मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
प्रस्तावना

श्रीसिध्दान्तबोध - प्रस्तावना

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


॥ श्रीगणेशायनम: ॥
॥ श्रीगुरवेनम: ॥

प्रस्तावना
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं ।
द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्‍ ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं ।
भावातीतं त्रिगुण रहितं सद्गुरुं तं नमामि ॥

संतचरित्रांचे गाढे अभ्यासक आणि खंदे लेखक ‘मुमुक्षु’ कार कै. ह.भ.प.ल.रा. पांगारकर यांनी, ‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे’ असें एके ठिकाणीं नमूद करुन ठेवलेलें आहे. श्रीसिध्दान्तबोध या ग्रंथाची महति आणखी कोणत्या शब्दांत वर्णन करावी ? श्रीसंत शहामुनि यांचा काळ ऐन पेशवाईतला. शके १७०० म्हणजेच इ.स. १७७८ मध्यें त्यांनी या अप्रतिम ग्रंथाची महाराष्ट्र भाषेंत रचना केली. या ग्रंथाचा मजकूर श्रीशहामुनि यांनी आपले पट्टशिष्य श्री. भगवंत नारायण पांढरकामे, राहणार पाडळी यांना कथन केला आणि त्यांनी तो उतरवून घेतला अशी हकिकत आहे. श्रीसिध्दान्तबोध या ग्रंथाव्यतिरिक्त अन्य कोणत्याहि ग्रंथ शहामुनि यांनीं लिहिल्याचें आढळत नाहीं. हा असामान्य ग्रंथ लिहून झाल्यानंतर या कवीनें आपली लेखणी आपल्या सद्गुरुंच्या पदकमलीं वाहून टाकली, असे ग्रंथांतरीं नमूद करुन ठेविली आहे तिच्या आधारेंच त्यांच्या चरित्राचा मागोवा घेणें क्रमप्राप्त आहे. श्री सिध्दान्तबोध या ग्रंथाच्या ३६ व्या अध्यायांत श्री शहामुनि लिहितात.

आतां नमुं वंशावळी । जन्म घेतला ज्याचें कुळीं ।
पणजा आमुचा मुळीं । नाम त्याचें शहाबाबा ॥२॥
महाराष्ट्र आणि फारशी । उभय पक्षीं विद्या त्यांसी ।
आराधिलें होतें शिवासी । एकनिष्ठ उपासना ॥३॥
अमिना होती त्याची अंगना । परम पतिव्रता सत्य जाणा ।
ती प्रसवली पुत्ररत्ना । नाम तयाचें जनाजी ॥४॥
तो करी विष्णूची भक्ति । मंडुबाई तयाची प्रकति ।
ती प्रसवली पुत्र सुमते । नाम तयाचें मानसिंग ॥५॥
त्याची भार्या नाम आमाई । लोक म्हणती तिला ताई ।
ती आम्हांसी जाहली आई । जन्मविलें पवित्र कुशीतें ॥६॥
पिता होता गणेश उपासक । पोटीं आजा आला नामधारक ।
हें जाणोनि कौतुक । नाम ठेविलें शहाबाबा ॥७॥
पणज्यापाशीं होतें भक्तीचें बीज । तोचि अंकुर विस्तरला सहज ।
म्हणोनी संतचरणीचें रज । प्राप्त जाहलें दैवानें ॥८॥
पणजा जन्मला प्रयागतीर्थी । आजा जन्मला अवंतिकेप्रती ।
सिध्दटेंक ज्यास म्हणती । जन्म दिला आम्हांसीं ॥१०॥
पणजा होता वैराग्यखाणी । रत्न प्रसवली तेथोनि ।
वंशवल्लीची मांडणी । निवेदीं तुम्हां सज्जन हो ॥११॥
होतें पदरीं वडिलांचे पुण्य । लाधलें तुम्हां संतांचे चरण ।
जाहलें पापाचें खंडण । मुकलों जन्म मरणासी ॥१२॥
बरवी लाभाची जाहली गोडी । उभारितों ग्रंथाची गुढी ।
जे परिसती आवडी । त्यासी गोडी सुधेहुनी ॥१३॥

या ओव्यांत दिलेल्या माहितीवरुन शहामुनींची वंशावळ पुढीलप्रमाणें ठरते -
शहाबाबा X अमिना

जनाजी X मंडुबाई

मानसिंग X अमाई उर्फ ताई

शहाबाबा (शहामुनि)

या ओव्यांवरुन आणखी एक गोष्टी स्पष्ट होतें ती अशी कीं, प्रस्तुत कवीच्या घराण्यांत, तें घराणे मुस्लिम असूनहि चक्क हिंदु दैवतांची उपासना रुढ होती. ही अर्थातच अतीव आश्चर्याची गोष्ट म्हणावी लागेल ! त्यांचे पणजोबा शहाबाबा हे शिवोपासक होते. आजोबा जनाजी हे विष्णू भक्त होते तर वडिल मानसिंग हे गाणपत्य होते ! या घराण्यातील पुरुषांचे वास्तव्यहि वेगवेगळ्या शहरीं झालेलें आढळतें. शहामुनींचे पणजोबा शहाबाबा यांचा जन्म प्रयाग या तीर्थक्षेत्रीं झाला. तर जनाजीचा जन्म अवंतिका, म्हणजेच उज्जैन येथें झाला. वडिल मानसिंग सिध्दटेक येथें जन्मले, तर खुद्द शहामुनींचा जन्म नगर जिल्ह्यांत पेडगांव येथें भीमातटीं झाला. श्री शहामुनि हे जातीनें मुसलमान होते. परंतु त्यांचा पणजा राजपूत जातीचा होता अशीहि माहिती कांहीं ग्रंथांतून आढळते. यावरुन शहामुनींच्या वडिलांचें नांव ‘मानसिंग’ असें होते व त्यांच्या घराण्यांतील सर्वच पुरुष हिंदु दैवतांचे उपासक होते यावरुन वरील विधानास निश्चितच पुष्टी मिळते ! असो. श्री शहामुनि यांचें मूळचें नांव ‘शहाहुसेन’ असें होतें असा उल्लेख कांहीं ग्रंथांतून आढळतो. परंतु आपले गुरु श्रीमुनीन्द्र यांच्या सन्मानार्थ त्यांनीं आपले मूळचें नांव बदलून ते ‘शहामुनि’ असें केलें असें म्हणतात. श्री शहामुनींचे गुरु मुनीन्द्र यांच्यासंबंधी विशेष माहिती कोठेंहि उपलब्ध नाहीं. मात्र स्वत: श्रीशहामुनींनी श्री सिध्दान्तबोध या ग्रंथांत त्यांच्या विषयीं जी थोडीफार माहिती लिहिलेली आहे त्यावरुन श्री मुनीन्द्र हे परमार्थमार्गात फार उच्च कोटीला पोचलेले सिध्दपुरुष असावेत असें वाटतें. ते परमहंस संन्यासी होते व साक्षात् भगवान् दत्तात्रेयाकडून त्यांनी उपदेश ग्रहण केला होता. अशा या परमश्रेष्ठ माहात्माकडून शके १७०० मध्ये वाराणसीच्या पवित्र परिसरात शहामुनींना ! उपदेश प्राप्त झाला. या संदर्भात ते लिहितात -
 
मुनीन्द्रनाम परमहंस ॥ दत्तें उपदेश केला त्यास ॥ श्रीगुरु शहास ॥ म्हणोनि नाम शहामुनी ॥ दत्ताचा उपदेश मुनीस ॥ मुनीनें उपदेशिलें शहास ॥ अवलंबून योग्यतेस ॥ केली कृपा गुरुरायें ॥ वाराणसीत गंगा तीरी ॥ प्रहर रात्र लोटल्यावरी ॥ आयुष्यमान योग रेवती नक्षत्रीं ॥ अनुग्रह केला स्वामीनें ॥ नाहीं पाहिलें यातीकडे ॥ ज्ञान सांगितलें उघडें ॥ अवघें उगविले कोडें ॥ सोडिलें बिरडें अविद्येचें ॥ मंत्र फुंकोनि कर्णी ॥ दीप लाविला हृदयभुवनीं ॥ गेली भ्रांती निरसोनी ॥ स्वयें प्रकाशलों स्वरुपीं ॥ ब्रह्मास्मि ठसावला बोध ॥ तोहि निरसोन केला आनन्द ॥ आनंदाचाहि फुंद ॥ जिरोनि केला निवांत ॥
आपल्यासारख्या हीन यातीत जन्मलेल्या ‘विद्याहीन’ ‘भाग्यहीन’ ‘दरिद्री’ आणि ‘दीन’ मनुष्याला मुनीन्द्रस्वामींसारख्या अधिकारसंपन्न पुरुषाकडून उपदेशामृताचा लाभ व्हावा या घटनेमुळें श्रीशहामुनी गहिवरुन गेलेले दिसतात. श्रीमुनीन्द्र स्वामींप्रमाणेंच प्रसिध्द सत्पुरुष कबीर यांनाहि श्रीशहामुनी आपले गुरु मानतात. कबीरांनी आपल्याला स्वप्नात दर्शन दिलें असें तें सांगतात. श्रीमुनीन्द्रस्वामींकडून त्यांना वेदांत आणि योग यांचें ज्ञान प्राप्त झालें. गुरुकृपेमुळें हृदयांत बोधसूर्य प्रगटला आणि त्याची शब्दरुप किरणें आपोआप बाहेर फांकूं लागली असें तें लिहितात.

मुसलमान संतकवींची महाराष्ट्रांत परंपरा
श्री संतकवि शहामुनि हे धर्मानें मुसलमान होते. त्यांची मातृभाषा अर्थातच मराठी नव्हती. परंतु असें असूनही त्यांनीं महाराष्ट्र भाषेंत, म्हणजेच मराठी भाषेंत अत्युकृष्ट ग्रंथरचना केली व ती देखील अद्वैत तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करण्यासाठीं केली याचें कुणाला आश्चर्य वाटेल. परंतु मराठींतील संतकवींचा इतिहास धुंडाळला तर असें दिसून येतें कीं, श्रीसंतशहामुनींप्रमाणेंच अन्य पांचपन्नास मुसलमान कवींनी देखील महाराष्ट्र भाषेंत वेदान्तादी गहन विषयांवर काव्यरचना केलेली आहे ! आपल्या महाराष्ट्रांत अशा मुसलमान संतकवींची तेजस्वी परंपरात आहे ! शेखसुलतान, शेखमहंमद, जिंदो फकीर, दादू पिंजारी. शबाबेग, मुताजी, विजापूरचा सुलतान आदिलशहा, हुसेन अम्बर, अलमखान अशीं किती म्हणून नांवें सांगावीत ! यांतील कांहीं कवींनीं विठ्ठल भक्तीचा डांगोरा पिटून आपला हिंदुधर्माकडे असलेला ओढा स्पष्ट केला आहे. यापैकी विजापूरचा सुलतान इब्राहिम अदिलशहा याला तर हिंदुधर्माविषयीं अपार प्रेम होतें. त्याचीं जीं फर्मानें आज उपलब्ध आहेत त्यांजवर ‘श्रीसरस्वती’ हीं अक्षरें लिहिल्याचें आढळून येतें, त्यानें शके १५१० च्या सुमारास विजापूरच्या किल्ल्यांत एक ‘संगीत महाल’ बांधून तेथें श्री सरस्वतीची स्थापना केल्याचेंहि इतिहास सांगतों. यानें केलेली थोडीफार मराठी कविता आजहि उपलब्ध आहे. तर हुसेन अंबर या दुसर्‍या एका उल्लेखनीय मुसलमान कवीनें ओवीबध्द ‘गीता टीका’ लिहिल्याचें दिसून येतें. ही टीका ‘अंबर हुसेनी’ या नांवानेंच प्रसिध्द असून तीत एकंदर ८१६ ओंव्या आहेत. ही ‘गीता टीका’ त्यानें शके १५७५ च्या सुमारास लिहिली व ती वाचल्यावर तो चांगलाच व्युत्पन्न असावा असें वाटतें. शेख महंमद या कवीला कांही लोक कबीराचा अवतार समजतात. हा नगर जिल्ह्यांतील श्रीगोदे किंवा चांभार गोंदे येथील रहिवासी होता. कालांतराने विरक्ती निर्माण होऊन त्याला हिंदुधर्माची ओढ लागली व त्यानें पंढरीची वारी केली. त्यानें लिहिलेले ‘पवनविजय’ निष्कलंकप्रबोध’ ‘योगसंग्राम’ व ‘ज्ञानसागर’ असे चार ग्रंथ प्रसिध्द आहेत. याचा काळ शके १४८२ ते १५७२ असा असून हा चांद बोधल्याचा अनुग्रहीत होता असे म्हणतात. अशा प्रकारें मराठी भाषेंत परमार्थपर ग्रंथरचना करणार्‍या मुसलमान कवींची महाराष्ट्रांत एक तेजस्वी परंपरा होती. या कवींच्या काव्यांत प्रसंगी उर्दू व फारसी शब्दांचा आढळ होत असला तरी एकंदरीने त्यांची कविता पूर्णपणे हिंदु वळणाची होती असें दिसून येतें. अशा या भव्य अन् दिव्य परंपरेतच एक ‘श्रेष्ठकवि’ म्हणून श्रीसंत शहामुनींचा आदरानें उल्लेख करावा लागेल. परंतु या तेजस्वी हिर्‍याची पारख महाराष्ट्राला पुरतेपणी झाली नाहीं व हा हिरा गारगोटीच्या मोलानें मापला गेला, उपेक्षित राहिला, ही अर्थातचे दुर्दैवाची गोष्ट होय ! या विसाव्या शतकांतदेखील श्रीशहामुनींचें नांव किती मराठी भाविकांना ठाऊक आहे ? त्यांचा ‘सिध्दान्तबोध’ किती जणांनी वाचला आहे ?

सद्गुरुकृपेचें फळ
‘श्री सिध्दान्त बोध’ हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संतकवि शहामुनी यांनी सहा महिने अनुष्ठान करुन जगद्‍गुरु भगवान्‍ दत्तात्रेय यांची कृपा संपादन केली आणि त्यानंतर सद्गुरुंची आज्ञा घेऊन या ग्रंथाचा प्रपंच मांडला. परंतु हा ग्रंथ म्हणजे केवळ सद्गुरु कृपेचें फळ आहे असें तें म्हणतात. त्यामुळेंच या ग्रंथाचें कर्तृत्व ते स्वत:कडे घेत नाहींत. मोठमोठया संतकवींच्या बाबतींत अशीच गोष्ट, आढळून येते. ज्ञानियांचे राजे श्रीज्ञानेश्वर हे देखील आपली ज्ञानेश्वरी हे आपले सद्गुरु देखील आपल्या दासबोधाचें कर्तृत्व स्वत:कडे न घेता ते प्रभु रामचंद्रांकडे सोपवितो.’ प्रसिध्दी आणि फोटो यासाठीं हापापलेल्या आधुनिक कवींकडे पाहिल्यानंतर या पूर्वीच्या संतकवींच्या विनम्रवृत्तीचें दिलखुलास कौतुक करावेसें वाटतें ! असो. या विनम्र भूमिकेंतूनच हा कवि स्वत:चे अवगुण श्रोत्यांपुढें मांडतो. तो म्हणतो, मी कर्मक्रियाहीन आहे, बुध्दिहीन आणि ज्ञानहीन आहे. परंतु असे असूनहि हा ग्रंथ लिहिणें मला मुळींच अवघड जात नाहीं. याचें कारण आपण देवाचे पाय दृढ धरुन ठेविले आहेत.

‘रसमात्रा जरी सांपडे ॥ ताम्रपात्रीं सुवर्ण जोडे ॥
धरितां देवाचे पाय दृढें ॥ अवघड काय कवितेचें ॥ सि.बो.२/१४३

आपण परमेश्वराला पूर्णत: शरण गेलों आहोत व एवढेंच एक भांडवल आपल्याजवळ आहे आणि परमेश्वर हा शरणागताचा अभिमानी आहे असेंहि तो सांगतों -

‘मी तों शरणागत देवासी ॥ हेंचि भांडवल मजपासी ।
शरणागताचा अभिमान हरीसी ॥ हें बिरुद प्रसिध्द असे ॥ सि.बो.५/२१

ईश्वराला आणि सद्गुरुला पूर्णत: शरण गेल्यास चौर्‍यांशीच्या फेर्‍यातून देखील जीवाची सुटका होऊ शकेल तिथें काव्य रचनेचें एवढें काय मोठें ? असें त्यांनी ठामपणें सांगितलें आहे !

मुळाचा शोध घ्या
कोठूनि आलासि कोठें जासी ।
शोधीं आपुल्या मूळासी ॥

जन्माला येणारे बहुतेक प्राणी आपण कोठून आलों व कोठें जाणार याचा शोध करण्याचा प्रयत्न न करतां या संसारातच रंगून जातात. परंतु हा संसार ‘लटिका’ आहे, असार आहे. म्हणूनच विवेकी मनुष्यानें या संसाराकडे त्रयस्थ वृत्तीनें पहावें. त्याच्यांत गुंतून पडूं नये. त्याविषयीं सदा उदासीन असावें. कारण हा संसार वरपांगी मोठा आकर्षक दिसतो. परंतु तो मिथ्या आहे. पत्नी, पुत्र, नातलग हे केवळ पैसा आहे तोपर्यंतच आपल्या पुढें पुढें करतात. (‘जोंवरी पैसा तोंवरी बैसा’ असाच येथला न्याय आहे !)

असतां वैभवसंपत्ति । पारके तेही आप्त होती ।
द्रव्य सरल्या नांव न घेती । सखेही होती दूरस्थ ॥ सि. बो. ८/१४२
‘मोहाची सोयरी मिळोनि चोरटी । खाऊनि करंटी घेती घर ॥’

या संत नामदेवांच्या उद्गारातहि हीच व्यथा आहे. अशी ही परिस्थिती कटु पण सत्य आहे. यासाठींच शहाण्या मनुष्यानें संत नामदेवांनी म्हटल्याप्रमाणें ‘संसारी असावें-असोनी नसावें’ अशी आपली वर्तणूक ठेवावी. या भूतलावर जन्माला येणारा प्रत्येक प्राणी एकटाच येतो आणि एकटाच जातो ‘एकलेंचि येणें एकलेंचि जाणें’ हाच येथला न्याय आहे ! अशा परिस्थितींत आयुष्य आहे तोंवरच भगवंताची कृपा संपादन करुन या चौर्‍यांशीच्या फेर्‍यांतून सुटण्यासाठी प्रत्येकानें तळमळीचा प्रयत्न करणें हें त्याचें आद्य कर्तव्य आहे. एकदां आयुष्याचा अंतकाळ येऊन ठेपला की, यादृष्टीने कोणताच प्रयत्न करतां येणें कदापि शक्य होणार नाहीं. या संदर्भात संत श्रीशहामुनि एक सुंदर दाखला येतात -

जंववरी दीपाची ज्योत । तंव झांकापाकी करी घरांत ॥
दीप मालवितां चांचपत । असती वस्तु दिसेना ॥
देहाचें आयुष्य जोंवरी । तोंवरीच करावी वारासारी ॥
मग अंतकाळ मांडल्यावरी । नसे अवकाश करावया ॥ सि. बो. १९-४४-४५

जन्माला येणारा प्रत्येक प्राणी केव्हा ना केव्हा मरणार हें निश्चित आहे. ‘जातस्यहि ध्रुवो मृत्यु:’ (गीता २-२७) हें गीतेतील वचन प्रसिध्दच आहे. घडीने घडी काळ आयुष्य नेत आहे. आणि म्हणूनच, ‘शरीर हें केव्हाहि ढांसळेल असें औट हाताचें खोपट आहे’ असें नामदेवांनीं एकें ठिकाणीं म्हणून ठेविलें आहे. तेव्हां अत्यंत दुर्लभ असा मनुष्यजन्म प्राप्त झाल्यानंतर तरी गुरुकृपा संपादन करुन आत्मज्ञान प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न करणें अत्यंत आवश्यक आहे. परंतु बहुतेकांची स्थिती -

मसणवटी जोंवरी बैसती । तोवरी वैराग्य उपजे चित्तीं ॥
गृहीं पातल्या निश्चितीं । शून्य जाहला परत ॥ सि.बो.९-१३२

अशीच होते ! स्मशान वैराग्य म्हणतात तें यालाच ! ही अशी परिस्थिती होऊं नये यासाठी तारुण्य दशेपासूनच ईश्वर प्राप्तीचा व्यास लागला पाहिजे. म्हणजे हळूहळू मग भगवद्‍भक्तींत रंगू लागेल.

जैसा धनकामिनीवर दक्ष ॥ तैसा ईश्वरीं लावीं लक्ष ॥ सि.बो. ४८-१९५

अशी परिस्थिती झाली पाहिजे. या संदर्भात एक मोठी मार्मिक कथा आठवते. एक शिष्य एकदां आपल्या गुरुजवळ ‘मला देवाचें दर्शन घडवा’ असा हट्ट धरुन बसला. त्याचे गुरु त्यावेळीं कांहीं बोलले नाहींत. थोडयावेळानें त्याला घेऊन ते नदीवर गेले. तेथें दोघेंहि स्नानासाठीं पाण्यांत उतरले. शिष्यानें पुन्हा हट्ट धरला - ‘मला ईश्वराचें दर्शन घडवून द्या !’
तें ऐकून त्याच्या गुरुंनीं त्याची मानगूट पकडून त्याला खोल पाण्यांत बुडविला. चार दोन मिनिटांतच तो शिष्य कासावीस होऊन हातपाय झाडूं लागला. तेव्हां त्याच्या गुरुंनीं त्यास अलगद वर काढलें आणि म्हटलें, “बाबारे, स्वत:चे प्राण वांचावेत यासाठीं आत्ता तूं जितक्या तळमळीनें प्रयत्न केलेस तितक्या तळमळीनें तूं ज्या दिवशीं ईश्वराची आराधना करशील त्या दिवशीं तो ईश्वर तुला आपण होऊन दर्शन देईल !’ सांगायचें तात्पर्य, दुर्लभ असा मनुष्यदेह प्राप्त झाल्यानंतर त्या सर्वेश्वराच्या दर्शनाची ओढ लागणें भाविक मनुष्याच्या दृष्टीनें स्वाभाविक आहे. परंतु त्यासाठीं साधनहि तेवढेंच केलें पाहिजे, आणि मुख्य म्हणजे श्रीशहामुनि म्हणतात त्याप्रमाणें क्षुद्र दैवतांची भक्ति न करतां त्या सर्वसत्ताधारी, कर्तुमकर्तुम अन्यथा कर्तुम, अशीं शक्ति असलेल्या सर्वेश्वराचीच - ‘मुख्य परमेश्वराची’ च भक्ति केली पाहिजे. कारण मोक्ष देण्याचें सामर्थ्य फक्त त्याच्याजवळच आहे.

क्षुद्र दैवतांचें बंड
परंतु अज्ञजन त्या सर्वेश्वराला विसरुन मायादिबंधनांत अडकलेल्या क्षुद्र दैवतांचीच उपासना करतात !

ज्या देशीं जन्मली जे याती ॥ तेचि देशभाषा वदती ॥
तेथील दैवत कुळस्वामी म्हणती ॥ भजती भावें त्यालागीं ॥
म्हणती हाचि सर्वेश्वर ॥ याहूनि अधिक नाहीं थोर ॥
इतर दैवतें शास्त्रकार ॥ पाषंड म्हणोनि निंदिती ॥ सि. बो. १-१९,२०

अशी परिस्थिती असल्यामुळेंच रवळोबा, विरोबा, नरसोबा, जानाई, तुकाबाई, सटवाई, हाणगोबा इ. नाना दैवतांचें बण्ड समाजांत माजतें ! संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव इत्यादि थोर संतांनी देखील समाजाच्या या वैगुण्यावर नेमकें बोट ठेवलेलें आढळतें. श्रीशहामुनि म्हणतात कीं, अशा क्षुद्र दैवतांची उपासना करुन सायुज्यपदाची प्राप्ती होणें कदापि शक्य नाहीं.

भक्ति करितो वेताळाची ॥ आशा लक्ष्मी विमानाची ॥
गाहाण पाठवी पोतडी गुंजांची ॥ इच्छी घडाभर मुक्ताफळें ॥ सि.बो.२-७४

वेताळाची भक्ति करुन आणखी कशाची प्राप्ती होईल, परंतु सायुज्य मुक्तीची प्राप्ती कधींहि होणार नाहीं !

नरदेहाला अपूर्वता
मुक्तीचे एकंदर चार प्रकार वेदांत सांगितलेले आहेत. सलोकता, समीपता, सरुपता आणि सायुज्यता. भगद्भजनानें यथाधिकार या ‘चत्वार’ मुक्ती प्राणी मिळवितात. या चार मुक्तीपैकीं पहिल्या तीन चंचल अर्थात् नाशिवंत आहेत. परंतु चौथी जी सायुज्यता ती मात्र आढळ आहे. त्रैलोक्याचा नाश झाला तरी ती नाश पावणार नाहीं. कारण या प्रकारच्या मुक्तींत जिवाशिवाचें ऐक्य आहे व नवविधा भक्तीच्या योगानें ती प्राप्त करुन घेतां येतें, असें दासबोधादि ग्रंथांत वर्णन केलेलें आहे. अशाप्रकारें सायुज्यमुक्ती प्राप्त करुन घेऊन चौर्‍यांशीच्या फेर्‍यांतून बाहेर पडण्याचा प्रयत्न प्रत्येकानें या दुर्लभ अशा नरदेहांतच केला पाहिजे. असें शहामुनि कळकळून सांगत आहेत. या नरदेहाची अपूर्वता सर्वच संतांनीं आपापल्या ग्रंथांतून वर्णन केलेली आढळून येतें. ‘नरदेह हें मोठें घबाड आहे’ असें समर्थ रामदासांसारखा महापुरुष म्हणतो. याचें कारण ‘नराचा नारायण’ बनण्याची पात्रता केवळ या नरदेहांतच आहे ! इतर कोणत्याहि देहांत ही गोष्ट कदापि शक्य नाहीं ! आणि याचसाठीं मोक्षप्राप्ती मिळावी म्हणून स्वर्गीचे देव देखील या नरजन्माची इच्छा धरतात !

देवतेस मोक्ष नाहीं ॥ या लागीं गृह्य ठेविलें पाही ॥
जीवचि अधिकारी निश्चयीं ॥ परमेश्वर प्राप्तीचा ॥ सि. बो. २८-२४२

सद्गुरु महिमा
सायुज्यमुक्ती हें एकदां ध्येय ठरल्यानंतर तें प्राप्त करुन घेण्यासाठीं योग्य तें मार्गदर्शन करणार्‍या सद्गुरुंची नितांत आवश्यकता आहे. सद्गुरुंचे वर्णन करतां येणेंच शक्य नाहीं ! श्रीसमर्थ म्हणतात -

‘म्हणोनि सद्गुरु वर्णवेना । हे गे हेचि माझी वर्णना ॥ दासबोध १-४-३१

ज्याप्रमाणे ब्रह्मस्वरुपाचें वर्णन करणें वेदांना देखील जमलें नाहीं, त्याचप्रमाणें श्रीगुरुपदाचें वर्णन करणें कुणालाहि साधणार नाहीं ! श्रीसिध्दान्तबोध या आपल्या ग्रंथांत संतकवि शहामुनि यांनीं सद्गुरुंची आवश्यकता व त्यांचा महिमा अनेक ठिकाणीं वर्णन केलेला आहे. ‘अहं ब्रह्मास्मि’ हा बोध केवळ सद्गुरु कृपेनेंच आपल्याला झाला, (आपल्या मनावर बिंबला) व आपली भ्रांति दूर झाली असे ते सांगतात. या संसार सागरांतून सुखरुपपणे तारुन नेऊन तो पैलतीरास नेतो व जन्ममरणाच्या फेर्‍यातून जिवाची कायमची सुटका करतो. म्हणूनच सद्गुरुला शरण जाऊन त्याची मन:पूर्वक सेवा करीत राहणें ही सर्व उपासनांत श्रेष्ठ उपासना होय !

सर्व उपासनांत श्रेष्ठ उपासना ॥ सद्गुरु एक कैवल्यराणा ॥
जो चुकवी जन्ममरणा । त्यासी शरण रिघावें ॥
जो गुरुचाही परमगुरु । श्रीकृष्ण परब्रह्म परमेश्वरु ।
अलक्ष अपार अपरंपारु । उतरी पारु भवाब्धी ॥ सि. बो. ५-१०२,१०३

आणखी एके ठिकाणीं श्रीशहामुनि म्हणतात -
पडिले चौर्‍यासीचे फेर्‍यांत ॥ सुख दु:खांचे हिंदोळे लागत ॥
तेथोनि काढावया त्वरित ॥ समर्थ एक सद्गुरु ॥
जे लागले सद्गुरु कासेस ॥ निघाले सायुज्य तीरास ॥
चुकले ते गेले भवडोहास ॥ विकल्पमासे तोडिती ॥ सि.बो.८-१५२-५३

श्रीसिध्दान्तबोध या ग्रंथांत सद्गुरुंचे माहात्म्य असें ठायीं ठायीं आढळतें. अध्याय ३२ (पृष्ठ २५९) हा देखील या संदर्भांत मननीय आहे.  

अद्वैत तत्त्वज्ञान
प्रस्तुतच्या ग्रंथांत कवि शहामुनि यांनी अद्वैत सिध्दान्ताचें प्रतिपादन केलेलें आढळून येतें. हा सिध्दान्त वाचकांच्या मनावर बिंबविण्यासाठीं कवि अनेक दाखले देतो, अनेक आख्यानें रंगवितों.

सर्प वांकडा तिकडा फिरत ॥ वारुळांत नीट उतरत ॥
तैसा कवि बहुप्रकारें वदत ॥ शेवटी सिध्दान्त अद्वैतची ॥ सि. बो.४५-९४

असें कवीनें स्पष्टपणें सांगितलेलें आहे. जीव आणि शिव हे वस्तुत: एकच आहेत, परंतु केवळ अविद्येमुळें, अज्ञानामुळें ते वेगळाले भासतात.

बिंब प्रतिबिंबाचे लक्षण ॥ तैसा जीवशिव घे ओळखोन ॥
आरशापुढें दोन जाण तेंवीं अविद्या संबंधें भिन्नता ॥ सि.बो.४८/१२५

प्रतिबिंब हें वास्तविक बिंबच असतें. सागर आणि सागरांतील लाट या गोष्टी देखील वस्तुत: एकच आहेत, रवि बिंब आणि प्रकाश किरण यांतही भेद नाहीं. भेद वाटतो हें खरें. परंतु य भेदाचें रहस्य ओळखतां आलें पाहिजे. तसेंच ब्रह्म आणि जीव वस्तुत: एकच आहेत. परंतु अज्ञानामुळें आपणांस त्यांच्यामध्यें भिन्नत्व वाटते !

सागरापासोन उठे लहर ॥ लहरीपासोन न होय सागर ॥
परंतु सागरावेगळी ना होय लहर ॥ हा अनुभव उघडाची ॥
तेवीं ब्रह्मापासूनि जीव निर्माण ॥ जीवापासून ब्रह्म होईना जाण ॥
परंतु जीव ब्रह्मावेगळा ना होय खूण ॥ समजून घेणें चतुरानें ॥
म्हणोनि जीव ब्रह्माचा अंश ॥ जैसा सिंधुवर तरंग विलास ॥
किंवा रविबिंबी किरण प्रकाश ॥ अथवा भंगारी आकारी नग दशा ॥
यापरी अनुभव समजून ॥ निवांत राहिलों गुरुकृपेन ॥
अद्वयबोध परिपूर्ण ॥ ठसला अक्षयीं स्वानंदी ॥ सि.बो.४८-३ ते ६

कवि आणखी एके ठिकाणी म्हणतो -
जीवाचें अविद्याबंधन तोडून ॥ करी ब्रह्मरुपा समान ।
हें परमेश्वरा वांचोन ॥ इतरा सामर्थ्य नसेची ॥ सि.बो.२३-९५

सद्गुरुंना कायावाचामनानें पूर्णपणें शरण जाउन त्यांनी दाखविलेल्या मार्गानें साधन करीत राहिलें तरच त्या परमात्म्याची कृपा संपादन होणार आणि त्यानंतरच अविद्याबंधनातून जीव मुक्त होणार ! तेव्हां सद्गुरुंच्या मार्गदर्शनाची नितांत आवश्यकता आहे ! आणि म्हणूनच त्यांचें माहात्म्य कवीनें जागोजाग वर्णन केलेलें आढळून येतें. अशा प्रकारें आपल्या या रसाळ व अलंकारिक काव्यांतून अनेक बहारदार आख्यानांच्या माध्यमांतून श्रीसंत शहामुनि यांनीं अद्वैत तत्वज्ञानाचा विचार प्रामुख्यानें मांडलेला आहे. हें तत्वज्ञान सांगतांना भक्तिमार्गांतील इतरहि अनेक विषयांसंबंधी त्यांनीं अगदीं बारीक सारीक गोष्टी वाचकांपुढें ठेवल्या आहेत. साधकानें त्यांचें मनन व आचरण करणें आवश्यक आहे. आतां वानगीदाखल कांहीं ठळक गोष्टींचा विचार करुं. भक्ति कशी असावी याबद्दल ते म्हणतात -

भक्तीचें हेंचि सदर ॥ कोणाचें दु:खवूं नये अंतर ॥
सर्वांभूती करुणा फार ॥ हृदया माजी असावी ॥

अगदी थोडक्या शब्दांत ते अशा प्रकारे पुष्कळ कांही सांगून जातात ! ईश्वराला कोणता मनुष्य आवडतो या विषयीं सांगतांना ते म्हणतात -

जो पुरुष नम्र चाले ॥ तो आवडे हरीसी
आणि म्हणूनच -
लहान मुंगीस साकर ॥ गज भक्षी काष्ठे अंकुशाचा मार

सज्जन मनुष्य सर्वांभूतीं एक परमेश्वर पाहतो. कारण -

सर्वांघरीं एक नेम ॥ सोहं स्मरणीं चाले दम ॥
हाचि बोध समजोनि सुगम ॥ भेद सांडिती सज्जन ॥

माया आणी अज्ञान यांपासून मुक्तता करुन घेण्यासाठीं काय करावें याबद्दल कवि म्हणतो -
लावा हरिभजनाचा चटका ॥ घ्या राम रसायणाचा घुटका ॥
तोडा अविद्याबंधन कटका ॥ फटका ममते पासोनि ॥

पूजा कशी असावी याबद्दल ते म्हणतात -
सजीव पुष्पें तोडून ॥ निर्जिव पाषाण धातूस वाहण ॥
हें अज्ञानाचें लक्षण ॥ पूजाधर्म तो नव्हे ॥
सर्वही एक ब्रह्म जाणिजे ॥ ही महापूजा बोलिजे ॥
विषमभाव त्यागिजे ॥ सम घेईंजे ही पूजा ॥

ते पुढें म्हणतात -
देव प्रसन्न तें करावें कर्म ॥ हें पूजेचें मुख्य धर्म ॥
बाह्य उपचार वृथा श्रम । पूजा कर्म तें नव्हे ॥ सि.बो.३१-१७८.

अशीं अनेक सुभाषितवजा वाक्यें या ग्रंथांत विपुलतेनें आढळतात व यांतच शहामुनींच्या काव्याचें यश दडलेलें आहे. कवीला विनोदाचेंही वावडें नाहीं. त्याच्या विनोदी स्वभावाचें एकच उदाहरण देतो कवी म्हणतो -

कोणी एक म्हणतो तमाखु सोडिना ॥
तिणें काय याचा पदर धरिला जाणा ?
सि.बो.३५-१८८

अतिशयोक्ती हा अलंकारही त्यांच्या काव्यांत अनेक ठिकाणीं आढळतो.
गुरुमहिम्याचें वर्णन करतांना तो म्हणतो -
सिंधु शोधावया लागीं । मनांत इच्छा करी मुंगी ॥
शेष कन्येच्या भोगी ॥ वासना धरी गांडूळ ॥
करावया पृथ्वीचें वजन ॥ मुंगळे जाती ताजवा घेऊन ॥
इतुकें घडो शके एकवेळ ॥ परि गुरुमहिमा अगाध नकळे ॥

आपला समाज मोठा चमत्कारिक आहे. त्याची वागणूक कशी आहे पहा -
जित्या सर्पातें मारिती ॥ मृत्तिकेचा नाग करिती ॥
वारुळीं पय घृत वोपिती । नमन करिती मृत्तिकेतें ॥
ऐसी रीत या जगाची ॥ जितां निंदा करिती साधूची ॥
तो सामावल्या तयाची ॥ पूजा करिती सोंवळ्यानें ॥ सि.बो. ८-२०,२१.

श्रीशहामुनींचे काव्य हें अशा प्रकारे नाना कल्पनांनी, अलंकारांनी नटलेले आहे. कवीची काव्यरचना ही ‘विशिष्टा-गुणवती’ असावी असें आहित्यज्ञ सांगतात. दंडी, भरत, आणि वामन इत्यादींनी प्रसाद, माधुर्य, ओज, सुश्लिष्टता, समता, सौकुमार्य, अर्थव्यक्ती, उदारता, कांती व समाधि हे दहा काव्यगुण मानलेले आहेत व श्रीशहामुनींच्या काव्यांत त्यांचा वारंवार आढत होतो, व म्हणूनच भक्तिरसांत रंगून गेलेलें त्यांचे हें काव्य वाचकांच्या मनावर अपेक्षित तो परिणाम करते एवढें निश्चित ! हा ग्रंथ निर्माण होऊन आज १९४ वर्षे होऊन गेलीं, कालौघांत तो इतकी वर्षे टिकून राहिला, भाविक मनांत त्यानें आदराचें स्थान मिळविलें व पुढील कित्येक पिढयांना तो मार्गदर्शन करत राहणार आहे. अशा या अलौकिक ग्रंथाची महति आणखी काय वर्णन करावी ? या ग्रंथाच्या संपादन कार्याला पूज्य स्वामी स्वरुपानंद (पावस) यांचा शुभाशीर्वाद प्राप्त झाला ही फार मोठी भाग्याची गोष्ट म्हटली पाहिजे !

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP