मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
दग्धपक्ष पतङग

माधव जूलियन - दग्धपक्ष पतङग

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[छन्द स्मर]

अजूनही आशा वेडया, ठेविशी का पोटीं ? ध्रु०

भव्य गौरीची आरास,
चलज्जोतींचा विलास,
स्मितें अहा दिव्य भास !
चटकाच लावी जीवा मोहिनी ही मोठी.  १

वासन्तिक नृत्याङगण
हिरण्मयींसाठी जाण,
निर्धनांना कैचा सण ?
कुठे पोत, हिर्‍यांची त्या कुठे ऊच्च कोटी ? २

भाळून रे आगन्तुका,
आंत झुकलास फुका !
जीव मीलनाचा भुका
द्दष्टिसुखें धाऊना, घे उडी ऊन्च खोटी ! ३

व्हावें ज्योतीशीं तन्मय
स्वर्गसुख तें अक्षय !
परी दैवीं हा निरय !
मूल्यहीन निर्धनाची या जगीं सचोटी ! ४

पडख मात्र दग्ध झाले,
हाय मरण न आलें !
जीवीं तळमळ चाले,
जीवन्मृति हीच काय भक्तीची कसोटी ? ५

दीपोत्सव चोहीकडे,
कोण किडयासाठी रडे,
कां न शिरीं पाय पडे ?
कां न केरसुणी झणी दूर तरी लोटी ? ६

ता. ३० मे १९३१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP