मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|निर्णयसिंधु|तृतीयपरिच्छेद पूर्वार्ध|
दुष्टरजोदर्शनाविषयीं शांति

तृतीयपरिच्छेद - दुष्टरजोदर्शनाविषयीं शांति

निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल , याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे .


दुष्टरजोदर्शनाविषयीं शांति सांगतो . -

शांतिमाहप्रयोगपारिजातेशौनकः सार्तवानांतुनारीणांशांतिंवक्ष्यामिशौनकः पंचमेह्निचतुर्थेवाग्रहयज्ञपुरः सरम् ‍ तस्मिन्नहनिकर्तव्योऋतुहोमोविधानतः आचार्यंवरयेत्प्राज्ञोभुवनेश्वरितुष्टये । होमार्थंचजपार्थंचवरयेदृत्विजोबहून् ‍ । यजमानोद्विजैः सार्धंशांतिहोमंसमाचरेत् ‍ । गृहादीशानदिग्भागे देवतापूजनायच द्रोणप्रमाणधान्येनव्रीहिराशित्रयंभवेत् ‍ कुंभत्रयंन्यसेद्राशौतंतुवस्त्रादिवेष्टितम् ‍ पूरयेत्तीर्थसलिलैः प्रतिकुंभंपृथक् ‍ पृथक् ‍ सूक्तेनाथनवर्चेनप्रसुवआपइत्यथ ऋचायाः प्रवतस्तद्वद्गायत्र्याचततः क्रमात् ‍ मध्यकुंभेक्षिपेद्धान्यमौषधानिचहेमच ततश्चपंचरत्नानिगंधपुष्पाक्षतादिकान् ‍ औषधानिचवक्ष्यंतेमुनिभिः शांतिकारणात् ‍ उदुंबरः कुशोदूर्वाराजीववटबिल्वकाः विष्णुक्रांताथतुलसीबर्हिषंशंखपुष्पिका शतावर्यश्वगंधाचनिर्गुंडीसर्षपद्वयम् ‍ अपामार्गः पलाशश्चपनसोजीवकस्तथा प्रियंगवश्चगोधूमाव्रीहयोऽश्वत्थएवच क्षीरंदधिचसर्पिश्चपद्मपत्रंतथोत्पलम् ‍ कुरंटकत्रयंगुंजावचाभद्रकमुस्तकाः द्वात्रिंशदौषधानीहयथासंभवमाहरेत् ‍ मृत्तिकाश्चौषधादीनितन्मंत्रेणक्षिपेत्क्रमात् ‍ कुंभोपरिन्यसेत्पात्रंकांस्यंमृद्वेणुताम्रजम् ‍ भुवनेश्वरींन्यसेत्तत्रइंद्राणींचपुरंदरं जपेद्गायत्रिमाहोमाच्छ्रीसूक्तंचपेत्ततः स्पृशन्वैदक्षिणंकुंभमृत्विगेकोजपेदथ चत्वारिरुद्रसूक्तानिचतुर्मंत्रोत्तराणिच संस्पृशन्नुत्तरंकुंभंश्रीरुद्रंरुद्रसंख्यया शंनइंद्राग्नीसूक्तंचतत्रैवसंस्पृशन् ‍ जपेत् ‍ कुंभस्यपश्चिमेदेशेशांतिहोमंसमाचरेत् ‍ दूर्वाभिस्तिलगोधूमैः पायसेनघृतेनच तिसृभिश्चैवदूर्वाभिरेकैकाचाहुतिर्भवेत् ‍ अष्टोत्तरसहस्रंवाशतमष्टोत्तरंतुवा गायत्र्यैवतुहोतव्यंहविरत्रचतुष्टयम् ‍ ततः स्विष्टकृतंहुत्वासमुद्रादूर्मिसूक्ततः संततामाज्यधारांतांपूर्णाहुतिमथाचरेत् ‍ अथाऽभिषेकंकुर्वीतप्रतिकुंभस्थितोदकैः आपोहिष्ठेतिनवभिः सूक्तेनचततः परम् ‍ इंद्रोअंगतृचेनैवपावमानैः क्रमेणतु उभयंश्रृणवच्चनः स्वस्तिदाविशएकया त्रैयंबकेनमंत्रेणजातवेदसएकया समुद्रज्येष्ठाइत्यादित्रायंतांचत्रिभिः क्रमात् ‍ इमाआपस्तृचेनैवदेवस्यत्वेतिमंत्रतः मंत्रेणाथत्नमीशानंत्वमग्नेरुद्रइत्यथ तमुष्टुहीतिमंत्रेणभुवनस्यपितरंतथा यातेरुद्रेतिमंत्रेणशिवसंकल्पमंत्रतः इंद्रत्वावृषभंपंचमंत्रैश्चैवाभिषेचयेत् ‍ धेनुंपयस्विनींदद्यादाचार्यायचभूषणैः सदक्षिणमनड्वाहंप्रदद्याद्रुद्रजापिने महाशांतिंप्रजप्याथब्राह्मणान् ‍ भोजयेत्ततइति ।

प्रयोगपारिजातांत शौनक - " मी शौनक रजस्वला स्त्रियांची शांति सांगतों - पांचव्या किंवा चवथ्या दिवशीं ग्रहयज्ञपूर्वक शांति करावी . त्या दिवशीं यथाविधि ऋतुहोम करावा . भुवनेश्वरीच्या संतोषाकरितां होमासाठीं व जपासाठीं बहुत ऋत्विज वरावे . ब्राह्मणासहवर्तमान यजमानानें शांतिहोम करावा . घराच्या ईशान दिशेकडे देवतापूजनासाठीं एक द्रोण ( चार पायली ) भाताच्या तीन राशी कराव्या . त्या राशींवर सूत , वस्त्र इत्यादिकांनीं वेष्टिलेले असे तीन कुंभ स्थापावे . त्या प्रत्येक कुंभांत ‘ प्रसुव आप० ’ ह्या नऊ ऋचांनीं आणि ‘ याः प्रवतो० ’ या एक ऋचेनें व गायत्रीमंत्रानें अनुक्रमानें शुद्ध उदक भरावें . आणि गंधादिक घालावीं . मध्यकुंभांत धान्यें ( यव , व्रीहि , तिल , उडीद , राळे , सांवे , मूग , ); ओषधी म्हणजे - उंबर , कुश , दूर्वा , रक्तकमळ , वड , बेल , विष्णुक्रांता , तुळस , बर्हिष् ‍, शंखपुष्पी , शतावरी , अस्कंध , निर्गुंडी , दोन प्रकारचे सर्षप , आघाडा , पळस , फणस , जीवक , राळे , गहूं , व्रीहि , अश्वत्थ , कमळपत्र ; कमळ , तीन प्रकारचा कोरांटा ( पांढरा , तांबडा , पिंवळा ), गुंजा , वेखंड , भद्रमोथा , मोथा , ह्या बत्तीस ओषधी मिळतील त्या मिळवून घालाव्या . आणि दूध , दहीं ,

तूप घालावें . नंतर तीन कलशांत मृत्तिका ( हत्तीची जागा , अश्वशाला , राजरस्ता , वारुळ , नदीसंगम , पाण्याचा डोह , गोठा यांतील सात मृत्तिका ), ओषधी इत्यादि म्ह० दूर्वा , पंचपल्लव , ( अश्वत्थ , उंबर , पायरी , आम्र , वट यांचे पल्लव ), पूगीफलें , पंचरत्नें ( सुवर्ण , हिरा , नील , पद्मराग , मौक्तिक ), हीं त्या त्या मंत्रानें अनुक्रमानें टाकावीं . गंध , पुष्पें , अक्षता , इत्यादिक टाकावीं . नंतर तीन कलशांवर कांशाचीं , किंवा मातीचीं , अथवा वेळूचीं किंवा तांब्याचीं तीन पात्रें ठेवावीं . त्यांत मध्यकलशावर भुवनेश्वरीची , दक्षिणकलशावर इंद्राणीची आणि उत्तरकलशावर इंद्राची अशा सुवर्णप्रतिमा स्थापून त्यांच्या त्यांच्या मंत्रांनीं षोडशोपचारांनीं पूजा करावी . नंतर आचार्यानें मध्यकुंभाला स्पर्श करुन अष्टसहस्त्र किंवा अष्टशत गायत्रीजप करुन श्रीसूक्तजप करावा . एका ऋत्विजानें दक्षिणकुंभाला स्पर्श करुन रुद्रसूक्तें चार ( कद्रुद्राय० हें नऊ ऋचांचें सूक्त पहिलें , इमारुद्राय० हें अकरा ऋचांचें सूक्त दुसरें , आतेपितर् ‍ ० हें पंधरा ऋचांचें सूक्त तिसरें , इमारुद्रायस्थिर० हें चार ऋचांचें चवथें ), पुढचे चार मंत्र ( आवोराजा० , तमुष्टुहि० , भुवनस्य पितरं० , त्र्यंबकं० ), यांचा जप करावा . दुसर्‍या ऋत्विजानें उत्तरकुंभाला स्पर्श करुन रुद्राच्या अकरा आवृत्ति कराव्या . आणि त्याच कुंभाला स्पर्श करुन इतरानें , शंन इंद्राग्नी० सूक्ताचा जप करावा . कुंभाच्या पश्चिमभागीं स्थंडिल घालून त्याजवर शांतिहोम करावा . तो असा - नवग्रहांचा होम समिधा , तिल , आज्य ह्या द्रव्यांनीं करावा . भुवनेश्वरीला गायत्रीमंत्रानेंच दूर्वा , तिलमिश्र गोधूम , पायस , घृत , ह्या चार द्रव्यांचा अष्टोत्तर सहस्र ( १००८ ) किंवा अष्टोत्तरशत ( १०८ ) संख्याक होम करावा . तीन तीन दूर्वांची एक एक आहुति होते . नंतर स्विष्टकृताचा होम करुन ‘ समुद्रादूर्मि० ’ या सूक्तानें संतत आज्यधारा ती पूर्णाहुति करावी . नंतर प्रत्येक कुंभांतील उदक एका पात्रांत घेऊन ‘ आपोहिष्ठा० ’ या नऊ ऋचांच्या सूक्तानें , ‘ इंद्रोअंग० ’ ह्या तीन ऋचा , पवमानमंत्र , ‘ उभयं शृणवच्चन० ’ ही एक ऋचा , ‘ स्वस्तिदाविशस्पतिः० ’ ही एक ऋचा , ‘ त्र्यंबकं० हा एक मंत्र , ‘ जातवेदसे० ’ ही एक ऋचा , ‘ समुद्रज्येष्ठाः ’ ह्या चार ऋचा , ‘ त्रायंतां० ’ ह्या तीन ऋचा , ‘ इमाआपः० ’ ह्या तीन ऋचा , ‘ देवस्यत्वा० ’ हे आपस्तंब शाखेंतील तीन मंत्र , ‘ तमीशानं० ’ हा एक मंत्र , ‘ त्वमग्नेरुद्र० ’ हा एक मंत्र , ‘ तमुष्टुहि० ’ हा एक मंत्र , ‘ भुवनस्य पितरं० ’ हा एक मंत्र , ‘ याते रुद्र० ’ हा एक मंत्र , ‘ यज्जाग्रत० ’ हे सहा शिवसंकल्प मंत्र , ‘ इंद्र त्वा वृषभं० ’ हे पांच मंत्र , यांनीं यजमान व पत्नी यांजवर अभिषेक करावा . नंतर आचार्याला अलंकारसहित पुष्कळ दूध देणारी धेनु द्यावी . रुद्रजप करणाराला दक्षिणासहित वृषभ द्यावा . व इतर ऋत्विजांना दक्षिणा द्यावी . नंतर ब्राह्मणाकडून महाशांतिजप करवावा . महाशांति म्हणजे ‘ आनोभद्रा० ’ ह्या दहा ऋचा , ‘ स्वस्तिनोमिमीता० ’ ह्या पांच ऋचा , ‘ शंन इंद्राग्नी० ’ ह्या पंधरा ऋचा , ही होय . महाशांतीचा जप झाल्यावर ब्राह्मणांना भोजन घालावें . "

नारदः तत्रशांतिंप्रकुर्वीतघृतदूर्वातिलाक्षतैः प्रत्येकाष्टशतंचैवगायत्र्याजुहुयात्ततः स्वर्णगोभूतिलान् ‍ दद्यात्सर्वदोषापनुत्तये प्रकारांतरंमदनरत्नेज्ञेयम् ‍ विस्तरभयान्नोच्यते ग्रहणेरजोदर्शनेतुजातकर्मप्रस्तावेशांतिं वक्ष्यामः । अथप्रथमर्तौविशेषः स्मृतिचंद्रिकायाम् ‍ प्रथमर्तौतुपुष्पिण्याः पतिपुत्रवतीस्त्रियः अक्षतैरासनंकृत्वातस्मिंस्तामुपवेशयेत् ‍ हरिद्रागंधपुष्पादिदद्युस्तांबूलकंस्त्रजम् ‍ दीपैर्नीराजनंकुर्यात्सदीपेवासयेद्गृहे लवणापूपमुद्गादिदद्यात्ताभ्यः स्वशक्तितइति ।

नारद - " रजोदर्शनाविषयीं सर्व दोषनशानाकरितां शांति करावी . घृत , दूर्वा , तिल , अक्षता , ह्या प्रत्येक द्रव्याचा गायत्रीमंत्रानें अष्टशत होम करावा ; नंतर सुवर्ण , गाई , भूमि , तिल , हीं ब्राह्मणांस द्यावीं . " दुसरा प्रकार मदनरत्नांतून जाणावा . येथें फार विस्तार होईल म्हणून सांगत नाहीं . ग्रहणांत रजोदर्शन झालें असेल तर त्याची शांति जातकर्मप्रकरणीं पुढें सांगूं . प्रथम रजोदर्शनाचे ठायीं विशेष सांगतो स्मृतिचंद्रिकेंत - " स्त्रियेला प्रथम रजोदर्शन झालें असतां पतिपुत्रवती स्त्रियांनीं अक्षतांचें आसन करुन त्या आसनावर तिला बसवावी . आणि हळद , गंध , पुष्पें , तांबूल , स्रक् ‍ ( माळा ) हीं तिला द्यावीं . दिवे लावून नीरांजन करावें . दीपयुक्त घरांत तिला बसवावी . त्या स्त्रियांना आपल्या शक्तीप्रमाणें लवण , अपूप , मूग इत्यादिक द्यावे . "

द्वितीयाद्यर्तुषुतुतन्नियममाह पारिजातेदक्षः अंजनाभ्यंजनेस्नानंप्रवासंदंतधावनं नकुर्यात्सार्तवानारी ग्रहाणामीक्षणंतथा अत्रिरपि वर्जयेन्मधुमांसंचपात्रेखर्वेचभोजनं गंधमाल्येदिवास्वापंतांबूलंचास्यशोधनं दग्धेशरावेभुंजीतपेयंचांजलिनापिबेत् ‍ मदनरत्नेहारीतः रजः प्राप्तावधः शयीतभूमौकार्ष्णायसेपाणौ मृन्मयेवाऽश्नीयादिति विष्णुधर्मे आहारंगोरसानांचपुष्पालंकारधारणं अंजनंकंकतंगंधान्पीठशय्याधिरोहणं अग्निसंस्पर्शनंचैववर्जयेत्सादिनत्रयमिति ।

दुसर्‍या ऋतूपासून पुढें रजस्वला स्त्रियांचा नियम सांगतो पारिजातांत दक्ष - " डोळ्यात काजळ घालणें , तेल लावणें , स्नान , प्रवास , दंतधावन , आणि ग्रहणाचें दर्शन हीं रजस्वला स्त्रियेनें करुं नयेत . " अत्रिही - " रजस्वला स्त्रियेनें मध व मांस वर्ज्य करावें . खर्व ( लहान ) पात्रांत भोजन , गंध , माल्य , दिवसा निद्रा , तांबूल , मुखशोधन , हीं वर्ज्य करावीं . परळांत भोजन करावें . आणि पेय पदार्थ अंजलीनें प्यावा . " मदनरत्नांत हारीत - " रजोदर्शन प्राप्त असतां स्त्रियेनें भूमीवर शयन करावें . कृष्णलोहपात्रांत , हातावर किंवा मातीच्या पात्रांत भोजन करावें . " विष्णुधर्मांत - " रजस्वला स्त्रियेनें गोरसभक्षण , पुष्प व अलंकार यांचें धारण , डोळ्यांत अंजन , कंकत ( फणीनें केशसंस्कार ), गंध , आसन व शय्या ह्यांवर बसणें , अग्नीचा स्पर्श , हीं तीन दिवस वर्ज्य करावीं . "

तथाचप्रथमर्तोः पूर्वंस्त्रीगमनंनकार्यम् ‍ प्राग्रजोदर्शनात् ‍ पत्नींनेयाद्गत्वापतत्यधः व्यर्थीकारेणशुक्रस्यब्रह्महत्यामवाप्नुयादितितत्रैवाश्वलायनोक्तेः एतत्तुदशवर्षात्प्राक् ‍ ज्ञेयम् ‍ प्रथमर्तौगमनेगौतमेनविशेषोदर्शितः गौरीमपिचरत्यर्थंगच्छेत्पुरुष आकुलः अन्यथावीर्यपातोहिसहस्रकुलपातकः अन्यथापितदिच्छयाभवतीति विज्ञानेश्वरः तत्रऋतौगमनमाहयाज्ञवल्क्यः षोडशर्तुर्निशास्त्रीणांतस्मिन्युग्मासुसंवसेदिति अनृतावप्याहगौतमः ऋतावुपेयात्सर्वत्रवाप्रतिषिद्धवर्जमिति मनुः ऋतुः स्वाभाविकः स्त्रीणांरात्रयः षोडशस्मृताः तासामाद्याश्चतस्रस्तुनिंदितैकादशीतथा त्रयोदशीचशेषाः स्युः प्रशस्तादशरात्रयः मदनरत्नेदेवलः तस्मात्रिरात्रंचांडालींपुष्पितांपरिवर्जयेदिति ।

तसेंच प्रथम ऋतुदर्शनाच्या पूर्वीं स्त्रीगमन करुं नये . कारण , " रजोदर्शनाच्या पूर्वीं स्त्रीयेप्रत गमन करुं नये . गमन करील तर अधःपात ( नरकपात ) होईल . कारण , निरर्थक शुक्रपात केल्यानें ब्रह्महत्येचा दोष प्राप्त होईल " असें तेथेंच विष्णुधर्मांत आश्वलायनवचन आहे . हें स्त्रीगमन वर्ज्य सांगितलें तें दहा वर्षांच्या आंतील स्त्री असतां समजावें . कारण , ऋतुदर्शनाच्या पूर्वीं गमनाविषयीं गौतम विशेष दाखवितो - " स्त्रीसंगाविषयीं आकुल ( कामातुर ) झालेल्या पुरुषानें सुरतासाठीं गौरी ( दहावर्षांचे ) देखील स्त्रियेप्रत गमन करावें . कारण , स्त्रीसंगावांचून इतर प्रकारानें वीर्यपात झाला तर तो हजारों कुलांना अधःपात करणारा आहे . " स्त्रीसंगावांचूनही स्त्रियेची इच्छा झाल्यानें वीर्यपात होतो , असें विज्ञानेश्वर सांगतो . आतां ऋतूचे ठायीं गमन सांगतो . याज्ञवल्क्य - " स्त्रियांना रजोदर्शनापासून सोळा रात्रि ऋतुकाल म्हटला आहे . त्या ऋतुकालांत समरात्रींचेठायीं ( सहाव्या , आठव्या इत्यादि रात्रीं ) गमन करावें . " ऋतुभिन्नकालीं देखील सांगतो गौतम - " ऋतुकालीं स्त्रियेप्रत गमन करावें . अथवा निषिद्ध दिवस वर्ज्य करुन सर्वकालीं ( ऋतुकालीं व अनृतुकालीं ) गमन करावें . " मनु - " स्त्रियांचा स्वाभाविक ऋतुकाल सोळा रात्री म्हटला आहे . त्या सोळा रात्रींमध्यें पहिल्या चार रात्री , अकरावी आणि तेरावी रात्र ह्या निंदित आहेत . बाकीच्या दहा रात्री प्रशस्त आहेत . " मदनरत्नांत देवल - " तस्मात् ‍ कारणात् ‍ रजस्वला स्त्री तीन दिवस चांडालीप्रमाणें वर्ज्य करावी . "

तत्रतिथ्यादीनाहश्रीधरः षष्ठ्यष्टमींपंचदशींचतुर्थीचतुर्दशीमप्युभयत्रहित्वा शेषाः शुभाः स्युस्तिथयोनिषेकेवाराः शशांकार्यसितेंदुजानाम् ‍ उभयत्रपक्षद्वये आर्योगुरुः सितः शुक्रः इंदुजोबुधः विष्णुप्रजेशरविमित्र समीरपौष्णमूलोत्तरावरुणभानिनिषेककार्ये पूज्यानिपुष्यवसुशीतकराश्विचित्रादित्यश्चमध्यमफलाविफलाः स्युरन्ये विष्ण्वादिदैवत्यनक्षत्राण्युक्तानिरत्नमालायां भेशादस्रयमाग्निधातृशशिनः शर्वोदितिर्वाक्पतिः कद्रूजाः पितरोभगोर्यमरवीत्वष्ट्राह्वयोमारुतः शक्राग्नीत्वथमित्र इंद्रनिऋतीतोयंचविश्वेविधिर्गोविंदोवसर्वोबुपाजचरणाहिर्बुध्न्यपूषाभिधाः उत्तराशब्देनोत्तरात्रयं अत्रमूलस्यपूज्यत्वमुक्तम् ‍ याज्ञवल्क्येनतु एवंगच्छन् ‍ स्त्रियंक्षामांमघांमूलंचवर्जयेदित्युक्तं तेनपूर्वत्रमूलंचिंत्यम् ‍ ।

त्या गमनाविषयीं तिथि , वार इत्यादिक सांगतो श्रीधर - " षष्ठी , अष्टमी , पंचदशी ( पंधरावी तिथि ), चतुर्थी आणि चतुर्दशी ह्या शुक्ल व कृष्ण दोन्ही पक्षांतील तिथि वर्ज्य करुन उरलेल्या बाकीच्या तिथि आणि सोम , गुरु , शुक्र , बुध हे वार स्त्रीगमनाविषयीं प्रशस्त आहेत . विष्णु ( श्रवण ), प्रजापति ( रोहिणी ), रवि ( हस्त ), मित्र ( अनुराधा ), वायु ( स्वाती ), पूषा ( रेवती ), मूल , उत्तरा ( उत्तरा , उत्तराषाढा , उत्तराभाद्रपदा ), वरुण ( शततारका ) हीं नक्षत्रें गर्भाधानाविषयीं शुभ आहेत . पुष्य , वसु ( धनिष्ठा ), चंद्र ( मृगशीर्ष ), अश्विनी , चित्रा , अदिति ( पुनर्वसु ), हीं नक्षत्रें मध्यम आहेत . आणि बाकीचीं नक्षत्रें अशुभ आहेत . " वरील श्लोकांत विष्णु इत्यादिक नक्षत्रें सांगितलीं आहेत तीं कोणतीं , हें समजण्याकरितां नक्षत्रांच्या देवता सांगतो रत्नमालेंत - " अश्विनीकुमार , यम , अग्नि , धाता ( प्रजापति ), चंद्र , शंकर , अदिति , बृहस्पति , सर्प , पितर , भग , अर्यमा , रवि , त्वष्टा , वायु , इंद्राग्नी , मित्र , इंद्र , निऋति , उदक , विश्वेदेव , विधि , विष्णु , वसु , वरुण , अजचरण , अहिर्बुध्न्य , आणि पूषा , ह्या अश्विनीपासून अठ्ठावीस नक्षत्रांच्या देवता अनुक्रमानें आहेत . " ह्या वरील श्लोकांत मूल नक्षत्र गर्भाधानाविषयीं शुभ सांगितलें आहे . याज्ञवल्क्यानें तर - " याप्रकारें स्त्रियेप्रत गमन करणारानें मघा व मूल नक्षत्र वर्ज्य करावें . असें मूल नक्षत्र वर्ज्य सांगितलें आहे . तेणेंकरुन पूर्ववचनांत मूल नक्षत्र उक्त सांगितलें तें चिंत्य ( प्रमाणशून्य ) होय .

अत्रसमासुपुत्राः विषमासुकन्यकेतिज्ञेयम् ‍ युग्मासुपुत्राजायंतेस्त्रियोऽयुग्मासुरात्रिष्वितिहेमाद्रौशंखोक्तेः तत्राप्युत्तरोत्तराः प्रशस्ताः तदाहापस्तंबः तत्राप्युत्तरोत्तराप्रशस्तेति तत्रैवव्यासः रात्रौचतुर्थ्यांपुत्रः स्यादल्पायुर्धनवर्जितः पंचम्यांपुत्रिणीनारीषष्ठ्यांपुत्रस्तुमध्यमः सप्तम्यामप्रजायोषिदष्टम्यामीश्वरः पुमान् ‍ नवम्यांसुभगानारीदशम्यांप्रवरः सुतः एकादश्यामधर्मास्त्रीद्वादश्यांपुरुषोत्तमः त्रयोदश्यांसुतापापावर्णसंकरकारिणी धर्मज्ञश्चकृतज्ञश्चआत्मवेदीदृढव्रतः प्रजायतेचतुर्दश्यापंचदश्यांपतिव्रता आश्रयः सर्वभूतानांषोडश्यांजायतेपुमानिति अत्रचतुर्थदिननिषेधेपि स्नातांचतुर्थदिवसेरात्रौगच्छेद्विचक्षणइतिमहाभारतोक्तेः चतुर्थेहनिस्नातायांयुग्मासुवागर्भंसंदधातीतिहारीतोक्तेर्विकल्पोज्ञेयः तत्रापि स्नानंरजस्वलायास्तुचतुर्थेहनिशस्यते गम्यानिवृत्तेरजसिनानिवृत्तेकथंचनेत्यापस्तंबोक्तेर्व्यवस्थाज्ञेया ।

ह्या ऋतुकालांत समरात्रीं गमन केलें तर पुत्र व विषम रात्रीं गमन केलें तर कन्या होतात असें जाणावें . कारण , " युग्म ( सम ) रात्रीं पुत्र होतात व विषम रात्रीं कन्या होतात " असें हेमाद्रींत शंखवचन आहे . त्यांतही उत्तरोत्तर रात्री प्रशस्त आहेत . तें सांगतो आपस्तंब - " त्यांतही उत्तरोत्तर रात्रि प्रशस्त आहेत . " तेथेंच व्यास - " चवथ्या रात्रीं पुत्र होतो , तो अल्पायुषी व धनरहित होतो . पांचव्या रात्रीं गमन केलें तर पुत्रवती कन्या होते . सहाव्या रात्रीं मध्यम पुत्र होतो . सातव्या रात्रीं प्रजा न होणारी कन्या होते . आठव्या रात्रीं ईश्वरतुल्य पुत्र होतो . नवव्या रात्रीं सुभग कन्या होते . दहाव्या रात्रीं श्रेष्ठ पुत्र होतो . अकराव्या रात्रीं अधर्म करणारी कन्या होते . बाराव्या रात्रीं पुरुषश्रेष्ठ होतो तेराव्या रात्रीं पापी कन्या वर्णसंस्कार करणारी अशी होते . चवदाव्या रात्रीं धर्मवेत्ता उपकार जाणणारा आत्मवेत्ता दृढ व्रत धरणारा असा पुत्र होतो . पंधराव्या रात्रीं पतिव्रता कन्या होते . सोळाव्या रात्रीं सर्व प्राण्यांना आश्रयरुप असा पुरुष होतो . " येथें वरील मनु इत्यादिवचनांत चवथ्या दिवसाचा निषेध केला तरी " चवथ्या दिवशीं स्नान केलेल्या स्त्रियेप्रत रात्रीं गमन करावें . " ह्या महाभारतवचनावरुन ; व चवथ्या दिवशीं स्नान केलेल्या स्त्रियेचे ठायीं अथवा युग्म ( सम ) रात्रीं पति गर्भसंधान ( स्थापन ) करितो " ह्या हारीतवचनावरुन चवथ्या रात्रीं विकल्प जाणावा . त्या विकल्पामध्यें देखील " रजस्वलेचें स्नान चवथ्या दिवशीं प्रशस्त आहे . रजाची निवृत्ति झाली असतां स्त्रीप्रत गमन करावें . रजाची निवृत्ति झाली नसेल तर कदापि गमन करुं नये . " ह्या आपस्तंबवचनावरुन व्यवस्था जाणावी .

अत्रसर्वासुयुग्मासुगमनमावश्यकम् ‍ युग्मास्वितिबहुवचननिर्देशादितिविज्ञानेश्वरः तच्चैकस्यांरात्रौसकृदेवकार्यं सुस्थ इंदौसकृत्पुत्रंलक्षण्यंजनयेत्पुमानितियाज्ञवल्क्योक्तेः इदंचर्तौगमनमन्यकालेप्रतिबंधादिनागमनासंभवेश्राद्धैकादश्यादावपिकार्यं ब्रह्मचार्येवपर्वाण्याद्याश्चतस्रश्चवर्जयेदितियाज्ञवल्क्योक्तेः व्याख्यातंचेदंमिताक्षरायां यत्रश्राद्धादौब्रह्मचर्यंविहितंतत्राप्यृतौगच्छतोनब्रह्मचर्यस्खलनदोषइति पर्वाणीति बहुत्वेनाष्टमीचतुर्दश्योर्ग्रहणमितिच मदनरत्नेप्येवं यत्तुहेमाद्रौशिवरहस्ये दिवाजन्मदिनेचैवनकुर्यान्मैथुनंव्रती श्राद्धंदत्वाचभुक्त्वाचश्रेयोर्थीनचपर्वस्विति तदनृतुविषयं ब्रह्मचार्येवभवतियत्रतत्राश्रमेवसन्नितिमनूक्तेः दर्शादौतुनभवत्येव पर्वणांपर्युदस्तत्वात् ‍ माधवीयेतु ऋतुकालंनियुक्तोवानैवगच्छेत्स्त्रियं क्कचित् ‍ तत्रगच्छन् ‍ समाप्नोतिह्यनिष्टफलमेवत्वितिवृद्धमनूक्तेः श्राद्धेब्रह्मचर्यंनियतमित्युक्तम् ‍ पृथ्वीचंद्रोदयेप्येवं एतत्सतिसंभवेज्ञेयं अनेकभार्यस्यर्तुयौगपद्येहेमाद्रौकश्यपः यौगपद्येतुतीर्थानांविवाहक्रमशोव्रजेत् ‍ रक्षणार्थमपुत्रांवाग्रहणक्रमशोपिवेति ग्रहणमृतुग्रहणं ऋग्विधाने विष्णुर्योनिंजपेत्सूक्तंयोनिस्पृष्ट्वात्रिभिर्व्रती गर्भाधानंततः कुर्यात्सुपुत्रोजायतेध्रुवम् ‍ ।

ह्या ऋतुकालीं सार्‍या युग्मरात्रीं गमन अवश्य आहे . कारण , वरील याज्ञवल्क्यवचनांत ‘ तस्मिन् ‍ युग्मासु संवसेत् ‍ ’ म्हणजे ऋतुकालीं युग्म ( सम ) रात्रीं गमन करावें . यांत ‘ युग्मासु ’ समरात्रीं , असें बहुवचन केलेलें आहे , असें विज्ञानेश्वर सांगतो . तें गमन एका रात्रीं एकवारच करावें . कारण , चंद्रबळ असतां पुरुष एकवार गमन करुन सुलक्षणी पुत्र उत्पन्न करील " असें याज्ञवल्क्यवचन आहे . हें ऋतुकालीं गमन इतर दिवशीं प्रतिबंध वगैरे असल्यामुळें झालें नसेल तर श्राद्धाचा दिवस , एकादशी इत्यादिकांचे ठायीं देखील करावें . कारण , " पर्व दिवस आणि पहिल्या चार रात्री वर्ज्य करुन गमन करणारा ब्रह्मचारीच समजावा " असें याज्ञवल्क्याचें वचन आहे . या वचनाची व्याख्या मिताक्षरेंत केली आहे , ती अशी - जेथें श्राद्धादिकांत ब्रह्मचर्य सांगितलें आहे तेथें देखील ऋतुकालीं गमन करणाराला ब्रह्मचर्यहानिरुप दोष होत नाहीं . आणि त्या वचनांत ‘ पर्वाणि ’ ह्या बहुवचनानें अष्टमी व चतुर्दशी यांचें ग्रहण होतें , असेंही मिताक्षरेंत सांगितलें आहे . मदनरत्नांतही असेंच आहे . आतां जें हेमाद्रींत शिवरहस्यांत - " दिवसा , व जन्मदिवशीं मैथुन करुं नये . व्रतस्थानें मैथुन करुं नये . दुसर्‍याच्या श्राद्धांत भोजन करुन व आपण श्राद्ध करुन मैथुन करुं नये . आणि कल्याणेच्छूनें पर्वांचे ठायीं मैथुन करुं नये " असें सांगितलें तें ऋतुभिन्नकालविषयक आहे . कारण , " कोणत्याही आश्रमांत ( गृहस्थाश्रमांसतही ) राहणारा ऋतुकालीं गमन करील तर तो ब्रह्मचारीच होतो म्हणजे ब्रह्मचर्यापासून भ्रष्ट होत नाहीं " असें मनुवचन आहे . दर्शादि पर्वांचे ठायीं तर ऋतुकालीं गमन नाहींच . कारण , वरील याज्ञवल्क्यवचनांत पर्वैं वगळलीं आहेत . माधवीयांत तर - ऋतुकालीं स्त्रीगमनाविषयीं वडिलांनीं नियोग ( आज्ञा ) केली असली तरी श्राद्धदिवशीं स्त्रीगमन कदापि करुं नये . कारण , श्राद्धदिवशीं गमन करणारास अनिष्ट फलच प्राप्त होतें " ह्या वृद्धमनुवचनावरुन श्राद्धाचे ठायीं ब्रह्मचर्य नियमित आहे , असें सांगितलें आहे . पृथ्वीचंद्रोदयांतही असेंच आहे . हें नियमित ब्रह्मचर्य संभवत असतां जाणावें . ज्याला अनेक भार्या आहेत त्याचे अनेक स्त्रियांना एक समयीं ऋतु प्राप्त असतां सांगतो हेमाद्रींत कश्यप - " अनेक स्त्रियांना एक समयीं ऋतु प्राप्त असेल तर त्या स्त्रियांप्रत विवाहक्रमानें ( ज्या क्रमानें विवाह झालेला असेल त्या क्रमानें )

गमन करावें . अथवा जिला पुत्र नसेल तिच्या संतोषार्थ पूर्वी तिजप्रत गमन करावें . " किंवा ज्या क्रमानें ऋतु प्राप्त असेल त्या क्रमानें गमन करावें . " ऋग्विधानांत - " व्रतस्थ पुरुषानें स्त्रियेला ऋतु प्राप्त असतां तीन अंगुलींनीं योनीला स्पर्श करुन ‘ विष्णुर्योनिं० ’ या सूक्ताचा जप करावा , नंतर गर्भाधान ( स्त्रीसंभोग ) करावें , म्हणजे उत्तम पुत्र निश्चयानें होतो . "

अगमनेदोषमाहपराशरः ऋतुस्नातांतुयोभार्यांसन्निधौनोपगच्छति घोरायांभ्रूणहत्यायांपच्यतेनात्रसंशयः अस्यापवादमाहमदनरत्नेव्यासः व्याधितोबंधनस्थोवाप्रवासेष्वथपर्वसु ऋतुकालेपिनारीणांभ्रूणहत्याप्रमुच्यते वृद्धांवंध्यामसद्वृत्तांमृतापत्यामपुष्पिणीं कन्यासूंबहुपुत्रांचवर्जयेन्मुच्यतेभयात् ‍ वृद्धांगतरजस्कां गर्भाधानांगहोमाकरणेप्रायश्चित्तमाहपारिजाते आश्वलायनः गर्भाधानस्याकरणात्तस्यांजातस्तुदुष्यति अकृत्वागांद्विजेदत्वाकुर्यात्पुंसवनंपतिः गर्भाधानंमलमासगुरुशुक्रास्तादावपिकार्यं उत्सवेषुचसर्वेषुसीमंतेऋतुजन्मसु सुरासुरेज्ययोश्चैवमौढ्यदोषोनविद्यत इति ज्योतिर्निबंधेभृगूक्तेः ऋतुगमनेपराशरः ऋतौतुगर्भशंकित्वात्स्नानंमैथुनिनः स्मृतं अनृतौतुयदागच्छेच्छौचंमूत्रपूरीषवत् ‍ स्त्रीणांतुनस्नानं उभावप्यशुचीस्यातांदंपतीशयनंगतौ शयनादुत्थितानारीशुचिः स्यादशुचिः पुमानिति वृद्धशातातपोक्तेः ।

ऋतुकालीं गमन न केलें असतां दोष सांगतो पराशर - " जो मनुष्य संनिध असलेल्या ऋतुस्नात भार्येप्रत गमन करीत नाहीं , तो भयंकर अशा भ्रूणहत्या दोषाचे ठायीं पक्क होतो , यांत संशय नाहीं . " याचा अपवाद सांगतो मदनरत्नांत व्यास - " व्याधिग्रस्त , बंदींत असलेला , किंवा प्रवासांत असलेला , आणि पर्व दिवस असतां पुरुष स्त्रियांच्या ऋतुकालीं देखील गमन न करील तरी त्याला भ्रूणहत्या दोष सुटलेला आहे . वृद्धा ( विटाळ गेलेली ), वांझोटी , असत् ‍ वर्तन करणारी , मुलें मरणारी , रजोदर्शन , नसलेली , कन्या प्रसवणारी , बहुत पुत्र झालेली , अशा स्त्रियेला वर्ज्य करणारा दोषापासून मुक्त होतो . " गर्भाधानांग होम न केला तर प्रायश्चित्त सांगतो पारिजातांत आश्वलायन - " गर्भाधान न केल्यानें तिच्या ठिकाणीं झालेला दुष्ट होतो . तें गर्भाधान न करितां गर्भिणी झाली तर पतीनें ब्राह्मणाला गाई देऊन पुंसवन संस्कार करावा . " गर्भाधान मलमास , गुरुशुक्रांचें अस्त इत्यादिकांतही करावें . कारण , " सर्व उत्सव , सीमंतसंस्कार , ऋतुदर्शनसंस्कार यांविषयीं गुरुशुक्रांच्या अस्ताचा दोष नाहीं . " असें ज्योतिर्निबंधांत भृगुवचन आहे . ऋतुगमनाविषयीं सांगतो पराशर - " ऋतुकालीं मैथुन करणार्‍या पुरुषास शंका असल्यामुळें स्नान सांगितलें आहे . जेव्हां ऋतुभिन्नकालीं गमन करील तेव्हां मूत्र व पुरीष केल्याप्रमाणें शुद्धि करावी . " हें ऋतुकालीं स्नान सांगितलें तें पुरुषास समजावें . स्त्रियांना तर स्नान नाहीं . कारण , " एकत्र शयनावर निजलेलीं स्त्री - पुरुष दोघेही अशुचि होतात . शयनापासून उठलेली स्त्री शुद्ध आहे . पुरुष अशुद्ध आहे " असें वृद्धशातातपवचन आहे .

अत्रकश्चिद्विशेषउच्यते तत्ररात्रौरजसिजननादौचरात्रिंत्रिभागांकृत्वा आद्यभागद्वयेचेत्पूर्वदिनंग्राह्यं परतस्तूत्तरदिनमितिमिताक्षरायां यत्तुप्रागर्धरात्रात्प्राग्वासूर्योदयात्पूर्वदिनंग्राह्यमित्युक्तं तत्रदेशाचाराव्द्यवस्था तथासप्तदशदिनपर्यंतंपुनारजोदर्शनेस्नानमात्रं अष्टादशेएकरात्रं एकोनविंशेद्व्यहः विंशतिप्रभृति त्रिरात्रमितिततएवज्ञेयं यत्तु चतुर्दशदिनादर्वागशुचित्वंनविद्यतइति तत्रस्नानप्रभृतित्वमभिप्रेतं एतच्चयस्याविंशतिदिनोत्तरंप्रायशोरजस्तत्रैव यस्यास्त्वर्वाक् ‍ प्रायशोरजस्तत्रोक्तं स्मृत्यर्थसारे त्रयोदशदिनादूर्ध्वंप्रायोरजोवतीनामेकादशदिनात्प्रागशुचित्वंनास्ति एकादशदिने एकरात्रम् ‍ द्वादशेद्विरात्रं ऊर्ध्वंत्रिरात्रमिति प्रयोगपारिजातेप्येवं रोगजेतुतत्रैवविशेषः संग्रहे रोगेणयद्रजः स्त्रीणामन्वहंहिप्रवर्तते नाशुचिस्तुभवेत्तेनयस्माद्वैकारिकंमतमिति कर्माधिकारस्तुरजोनिवृत्तावेव साध्वाचारानतावत्स्यात्स्नातापिस्त्रीरजस्वला यावत्प्रवर्तमानंहिरजोनैवनिवर्तत इतिश्राद्धहेमाद्रौशंखोक्तेः तत्रापिस्वकालेअशुचिरेवेत्याहऋष्यश्रृंगः रोगजेवर्तमानेपिकालेनिर्यातिकालजं तस्मात्कालेप्रमत्तास्यादन्यथासंकरोभवेत् ‍ तथारजस्वलायाः रजस्वलांतरस्पर्शेअकामतः स्नानं कामतः उपवासः पंचगव्याशनंच असवर्णानांतु ब्राह्मण्याः क्षत्रियादिस्पर्शेक्रमेणकृच्छ्रार्धपादोनकृच्छ्रकृच्छ्राः क्षत्रियादीनांतुकृच्छ्रपादएव क्षत्रियादीनांहीनवर्णास्पर्शेत्रिरात्रमुपवासः वैश्याशूद्योः पूर्वयास्पर्शेहोरात्रंद्विरात्रंच एतच्चकामतः अकामतस्तुप्राक् ‍ शुद्धेरनशनं अकामतः चांडालादिस्पर्शेष्वनशनमेवप्राक् ‍ शुद्धेः कामतस्तुप्रथमेह्नित्र्यहः द्वितीयेव्द्यहः तृतीयएकाहः श्वस्पर्शेतुव्द्यहएकाहोवा भुंजानायाश्चांडालादिस्पर्शेषड्रात्रं उच्छिष्टयोः स्पर्शेतुकृच्छ्र इत्यादिमिताक्षरायांज्ञेयं स्मृत्यर्थसारेतु सर्वत्रबालापत्यायाः स्पर्शेस्नानेकृतेभुक्तिः पश्चादनशनप्रत्याम्नायइति स्नानविधिंचाहपराशरः स्नानेनैमित्तिकेप्राप्तेनारीयदिरजस्वला पात्रांतरिततोयेनस्नानंकृत्वाव्रतंचरेत् ‍ सिक्तगात्राभवेदद्भिः सांगोपांगाकथंचन नवस्त्रपीडनकुर्यान्नान्यद्वासश्चधारयेत् ‍ ।

ह्या रजोदर्शनाविषयीं कांहीं विशेष सांगतो - रात्रीं रजोदर्शन आणि जननादिक आशौच प्राप्त असतां रात्रीचे तीन भाग करुन पहिल्या दोन भागांमध्येम असेल तर पूर्व दिवस धरावा . तिसर्‍या भागांत असेल तर पुढचा दिवस धरावा , असें मिताक्षरेंत सांगितलें आहे . आतां जें ‘ अर्धरात्रीच्या पूर्वी रज वगैरे प्राप्त असतां पहिला दिवस किंवा सूर्योदयापूर्वी प्राप्त असतां पहिला दिवस धरावा , असें सांगितलें आहे , तेथें देशाचारावरुन व्यवस्था जाणावी . तसेंच रजोदर्शनदिवसापासून पुनः सतराव्या दिवसापर्यंत रज प्राप्त झालें असतां स्नान मात्र करावें . अठराव्या दिवशीं रज प्राप्त असतां एक दिवस धरावा . एकोणिसाव्या दिवशीं प्राप्त असतां दोन दिवस धरावे . विसाव्या दिवसापासून पुढें प्राप्त असतां तीन दिवस अशुचित्व धरावें , हें सर्व मिताक्षरा ग्रंथापासूनच जाणावें . आतां जें " चवदाव्या दिवसापूर्वी रज प्राप्त झालें असतां अशुचित्व नाहीं " असें सांगितलें आहे , तेथें स्नानादिक जाणावें . म्हणजे चवदाव्या दिवशीं असेल तर स्नान , पंधराव्या दिवशीं असेल तर एक दिवस , सोळाव्या दिवशीं असेल तर दोन दिवस , आणि सतराव्या दिवसापासून पुढें असेल तर तीन दिवस , असा अभिप्राय . हा प्रकार जिला विसाव्या दिवसापुढें प्रायशः रज प्राप्त होत असेल तीविषयींच जाणावा . जिला बहुतकरुन लवकर रज प्राप्त होत असतें तीविषयीं सांगतो स्मृत्यर्थसारांत - तेराव्या दिवसापुढें फार करुन रजस्वला होणार्‍या स्त्रियांना अकराव्या दिवसाच्या पूर्वीं प्राप्त होईल तर अशुचित्व नाहीं . अकराव्या दिवशीं प्राप्त असतां एक दिवस . बाराव्या दिवशीं प्राप्त असतां दोन दिवस . याच्या पुढें प्राप्त असतां तीन दिवस . प्रयोगपारिजातांतही असेंच आहे . रोगापासून झालेल्या रजाविषयीं तर तेथेंच विशेष सांगतो संग्रहांत - " स्त्रियांना रोगानें जें प्रत्यहीं रज प्रवृत्त होतें , त्या योगानें ती स्त्री अशुचि होत नाहीं . कारण , तें रज वैकारिक ( विकारानें झालेलें ) आहे . " कर्माविषयीं अधिकार तर रजाची निवृत्ति झाल्यावरच समजावा . कारण , " रजस्वला स्त्री स्नान केली तरी जोंपर्यंत प्रवृत्त झालेलें ( स्त्रवणारें ) रज निवृत्त ( बंद ) झालें नाहीं , तोंपर्यंत तिनें चांगला आचार ( कर्म ) करुं नये " असें श्राद्धहेमाद्रींत शंखवचन आहे . रोगजन्य रज प्रत्यहीं असतां देखील कालिक रजाच्या कालीं अशुचिच आहे , असें सांगतो ऋष्यश्रृंग - " रोगजन्य रज प्रवृत्त असतांही आपल्या कालीं कालज रज प्रवृत्त होतें तस्मात् ‍ त्या कालिक रजाच्या कालीं हें रज रोगज किंवा कालिक , असें जाणण्याविषयीं स्त्रियेनें सावध असावें . सावध नसेल तर कालिक व रोगज यांचा संकर होईल . " तसेंच रजस्वलेला दुसर्‍या रजस्वलेचा स्पर्श न समजून झाला असतां स्नान करावें . मुद्दाम स्पर्श करील तर उपवास करावा , आणि पंचगव्य प्राशन करावें . भिन्न जातीच्या स्त्रियांना तर सांगतो - रजस्वला ब्राह्मणीला रजस्वला क्षत्रियेचा स्पर्श झाला तर अर्ध कृच्छ्र . वैश्येचा स्पर्श झाला तर पाऊण कृच्छ्र , शूद्रेचा स्पर्श झाला तर एक कृच्छ्र . आणि क्षत्रियेला , वैश्येला , व शूद्रेला ब्राह्मणीचा स्पर्श असतां पादकृच्छ्रच आहे . रजस्वला क्षत्रियादि स्त्रियांना हीन जातीच्या रजस्वलेचा स्पर्श असतां तीन दिवस उपवास सांगितला आहे . वैश्या व शूद्रा यांना क्षत्रियेचा स्पर्श असतां अनुक्रमानें अहोरात्र आणि द्विरात्र उपवास . हें प्रायश्चित्त मुद्दाम होऊन स्पर्श असतां समजावें . साहजिक स्पर्श होईल तर शुद्धीपर्यंत भोजन करुं नये . साहजिक चांडालादिकांचा स्पर्श झाला तर शुद्धीच्या पूर्वीं अभोजनच सांगितलें आहे . चांडालादिकांना मुद्दाम स्पर्श केला तर प्रथम दिवशीं स्पर्श असतां तीन दिवस उपवास . दुसर्‍या दिवशीं स्पर्श केला तर दोन दिवस उपवास करावा . तिसर्‍या दिवशीं स्पर्श केला तर एक दिवस उपवास . कुत्र्याचा स्पर्श झाला तर दोन किंवा एक दिवस उपवास करावा . रजस्वला भोजन करीत असतां चांडालादिकांचा स्पर्श होईल तर सहा दिवस व्रत ( उपवासादि ) करावें . रजस्वला स्त्रिया उच्छिष्ट असतां त्यांचा परस्पर स्पर्श झाला तर कृच्छ्र प्रायश्चित्त करावें , इत्यादि प्रकार मिताक्षरेंतून जाणावें . स्मृत्यर्थसारांत तर - मूल लहान असलेल्या रजस्वलेला वर सांगितलेल्या सर्व स्पर्शांविषयीं स्नान केल्यावर भोजन आहे . नंतर उपवासाचा प्रतिनिधि सांगितला आहे . नैमित्तिक स्नानाचा विधि सांगतो पराशर - " नैमित्तिक स्नान प्राप्त असतां जर स्त्री रजस्वला असेल तर तिनें बुडी न मारतां पात्रांत उदक घेऊन स्नान करुन व्रत ( रजस्वलाधर्म ) करावें . तिचीं मुख्य अंगें व उपांगें उदकानें भिजतील असें कसेंही तिनें स्नान करावें . वस्त्र पिळूं नये व दुसरें वस्त्र नेसूं नये . "

N/A

References : N/A
Last Updated : June 24, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP