मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ४९ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४९ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
ओं नमो जी नारायणा ॥ नामीं रुपीं अवघा तूचि जाणा ॥ विश्वकुटुंबी जगज्जीवना ॥ संरक्षिसी अनंत जीवां ॥१॥
अनंत जीवांचिया कोटी ॥ कोणी वसती गिरिकपाटीं ॥ पोसिसी जळांचिया पोटीं ॥ तेथेंचि त्यांस पाळिसी ॥२॥
पृथ्वीपोटीं कित्येक जीव ॥ त्यांचा तूं करिशी गौरव ॥ वृक्षीं पक्षियांचा ठाव ॥ तेथेंचि चारा पुरविसी ॥३॥
राजहंसा पाहिजे मोतीं ॥ त्यांसि संरक्षिसी त्याचि रीतीं ॥ कित्येक जीव मनीं मांस भक्षिती ॥ त्याच रीतीं त्यां देसी ॥४॥
मनुष्य भक्षी अन्नालागून ॥ त्यांसाठीं पाडिसी पर्जन्य ॥ अनंत खंडया धान्य पिकवून ॥ संतोषविसी दयाळा ॥५॥
पाण्यास पोट ना पाठ ॥ वायूस मुख ना शेंपुट ॥ अग्नीचें ना दिसे देह नीट ॥ नवल कळा पैं तुझी ॥६॥
बहुत पाय असती गोमिला ॥ दोन पाय जी मानवाला ॥ निपायीं सर्प चालविला ॥ नवल तुझ्या करणीचें ॥७॥
भानूच्या ठायीं उष्णता ॥ चंद्राअंगी शीतळता ॥ प्रकाश एक कळा भिन्नता ॥ कौतुक काय सांगावें ॥८॥
सर्वांचा प्राण एक त्यांत लाविला यातिभेद अनेक ॥ मुखांत फेर करुनि देख ॥ ओळख वेगळी दाविली ॥९॥
कंठीं काय केली मौज ॥ शब्दांत ओळख वेगळी हें चोज ॥ त्रिगुणी वेष्टूनि जग सहज ॥ भिन्न केले स्वभाव ॥१०॥
मुळीचें सूत्र पाहतां अवघें एक ॥ पुढें एकांत एक ना मिळे देख ॥ धन्य कर्त्या तुझें कौतुक ॥ चोज वाटे मानसी ॥११॥
विश्वकुटुंब एक ॥ तेथें कलह लाविला हें कौतुक ॥ सखेपणही राखिसी देख ॥ काय हुन्नेर सांगावे ॥१२॥
सख्या भावांची पंचाईत ॥ बापलेकांसी भांडण होत ॥ सासुसुनेसी भंडिमें होत ॥ किती फजिती सवतीची ॥१३॥
म्हातारपण मरण जवळ ॥ म्हणे संसार कैसा चालेल ॥ केवढी मायेची भूल ॥ भले हुनेरी तुम्ही एक ॥१४॥
काळ ओढी मृत्युकडे ॥ प्राणी दारापुत्रांत तडफडे ॥ बैसविलें मोहाचें बिरडें ॥ भले गारोडी तुम्ही एक ॥१५॥
शब्द अक्षरजात एक ॥ त्यांतच फेर केला एक ॥ एक अक्षरीं राग भडके ॥ एक अक्षर गोड कीं ॥१६॥
शिव्या देणें तेंही अक्षर ॥ आशीर्वाद देणें तेंही अक्षर ॥ एक कजियाचा करी घोर ॥ एक देईं संतोष ॥१७॥
रुसणें फुगणें हांसणें रडणें ॥ व्याही विहीणी सासु मेहुणे ॥ तुझें माझें मी तूंपण ॥ जुंपले जीव व्यवहारीं ॥१८॥
पापपुण्याचें कचाट ॥ बैसती चिंतेची लपेट ॥ त्यावर कामक्रोधांचा थाट ॥ ताणे जीव चहूंकडे ॥१९॥
एकाची लेंक लेक एकाचा ॥ संबंध जाहला नात्याच्या ॥ निमाल्या कोण कोणाचा ॥ रुदन शोक पदरीं पडे ॥२०॥
मेला तो निसुर गेला ॥ जित्याचा पदरीं शोक बांधिला ॥ मढें ना बोले मौनावला ॥ लोक रडतां राहेना ॥२१॥
लटक्या मारुनियां मेखा ॥ खरें दाविलें तुम्ही देखा ॥ सत्य वाटलें अज्ञान मूर्खा ॥ ज्ञानी उमजले ना फसती ॥२२॥
भोरपी सोंग घे संन्याशाचें ॥ शाहणे पायां न पडती त्याचे ॥ रुपये मिरविले हिणाचे ॥ परीक्षवंत ना ठकती ॥२३॥
रायविनोदाच्या विनोदाला ॥ नेणती खरा जाणता ना भुले त्याला ॥ अविदया कैफ जगाला ॥ साधु शुध्द सावध ॥२४॥
भली मौज केली देवराया ॥ हांसें येतें लागतों पायां ॥ जगासी लावूनियां मायां ॥ कौतुक तुम्ही पाहतसां ॥२५॥
आम्हीं तों पतितरासी ॥ पतितपावन विरुद तुम्हांसी ॥ मागें सरें उणेंपण त्यासी ॥ केला पण जतन करा ॥२६॥
जाणतां नेणतां घडेल दोष ॥ क्षमा करणें विरुद तुम्हांस ॥ शरण आलिया पायांस ॥ दया करणें उचित ॥२७॥
असो बोलण्याचा पैस ॥ पुढें परिसा ग्रंथास ॥ याप्रसंगीं दोन चरित्रांस ॥ सुकर्णी आकर्णा ॥२८॥
पाठपोट नाहीं परेशाला ॥ चंदन अंगीं सुगंध भरला ॥ साकरेच्या खडयाला ॥ टरफल नलगे सोलावें ॥२९॥
याचा हाचि अभिप्राय ॥ एक वस्तु इतर वाव ॥ ग्रंथविस्तार गौरव ॥ शोभेसाठीं मांडिला ॥३०॥
एक पालखींत जाय माणुस ॥ एक पुढें धांवे सेवेस ॥ गुणभेद चरित्रास ॥ केलें सूत्र कत्यानें ॥३१॥
गुर्जरां चुर्म्याचे आवडती लाडू ॥ राजहंसां मोतियांचा घडू ॥ संतांस परमार्थ गोडू ॥ प्रपंचीं आवडी अज्ञाना ॥३२॥
चंदनावर सर्पाची झेंप ॥ मुंग्या करिती साकरेची खांप ॥ आळसिया प्रिय फार झोंप ॥ वत्सा धेनू कास कीं ॥३३॥
मक्षिकेची मधावर चिकाटी ॥ भाविकां कीर्तनावर बैसे मिठी ॥ योगी लक्षिती स्वरुप दिठीं ॥ ज्ञानिया एक ब्रह्मची ॥३४॥
आतां असोत या युक्ती ॥ कथा परिसा भाविक चित्तीं ॥ रसिक संवाद परमार्थरीतीं ॥ ज्यांत संतोष सज्जनां ॥३५॥
आतां परिसा एक चरित्र ॥ कौतुक अर्थ सांगतों विचित्र ॥ आकर्णितां श्रोतयांचें श्रोत्र ॥ आनंदें अंतरीं हेलावती ॥३६॥
चंद्रसेन राजा विशाळकीर्ति ॥ त्याची कन्या लावण्य भानुमती ॥ सभाग्य सुरेख विचार सुमती ॥ पवित्र निर्मळ गुणाढय ॥३७॥
जो चतुर मजसी करी संवाद ॥ माझिया प्रश्नाचा सांगेल भेद ॥ निशा परतल्या स्वानंद ॥ माळ घालीन मग त्यासी ॥३९॥
परिसोन कन्येचें उत्तर ॥ पिता पाचारी राजकुमर ॥ जो येई त्यास सुंदर ॥ पुसे शतप्रश्नांसी ॥४०॥
त्याची कुंठित होय वाणी ॥ ना उगवे प्रश्नांची ठेवणी ॥ ते वर जाती परतोनी ॥ तटस्थ होउनी मानसीं ॥४१॥
यापरी दोनशत राजकुमरां ॥ परतविले मूर्ख जाणून त्वरां ॥ चिंता पातली माता-पितरां ॥ पुढें उपाव सुचेना ॥४२॥
मग धर्मसेन रायाचा कुमर ॥ परमबुध्द नामें महाचतुर ॥ तो पातला भानुमतीसमोर ॥ म्हणे काय वदसी सुमती ॥४३॥
कैसे तुझिया प्रश्नांचें उत्तर ॥ निंवेदीं मातें विस्तर ॥ शत प्रश्नांचा प्रकार ॥ दावीं मातें साक्षेपें ॥४४॥
पाहोनि त्याची हर्षदशा ॥ भानुमतीस आल्हाद वाटे बहुसा ॥ म्हणे पुरवीन मनाची आशा ॥ अंतर साक्ष देतसे ॥४५॥
सांवरोन बोले भानुमती ॥ ऐक परम बुध्दा चतुर रीतीं ॥ माझिया प्रश्नांची उकलल्या युक्ती ॥ तूतें पर्णीन सुजाणा ॥४६॥
सांग खातोस तें काय ॥ काय प्राशून संतोष होय ॥ पांघरुण पांघरतां तें काय ॥ भोगितोस काय तें वदे ॥४७॥
गम खातों गे मानसीं ॥ प्राशितों दुष्ट वासनेसी ॥ पांघुरतों आपुल्या संचितासी ॥ भोग भोगितों प्रारब्ध ॥४८॥
फिरतां कोणेस्थानीं ॥ बैसतां कोणत्या आसनीं ॥ निजतां कोणत्या शयनीं ॥ जागतां कोठें तें वदा ॥४९॥
मनांत फिरतों गे चतुरे ॥ बुध्दींत बैसतों साचार ॥ उन्मनींत निद्रा करितों निसुर ॥ जागतों स्मरणीं सत्य कीं ॥५०॥
कोठें जन्म घेतां सांगा ॥ मरतां कोणत्या जागा ॥ व्यवसाय करितां कोण गा ॥ नांदतां कोठें तें वदा ॥५१॥
जन्मतों भेदांत सुजाणे ॥ मरतों अभेदीं ओळख सुलक्षणे ॥ व्यवसाय करितों नित्य कीर्तन ॥ नांदतों सख्यभक्तींत ॥५२॥
घेतां तें तुम्हीं काय ॥ फिरोन देतां तेहीं काय ॥ अंगीकार करितां तें काय ॥ त्याग करितां कशाचा ॥५३॥
घेतों अद्वैत एक ॥ त्यागितों द्वैत देख ॥ अंगीकारितों सुमति सुरेख ॥ त्याग करितों कुमतीचा ॥५४॥
सोडितां तुम्हीं कासयाला ॥ धरितां पदार्थ कोणत्याला ॥ देहाचें स्थान कोण नेमिला ॥ जीवाचें वतन कोणतें ॥५५॥
सोडितों परनिंदा देहबुध्दीसी ॥ धरितों सद्भावें भावार्थासी ॥ देह तंव स्मशानभूमिकेसी ॥ जीवाचें वतन मुख्य ब्रह्म ॥५६॥
पाप कशास म्हणावें ॥ पुण्य काय तें मोजावें ॥ स्वधर्म कोणते नेमावे ॥ परधर्म कोणते ते वदा ॥५७॥
जीव नरकीं जाय तें पाप ॥ जीव मोक्षपदीं बैसवी पुण्याचें रुप ॥ मी ब्रह्म हा स्वधर्माचा दीप ॥ देहबुध्दीचें कर्म तो परधर्म ॥५८॥
सुख कशास म्हणावें सांग चतुरा ॥ दु:खाचें रुप कोण तें करा ॥ लाभ काय तो निर्धारा ॥ हानि कोणती मज सांगा ॥५९॥
ईश्वरप्राप्ति तेंचि एक सुख ॥ या विरहित करावें तेंचि दु:ख ॥ आयुष्य हाचि महालाभ देख ॥ मरणाएवढी हानि नाहीं ॥६०॥
धन म्हणावें कशियाला ॥ दरिद्री कोणता नेमिला ॥ समाधान बोलिजे कोणत्या अर्थाला ॥ असमाधान काय तें वदा ॥६१॥
धन म्हणिजे शुध्द ज्ञान ॥ दरिद्री ओळखावा ज्ञानहीन ॥ संतसंगचि समाधान ॥ असमाधान संतविमुखता ॥६२॥
स्नान म्हणा कशियाला ॥ अमंगळ ओळखिजे कोणाला ॥ शहाणा कोण तो नेमिला ॥ मूर्ख कोण तो सांगा ॥६३॥
स्नान तेंचि निर्मळ ॥ अमंगळ तोचि मनीं गढूळ ॥ शाहाणा तोचि साधी मोक्ष अढळ ॥ मूर्ख तोचि नरकीं फस ॥६४॥
भला कोणत ओळखावें ॥ बुरा कोणता जाणावें ॥ तपी कोण हें मानावें ॥ अतपी कोण हें बोला ॥६५॥
भला तोचि सर्वांसी जो मैत्री करी ॥ बुरा तोचि विश्वाचा वैरी ॥ तपी तोचि जो सत्य दृढ धरी ॥ अतपी लय लबाड ॥६६॥
मर्द कोण सांग गुणवंता ॥ नेमी गांठया तो कोणता ॥ पुण्यात्मा कोण लक्षितां ॥ पापी कोण तो वदा ॥६७॥
मर्द तोचि इंद्रियजित ॥ गांठया इंद्रियभ्रष्ट होत ॥ पुण्यात्मा कल्पनेरहित ॥ पापी तोचि विकल्पी सदा ॥६८॥
बोधाची दशा कोणती ॥ अबोध कोणास वदती ॥ धर्म कोण महामती ॥ अधर्मी कोण तें वदा ॥६९॥
बोध म्हणिजे समान वर्तणें ॥ अबोध तोचि विषम पाहाणें ॥ सर्वांभूतीं दयाधर्म जाणणें ॥ निर्दयी निष्ठुर अधर्मी ॥७०॥
संन्यासी कोण तो सांगा खरा ॥ संसारी कोण तो वदा चतुरा ॥ उदार कोण पुरुष बरा ॥ संत कोण हें वदा ॥७१॥
ज्याची कल्पना उडाली तो संन्यासी ॥ मोहपाशांत फसे तो संसाराची दासी ॥ माझें कांहीं न म्हणे उदार बोलिजे त्यासी ॥ सम ब्रह्म पाहणें तो संत  ॥७२॥
लई फजीतखोर कोणता ॥ ईजतवान कोण लक्षितां ॥ धन्य कोण संसारीं पाहतां ॥ कष्टी कोणता पुरुष जी ॥७३॥
फजितखोर लई रिणकरी लागली मागें ॥ ईजतवान तो कोणाचें न लागे ॥ धन्य तोचि कीर्ति वर्णिजें जगें ॥ चिंता फार तो कष्टी ॥७४॥
कोणत्या गांवाहून आला ॥ पुढें जातां कोणत्या गांवाला ॥ देहाची जात कोणती बोला ॥ जीवाची जात कोणती ॥७५॥
आलों जन्मल्या गांवाहून ॥ मरणगांवास पुढें पेणें ॥ देहाची जात पंचभूतें निरखणें ॥ जीवाची जात आत्माराम ॥७६॥
आंधळे म्हणों कोणास ॥ डोळस कोणता पुरुष ॥ खराब ओळखावे कैसे ॥ पवित्र कोण ते वदा जी ॥७७॥
ज्यासि आपुली गति न दिसे तोचि अंध ॥ जगचि ब्रह्म दिसे तोचि डोळस शुध्द ॥ पदद्वारीं खराब बहु द्वंद्व ॥ पवित्र तो एक पत्नी ॥७८॥
अध्याविद म्हणावें कवणास ॥ सर्वांस मान्य कवण पुरुष ॥ बध्द तो कैसी जी असे ॥ मुक्त कोण तो सांगावें ॥७९॥
द्वैत गेलें ज्याचें तोचि अध्यात्मिक ॥ निगर्वी नम्र तो सर्वांस मान्य देख ॥ सम विषम पाहे तोचि बध्दक ॥ जग मुक्त देखे तोचि मुक्त ॥८०॥
गुरुमार्गी कोण तत्वतां ॥ निगुरा पुरुष कोणता ॥ दुष्टसंग कोण पाहतां ॥ चांगला संग तो कवण ॥८१॥
कोणाचा द्वेष न करी तो गुरुमार्गी ॥ सर्वांसी द्वेषी तो निगुरा जगीं ॥ काम क्रोध मद मत्सर हे दुष्ट संगीं ॥ विवेक अनुभव विचार संग चांगला ॥८२॥
संतपण अंगीं कशानें येईल ॥ देव दया केव्हां करील ॥ चांगले साधन कोण फळेल ॥ शांति कोणती मज सांगा ॥८३॥
समतापदवी आल्यानें संतपण ॥ देव दया करील रात्रंदिवस भजल्यानें ॥ चित्तांत विसरुं नये हरि हें उत्तम साधन ॥ हर्षशोक जाय ती शांती ॥८४॥
धैर्यवंत तो कवण जाणावा ॥ आनंदमय कवण ओळखावा ॥ संसार कोणाचा दिसे बरवा ॥ ओंगळ संसार तो कोणता ॥८५॥
धडक्यांत संसाराच्या डगमगेना मन ॥ तोचि धैर्यवंत पुरुष जाण ॥ चिंता नाहीं स्वस्थचि मन ॥ तोचि आनंदमय ओळखावा ॥८६॥
बाईल कर्कशा पुत्र दांडगा ॥ तोचि संसार ओंगळ पाहें गा ॥ दारापुत्र चित्ता जोगा ॥ चांगला संसार तोचि कीं ॥८७॥
ओंगळ मरण तें कोणतें ॥ चांगलें मरण तें कोणतें ॥ वेदशास्त्रांचें मूळ तें कोणतें ॥ दया निवडोन सुजाणा ॥८८॥
दारापुत्र आठवितां तडफडोनि मरणें ॥ तें ओंगळ घे ओळखोन ॥ नामस्मरणीं ठेवी प्राण ॥ उत्तम मरण तें ऐक ॥८९॥
वेदशास्त्रांचें मूळ अक्षर ॥ अक्षरांचें मूळ कोण निर्धार ॥ अक्षराचें मूळ ओंकार ॥ ओंकाराचें मूळ वदा कोणतें ॥९०॥
ओंकाराचें मूळ उल्लेख ॥ उल्लेखाचें मूळ सांगा हरिख ॥ उल्लेखाचें मूळ ओळखे चतुरांचे नायके ॥ मुख्य ब्रह्म तेंचि कीं ॥९१॥
प्रपंचाचें मूळ तें कोण ॥ पंचभूतें घे ओळखोन ॥ पंचभूतांचें मूळ कोठें ओळखणें ॥ त्याचें मूळ माया जाण कीं ॥९२॥
मायेचें मूळ तें ब्रह्म ॥ हें योगियांचे निजवर्म ॥ वायू आकाश दोन नाम ॥ या रीतीं लक्षिणें चतुरे ॥९३॥
भुलला कोण पहावा ॥ सावधान कोण जाणावा ॥ आपुला आत्मा कैसा ओळखावा ॥ ती खुणा सांगा कोणती ॥९४॥
ज्याला आपुली शुध्दि नाहीं ॥ तोचि भुलला पहा देहीं ॥ आपुला आम्हीं ओळखिला पाहीं ॥ तोचि सावधान ओळखिजे ॥९५॥
मना मूळ कोण वदा ना ॥ कल्पना हेचि जाणा खुणा ॥ कल्पनेस मूळ कोणतें वदा ना ॥ अंत:करण जाणिजे ॥९६॥
अंत:करणाचें मूळ कोण ॥ पहा विष्णु दक्ष होऊन ॥ विष्णूचा मूळ ठिकाण कोण ॥ उल्लेख तोचि ब्रह्मींचा ॥९७॥
हृदय कशास म्हणावें ॥ आपुला उल्लेख जाणावें ॥ जीवास कैसें ओळखावें ॥ आपुली जाणीव जी कळा ॥९८॥
प्रश्नीं जाहलें समाधान ॥ मग घाली साष्टांग लोटांगण ॥ म्हणे संशयरहित केलें मन ॥ जाहला आनंद सुखसिंधू ॥९९॥
बरवा भेटलासि चतुरराया ॥ निर्भय केलें जन्मा आलिया ॥ आतां शरण आलें तुझिया पायां ॥ निजपति तूं मोक्षदानी ॥१००॥
मग विवेक अनुभवें केलें लग्न ॥ परबुध्द वरिला भानुमतीन ॥ आपुलें केलें कल्याण ॥ उभयतां जोडा नेटका ॥१॥
हें अनुभव रसिकचरित्र ॥ श्रोतयां वदलों परमपवित्र ॥ सिध्दांतबोध पात्र ॥ त्यांत ठेविलें सांठवून ॥२॥
इतुकें ज्ञान व्हावयाचें कारण ॥ श्रीगुरुची कृपा परिपूर्ण ॥ म्हणोनि द्रवलीं शब्दरत्नें ॥ उल्लेख सागराआंतूनी ॥३॥
सकळ साधनांचें सार ॥ नाम कंठीं सुधारसधार ॥ तेणें विवेकमार्गावर ॥ मति माझी विस्तारली ॥४॥
टिळा लाविला वेसीला ॥ आमंत्रण जाहलें ग्रामवस्तीला ॥ तेवीं नाम बैसलें वदनाला ॥ सर्वसाधनें त्यांतची ॥५॥
अनंत लहरी एक सागर ॥ कोटिसाधनीं नाम सादर ॥ बहु शाखा पत्रीं एक बीजांकुर ॥ तेवीं नाम आम्हांसी ॥६॥
नामेंचि तरलें कोटयानुकोटी ॥ नामें पाप ना पडे दृष्टीं ॥ हीन याती गेले वैकुंठीं ॥ ध्वजा ज्यांच्या मिरवल्या ॥७॥
देहबुध्दि ना कर्म अभिमान ॥ संतास नामाचें भूषण ॥ तेंचि हृदयीं दृढ धरुन ॥ शहा निवांत राहिला ॥८॥
एक तुळसीपत्रापुढें ॥ तुच्छ नगांचे पर्वत गाढे ॥ तेवीं नाम मुखीं गडगडे ॥ इतर साधनें कसपट ॥९॥
एक देव मणी पुढें जेर बाहत्तरखोडी ॥ तेवी नामापासी इतर साधनांची परवडी ॥ ही संतीं उभविली गुढी ॥ साक्ष गीता भागवत ॥११०॥
रोगिया मिळे अमृतसंजीवनी ॥ कोटि औषधें सांडी ओवाळुनी ॥ तैसें नाम ज्याचें वदनीं ॥ तो इतरसाधनीं फसेना ॥११॥
प्रल्हादापासी भांडवल नाम ॥ बाधूं ना शकती विघ्नांचे कडे दुर्गम ॥ ध्रुव रंगला नामप्रेमें ॥ अढळपदीं बैसविला ॥१२॥
बिभीषण काय कष्टला अनुष्ठानीं ॥ रामीं शरण नाम वदनीं ॥ चिरंजीव केला अभय देऊनी ॥ वैभव दीधलें लंकेचें ॥१३॥
नामें गणिका बैसविली विमानीं ॥ अजामिळ उध्दरिला दुष्ट प्राणी ॥ हनुमंत बलाढय त्रिभुवनीं ॥ नाम वदनीं भांडवल ॥१४॥
ज्या नारदाचा त्रिभुवनी डंका ॥ त्यापासी भांडवल नामचि देखा ॥ द्रौपदी नामेंचि पाचारी यदुनायकां ॥ धांवे हरि संकटीं ॥१५॥
कश्यपें गरुडास नाम उपदेशिलें ॥ बळ अद्भुत आलें ॥ देवांस जिंकोन अमृत आणिलें ॥ माता मुक्त केली दास्यातून ॥१६॥
ऐसा नामाचा महिमा अगाध ॥ विश्वास नये मनुष्य अंध ॥ संत गर्जती महाबोध ॥ अद्भुत महिमा नामाचा ॥१७॥
विश्वास धरतां नामापासीं ॥ ऋध्दिसिध्दी होती दासी ॥ देव नांदे आपणांपासीं ॥ शोध करणें मग नलगे ॥१८॥
होतों पतित अपराधी ॥ नामें बैसलों स्वानंदपदीं ॥ गेली जन्ममरणांची व्याधी ॥ जाहलों सुखी संतसंगें ॥१९॥
नामींच बोध शहाचा ॥ कळस केला सिध्दांतबोधाचा ॥ अनुभवरस ओतिला साचा ॥ जाणती परीक्षा संत कीं ॥१२०॥
भाग्याचा उदय जाहला पाहाहो ॥ हृदयीं भरला ज्ञानडोहो ॥ शहा घेतो सुखाचा लाहो ॥ यास म्हणणें गुरुकृपा ॥२१॥
गुरुकृपेचें हेंचि लक्षण ॥ समता बोध ठसे पूर्ण ॥ कल्पना जाय द्वैत घेऊन ॥ शहा संतोषे अक्षयी ॥२२॥
यापरी एक मौज ॥ परिसा रसिक अनुभव चोज ॥ ज्या बोलण्यांत चातुर्यकाज ॥ तें गुज लिहितों परिसावें ॥२३॥
पवित्र गंगेचिया तटीं ॥ तीर्थशिरोमणी पंचवटी ॥ त्यांतही सुंदर रम्य पर्णकुटी ॥ सीता गोरटी ज्यामाजी ॥२४॥
पाहोनि श्रीराममूर्ती ॥ अष्टांगे नमीं सीता सती ॥ सद्भावें मस्तक ठेवी चरणावरुती ॥ नम्र बोले मंजुळ ॥२५॥
लक्षून श्रीरामाची आनंदमय मर्जी ॥ कर जोडोनी करी अर्जी ॥ प्रश्नयुक्ती बरव्या सुजी ॥ ज्यांत संतोषे श्रीराम ॥२६॥
स्वामी बहुतां जन्मांचे शेवटीं ॥ मनुष्य महालाभ पडे गांठीं ॥ त्यांतही राज्यभोग संतुष्टी ॥ किती दैव वर्णावें ॥२७॥
त्या राज्यसुखाचा केला त्याग ॥ काय प्रिय जाहला भणंग जोग ॥ मग भोगावया सुखाचा रंग ॥ कोणता जन्म सांगाची ॥२८॥
मनुष्यपण दरिद्रपण ॥ हेंचि पाप महादारुण ॥ क्लेशप्रवाहीं जाय शोकोन ॥ पर्वत श्रेष्ठ दु:खाचे ॥२९॥
दरिद्रपण येतें जयासी ॥ त्यासि बाईल मिळे कर्कशी ॥ रागे चौताळे लांस जैसी ॥ पोरें तींही दांडगीं ॥१३०॥
दरिद्रियास कैंचें ॥ भक्षास खळवट पान भाजीचें ॥ पांघरावया हाल वस्त्राचे ॥ मलिन सदा शौच कधीं नसे ॥३१॥
नाघडी तीर्थ व्रत तप दान ॥ देव कैंचा परमार्थहीन ॥ सदा जिण्याची भणभण ॥ ऋण करी पीडा रोगाची ॥३२॥
दरिद्रियास सोयरिकांचा उबग ॥ चिंताक्रांत सदा उद्वेग ॥ घरीं कलह जिण्याची ढगढग ॥ मलीन अंग सुकाळ उवालिखांचा ॥३३॥
घरांत ढेंकुण पिसा उंदिर घुशी ॥ खाजवी टिरी डोईअंग मोडे जांभईसी ॥ उदीम कैंचा झोपी आळसी ॥ पापसंग्रही पुण्य कैचें ॥३४॥
मनुष्यजन्मीं दरिद्र भोगणें ॥ त्यापरीस बरें जी मरणें ॥ सौख्य भोगावया पाहिजे अपार पुण्य ॥ निवे तनु मन जीव संतोषी ॥३५॥
आधींच नरदेह दुर्लभ ॥ त्यांत प्राप्त राजपदीचा आरंभ ॥ ऐसिया सुखाचा महालाभ ॥ कैसा तुम्हीं त्यागिला ॥३६॥
सांडोन जरीचे पोशाख फेटे ॥ अंगीं विभूतीचे लावितां पट्टे ॥ बैसतां सभा कैसी घनवटे ॥ आतां एकटे योगी जैसे ॥३७॥
मस्तकीं छत्र चामरें डोलती ॥ आतां द्रुमच्छाया यांचीच शोभा देती ॥ शिरीं मोत्यांचे घोस लोंबती ॥ भल्या शोभती मोठया जटा ॥३८॥
कोटयावधी रुपये उडती टका ॥ आतां पदरीं ना मिळे आडका ॥ राज्यभार सांडिला तटिका ॥ एकटे वनीं बैसलां ॥३९॥
त्यागिले परी न्याहाल्या पलंग तिवासिया ॥ प्रिय जाहली तृणसेज निद्रा करावया ॥ अमूल्य वस्त्रें घरीं ठेऊनियां ॥ मृगचर्म आवडलें ॥१४०॥
मी तों तुमच्या अक्षयीं संगीं ॥ निवालें पूर्ण अष्टांगीं ॥ परंतु तुमची दशा पाहोनि उद्वेगी ॥ जीव माझा होतसे ॥४१॥
तुमचे स्वामी सुकुमार चरण ॥ लोणी चोळतांना साहती जाण ॥ मार्गीं चालतां पावती शीण ॥ खडे सराटे रुपती ॥४२॥
सांडोनि मिष्टान्न परवडी ॥ आवडली द्रुमफळांची गोडी ॥ परवानगीस चोपदारांचे थाट देवडीं ॥ आतां चारी दिशा मोकळ्या ॥४३॥
परिसोनि जानकीची शब्दरत्नें ॥ बोले श्रीराम उद्गार वचनें ॥ म्हणे बरवें वदसी मृगनयने ॥ घेई उत्तर उडवीं संशयासी ॥४४॥
राज्यभोग अवघा सोंग ॥ जैसें भोरपियाचें ढोंग ॥ किंवा पतंगाचा रंग ॥ उडोनि जातो तगेना ॥४५॥
काय स्वप्नींचा विस्तार ॥ दिसे नाना प्रकार ॥ जागृति दशा पातल्यावर ॥ शून्य होय सर्वही ॥४६॥
राज्यपदीं बैसलिया हरुष ॥ मृत्यु म्हणे चला मसणखाईस ॥ महाल दौलत राहिली ठिकाण्यास ॥ संगें नये कडदोरा ॥४७॥
सूर्यवंशीं राजे चक्रवर्ती ॥ त्यांच्या उठोन गेल्या पंक्ती ॥ काळसिंहाचे चपेट धातीं ॥ आकार गज तगेना ॥४८॥
आमुच्या वंशींचे महापूर्वज ॥ गेले किती करिसी चोज ॥ आमुची कसी पाहा मौज ॥ जाऊं या लोकांतूनी ॥४९॥
सर्प धरी दर्दुरीसी ॥ दर्दुरी कवळी मक्षिकेसी ॥ काळ फांसे घाली जगासी ॥ जग कवटाळी संसारा ॥१५०॥
मृत्यु उरला दोन मास ॥ घर बांधावयाचे करी सायास ॥ ना लक्षी आपुल्या निज गतीस ॥ जग अंध जाण पां ॥५१॥
हें समज बरव्यापरी ॥ जाणें आम्हां वैकुंठनगरीं ॥ वाटसरुं धर्मशाळेंत उतरल्यावरी ॥ सारवणचिंता कशाला ॥५२॥
राज्य वन दोन्हीं सारिखें ॥ कर्मूं न जाणे समज सखे ॥ विश्वकुटुंब अवघें पारिखें ॥ आप्त हो नसती एकही ॥५३॥
शरीरासाठीं जोडा राज्यलोभ ॥ त्या देहाचा होईल क्षयाचा आरंभ ॥ अवघा श्रमाचा होय लाभ ॥ नसतां डंभ वाउगा ॥५४॥
गेले पुण्यश्लोक लोकांचे थाट ॥ सांगावया उरले बोभाट ॥ पहा पातकियांचे लोट ॥ गेले संख्या कोण करी ॥५५॥
हा क्षणभंगुर संसार देखा ॥ रायविनोदाच्या सोंगाचा लेखा ॥ किंवा गारुडयाच्या खेळाच्या कौतुका ॥ सत्य काय मानावें ॥५६॥
ठग बैसती वाटेस संन्यासी होऊनी ॥ भासे मृगजळीचें विशाळ पाणी ॥ गंधर्वनगरीची उभारणी ॥ काय कोट तो खरा ॥५७॥
जन्मल्याचा हर्ष भारी ॥ निमाल्या शंखाचा गजर करी ॥ संसारसोंग बाजेगिरी ॥ लटके लोक वरपंगा ॥५८॥
काय मायेचे कौतुक ॥ एकास एक लपटे देख ॥ शोकमोहाचे उठती भडके ॥ बैसती कडके दु:खाचे ॥५९॥
द्रव्यें होती परम कष्टी ॥ निर्द्रव्यें सहजचि हिंपुटीं ॥ पोर होईना तो कपाळ पिटी ॥ लई पोरें तो ताणला ॥१६०॥
एक सुखी एक दु:खी ॥ ऐसी संसाराची रीत कीं ॥ डोईवर फिरे काळाची कडकी ॥ बसे धडकी मृत्युची ॥६१॥
जडभरत पुरुरवा ययातींनीं ॥ राज्यभार टाकोनि बैसले वनीं ॥ निघाले संसारातूनी ॥ जाहले पवित्र त्रिशुध्द कीं ॥६२॥
राज्य देऊनि ऋषीलागोनी ॥ वनवास भोगिला हरिश्चंद्रानी ॥ पवित्र राजपुत्र गुणी ॥ कीर्तिघोष गाजविला ॥६३॥
सांडी राज्यवासना फुटकें मडकें ॥ आपुली निजगति कोण ती हुडके ॥ फेडी देहबुध्दीचें फडकें ॥ लेईं धडके ज्ञानकळा ॥६४॥
जानकी होई तूं सावध ॥ सांगतों विवेक अनुभव शुध्द ॥ ज्या सुखीं अक्षयीं परमानंद ॥ नसे द्वंद्व बाधेचा ॥६५॥
धरीं धैर्य सुमति शांति ॥ लक्षीं सबाह्य प्रकाश ज्योती ॥ तुझी तूंचि चैतन्यशक्ती ॥ भ्रमचक्रीं भ्रमूं नको ॥६६॥
तूंचि मूळमायेचें मूळ ॥ ब्रह्म सागरींचा कल्लोळ ॥ विश्व विस्तारले सकळ ॥ तुझिया अंगीचा पसारा ॥६७॥
वृक्ष बिजाचिये पोटीं ॥ बीज वृक्षाचिये शेवटीं ॥ वस्त्राचे विस्तार कोटी ॥ त्यांत सूतची मिरवलें ॥६८॥
बध्द मुक्त दोन्ही भावना ॥ ह्या उपासकांच्या कल्पना ॥ अवघा आत्मा एकचि जाणा ॥ भला बुरा मग कोण ॥६९॥
सर्वांचा एकचि प्राण ॥ अनेक देखणें सारिखेंचि जाण ॥ रसनेंत रुचि एकचि बिंबोन ॥ तृषा क्षुधा सारिखी ॥१७०॥
अवघीं पंचभूतांचीं शरीरें ॥ त्रिगुणीं गुंफिले जीव समग्र ॥ भिन्न यातीचा प्रकार ॥ वर्तावया कौतुक दाविलें ॥७१॥
पापपुण्यांचा केला गोंवा ॥ जैसा सवतीचा लटिका हेवा ॥ स्वप्नींच्या कलागतीचा दावा ॥ काय पंचाईत निवडावी ॥७२॥
दर्पणीं काय दुजें असे ॥ पाहाणारा तोचि आंत भासे ॥ बागुलभयें बाळ भीतसें ॥ काय शस्त्रें सजावीं ॥७३॥
अवघा काल्पनिक व्यवहार ॥ समज उमज बरा चतुरे ॥ देव नदी देऊळ भवंता आवार ॥ नाम भिन्न जात एक ॥७४॥
गंगा यमुना भीमा कृष्णा ॥ नामें भिन्न जळ एक जाणा ॥ अनंत जीवांच्या कल्पना ॥ एक बिंबे रवी कीं ॥७५॥
अनंत धारा एक पाणी ॥ बहु अंकुर एक मेदिनी ॥ जन्ममरण प्रारब्धाची ठेवणी ॥ निद्रेची मोहनी सारिखी ॥७६॥
विश्वपटाचा तंतू एक ॥ भिन्न भेद नसे देख ॥ सहस्त्रमुखें शेष एक ॥ बहु तरंग सिंधु उदरीं ॥७७॥
पुरुष शेला वनिता काय लुगडीं ॥ एक्यासुतीं मौजेची फुगडी ॥ पोरें खेळतां काबडा काबडीं ॥ नीर स्वभावें एकचि ॥७८॥
नदी नद काय पुरुष कामिनी ॥ पाहतां दोहींत एकचि पाणी ॥ सूर्य प्रकाश सहस्त्र किरणीं ॥ बिंब विलसे एकचि ॥७९॥
रोम फार शरीर एक ॥ तेवीं अनंतघटीं जगन्नायक ॥ हा समज बरा विवेक ॥ वमी कल्पना मनाची ॥८०॥
पंच ज्ञानेंद्रियें ॥ पंच कर्मेंद्रियें होय ॥ यांचा चाळक एकचि आहे ॥ अंत:करणपंचकाची वेगळी सोय ॥ मूळ विचार एकची ॥८१॥
दशविध वायु भरला देहीं ॥ पिंडब्रह्मांड एकचि पाहीं ॥ आणि सप्तस्कंधांचे ठायीं ॥ विराजे आपणची ॥८२॥
चार देह नेमिले देख ॥ आंत सोंगाडया जीव एक ॥ चारी अवस्था प्रेरक ॥ दुजा कोणी असेना ॥८३॥
देऊळ बांधोनी देव स्थापिले ॥ अवघे आंत पाषाणचि बैसले ॥ बहिरोबा हनुमंत नांव ठेविलें ॥ जात मात्र एकची ॥८४॥
आतां विस्तार सांगावा कोंठवरी ॥ अवघा एकचि समज चतुरी ॥ माझिया कृपेची अगाध लहरी ॥ तुझिया हृदयीं सांठविली ॥ ॥८५॥
उत्पत्ति स्थिती संहार ॥ हा तुझिये अंगींचा प्रकार ॥ बुडबुडा उठे बैसे जळावर ॥ किंवा कनकीं नग हातीं ॥८६॥
कापुसाचा पुत्र दोरा असे ॥ दोर्‍याचा पुत्र शेला दिसे ॥ पुत्र नातु आजा ऐसे ॥ तिहीं नातीं कापुस कीं ॥८७॥
त्वंपद तत्पद असिपदावर ॥ तूंचि नांदसी सुंदर ॥ सद्चिदआनंदप्रकार ॥ हा विलास तुझा कीं ॥८८॥
मीं ब्रह्म स्फुरे उल्लेख होती ॥ प्रकृतिपुरुष त्यांस म्हणती ॥ तुर्या ज्ञानकळा प्रकाशदीप्ती ॥ यांत मिरवणुक तूंचि कीं ॥८९॥
अद्वयबोध सुरस ॥ तूतें निवेदिला राजसे ॥ अभेदबोधीं करीं रहिवास ॥ देई प्रायश्चित्त भेदासी ॥१९०॥
भेद म्हणिजे काल्पनिक खांब ॥ अभेद काष्ठ पहा स्वयंभ ॥ सांडी तूंपणाचा डंभ ॥ एक आत्मा तूंचि विराजसी ॥९१॥
स्त्री पुरुष कल्पनारुप ॥ तूंचि आत्माराम स्वरुप ॥ प्रगटीं हृदयीं ज्ञानदीप ॥ निरसीं भेद तमासी ॥९२॥
मी राम तूं जानकी ॥ हाही एकचि स्वरुप पारखी ॥ स्वयंबोधें होय गा सुखी ॥ नसे पारखी तुज कोणी ॥९३॥
तुझिया दाविलें हृदयीं उल्लेख उठे स्फुरण ॥ त्यांतच जाणीव कळा मिरवे जाण ॥ तूज तेंचि तूं घेईं भूषण ॥ रमे स्वानंदीं अक्षयीं ॥९४॥
हाचि शिवादिकांचा योग ॥ पार्वतीला सांगितला यथासांग ॥ तोचि निवेदिला तूज यथासांग ॥ भाग्याची तूं चांगली ॥९५॥
या बोधें जानकी निमग्न ॥ निवाली अष्टही भावें पूर्ण ॥ मग घाली साष्टांग लोटांगण ॥ धन्य म्हणे मी एक ॥९६॥
निवालें तरलें तव पायां ॥ गेलीं अविदया मोह माया ॥ कल्याण केलें रामराया ॥ जाहलें सार्थक जन्माचें ॥९७॥
राम म्हणे जानकी सावधान ॥ तूतें बिंबलें ब्रह्मज्ञान ॥ आतां सोंगसंपादणी लक्षण ॥ तेंही तूतें सांगतो ॥९८॥
प्रपंच अवघा पंचभूतांचा ॥ त्याचा पिंड रचिला साचा ॥ खटला पंचप्रकारांचा ॥ सहज ताणलें जीवासी ॥९९॥
अंत:करणीं उठे कल्पना घोर ॥ मग भ्रमांत गरगरां फिर ॥ बुध्दींत भरती ना विचार ॥ चित्त फाटे अहंकार नाचवी ॥२००॥
पंचप्राणाचे फाटती फरगडे ॥ पंच कर्मेंद्रियांची पडे वोड ॥ पंचज्ञानेंद्रियांची गडबड ॥ उठे अनिवार अफाट ॥१॥
ऐकावया ओढिती श्रवण ॥ पहावया ताणिती नयन ॥ सुगंधावर घ्राण करी धांवण ॥ रसना नाचे रुचीला ॥२॥
त्वचा इच्छी मऊपणासी ॥ क्षुधा भडके भक्षावयाची ॥ तृषा धांवे पाण्यापासी ॥ वासनेची उडी अनिवार ॥३॥
काम क्रोध मद मत्सर ॥ यांचा डंभ अनिवार ॥ रचलें प्रपंचाचें शरीर ॥ कैसा त्यास होईल ॥४॥
त्याच्या त्यागाची एकचि परी ॥ देहातीत ज्ञान भरे अंतरीं ॥ मी साक्ष देहामाझारी ॥ मज संबंध नसे देहाचा ॥५॥
प्रपंचाचें शरीर ॥ शरीराचे धर्मानें चालावें साचार ॥ यास्तव घेतला अवतार ॥ पुढें कार्य लक्षूनी ॥६॥
प्रपंच म्हणावें शरीराला ॥ संसार बोलिजे उदयोगवृत्तीला ॥ दोहीं ठायीं जीव ताणला ॥ सुटका होणें कठिणचि ॥७॥
जाहले ज्ञानाचे सागर ॥ त्यासही देहसंबंध हिसके फार ॥ सुखदु:खांचा माजवी घोर ॥ नसती उपाधि आदळे ॥८॥
पुण्य करितां हरिश्चंद्राला ॥ महादु:खसागरीं लोटला ॥ चिंताज्वरें दशरथ पातला ॥ दिला प्राण सोडोनी ॥९॥
जितुके देहवंत नर ॥ त्यांस लपटे शोकसागर ॥ फिरती चिंतेचें चक्र ॥ विश्रांति घेऊं देईना ॥२१०॥
राज्य तैसा वनवास ॥ क्रमूं न जाणे आपुल्या पदास ॥ कोण करी संसारसोस ॥ फुसका कळल्या मग ॥११॥
आम्ही मनुष्य मूर्ख न हो जाण ॥ तुवां असावें सावधान ॥ अवतार घेतला ज्या लागोन ॥ त्याचें सूत्र तुज सांगों ॥१२॥
राक्षसवंशीं रावण ॥ तपोबळें उन्मत्त होवोन ॥ बंदीं घातलें सुरांलागोन ॥ आकांत घेतजा ज्या सृष्टीचा ॥१३॥
त्याचा परिहार करावया ॥ जाणे लंकेचिया ठायां ॥ यालागीं राज्य त्यजूनियां ॥ आलों वना जाण पां ॥१४॥
तूतें दुराचारी दुर्जन ॥ चोरोनि लंकेसि नेईल जाण ॥ क्लेश घडती तुजलागून ॥ धैर्यबळें लोटिजे ॥१५॥
षण्मास राक्षसाचें घरीं ॥ वस्ती होईल राजकुमरी ॥ मी येईन भवगजकेसरी ॥ कपिसेना घेऊनी ॥१६॥
मारोन रावण कुंभकर्ण ॥ राज्यीं स्थापिन बिभीषण ॥ देव सोडवून बंदींतून ॥ मग तूतें भेटेन राजसे ॥१७॥
उभयतां मिळोनि अयोध्येसी ॥ येऊं आनंदमय सुखसंतोषीं ॥ भेटूं भरता कौसल्येसी ॥ बैसूं राज्यसुखासनीं ॥१८॥
यापरी श्रीरामचंद्रानें ॥ उपदेशिली जानकी सुढाळरत्न ॥ उभयतां संवाद ऐकोन ॥ लक्ष्मणही निवाला ॥१९॥
हा आनंदरस कल्लोळ ॥ श्रोतियां निवेदिला प्रांजळ ॥ ज्यांत अनुभवचातुर्य सबळ ॥ तें चरित्र वाखाणिलें ॥२२०॥
हें नव्हे मायिक बोलणें ॥ अनुभव कथिला गुरुकृपेनें ॥ परिक्षवंतास होतीं भूषणें ॥ शोभतील अलंकार वृत्तीसी ॥२१॥
एक एक प्रसंगाआंत ॥ अनुभवरस ओतिला अद्भुत ॥ परिसोन प्रेमळ भक्त ॥ मस्तक डोलवी स्वानंदें ॥२२॥
ज्याचे हातीं परीस ॥ जडीबुटीचे नलगेत सायास ॥ बैसत कामधेनूचे कासेस ॥ क्षुधेची चिंता कोण करी न ॥२३॥
चिंतामणि आलिया हातां ॥ आणून देई चिंतिल्या पदार्था ॥ तैसा श्रीगुरु अनुकूल असतां ॥ इच्छिला पदार्थ देई मतीला ॥२४॥
चाले मति विशाळ तर्क ॥ हें भजनबळाचें कौतुक ॥ भाग्याची उघडली सुरेख ॥ दैवदशा उदेली ॥२५॥
अहो श्रोते सज्जन ॥ समग्र ग्रंथाचें करा शोधन ॥ अर्थ मतीस आल्या भरोन ॥ संतोष पावेल जीव आत्मा ॥२६॥
गंगेस मीनल्या सागर ॥ खळबळ वाहणें जाहलें स्थीर ॥ मजलीस पोहोचल्यावर ॥ गति खुंटली गमनाची ॥२७॥
केळीची फणी वर आलिया ॥ वाढी खुंटे राहे लावोनियां ॥ तेवीं ब्रह्मानंद प्राप्त जाहलिया ॥ वृत्ति निवांत सहजचि ॥२८॥
निद्रेमाजी इंद्रियें निवांत ॥ तैसा प्राप्तीं पुरुष होय शांत ॥ ऐसीं वरुषें पातल्या यशांत ॥ जिरे कामवासना ॥२९॥
रिता कुंभ जळें भरला ॥ तो बादयाचा न करी गलबला ॥ तैसे अनुभवी पुरुष निवाला ॥ तो वितंडवाद करीना ॥२३०॥
ज्याचें अंगीं श्रीमंतपण ॥ तो काय पादरक्षा घेईल कांखेस मारुन ॥ तैसे सभाग्य भाविक सज्जन ॥ निंदा कुटिलता ना शिवती ॥३१॥
हेंचि परमार्थाचें साधन ॥ कोणाचें दुखवूं नये अंत:करण ॥ सर्वांभूतीं नारायण ॥ वंदावें हा लाभ कीं ॥३२॥
आमुच्या सुकृताचा ठेवा ॥ पांडुरंग दैवत लाधला बरवा ॥ आनंद जाहला असे जीवा ॥ निवालों पायीं संतांचें ॥३३॥
हीच शहामुनीची जोडी ॥ उभविली स्वानंदाची गुढी ॥ गेली जन्माची परवडी ॥ ब्रह्मानंदीं निमग्न ॥३४॥
आतां भेदोनि त्रिपुटी ॥ दीप उजळिला घटीं ॥ बैसलों ज्ञानाचिया मठीं ॥ संशयतम निरसिलें ॥३५॥
नाहीं जाहलों भगली गोसावी ॥ ईश्वरनिष्ठा धरिली जीवीं ॥ पावलों भजनप्रताप पदवी ॥ विवेक अनुभवीं निमग्न ॥३६॥
मति भरली ब्रह्मरसांत ॥ भक्तिसुखांत जाहलों रत ॥ शिरां केली प्यादमात ॥ जिंकिला डाव मोक्षाचा ॥३७॥
आशलोभीं मारिली लात ॥ निराश जाहलों भगवद्भक्त ॥ क्षमा शांतीं बैसलों स्वस्थ ॥ उद्वेगरहित मी जाहलों ॥३८॥
बाणली विरक्ति मानसीं ॥ गेल्या शोकमोहांच्या राशी ॥ भांडवल जोडिलें संतसंगासी ॥ केली निजानंदीं मिरास ॥ अक्षय वतनी मी जाहलों ॥३९॥
सांभाळिलें आपुलें वतन ॥ गैरवतन्यास हांसतों जाण ॥ कां फिरतां चौर्‍यांशीं ठिकाण ॥ मुळींचें वतन सांभाळा ॥२४०॥
वतनदार तो होईल सुखी ॥ गैरवतन्या पावेल दु:खी ॥ हीं आमुचीं वचनें सत्य कीं ॥ जाणती पारखी गुरुभक्त ॥४१॥
जीवांचें जन्म ब्रह्मापासूनी ॥ चुकला फिरे चौर्‍याशीं योनी ॥ जो नांदेल मिरास धरुनी ॥ सुखी राहेल तो एक ॥४२॥
सवता उमज ना पडे मानवाला ॥ यालागीं बोध करावया सद्गुरु जाहला ॥ तेथेंहि समजून ना घेई स्वहिताला ॥ मग फुटकें कपाळ सहजचि ॥४३॥
यालागी भल्यानें डोळे झांकूं नये ॥ कीजे महासुखाचा उपाये ॥ आळस करितां हातींचा जाये ॥ तांतड केल्या लाभ असे ॥४४॥
कठीण कलीची राहाटी ॥ विश्वास नाहीं मनुष्याचें पोटीं ॥ तीर्थ पाणी देव पाषाण पडे दृष्टी ॥ साधुभावें मनुष्य ॥४५॥
बाप लेकांत विश्वास नाहीं ॥ धनलोभें पिसीं जाहलीं पाहीं ॥ गुरु केला त्यासही ॥ सेवेसि अवकाश पुरेना ॥४६॥
बैसली दारा पुत्रांची आवडी ॥ धनालागीं जाहलीं वेडीं ॥ मति प्रपंच लडबडी ॥ रुचली गोडी विषयांची ॥४७॥
प्रपंचांत ताण भारी ॥ दु:खाचे डोंगर लोटती शिरीं ॥ धर्मवासनेची जाहलीं वेडीं ॥ मति प्रपंच लडबडी ॥ रुचली गोडी विषयांची ॥४७॥
प्रपंचांत ताण भारी ॥ दु:खाचे डोंगर लोटती शिरीं ॥ धर्मवासनेची जाहली बोहरी ॥ चित्त फांके चहूंकडे ॥४८॥
याही संकटापासोन ॥ जरी सोडवी नारायण ॥ होय जीवाचें कल्याण ॥ बैसे पदीं मोक्षाच्या ॥४९॥
होतें पदरीं पुण्य बळकट ॥ तुटलें कर्मांचें कचाट ॥ जाहलों ईश्वरभजनीं नीट ॥ मोह ममता गिळोनी ॥२५०॥
केला पुरुषार्थ गेला सिध्दी ॥ तन्मय राबली स्वरुपीं बुध्दी ॥ गेला अभेदपदीं ॥ जोडली वस्ती सुखाची ॥५१॥
सुखसिंधु उचंबळला भारी ॥ ज्ञानलाटांची चढली खुमारी ॥ उसळे सिध्दांतबोध त्यावरी ॥ भरलें केणें ब्रह्मींचें ॥५२॥
तारुं गेलें सायुज्यतीरीं ॥ ग्राहिक संत सावकार भारी ॥ माल परिक्षोन घेतले पदरीं ॥ उगवली खेप शहाची ॥५३॥
उमळली संचितक्रिया ॥ ग्रंथ अर्पिला श्रीगुरुपायां ॥ मस्तक ठेऊनि श्रीसंतपायां ॥ बरी चर्चा निवडली ॥५४॥
आत्मज्ञानें उघडली दिठी ॥ दिसे ब्रह्मचि एक सृष्टी ॥ अनुभवाची कसोटी ॥ जिरे हुटहुटी द्वैताची ॥५५॥
अद्वैतबोध ठसावयासी ॥ कोटि पुण्यांच्या पाहिजेत राशी ॥ निरसे कल्पना सुखसंतोषी ॥ हें ज्ञान लाभे गुरुकृपें ॥५६॥
ब्रह्मज्ञानावरुन जाण ॥ राज्यसुख सांडिजे ओवाळून ॥ तीर्थें व्रतें यज्ञ दान ॥ तेंही फोस ज्ञानापुढें ॥५७॥
ज्ञानभानु उदेलिया ॥ भ्रांतिनिशा जाय विलया ॥ ज्या वनीं सिंहाच्या जाळिया ॥ कुंजरथारा मग कैंचा ॥५८॥
राजसैन्याचा चालिला पाट ॥ चोरभय कैंचें त्या वाटे ॥ जेथें विजेचा लखलखाट ॥ अंधार कैंचा दिसावया ॥५९॥
अमृताचिये पोटीं ॥ विष कैंचें पडेल दिठीं ॥ चंद्रबिंबाचे नेहटीं ॥ उष्मा कैंचा मिळावया ॥२६०॥
वज्रासमान कैंचें शस्त्र ॥ वेदाइतुकें कोण शास्त्र ॥ आकाशाहून पैसा पात्र ॥ विजेसारिखें विचिन्त्र नसे ॥६१॥
समुद्राऐसें ना दिसे सरोवर ॥ वैकुंठासम कैंचें मंदिर ॥ पांडुरंग संतांचें माहेर ॥ यासही जोडपें असेना ॥६२॥
गरुडासमान कैंचें पांखरुं ॥ हनुमंता सम बळी नसे वानरु ॥ मेरुऐसे नसती गिरिवरु ॥ शेषातुल्य सर्प कैंचा ॥६३॥
कैलासासारिखा कैंचा मठ ॥ ब्रह्मयातुल्य न दिसे भट ॥ दैत्यमर्दनीं विष्णु अचाट ॥ नारदा ऐसा पुरुष दुर्लभ ॥६४॥
काळाचा हा कोपा ॥ गुरुपासी दयेचें रुप ॥ सूर्यासमान प्रचंड दीप ॥ त्रिभुवनीं असेना ॥६५॥
पृथ्वी ऐसी जड ॥ दुसरी वस्तु जी न घडे ॥ सुधारसाहून गोड ॥ दुसरा जिन्नस असेना ॥६६॥
मनाऐसा कोण चपळ ॥ ध्रुवा ऐसा न दिसे अढळ ॥ दत्ताऐसा योगी प्रबळ ॥ गोरखी सारिखे कैंचें जोगी ॥६७॥
शंकरासमान कैंचे तपी ॥ विश्वामित्र ऐसे नसती जपी ॥ गंगा आणावया साक्षेपी ॥ भगीरथासमान नसे कीं ॥६८॥
रावणापें गर्वाच्या कोटी ॥ दुर्योधना ऐसा न सांपडे कपटी ॥ काम जिंकावयाच्या करावया गोष्टी ॥ शुकाऐसे नसती कीं ॥६९॥
प्रतिज्ञा तरी भीष्माची ॥ धनुष्यप्रेरणीं विदया अर्जुनाची ॥ शांति तरी कदर्यू ॥ सबुरी धर्माची अधिक ॥७०॥
औदार्य तरी हरिश्चंद्राचें ॥ धारिष्ट पहा चांगुणेचें ॥ पतिव्रतापण अनसूयेचें ॥ करार रामाचा श्रेष्ठ कीं ॥७१॥
युध्द तरी रामरावणाचें ॥ सिंधूसि प्राशनकर्म अगस्तीचें ॥ राज्य एक इंद्राचें ॥ चिरंजीव एक ब्रह्मचि ॥७२॥
यापरी ज्ञानाचा महिमा ॥ नसे दुसरी त्यास उपमा ॥ कल्पतरु ऐसी अनेक द्रुमा ॥ उपमा कैंची आणावी ॥७३॥
चिंतामणीसारिखे कैंचे खडे ॥ परिस सामर्थ्यास ना मिळे दगड ॥ मैलागिरी सुवास आणिके ठायां न जोडे ॥ कामधेनु पाडें गौ नसे ॥७४॥
सांडोनि कोटी औषधींला ॥ एक धन्वंतरी पाहिजे मेळविला ॥ एक चंद्र लक्षावा डोळां ॥ नक्षत्रमाळा कोण गणी ॥७५॥
कोटी देवपूजांहून श्रेष्ठ ॥ एक स्तोत्रपठण स्पष्ट ॥ त्याहून अधिक जपाचें नेट ॥ जपाहून वरिष्ठ ज्ञान कीं ॥७६॥
ज्ञानाहून लय अधिक ॥ लय लागल्या सार्थक देख ॥ अनुभवी जाणती हें कौतुक ॥ इतरांस अर्थ लक्षेना ॥७७॥
लयाहून लक्ष जोडी ॥ धरिली निजनामाची आवडी ॥ जिंकोन प्रपंच परवडी ॥ उभविली गुढी सुखाची ॥७८॥
सुखसिंधु हेलावला अंत:करणीं ॥ बुध्दितरंग हेलावले सहस्त्रफणी ॥ जाहली कवित्वाची मांडणी ॥ उभविला ग्रंथ रुचिकर ॥७९॥
रुचीं भरला रस अद्भुत ॥ जाहली सिध्दांतबोधाची मात ॥ शहामुनीचा मनोरथ ॥ सिध्दी नेला ईश्वरें ॥२८०॥
अंगीकार केला ईश्वरें ॥ पावलों ग्रंथाचा पैलतीर ॥ बैसलों मोक्षापदावर ॥ जिंकिला डाव जन्माचा ॥२८१॥
मतीस जाहला पैस ॥ तैसेंच लिहिलें ग्रंथास ॥ अनुभवकथा रसविलास ॥ भोगितां शहा निवाला ॥२८२॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये एकोनपंचाशत्तमो ध्याय: ॥४९॥
॥अध्याय ४९॥ ओव्या २८२॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP