीस सांगण्या जात । राजपुत्राचा हा वृत्तान्त ॥३७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे तृतीये खण्डे महोदरचरिते शुक्रशिष्यसुबोधसंवादो नामाष्टचत्वारिंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP