मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
अन्धारून आलें

माधव जूलियन - अन्धारून आलें

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[अभङग]

अन्धारून आलें,
चिम्ब झालें जग,
स्तब्ध झाले खग
झाडांवरी, १

पागोळ्या वाजती,
वरकड शान्त,
धुन्दता दिशांत
कोन्दाटली. २

डोङगराची बाहय -
रेषा लुप्त झाली,
त्यास कुरवाळी
मेघमाला. ३

म्लान या प्रकाशी
ऐकला घरांत
बसें मी पहात
वर्षा - लीला. ४

पाण्याची चादर
जमे क्रीडाङगणीं,
पावसाचे मणी
क्रीडतात. ५

काय बरें चुके
माझ्या अन्तर्यामीं ?
पुढील दर्या मी
केवी तरूं ? ६

चोहीकडे पाणी
अथाङग अफाट
नाही जरी लोट
भिववाया. ७

मागे वाहवेना
पुढे पोहवेना
ऐथे राहवेना,
काय तळीं ? ८

आलों मी ऐकला,
जाणार ऐकला,
ऐकान्त ऐथला
कां न साहे ? ९

ता. १४ जून १९२७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP