मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
सखे, तुझ्या चांगुलपणाची क...

लावणी ६० वी - सखे, तुझ्या चांगुलपणाची क...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


सखे, तुझ्या चांगुलपणाची काय तारीफ तरी सांगावी ? ।
प्राण व्यर्थ तुजपुढें, खरा जिव लावुन तुला गडे भोगावी ॥धृ०॥
गोरा रंग गोजिरा शिरा ही तर्‍हा तुझ्या गडे स्वरूपाची ।
जोबन कवठें जशीं, उरावर तंग चोळी मिन्याची
बहरदार थोडकेंच हसतां मोती हलती कांपाची ।
मर्यादेशील आहेस, वाटते तूं लाडकी मायबापाची ।
सुगंध वेणीमधें खोचली पुडी कस्तुरिच्या नाभाची ।
पवित्र दिसशी कशी भोगितां नाहि कल्पना पापाची ।
शंभरदां फिरफिरुन पाहतों, तरि वाटे आणखी पहावी ॥१॥
चाल तुझी हळुहळु झुकावित पाइं जोडवीं न वाजती ।
पंगतींमध्ये वाढतां तुझ्याकडे टवकारून सारे पहाती ।
सपिट गव्हाचें जसें तशा मृदु मांडया, निर्मळ उर छाती ।
गोलदार बाहुटे, घातल्या घट्ट वाकि वर गुजराथी ।
अम्ही पुरुष तुजपुढें गरिब, तूं सखे आम्हाला धर हातीं ।
सुख भोगुन शेवटीं तूंच हो अमच्या प्राणांची साती ।
रोज घराशी अणुन एकिकडे प्रीतीनें अलिंगावी ॥२॥
लाल रंग तळहात, कोवळे पाय, नैतिचें वय थोडें ।
राजि व्हावयासाठीं देतसों अणुन तुला ताजे पेढे ।
समागमाचा पहा कसा गुण, गंगेला मिळती ओढे ।
हीच कल्पना इथे लक्षितां अक्षइपद हातीं जोडे ।
पडुन मुर्ख जाहलों तुंसाटी वेडयापेक्षां अम्हि वेडे ।
जिवंतपणिं भोगुं दे, काय मग मेल्यावर गेले गाडे ।
जन्मोजन्मीं हीच ईश्वरापसी अशी स्त्री मागावी ॥३॥
प्रसन्नतेची गुढी अतां दे, उपकाराला जीव देतों ।
दो घटकेची मौज, फारसे तुझें काय नेतों ? ।
घेतों सलामतीचा बहार तुझ्या, गडे तोंडाकडे पाही जो तो ।
प्राप्त कोणाची नाहीं, आपल्या मनामध्यें साखर खातों ।
निलाजर्‍याचे तुझ्या घरी तिनतिनदां धावुन येतों ।
नको हाडें घोळसूं, कृपा कर दिला अमचा व्याकुळ होतो ।
होनाजी बाळा म्हणे, प्रयत्नें करून हाताशीं लागावी ।
ही सुंदर चांगल्या फुलाची कळी सुवासिक हुंगावी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP