मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ४१ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४१ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
श्रीगुरु वंदिती हरिहर ॥ तेथेंमी काय किंकर ॥ गुरु अनादिसिध्द निर्विकार ॥ म्हणोनि पूज्य सर्वांसी ॥१॥
गुरु जगदीश प्रकाशज्योती ॥ गुरु प्रताप वेद वर्णिती ॥ त्यांत माझी काय मती ॥ जाणावया गुरुमहिमा ॥२॥
गुरु निर्विकार निरंजन ॥ तें प्राप्तीस पाहिजे भाग्य पूर्ण ॥ मी दुर्बळ हीन दीन ॥ कास धरिली संतांची ॥३॥
जैंसी कां चिंध्यादेवी ॥ बहुत चिंध्या मेळवोनि मिरवी पदवी ॥ कां सैन्याच्या समुदायीं ॥ श्रेष्ठता विशेष नृपाची ॥४॥
बहु द्रुमांचा रस आणोन ॥ मक्षिका करिती रसपूर्ण ॥ याचिपरी मीही जाण ॥ संत शेष संग्रहीं ॥५॥
निर्विकार ब्रह्मीं उल्लेख होता ॥ तेचि मूळमाया तत्वतां ॥ तिची इच्छा तोचि पाहातां ॥ महत्तत्व त्यास म्हणावें ॥६॥
महत्तत्व-उदरीं तीन कुमर ॥ अकार उकार आणि मकार ॥ त्यांसीच बोलिजे हरिहर ॥ तृतीय धाता विश्वकर्ता ॥७॥
त्या विरंचीचे कल्पनेंत ॥ जन्मला महा भृगु समर्थ ॥ त्याणें गुरु केला विख्यात ॥ वरुण जो कां मेघराजा ॥८॥
चहूं वेदांचें रहस्य काढून ॥ उपदेशिला ज्ञानसंपन्न ॥ जैसें क्षीरसिंधूचें घेऊनि जीवन ॥ भागीरथींत सांठविजे ॥९॥
किंवा सूर्यास सूर्य भेटले ॥ कीं चंद्रास चंद्रें आलिंगिलें ॥ महादधी रत्नाकर मीनले ॥ नातरी आकाशावरी लोळे आकाश ॥१०॥
क्षीरसिंधु क्षीरसिंधूनें ॥ केला पाहुणेर आदरानें ॥ तेवी निगमसार ज्ञानें ॥ वरुण भोगी गुरुसी ॥११॥
त्या वरुणाचे द्रवलें रेत ॥ तें सांठविलें कुंभांत ॥ तेथें जन्म पावला समर्थ ॥ अगस्ति ऋषि महाराज ॥१२॥
विभूपासूनि विधि उत्पन्न ॥ विधीचा नारद नंदन ॥ तैसा वरुणकुमार जाण ॥ अगस्ति मुनि समर्थ ॥१३॥
तो अगस्ति महामुनि ॥ अखंड वसे आनंदवनीं ॥ ज्याची लोपामुद्रा कामिनी ॥ प्रकाशखाणी ज्ञानाची ॥१४॥
रुप सुढाळ सुरस गुणी ॥ पतिव्रता शिरोमणी ॥ शुध्दवासना विवेकखाणी ॥ धारिष्ठ श्रेष्ठ जीपासीं ॥१५॥
करुनि अगस्तीस नमन ॥ उभी राहिली कर जोडून ॥ विनये बोले करुणावचन ॥ अति नम्र सद्भावें ॥१६॥
स्वामी तूं समर्थ मूर्ती ॥ मोक्षदानी मज निजपती ॥ मी दासी अल्पमती ॥ करितें विनंति पायासी ॥१७॥
ईश्वर गुरु सोयरा ॥ सखा जिवलग समर्थ पुरा ॥ मी अंकित तुझी दारा ॥ सरिता जेवीं सागरीं ॥१८॥
चंद्रापासी चंद्रकळा ॥ तेवीं मी पायांपासी दयाळा ॥ मीन उदकीं तान्हेला ॥ हेंचि अपूर्व मज वाटे ॥१९॥
कामधेनूचें वासरूं ॥ क्षुधेनें पिडे त्याचें जठरु ॥ लक्ष्मी समुद्र माहेरु ॥ बोळवणशुध्दी होईना ॥२०॥
श्रीरामाचें कलत्र ॥ भीक मागे दारोदार ॥ तैसा मज विचार ॥ भ्रांति दरिद्रें पीडिलें ॥२१॥
पार्वतीस लागे भूत ॥ अंगारा देवऋषि देत ॥ तैसें माझें चित्त ॥ चिंता वाहे भवाची ॥२२॥
सूर्याचे रथीं बैसला अरुण ॥ वाती वळी दीपालागून ॥ तुम्हासन्निध मी असोन ॥ परमार्थ दुर्लभ कां जाहला ॥२३॥
धन्वंतरियासी रोग पीडी ॥ अमृतावर मृत्युची उडी ॥ रवीवर अंधार घाली झांपडी ॥ तेवीं मज नाडी प्रपंच ॥२४॥
जगद्गुरु भ्रतार शिरीं ॥ एवढी मज भाग्याची थोरी ॥ मज कृपेनें उपदेश करीं ॥ भरीं भांडार ज्ञानाचें ॥२५॥
तोडीं मायेचें बिरडें ॥ बोधीं जेणें विकल्प उडे ॥ उगवी संशयाचें कोडें ॥ झडे वासना विषयाची ॥२६॥
तुटे अविदया दुष्ट शेवटीं ॥ सरे जन्ममरण दु:खकोटी ॥ पडो आत्मबोधीं मिठी ॥ दावी चित्कळा तुर्याची ॥२७॥
हें जग ब्रह्म कीं माया ॥ कोण पुरुष कोण भार्या ॥ कोण शिष्य कोण गुरुवर्या ॥ दावीं चर्या मज कैसी ॥२८॥
कोण श्रोता कोण वक्ता दोन्हीं माजी कोण देखता ॥ कोण मरता कोण जन्मता ॥ कोण मुक्त कोण बध्द ॥२९॥
प्रकृतिपुरुषाचा काय विवेक ॥ जीव शिव दोन्ही एक ॥ ॥ कोणें लिहिली प्रारब्धरेख ॥ कोण पुसी तियेसी ॥३०॥
या प्रश्नांचें निरसन ॥ कर्ता तूं समर्थ पूर्ण ॥ ऐसें वदोन लोपेन ॥ लोटांगण घातलें ॥३१॥
परिसोनि लोपेची विनंती ॥ मुनि सुखावला चित्तीं ॥ म्हणे बरवी चातुर्याची रीती ॥ पुससी चतुर तूं एक ॥३२॥
घटाकांश पुसे गगनासी ॥ कधीं भेट दयाल आम्हांसी ॥ लहरी शोधी समुद्रासी ॥ किंवा पट तंतूसी ॥३३॥
नग म्हणे सोनें दाखवा ॥ घटा पुसे मृत्तिकेस भेटवा ॥ तेवीं तुझ्या पुसीचा गोवा ॥ विस्मय वाटे आमुतें ॥३४॥
क्षीरसिंधु म्हणे क्षुधा लागली ॥ वन्ही भावी ऊष्मा काहली ॥ तैसी तुझी मातें बोली ॥ कौतुकार्थ वाटते ॥३५॥
तूंही पुससी जाणून ॥ मीही सांगतों समजून ॥ या मृगजळीं जाण ॥ मिथ्या भ्रमें कुरंग ॥३६॥
रज्जूचा सर्प भासला ॥ त्याचा संशय पडिला ॥ तेवीं अविद्येचा गलबला ॥ मिथ्या कल्पना मनाची ॥३७॥
पापपुण्यांची जाती ॥ हे तों वांझेची संतती ॥ बागुलभयें बाळें पळती ॥ तैसी गति काळाची ॥३८॥
जन्ममरण चौर्‍यांशी जाणा ॥ हे स्वप्नीं दिसे भ्रमणा ॥ मी ब्रह्मबोध प्रकाशे मना ॥ तुर्या दया ती नांवें ॥३९॥
तंतु पट एक असे ॥ तेवीं जग आणि जगदीश ॥ हें ज्ञान गुरुकृपें वसे ॥ नातरी दिसे श्रमित ॥४०॥
पुरुष म्हणावें दीपास ॥ भार्या बोलिजे प्रभेस ॥ शिष्य नेमावें स्फुरणास ॥ ज्ञान गुरु समर्थ ॥४१॥
श्रोता जाणिजे मन ॥ वक्ता बुध्दि होय निपुण ॥ दोहींमाजी करी निरसन ॥ आत्मकळा एकची ॥४२॥
मरे अहंकार जाणा ॥ जन्म घेतसे वासना ॥ देहबुध्दी बंधना ॥ मी आत्मा मानी मुक्त तो ॥४३॥
उगीच निवांत बैसणें ॥ तो पुरुष जाणिजे खूण ॥ तोचि उठोनि खटपट दारुण ॥ प्रकृति जाण ती नांव ॥४४॥
निश्चय तो आकाश जाण ॥ चंचळ वायु करी भ्रमण ॥ तो थिरावल्या एकचि खूण ॥ दोन काय मोजावे ॥४५॥
बिंबप्रतिबिंबीं एक ॥ तेवीं जिवशिवाचा लेख ॥ जो अश्वावरी बैसे देख ॥ तो रथीं आरुढला ॥४६॥
केल्या कर्माचें आचरण ॥ तेंचि लिहिलें संचित जाण ॥ ते रेखा पुसे गुरुकपेन ॥ इतर उपाय श्रमची ॥४७॥
तुझ्या हृदयीं जें मीपण ॥ तोचि आत्मा निजखूण ॥ येथें सारावें दुजेपण ॥ आहे ज्याचा तोचि कीं ॥४८॥
नाभिकमळापासून ॥ जे स्फुरे आठवण ॥ चित्तातेंही चेतवून ॥ वर्तें सर्वांत जो साक्षी ॥४९॥
जो प्रकाशी चंद्रसूर्याला ॥ आकाशही ज्यामाजी सांठवला ॥ तोचि तुझ्या हृदयीं संचरला ॥ स्फुर्ति आंत प्रवेशे ॥५०॥
दारुगोळा भरली रंजक ॥ पलिता लावितां आवाज भडक ॥ लोपेचें अंत:करण नभ देख ॥ बोधभानु उदेला ॥५१॥
पवित्र सुवर्णकूपिका ॥ त्यांत गंगोदक देखा ॥ कीं सरस्वतीच्या मुखा ॥ वेद वस्तीस पातले ॥५२॥
लक्ष्मीस भाग्य पूर्ण ॥ तीस समुद्र पिता जाण ॥ मग दरिद्र कोठें राहण ॥ उदय सर्व सुखाचा ॥५३॥
आधींच लोपा सर्वज्ञ सती ॥ त्यावरी मुनीची बोधशक्ति ॥ मग अनुभवाची रीती ॥ किती म्हणोनी सांगावी ॥५४॥
यापरी लोपामुद्रेस ॥ अगस्तीनें केला उपदेश ॥ तोचि लाभ श्रोतयांस ॥ श्रुत केला श्रवणीं पैं ॥५५॥
यालागीं पुरुषालागोन ॥ स्त्री पाहिजे चातुर्यरत्न ॥ तरीच शोभा मंडण ॥ नातरी भंडिमा संसारीं ॥५६॥
आधींच हिंगाचें पोतें देख ॥ त्यात सांठविला गंधक ॥ पतीस परद्वारीं हरिख ॥ कांता त्याहून विशेष ॥५७॥
पतीस पाहिजे फार दारु ॥ पत्नी पेढयांची विषयभरु ॥ मग संसाराचा उपभरु ॥ किती फजीती सांगावी ॥५८॥
पुण्य असेल पदरीं प्रबळ ॥ तरी कांता मिळेल सुढाळ ॥ उभयलोकीं यश निर्मळ ॥ पावती पवित्र कीर्तीतें ॥५९॥
सुलोचना आणि मंदोदरी ॥ कैशा राहाटल्या निशाचरघरीं ॥ त्यांचीं कीर्ति वाल्मीकाचे वक्रीं ॥ विस्तारली विश्वातें ॥६०॥
असंख्य जाहले नृपती ॥ रावणाऐसी नये संपत्ती ॥ तयाची तरी अद्भुत ख्याती ॥ शिवही माथा डोलवी ॥६१॥
कोट तरी लंकाभुवन ॥ खंदक समुद्रा ऐका जाण ॥ सैन्याचें कोण करील गणन ॥ पद्म खर्व शंखनिधी ॥६२॥
जरी वर्णावें द्रव्यासी ॥ तरी नगर सुवर्णमय ज्यासी ॥ रत्नें पडलीं वाळू ऐसी ॥ कोणी त्यांसी पुसेना ॥६३॥
डोईचा मुगुट कोटीचा ॥ झगा ज्याचा दों लक्षांचा ॥ गळां हार पदकांचा ॥ जणों चंद्रसूर्य बैसले ॥६४॥
अठरा अक्षौहिणी वाजंतरे पाहीं ॥ वाजे दशनाद एक घाई ॥ ज्याच्या नौबतींची नवाई ॥ ध्वनि उमते कैलासीं ॥६५॥
दीप पोताल कापुराची ॥ दिवटी जळे सवालक्षाची ॥ खणोंखणीं कोंदणें हिर्‍यांचीं ॥ दीपांचें काम असेना ॥६६॥
सुरवर घरीं पाईक ॥ तीर्थें तिष्ठती जैसे रंक ॥ त्रैलोक्यीं ज्याचा धाक ॥ नवग्रह ते पायर्‍या ॥६७॥
जाहली संपदेची सीमा ॥ चढली गर्वाची गरिमा ॥ सूर्यास केतू लागतां काळिमा ॥ उणा तेजें मलिन तो ॥६८॥
उत्तम अन्न सुरस ॥ मक्षिका पडतां करी नाश ॥ गंध कालवितां चंदनास ॥ शोभा या काय उटीची ॥६९॥
डेरा भरी दुग्धांत ॥ लवण पडतां नाश ॥ होत तपतां अद्भुत ॥ किंचित् काम वरी बुडवी ॥७०॥
अमृतफळांचा रस केला ॥ हिंगाची फोडणी दिली त्याला ॥ तैसें रावण संपत्तीला ॥ गर्वे केली विनश्यती ॥७१॥
श्रीराम येऊनि लंकेवरी ॥ मारिलें पुत्रपौत्र बंधु समरीं ॥ असंख्य निशाचरांची बोहरी ॥ निर्मूळ केली मुळींसी ॥७२॥
हें समजोनि मंदोदरी ॥ स्वयें पातलीं सभेमाझारी ॥ रावणाचे चरणांवरी ॥ भाल ठेवी सहस्त्रदां ॥७३॥
म्हणे तुजसारिखा चतुर शाहाणा ॥ शोधितां न दिसे ब्रह्मांडीं जाणा ॥ बळाची तरी गणना ॥ किती म्हणवूनी सांगावी ॥७४॥
केलीं वेदांचीं खंडें पूर्ण ॥ एवढें तुमचें ज्ञान गहन ॥ शूरधीर राज्यकारण ॥ करुं जाणसी शाहाणिया ॥७५॥
दीपाखालीं दिसे अंधार ॥ केळगर्भीं काळी शीर ॥ तैसें तुमचें अंतर ॥ मातें दिसों येतसे ॥७६॥
प्रजापतीनें यज्ञ केला ॥ पुरोडांश सर्वदेवां दीधला ॥ शेखीं शिवाचा अव्हेर केला ॥ नाश जाहला यज्ञाचा ॥७७॥
अमृताचें अधण सोन्याची चरवी ॥ बुढीं कापुराचें इंधन लावी ॥ आंत पेढा शिजवी ॥ काय शहाणा बोलिजे ॥७८॥
वोजावलें शेत संवत्सरपर्यंत ॥ शेवटीं धोतरे पेरिले तेथ ॥ कल्पद्रुम तोडून लावी बाभुळेंतें ॥ हे काय करणी बरवी असे ॥७९॥
कर्दळीचे खुंट उपडिले ॥ भांगेचे बूड तेथें पेरिलें ॥ गाईचें खिल्लार विकिलें ॥ संग्रह केला कुक्कुटांचा ॥८०॥
त्यागून सद्वासनेसी ॥ संग कीजे कुवासनेसी ॥ करावें सख्य रामासी ॥ सांडा दुर्मती मनाची ॥८१॥
जेथें रीघ नाहीं काळाचा ॥ तेथें प्रवेश राघवाचा ॥ संहार केला कुळाचा ॥ मूळ रक्षी अझूनी ॥८२॥
राम नव्हे मानवी नर ॥ हा परमेश्वर अवतार ॥ त्यासी लावूनि वैराकार ॥ घर आपुलें बुडविलें ॥८३॥
ज्यासाठीं तप अनुष्ठान ॥ त्यासीं तुझें संधान ॥ कामधेनूवरी धावण ॥ काठी घेऊनि उचित कीं ॥८४॥
घरा आला क्षीरसिंधू ॥ अव्हेरुन स्वीकारी कांजी बिंदू ॥ सन्निध बैसल्या इंदू ॥ ऊष्मा त्याचा मानवा ॥८५॥
पाहोन लक्ष्मीचें वदन ॥ मनीं कल्पावें द्वाड म्हणोन ॥ अथवा परीस करीं धरुन ॥ गोफणगुंडा करावा ॥८६॥
शिबिका दिलीं श्रीमंतान ॥ कासया पदीं इच्छावें गमन ॥ सदाशिव जाहलिया प्रसन्न ॥ चौर्‍याशीं जन्म त्यागावे ॥८७॥
चक्षुहीना न दिसे रवी ॥ आज्ञानासी प्रपंच अधीं गोवी ॥ अहंकार अवघियांस बुडवी ॥ केलीं साधनें वृथा करीं ॥८८॥
आतां माझी हे विज्ञापना ॥ शरण जावें रघुनंदना ॥ तुळसी रोप दिसे साना ॥ परी तें पूज्य सर्वांगी ॥८९॥
राया करीं तू आपुलें कल्याण ॥ घालीं रामासी लोटांगण ॥ चुकवी नरकवास दारुण ॥ बैसे पदीं मोक्षाचे ॥९०॥
गेले पुत्र स्नुषा नातू पणतू ॥ जाहला अवध्यांसि कल्पांतू ॥ महाशोक सागरांतू ॥ किती बुडावें सांग पां ॥९१॥
गेला इंद्रजितासारिखा कुमर ॥ कुंभकर्ण प्रतापी वीर ॥ प्रहस्त प्रधान निशाचर अपार ॥ काळचक्रें आटले ॥९२॥
देवापरीस राक्षस गाढ ॥ उदकीं पर्वत तरले जड ॥ त्त्यांवरुन वीर आले दृढ ॥ हें कौतुक तव नव्हे ॥९३॥
एके बाणें मारिली ताटिका ॥ सुबाहु निवटोनि मारीचास दाविली लंका ॥ सिध्दी नेलें ऋषीच्या मखा ॥ केला उध्दार अहिल्येचा ॥९४॥
तुम्ही धनुष्य उचलितां भागलां ॥ रामें भंगोन पर्णिली जनकबाळा ॥ परशुराम जिंकोनि अयोध्येस गेला ॥ मात कर्णी ऐकिली ॥९५॥
प्रतापें आलें पंचवटिका ॥ चौदा सहस्त्र राक्षस निवटोनि देखा ॥ विटंबिली शूर्पणखा ॥ केला मुक्त जटायू ॥९६॥
कबंध मारोनि पंपासरोवरीं ॥ पावन केली भिल्लटी शबरी ॥ करुनी सुग्रीवासी मैत्री ॥ वाली बलाढय निवटिला ॥९७॥
उदकीं तारुण पाषाण ॥ उतरलें अठरा पद्म सैन्य ॥ सुवेळेस ठाणें घालून ॥ लंकेचे हुढे ढांसळले ॥९८॥
भविष्य जाणोनि बळकट ॥ बिभीषणें केलें चोखट ॥ गेला श्रीरामानिकट ॥ मरणार्णवांतूनी निघाला ॥९९॥
रामासि घाली लोटांगण ॥ म्हणे मी शरणागत हीन ॥ रामें चिरंजीव केला जाण ॥ चंद्रसूर्य तों वरी ॥१००॥
तुम्हासि धाडावें स्वर्गलोका ॥ बिभीषणासी दीधली हेमलंका ॥ हा संकल्प रामें देखा ॥ केला निश्चय मी जाणें ॥१॥
जानकी धरोनियां करीं ॥ दयावी श्रीरामाची सुंदरीं ॥ तो जाईल अयोध्यानगरीं ॥ इतुकेन कल्याण आपुलें ॥२॥
परिसोनि मंदोदरीची वाणी ॥ रावण संतोषला मनीं ॥ मग हृदयीं आलिंगोनी ॥ गुज सांगे तियेतें ॥३॥
तूं बोलसी तितुकें सत्य ॥ मीही जाणें त्याचा अर्थ ॥ परंतु होणार बळवंत ॥ त्यासी काय करावें ॥४॥
विधीनें लीहिलें ललाटीं ॥ तें काय चुकेल कर्म रहाटी ॥ भोक्तृत्व असे बळकट गांठी ॥ कोण सोडी सांगपां ॥५॥
आकारलें तें जाईल सहजें ॥ याचा खेद कासया कीजे ॥ दिसे तितुकें वाझें ॥ इंद्रधनुष्यासारिखें ॥६॥
अभ्र जुळे आणि वितुळे ॥ तैसा संसाराचा घडे खेळे ॥ सागटा खेळतां निमाले आणि उठिले ॥ काय सत्य कल्पावें ॥७॥
तरंगाचे जन्ममरणीं ॥ शोक नसे समुद्रालागूनी ॥ लक्ष्मी जाईल हे कांचणी ॥ विष्णुलागीं नसे कीं ॥८॥
कला तुटती वाढती ॥ चंद्रास खेद नसे चित्तीं ॥ राहाटमाळिके गती ॥ एक रिक्त एक भरे ॥९॥
देह पंचभूतांचा गोळा ॥ पंचभूतांचा संचला मेळा ॥ निमाला तो कोणीकडे गेला ॥ भूतां वेगळा जाण पां ॥११०॥
म्हणती काळें खादला ॥ भूतांचा नाश नाहीं जाहला ॥ दुग्ध हालविल्या साईला ॥ गेली कोठें सांग पां ॥११॥
दीपाची ज्योति मालविली ॥ न दिसे तरी काय निमाली ॥ फिरोनि लावितां संचली ॥ तूंचि सांगें मजप्रती ॥१२॥
मुळीं तेज अक्षयी असे ॥ यालागीं दीपाचा नाश नसे ॥ तेज आटल्या होणें दीपास ॥ हें तो कदापि घडेना ॥१३॥
वायु भरलासे सर्वांत ॥ कुडींत प्राण येत जात ॥ वायु नसल्या कुडींत ॥ मग कोठोनी येईल ॥१४॥
गगनीं असे तरणी ॥ तो बिंबला दिसे जीवनीं ॥ उदक आटतां बिंबालागोनीं ॥ नाश कैसा घडेल ॥१५॥
जीव ब्रह्मींचा अंश ॥ तो लिंगदेह बिंबला दिसे ॥ जाणीव रुपें चित्तीं भास ॥ नसे नाश यालागीं ॥१६॥
भूतें मिळती भूतांचे ठायीं ॥ जीव ब्रह्मींहूनि वेगळा नाहीं ॥ तूं कासया खेद करिशी देहीं ॥ नसतां नाश तत्वांचा ॥१७॥
पंचभूतांचा गोत्रज एक ॥ तुझाचि पुत्र कोठोनि आला अधिक ॥ विश्व मरे त्याचा न करी शोक ॥ तें कां गोत्रज आपुलें नव्हे ॥१८॥
तूंचि सर्वांचें हृदयीं वससी ॥ वोळखीं आपुलिया आत्मयासी ॥ जाणीव कळा जे तुजपासी ॥ तूंचि तुझा आत्मा कीं ॥१९॥
मुंगीपासोनि हरिहरांत ॥ जे जाणतीकळा वर्तत ॥ तोचि आत्मा सर्वांत ॥ स्फुरणवंत वसे हृदयीं ॥१२०॥
कैंचा राम आणि रावण ॥ स्फुरे एकचि चैतन्य ॥ हें ज्ञान मी जाण ॥ तूं कां खेद हा करिसी ॥२१॥
हें आत्मज्ञान म्यां आपुलें ॥ तुझ्या हृदयीं ठेविलें ॥ बाहेर वैर लोकां दाविलें ॥ अंतरीं रामाचा सखा मी ॥२२॥
राम निर्गुण निराकार ॥ पूर्ण ब्रह्म साचार ॥ हा मी जाणें विचार ॥ नसे भ्रांति मजलागीं ॥२३॥
जो नातुडे तपें करितां युगायुगीं ॥ तो राम आला मजभेटीलागीं ॥ माझें भाग्य विशाळ जगीं ॥ जोडा नसे ब्रह्माण्डी ॥२४॥
जो वेदांचें ठेवण ॥ जो माझ्या घरा आला चालोन ॥ ब्रह्मादिकांचें ध्यान ॥ त्याहूनि लाभ कोणता ॥२५॥
म्हणती बिभीषण शरण गेला ॥ चिरंजीवपद पावला ॥ देहलोभें भागविला ॥ नाहीं जाहला निजवस्तू ॥२६॥
माझी मी जाणें खूण ॥ राम माझा सखा पूर्ण ॥ हें तूं समजोनि जाण ॥ सुखें वसे स्वगृहीं ॥२७॥
यापरी रावणान ॥ बोध केला अंगनेलागून ॥ येरी तन्मय होऊन ॥ मौनें गेली सदनातें ॥२८॥
रावणमंदोदरीसंवादसुख ॥ रामायणी वदला ऋषि वाल्मीक ॥ त्यांतील सारांश देख ॥ काढोनि अर्थ म्यां लिहिला ॥२९॥
अध्यात्म समजावयाकारण ॥ दृष्टांत योजिला रामायण ॥ ज्यांत अनुभव पूर्ण ॥ तो इतिहास मांडिला ॥१३०॥
गुरुकृपेचा वर्षे घन ॥ अंत:करण शहाचें बोलाऊन ॥ ज्ञानकोंभ उदेला गहन ॥ अनुभव शाखा विस्तारल्या ॥१३१॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये एकचत्वारिंशोध्याय: ॥४१॥
अध्याय ॥४१॥ ओव्या ॥१३१॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP