मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
सोडून मज पलिकडे निजा, येव...

लावणी ४४ वी - सोडून मज पलिकडे निजा, येव...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


सोडून मज पलिकडे निजा, येवढा वेळ रमले ।
रात्रंदिस बेजार, तुम्हांसी रत होतां दमले ॥धृ०॥
अडविउभी नका दडपुन धरूं तनु निर्जिव कवळी ।
कठिण शरिर तुमचें, तशामधें मी केतकि पिवळी ।
अढळ भांग विखुरला कसा, कुंकुम पुसलें भाळीं ।
नथ झाली वाकडी चुंबितां वदन अधरपवळी ।
लवलवित करचरण मुरडितां देह पातळ चवळी ।
जिव दुसर्‍याचा बघा, तुम्ही किति करितां चोळाचोळी ! ।
फुकट मिळालें तरी मिष्ट भोजन थोडें घ्यावें
गोड ऊस लागला म्हणुन काय मुळवाढें खावें ?
ठाणबंद भोगितां, कसें तरि मग बाहेर जावें ?
कार्याकारण घ्यावें करून, बहुतापरि श्रमले ॥१॥
न्हाण आल्याच्या आधीपसुन तुम्हि छळिलें हो भारी ।
बळस्वार घातली तेव्हांपुन मजवरती स्वारी ।
सालोसाल दरमहा घेउन मज निजतां शेजारीं ।
नरम-कठिण ओळख, पितळ-सोनें दोन्ही न्यारी ।
उंच वस्त्र चोळटूं नका हो, मी गजनी कोरी ।
सर्व परी अति वर्ज, करुं नये नारीवर जोरी ।
कंटाळल्यावर विषयसुखाची मग नाहीं गोडी
फार सोस वावगा, प्रीतिची लहर बहार थोडी
चतुर विचक्षण आपण उभयतां हंसाची जोडी
घडोघडिं वदो किति ? जागृतिनें डोळे भरले ॥२॥
सरलि वाट, ताठली पाठ, कां अठ येवढी धरली ? ।
पोकळ झाली वेणि, राखडीमुद माथ्यावरली ॥
काढुन तरि घेउं द्या कंचुकी कांठाला चिरली ।
मर्यादा करणाचि यापुढें काय सिलिक उरली ? ।
निस्तेज दीन दिसे मुखश्री अगदींच उतरली ।
मदन शांतवा, अतां जवळ मी नाहीं असें मोजा
येक शयन, येक चित्त, एक मन तुम्ही केल्या मौजा
बहुत जिकिर ठीक नव्हें, जीवन हें परक्याचें समजा
कांहिं तरी उमजा, अंगाला पाजर थबथबले ॥३॥
उद्यां हौस पुरवा पुरती, आज तनमन विटलें ।
सापडलें ऐतें जसें धन कुबेराचें लुटलें ।
मोहनमाळ सर, मुक्त पदर हे कंठयाचे तुटले ।
इतके करतां तरी तुम्हांला नको कधीं म्हटलें ? ।
ज्याचें त्यास भोगणें, कोणाला तें नाहीं सुटलें ।
नदर वाहिला प्राण, घेतलें शिर कापुन हातीं
जशी इनाम जहागीर तुमची वतनाची खोती
मी सुरंग लालडी, तुम्ही तर येक दाणामोती
स्वसंतोष भरनवतिजळावर, ती कमळण उमले ।
होनाजी बाळा म्हणे, दर्शनीं कामज्वर शमले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP