मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
रुक्मिणी म्हणे कंसांतका य...

लावणी १४२ वी - रुक्मिणी म्हणे कंसांतका य...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


रुक्मिणी म्हणे कंसांतका यादवनायका लिहिली पत्रिका, पाहा वाचून्‌ । भावानें दिलें शिशुपाळा, धांव घननीळा, नेईं मज हरून्‌ ॥धृ.॥

माझा बंधु रुक्मया खळ परम चांडाळ, त्यानें शिशुपाळ वर योजिला । भीमकाचें राहिलें बळ जाला निर्बळ, पुत्र मातला । हें नये माझ्या विचारा, भुवनसुंदरा, करावी त्वरा, उशिर लावीला । रात्रीचा दिवस करून यावें धावून आमुच्या नगराला । तुं म्हणशील मोठी धीट, मानिशील वीट, तरी ही गोष्ट न ये कामाला । तुजवांचुन हे नृपवर पित्याबरोबर मानित्यें त्याला । ये ऐशा समयामधीं कृपानिधी भक्तवछ्‌छला । साधी लग्नाची हे घडी घालिसी उडी दीनदयाळा । तरीच कार्य साधेल, हेत पुरेल, घालीन माळ हो । आमुचा नवस देविसी आज पुजावें हो । गांवाबाहरे अंबिका, तेथें तुम्ही यावें हो । सकळा दृष्टीवर नमी जिवेंभावें हो । गांवाबाहेर अंबिका, तेथें तुम्ही यावें हो । सकळा दृष्टीवरी नमी जिवेंभावें हो । खरें सांगत्यें, सत्य मानित्यें चित्तापासून । याला साक्ष सूर्य प्रत्यक्ष लक्ष लावित्यें जिवापासून ॥१॥

कमलोद्भवें पत्र वाचिलें, ध्यान लागलें चंचळ अनिवार । केधवां लाभेल भ्रांत फिटेल, करी विचार । चटपट जिवा कर्मेना, सुदेव ब्राह्मणा बोले सत्वर । कैसें आतां करावें ? सत्य सांगावें नेम उत्तर । चैद्यादि मागध वीर आले नृपवर मिळोनी थोर थोर रथी झुंझार । येकला येउं कीं सांग कसा तो संगें घेऊं दलभार ? । सुदेव म्हणे श्रीहरी, चला लौकरी, उशिर लावीला । लौकिकीं भाव दाविसी, विचार पुससी अज्ञानाला । तूं जगदात्मा श्रीपती, चैद्य ते किती वधिसी येकला । आतां केशवा माधवा, चला लौकर । मागुन येईल अवघा तुमचा दळभार । मार्ग लक्षीत असेल रुक्मिणी नार । असें ऐकुनी मनमोहन रथीं जाऊन । आरूढला द्विज घेऊन जगजीवन निघे तेथून ॥२॥

कौंडण्यपुर भीमकानें शृंगारुनी स्वस्थ बैसला । वराडी मुळ धाडिलें, लग्न काढिलें अस्तमानाला । चहूं देशींचे ब्राह्मण आले धाऊन नृपनंदन विनवी त्याला । सत्वर लावा हळदी, बोलवा आधीं भीमक-बाळीला । मग बारासोळाजणी मिळोनी कामिनी म्हणती, बाई चला । भीमकीचें मनीं घननीळ, करी तळमळ, करवत जिवाला । लावण्य कनकलतिका आणुनी कौतुक स्नेहें न्हाणिली । वेदघोष करिती ब्राह्मण वाद्यें आणुन हळदी लाविली । वाजती नौबती चौघडे घाय लागली । वराडी आले दम-घोश जरासंधादी । पुजुनी सेंवती ? जानवसा नगरामधीं । आला वनमाळी साधुनियां ऐसी संधी । सुदेव ब्राह्मण पुढें जाऊन बोले हांसून । रुक्मिणी पद्मलोचनी चक्रपाणिला आलों घेऊन ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP