मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
कीर्ति आणि कान्ता

माधव जूलियन - कीर्ति आणि कान्ता

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति दिण्डी]

पुरे ! लौकिक तो यापुढे नको गे.
बैस, सम्मुख ऐकत्र बसूं दोघे;
धरुनि माझ्या हातांत तुझे हात
स्वस्थ बसतों मी तुजकडे पहात १

जरी नसले राहिले केस काळे,
जरी भाळीं ओढिले चरे काळें,
श्यामलारुण भोवती सान्ध्यराग,
औषा फुलवी प्रीतिची हृदीं बाग २

प्रीतिकरुणादर मिळति तुझ्या नेत्रीं
म्हणूनि सुन्दर या पुण्यमधुक्षेत्रीं
शान्त व्हायाला आणखी पुनीत
स्नान करितों या नव त्रिवेणींत. ३

श्लोक म्हटला जो भीत तू विवाहीं
आज होऐ तत्स्मरण अश्रुवाही’
सखे, योग्यांसहि गहन अन अगम्य
धर्म केला तो तुवां सिद्ध रम्य ! ४

हेळसाण्डुनि तुज कष्टतां जनांत
पाहिली मी नाहीच दिवसरात:
लुब्ध होते जन फळावरच देख,
वृक्षचिन्ता वाहिली तूच ऐक. ५

आणि खपतां मी ऐतर जनांसाठी
कधि न निढळीं तव आढळली आठी
स्वार्थसाधू वरवरच मानितात,
स्निग्ध निस्स्पृहता नित तुझ्या स्मितांत. ६

यत्न केला नच हृदय पारखाया,
सहज तरुपरि मज दिली फलच्छाया,
आणि विहगपारि ठेविलें स्वतन्त्र
गाऐले मी स्फूर्तिने कल - मन्त्र. ७

भूस भेटे मृगमेघबिन्दु जेवी
तसा आलों मी तुझ्याकडे देवी,
घेऐ गाढालिङगनीं त्यास भूमी,
तसे पावूं या ऐक्य आज तू मी. ८

कीर्ति लाभे मज, हवी परि कशाला
गुलाबाची वा बकुळिचीहि माला ?
ह्रदय अपुलें हृदयास भिडे अन्तीं,
नको, असली तरि मधे वैजयन्ती ! ९

म्हणुनि कीर्तिस्त्रज धर शिरीं तुझ्याच,
तुझ्या प्रीतीसच शोभवील साच;
मला अद्वैतीं गमे बुडुनि जावें -
पुढे जाणें कुणि कुठे कुणा ठावें ? १०

ता. ५ ऑगस्ट १९२७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP