मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ४४ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ४४ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीगुरुदत्तात्रेयाय नम: ॥
आवडीं नमूं संतसज्जन ॥ जे जगावर दयावंत पूर्ण ॥ सर्वां भूतीं समसमान ॥ लक्षिती ब्रह्म एकचि ॥१॥
दुर्जन बोलिला कठोर वचनें ॥ त्यावरी त्याणीं दया करणें ॥ जैसा चंदनाचा गुण ॥ घांसिल्या सुगंधें तोषवी ॥२॥
फूल ज्याणें तळहातीं चोळिला ॥ त्यानें त्यास सुगंध अर्पिला ॥ परीस घणानें फोडिला ॥ त्याणें केला कांचन ॥३॥
इक्षुदंड चाकूने कापितां ॥ त्यासि गोडीच देई तत्वतां ॥ कस्तूरी मृत्तिकेंत कालवितां ॥ मातीस आणी सुगंध ॥४॥
मोहरा न जाळी सुतासी ॥ साधु उध्दरी दुर्जनासी ॥ धर्में दुर्योधनासी ॥ कुभीपाकांतून काढिलें ॥५॥
जड खिळे लोखंडाचे ॥ जळांत तरती संगें नौकेचे ॥ कासेस लागल्या पेटीचें तारावें हा गुणचि ॥६॥
क्षारसमुद्र मेघ प्राशिती ॥ जगासि गोड करुनि दाविती ॥ सर्प पय पवित्र पिती ॥ विष गरळ त्यां मुखीं ॥७॥
आतां असो हा दृष्टांत ॥ भल्यास क्षमा उचित ॥ मातेनें बोधिला सुत ॥ तेचि कथा परिसावी ॥८॥
ते मैनावतीचा उपदेश ॥ गोपीचंदें आणिला मनास ॥ मग चालिला गुरु करावयास ॥ तों जालंधर देखिला ॥९॥
मेल्या उंटाचे सांपळ्यांत ॥ जालंधर पहुडला असे आंत ॥ चिंध्या गुंडाळल्या हातापायांत ॥ चहूकडे दर्पे दुर्गंधी ॥१०॥
रायें त्रास घेतला चित्तीं ॥ हा पिशाचा अमंगळ जाती ॥ यातें गुरु केल्यानें फजीती ॥ जगामाजी होईल ॥११॥
रायें आज्ञापितां दूत ॥ उचलोनि टाकिला कूपांत ॥ वर्ते लोटोन केर बहुत ॥ स्वगेंहीं राव प्रवेशला ॥१२॥
जालंधर सामर्थ्याचा पुतळा ॥ अधरीं आसन घालूनियां बैसला ॥ केर वरच्यावर थोकला ॥ काय सत्ता पडावया ॥१३॥
जालंधराचा शिष्य कानिफा जोगी ॥ शोधीत फिरे गुरुलागीं ॥ सामर्थ्याचा महायोगी ॥ पराक्रमें आगळा ॥१४॥
वनीं हिंडतां श्रमली काया ॥ पाहोनि वृक्षाची शीतळ छाया ॥ सहज गेला बैसावया ॥ तों गोरखी तेथें देखिला ॥१५॥
सिध्द सिध्दानें वोळखिले ॥ आवडीं उभयतां भेटले ॥ मग वृक्षाखाले बैसले ॥ करिती सुखाच्या गोष्टी ॥१६॥
गोरखी म्हणे कानिफासी ॥ आंबे लागले वृक्षासी ॥ भक्षावया इच्छा मानसीं ॥ तूं सामर्थें आणावे ॥१७॥
कानिफानें वृक्षासि पालविलें ॥ आंबे उतरोनि समग्र आले ॥ पुढें ढीग पडिले ॥ भक्षा म्हणे नाथासी ॥१८॥
उभयतांनीं बैसोनि भक्षिले ॥ अपार पुढें उरले ॥ नाथ म्हणे वायां जातील ॥ लावा जेथील तेथेंची ॥१९॥
परतोनि लावावयाची कळा ॥ कानिफा म्हणे नाहीं मजला ॥ जा ऐसें नाथ बोलिला ॥ गेले आंबे स्वस्थानीं ॥२०॥
कानिफा बोले तूं समर्थ ॥ महिमा दाविला अद्भुत ॥ काय नम मज त्वरित ॥ वाचें उच्चारीं ऐकों दे ॥२१॥
नाथ म्हणे मी गोरखी ॥ ज्ञानलोचनीं पारखी ॥ गुरु समर्थ मस्तकीं ॥ मत्स्येंद्र नाम विख्यात ॥२२॥
हें परिसोन कानिफा हांसला ॥ म्हणे तुझा गुरु म्यां देखिला ॥ घेऊनि वनितेचा पाळा ॥ क्रीडें विषयकर्दमीं ॥२३॥
त्यागिली वैराग्यपेठ ॥ जाहला अनंगलंपट ॥ वन्हीवर ठेविला घृतघट ॥ केवीं थिजोनी राहील ॥२४॥
गुरुनिंदा कठिण ऐकोनी ॥ संतोष गोरखीचें मनीं ॥ शोध करितां जनीं वनीं ॥ ठायीं पडला गुरुमूर्ती ॥२५॥
नाथ बोले तूं कोण ॥ सांग तुझें नाम उच्चारुण ॥ येरु वदे कानिफा जाण ॥ शिष्य जालंधराचा ॥२६॥
नाथ बोले तुझिया गुरुतें ॥ गोपीचंदें टाकिलें कूपाआतौतें ॥ वरी लीद वाढली बहुत ॥ तुझी प्रतिष्ठा भली नव्हे ॥२७॥
दोघे पावोन संतोष ॥ अलेख बोलोन येरयेरांस ॥ जाते जाहले गुरुभेटीस ॥ त्यांची कथा पुढें ऐका ॥२८॥
गोरख गेला स्त्रीराज्यांत ॥ कानिफा आला गौडबंगाल्यांत ॥ शिष्यसमुदाव घेऊनि त्वरित ॥ महारोषें पातला ॥२९॥
रायास कळलें वर्तमान ॥ थोर महंत आला चालोन ॥ याचें घ्यावें दर्शन ॥ समर्थ गुरु होय कीं ॥३०॥
भेटीस आला उतावेळीं ॥ भाल ठेविलें पादकमळीं ॥ कानिफा म्हणे मेळवीन धुळीं ॥ शिक्षा करीन तुजलागीं ॥३१॥
कानिफा कोपला दारुण ॥ मैनावती आली धांवोन ॥ घाली साष्टांग लोटांगण ॥ क्षमा करीं समर्था ॥३२॥
गुरुउपदेश मजलागूनी ॥ तुझी धाकुटी बहिणी ॥ भिक्षा मागतें पदर पसरोनी ॥ गोपीचंदास रक्षावें ॥३३॥
येणें केला अपराध ॥ कूपांत घातला महासिध्द ॥ तो कोपल्या होईल दग्ध ॥ करी उपाव वांचेसा ॥३४॥
पायांवरती ठेवितें डोई ॥ पुत्रदान मज देईं ॥ तूं होऊन कृपेची आई ॥ कोपप्रळयांतून काढीं ॥३५॥
मैनावतीचे भिडेस्तव ॥ कानिफासी आली परम कवण ॥ तुझा वांचवीन चिरंजीव ॥ भय न धरीं मानसीं ॥३६॥
कानिफा म्हणे गोपीचंदासी ॥ तूतें घडल्या अपराधराशी ॥ कूपांत टाकिलें गुरुसी ॥ हा अन्याय त्वां केला ॥३७॥
तो जालंधर महाराज ॥ ज्याचे सामर्थ्याचा ध्वज ॥ पाहोनि चंद्रसूर्या लाज ॥
भय मानिती हरिहर ॥३८॥
जो परमेश्वरी पुरुष ॥ त्यासि वंदिजे जगदीश ॥ शुभ अशुभांचा भास ॥ लेश त्यापासीं असेना ॥३९॥
क्षीरसिंधूच्या पोटीं ॥ विष कैंचें पडेल दृष्टी ॥ तेवीं एक ब्रह्मींची राहाटी ॥ अमंगळ काय कल्पावें ॥४०॥
विटाळ हेचि कल्पना ॥ तेंचि पापाचें मूळ जाणा ॥ ज्याची शुध्द वासना ॥ त्यास शुध्द सर्वही ॥४१॥
अमंगळें भरलें शरीर ॥ बाहेर सोंवळ्याचा प्रकार ॥ गंधक होईल मैलागिर ॥ हें कैसें घडेल ॥४२॥
कोणी एक सिध्द पुरुष ॥ सामर्थ्यवान् विशेष ॥ सोंवळें वागवी बहुवस ॥ स्पर्श कोणास करीना ॥४३॥
एके दिवसीं मार्गीं जातां ॥ तृषेनें शोक जाहला चित्ता ॥ पुढें ओहळ आढळला अवचितां ॥ त्यांत विहिरा देखिला ॥४४॥
विहिर्‍याजवळ येऊनि पाहे ॥ तंव पादरक्षेचे पाय ॥ म्हणे मूर्खानें प्राशिलें तोय ॥ उपानह दूर नाहीं ठेविलें ॥४५॥
मग भोंवती वाळू झाडूनी ॥ विहिरा दाहावेळ उपसोनि ॥ वोंजळींत घेतलें पाणी ॥ तो कल्पना उठली ॥४६॥
कोणे यातीचा नर ॥ प्याला असेल महार चांभार ॥ ऐसा करुन विचार ॥ उदक हातीचें टाकिलें ॥४७॥
तृषा लागली अपार ॥ जवळी नाहीं सरिता विहिर ॥ म्हणे प्यावें हेंचि नीर ॥ झाडोनि विहिरा उपसावा ॥४८॥
देवें दाविला चमत्कार ॥ त्वरें उपसितां नीर ॥ मेल्या पशूचें ढोंपर ॥ आलें हातीं लागलें ॥४९॥
बहु त्रासला मनास ॥ जीव जाहला कासाविस ॥ स्पर्शलों अपवित्र अमंगळास ॥ प्रायश्चित्त घेतां बहु बरें ॥५०॥
चहुंकडे पाहे रोंषें ॥ पुढें देखिला एक पुरुष ॥ त्यासी कोण असें पुसें ॥ देव म्हणे मी ओहळ ॥५१॥
त्यावर रागें बोलीला ॥ कांरे सांठविलें अमंगळा ॥ त्याणें दाविलें वरुतें डोळा ॥ गंज पडिले विष्ठेचे ॥५२॥
म्हणे कोण पाप गांठी ॥ पडली अमंगळाची मिठी ॥ ओहळा तुझी जाहली भेटी ॥ बहु दोषी मी जाहलो ॥५३॥
ओहळ वदे महापुरुषा ॥ पवित्र असे माझी दशा ॥ पर्जन्यकाळीं मळ सरिसा ॥ गंगेमाजी टाकितों ॥५४॥
मी पवित्र निर्मळ ॥ मजपें थोर नाहीं मळ ॥ हें परिसोनि उतावेळ ॥ योगी आला गंगेपासी ॥५५॥
गंगा म्हणोनि हांक मारी ॥ तंव ती ठाकुली पुढारीं ॥ ओहळांतील अमंगळ भारी ॥ तूं कां उदरीं सांठविसी ॥५६॥
गंगा वदे जी समर्थ ॥ ओहळ आणि तो अमंगळ बहुत ॥ नेऊनि टाकीं तो समुद्रा आंत मी पवित्र सर्वदा ॥५७॥
तेथून निघाले तापसी ॥ गेले समुद्रतीरासी ॥ हांक मारितां सिंधूसी ॥ तोही उभा ठाकला ॥५८॥
योगी म्हणे सागरा ॥ तुझ्य़ा पोटीं रत्नें हिरा ॥ या जगाचा मळ सारा ॥ तूं कां उदरीं सांठविसी ॥५९॥
समुद्र म्हणे त्याचें कारण ॥ लवण पदार्थ निर्मितों जाण ॥ तो अन्नरसांत मेळवूनी ॥ रुचि आणितों स्वामीस ॥६०॥
अरे पृथ्वीवर अमंगळ जाती ॥ आम्ही स्वयें करितों उत्तम याती ॥ मग पाहे देहाची स्थिती ॥ विटाळाचा वोतींव ॥६१॥
तेव्हां कल्पना त्याची निमाली ॥ निर्विकल्पदशा बाणली ॥ मग ईश्वरें भेट दिली ॥ मुक्त केला स्वयें तोचि ॥६२॥
राया ज्याची बुध्दि कल्पक हें देख ॥ तेथेंचि घडे महापातक ॥ विकार मत्सर सर्वही ॥६३॥
त्या विश्वाचें मूत्र मळ अमंगळ ॥ पृथ्वीवरी पडे सकळ ॥ तितुकेही उपद्रव सकळ ॥ साहे थोर म्हणोनि ॥६४॥
पर्जन्य सर्वांवरी सारिखा ॥ सूर्य सर्वां वागवी लोकां ॥ एक वन्हि विश्वाघटीं देखा ॥ एकच वायु प्राणमय ॥६५॥
सर्वांघटीं आत्मा एक ॥ पाप पुण्य काल्पनिक ॥ थुंकोनि सांडी भेद भ्रांतिक ॥ करी शुध्द वैराग्य ॥६६॥
वैराग्यभाग्यें परम शुध्द ॥ त्या वैराग्यांत परम शुध्द ब्रह्मानंद ॥ होसी सुखाचा सोलींव कंद ॥ द्वैतबाधा असेना ॥६७॥
तुझे अपराध केल क्षमा ॥ भेटवितों गुरुसत्तमा ॥ ज्याचा अगाध अपार महिमा ॥ उध्दरे जीव तत्काळीं ॥६८॥
गुरुकृपेची राशी ॥ गुरु मायबाप सर्वांसी ॥ गुरु बैसवी मोक्षपदासी ॥ दयाळू मायाळू कनवाळू ॥६९॥
त्या गुरुचा नेणोनि महिमा ॥ वर्तलासि अन्यायकर्मा ॥ आतां तुझ्या भ्रांतीची काळिमा ॥ उडाली किंवा नाहीं ॥७०॥
परिसोनि कानिफाचा बोध ॥ रायाचा गेला तम अंधमद ॥ मग होऊनियां सद्गद ॥ घाली लोटांगण भावार्थें ॥७१॥
आधींच मातेचा उपदेश ॥ केला होतां ठांसून सुरस ॥ त्यावरी कानिफानी केलें विशेष ॥ मग साहित्य किती सांगावें ॥७२॥
मग अनुतापला भारी ॥ म्हणे मी पतित या संसारीं ॥ पापवासना अघोरी ॥ त्यांत बुडालों दयाळा ॥७३॥
केल्या अपराधांच्या राशी ॥ गणित नाहीं पापकर्मांसी ॥ आचरलों दुष्ट बुध्दीसी ॥ बहु भोगिल्या अंगना ॥७४॥
अहर्निशीं विषयीं रत ॥ नाहीं पाहिलें म्यां स्वहित ॥ मातेनें सांगितलें हित ॥ भ्रांति पडली दिसेना ॥७५॥
आतां तुझ्या पायाची शपत ॥ विषय थुंकिला म्या समस्त ॥ येथोनि वनितारत ॥ मात्रागमन मज घडो ॥७६॥
बसल्या अन्नावर वासना ॥ कोणाची होईना जाणा ॥ ऐसें वाटलें माझ्या मना ॥ निश्चय साक्षी ईश्वर ॥७७॥
काय फजितीचें जिणें ॥ कोण भोगी नरक दारुण ॥ किती सोसावे जन्ममरण ॥ दु:खदायक शोकसार ॥७८॥
ज्या ज्या योनींत जन्म पावे ॥ तेथें मातेचें चाम चोखावे ॥ विष्ठमूत्रांत लोळावें ॥ धिक्कार आम्हांस देह धरुं ॥७९॥
आतां हेंचि प्रायश्चित्त ॥ पुन्हां नाचरे मी अनुचित ॥ तूं भेटलासि समर्थ ॥ करीं कृपा मजलागीं ॥८०॥
शुध्द पाहोनियां अनुतापा ॥ करुणा आलीसे कानिफा ॥ म्हणे भेऊंनको बापा ॥ करितों कल्याण अक्षयी ॥८१॥
आलिंगोनी पोटासी धरिला ॥ शिरीं अभय हस्त ठेविला ॥ भिऊं नको वांचवितों तुजला ॥ गुरुकोपापासोनी ॥८२॥
उकरडा झाडोनि काढिले ॥ तीन पुतळे धातूचे केले ॥ कूपापासी ठेविले ॥ केला गोपीचंद मागें उभा ॥८३॥
कानिफा करी आदेश गुरुला ॥ जालंधर बोले कोण आला ॥ कानिफा वदे शिष्य आपुला ॥ जवळ राजा गोपीचंद ॥८४॥
भस्म होईं गुरु बोले ॥ धातुपुतळे भस्म जाहले ॥ गोपीचंदास भय वाटलें ॥ बरें कांही दिसेना ॥८५॥
कानिफा म्हणे आदेश गुरुजी ॥ मजपासी गोपीचंद दाजी ॥ शिष्य करा आपुलाजी ॥ क्षमा कीजे अपराध ॥८६॥
तूं दयाळ मायाळ शीतळ चंदन ॥ अमृताचा समुद्र पूर्ण ॥ त्यापें विष विषाद वसण ॥ केवीं घडे महाराजा ॥८७॥
भृगूनें विष्णूस मारिला चरण ॥ तेणें हृदयीं वाहिला जाण ॥ थोरांस क्षमा भूषण ॥ इक्षुदंड यापरी ॥८८॥
परीस फोडोनि गेला घन ॥ तेणें दिले सुवर्ण भूषण ॥ फुलें तोडी विषयी जन ॥ तो देई सुगंध ॥८९॥
पादरक्षासहित पाव ॥ पिंडीवर ठेवी भिल्लराव ॥ प्रसन्न जाहले महादेव ॥ हें थोरांचें उचित ॥९०॥
विश्व हे आपुले अवयव जाहले ॥ ते जीव अपराध आचरले ॥ ते स्वयें आपणचि केले ॥ दुजे कोण गुरुराया ॥९१॥
तूंचि निर्गुण आणि सगुण ॥ विश्व अवघें तुझें पूर्ण स्फुरण ॥ हेलावती तरंगवत् जाण ॥ तळीं निश्चळ तूंचि कीं ॥९२॥
विनंति परिसोन जालंधर ॥ कृपेनें हेलावला अपार ॥ होई गोपीचंदा अजरामर ॥ आशीर्वादें माझिया ॥९३॥
अमर असो तुझी काया ॥ तुजवर न पडो काळाची छाया ॥ कधीं न बाधो मोहाची माया ॥ जावो लया त्रिविधताप ॥९४॥
ऐसें बोलोन उतर ॥ बाहेर निघाला जालंधर ॥ कानिफा करी नमस्कार ॥ गोपीचंद घाली लोटांगण ॥९५॥
मैनावती लागे पायां ॥ ओवाळूनि सांडिली आपुली काया ॥ श्रमविलें योगिराया ॥ तें त्वां मना नाणिलें ॥९६॥
तूं क्षमेचा सागर ॥ मेरुपरिस अधिक धीर ॥ धरिलीसे शांति अपार ॥ उपमे क्षिती कठिण ॥९७॥
ज्यापें शांतो तो ब्रह्मरुप ॥ शांत पुरुष ज्ञानाचा दीप ॥ शांतीचें पदचि अनूप ॥ तया नसे उमाणिता ॥९८॥
कदर्य़ूची अपार शांती ॥ त्याचें भूषण मिरवे भगवंतीं ॥ वदला रुक्मिणीचा पती ॥ उध्दवापासी आवडीं ॥९९॥
जालंधर म्हणे नलगे स्तवन ॥ तुम्हीं माझे जीव प्राण ॥ मग गोपीचंद उपदेशून ॥ केला प्रकाश बोधाचा ॥१००॥
भस्म लाविलें सर्वांगीं ॥ झोळी पात्र घेतलीं सिंगी ॥ रंगूनि गेला वैराग्यरंगीं ॥ घातली मेखळा डोईस टोपी ॥१०१॥
हाती कुंचा किंगरी घेऊन ॥ बोले अध्यात्मसिध्द लक्षण ॥ निर्भय नि:शंक आनंदमन ॥ भिक्षा करी घरोघरीं ॥२॥
त्याचा पुत्र माणिकचंद ॥ त्यासि दिलें राज्यपद ॥ कानिफा जालंधर निजानंद ॥ गेले तीर्थें करावया ॥३॥
यावरी गोरखनाथाची कथा ॥ विवेकें परिसावी श्रोतां ॥ मत्स्येंद्र गुरु शोधितां ॥ स्त्रियाराज्यीं पातला ॥४॥
मत्स्येंद्र राजपदीं बैसोनी ॥ चंपावती पर्णिली राणी ॥ पुत्र जन्मला शुभलक्षणी ॥ नांव ठेविलें मीननाथ ॥५॥
गोरखीचें भयेंकरुन ॥ चौक्या ठेविल्या नगराबाहेर ॥ जोगी जंगम सैन्यासी जाण ॥ येऊं नेदी गांवांत ॥६॥
हें समजोन गोरखानें ॥ कंचनीचा मृदंग्या होऊन ॥ त्यांसंगें प्रवेश करुन ॥ नगरामाजी राहिला ॥७॥
एके विससीं मत्स्येंद्रसभेसी ॥ कंचनी गेल्या नाचावयासी ॥ गोरखनाथ त्यांपासी ॥ मृदंग वाजवी बहुछंदें ॥८॥
नाच जाहला एक प्रहर ॥ गोरख दावी चमत्कार ॥ मृदंगांतून घनघोर ॥ विपरीत नाद उठविला ॥९॥
उठ मत्स्येंदर गोरख आला ॥ चला जाऊं तपोवनाला ॥ थुंकोनि सांडा राज्यपाला ॥ जाग अक्षयी चांग दिसे ॥११०॥
वैभवसत्ता त्रिलोकीचीं ॥ त्यापुढें राज्य नरकाडी छी छी ॥ ऐसी ध्वनि मृदगाची ॥ उठती जाहली सभेंत ॥११॥
चमत्कारिला मत्स्येंद्रनाथ ॥ गोरखी पातला आजि येथ ॥ ज्ञानदृष्टीनें लक्षितां तेथ ॥ गोरखाते वोळखिलें ॥१२॥
धांवूनि गळां घातली मिठी ॥ गुरुशिष्यांच्या जाहल्या भेटी ॥ संतोष पावोनि पोटीं ॥ आनंदाश्रु लोटले ॥१३॥
सभेच्या लोकां आज्ञा देऊन ॥ एकांतीं बैसले दोघेजण ॥ क्षेम कल्याण कुशल जाण ॥ येरयेरां पुसती ॥१४॥
मत्स्येंद्र बोले या समया ॥ बरा भेटलासि सखया ॥ सुखें वसूं या ठायां ॥ सर्व अनुकूल असे कीं ॥१५॥
गोरख म्हणे या गोष्टी ॥ थुंकोनि सांडा राज्यराहाटी ॥ श्रेष्ठ अनुभवाची कसोटी ॥ त्यापुढें असे तुच्छ हे ॥१६॥
कोठें रवी कोठें काजवा ॥ हंस उडवूनि काग पोसावा ॥ हिरियासंगें काच मिरवा ॥ केशर पंक्तीस कर्डईफुलें ॥१७॥
कोठें सुर कोठें भोगाडा ॥ कोठें रथ कोठें गाडा ॥ कोठें रासभ कोठें घोडा ॥ कोठें शिबिका पाळणा ॥१८॥
कोठें इंद्रसभा कोठें ग्रामचावडी ॥ कोठें कैलास कोठें गोसाव्यांची मठी ॥ कोठें हनुमंत कोल्हाटी उडी ॥ कोठें चंदन कोठें हिंगण ॥१९॥
तैसा संसार आणि परमार्थ ॥ पाहतां दोहींस अंतर बहुत ॥ अहो बध्द आणि मुक्त ॥ केवीं येती समसुखा ॥१२०॥
सुधासमान तक्रगोडी ॥ परीस लाविला इतर दगडी ॥ गुरुगोडी आणि गुडगुडी ॥ हे काय तलब सारिखी ॥२१॥
गज टोणगा रत्न गारा ॥ राजा रंक मूर्ख चतुरा ॥ इंद्रियजित इंद्रियभ्रष्ट नरा ॥ पय शर्करा सम कांजी ॥२२॥
गंधर्व गायनाचें तान ॥ त्यासम अस्वल गुणगुण ॥ नारदा ऐसें चाहाडाचें कथन ॥ विष्णू ऐसे दशअवतारी ॥२३॥
वैदिक आणि चार्वाक ॥ कर्मनिष्ठ देख ॥ दयावंत आणि हिंसक ॥ साधू भोंदू सारिखे ॥२४॥
सिध्दाची सिध्दमुद्रा ॥ त्यासमान भांगियाची निद्रा ॥ स्मशानीं वस्ती केली रुद्रा ॥ भूतेंही तैसी खेळती ॥२५॥
विषयानंद अल्पबिंदु ॥ ब्रह्मानंद अगाधसिंधू ॥ दैत्य आणि गोविंदू ॥ एकरुपी गणावे ॥२६॥
ब्रह्मा सृष्टि घडी मोडी ॥ कुलाल तोही मडकी घडी ॥ कारागीर आव साधून चित्रें काढी ॥ जीवनकळा येईल कीं ॥२७॥
ज्ञानी आणि प्रपंची ॥ दोघांसि केवीं एक रुची ॥ ज्ञात्यास समाधि आनंदाची ॥ प्रपंची धुपे गौरीसा ॥२८॥
विनंति परिसा गुरुराया ॥ जावें तीर्थें करावया ॥ ज्यांत न बोध अविदया माया ॥ फिरूं निर्भय मोकळे ॥२९॥
शकुनळिकान्यायें गुंतुं नका ॥ साधूं आपली योगभूमिका ॥ आत्मज्ञान मिरास देखा ॥ अक्षयीं नांदूं जन्मभूमी ॥१३०॥
परिसोनि गोरखअनुभवासी ॥ मत्स्येंद्र उगाचि राहिला मानसीं ॥ मौनेची उठिला भोजनासी ॥ बाळ विष्ठेनें माखला ॥३१॥
गोरखासि म्हणे धुवोनि आणीं ॥ नाथें कडेवर घेऊनी ॥ नदीस शिळेवर आपटोनी ॥ चर्म त्याचें काढिलें ॥३२॥
अस्थिमांस टाकिलें उदकांत ॥ चर्म पसरिलें घरावरुतें ॥ जाऊन बैसला भोजनातें ॥ स्वस्थ चित्तें निर्भय ॥३३॥
मत्स्येंद्र पुसे मूल काय जाहलें ॥ येरु म्हणे घरावर वाळूं घातलें ॥ मत्स्येंद्र पाहे तो चर्म देखिलें ॥ हें काय केलें गोरखी ॥३४॥
बाळ मारिला गोरखीनें ॥ वार्ता ऐकिली चंपावतीनें ॥ सकळ कामिनी मिळोन ॥ शोकें केला आक्रोश ॥३५॥
मत्स्येंद्रही रडे तेथें ॥ म्हणे गोरखी काय केला अनर्थ ॥ येरु मनामाजी हांसत ॥ म्हणे कोण वेड मायेचें ॥३६॥
हा मत्स्येंद्र सिध्द पुरुष ॥ ज्यास शिवाचा उपदेश ॥ तो करी लटिकाची शोक ॥ हें कौतुक मायेचें ॥३७॥
जो सिध्दांमाजी धडफुडे ॥ त्यासि मायेनें भरविलें वेड ॥ इतर जीवां कोण पाड ॥ जे अविदयेनें वेष्टिलें ॥३८॥
बोलूं नका नका करुं रुदना ॥ तुम्हां देतों बाळ जाणा ॥ हांक मारितां योगीराणा ॥ सहस्त्रबाळें धाविन्नलीं ॥३९॥
मत्स्येंद्र पाहे चहूकडे ॥ अवघे मीननाथ चहूंकडे ॥ गोरखी म्हणे आवडे ॥ तितुकीं मुलें घेईंजे ॥१४०॥
अचंबा करिती नरनारी ॥ बोलती ही काय नवलपरी ॥ त्याचा त्यास दिला करीं ॥ इतर जाहलें अदृश्य ॥४१॥
त्या मुलास बैसविलें राज्यीं ॥ नाथ वदे गुरु चला जी ॥ राहूं नये मायेमाजी ॥ निघतां बरें स्वामिया ॥४२॥
मत्स्येंद्र सोन्याची वीट घेऊन ॥ झोळीमाजी ठेवी बांधून ॥ चंपावतीस पुसोन ॥ गोरक्षीसंगें चालिला ॥४३॥
महावनीं मार्गीं जाहला जाता ॥ भय वाटे मत्स्येंद्रनाथा ॥ गोरक्षका जाहला पुसता ॥ भय नाहीं ते वाट दावा ॥४४॥
समजलें गोरखीं तेणें ॥ गुरुपासीं भय दारुण ॥ आतां यासी निर्भय करणें ॥ मग चारी दिशा मोकळया ॥४५॥
मार्गीं जातां आड देखिला ॥ जळ काढोनि तुंबा भरिला ॥ मत्स्येंद्र बहिर्भूमीस गेला ॥ झोळी ठेविली कूपापासी ॥४६॥
गोरखीनें झोळीची गांठ सोडिली ॥ आंत सोन्याची वीट देखिली ॥ ती कूपामाजी टाकिली ॥ धोंडा बांधिला झोळींत ॥४७॥
मत्स्येंद्र आला कूपापासी ॥ पाद प्रक्षाळून झोळी काखेसी ॥ घेऊन चालिला बोले गोरखीसी ॥ पुढें वोसाड वन दिसे ॥४८॥
आम्हां भय वाते जावयालागीं ॥ चल जाऊं दुसर्‍या मार्गीं ॥ हें समजोन गोरख जोगी ॥ मनामाजी हांसिला ॥४९॥
निर्भय चला स्वामी मार्गें ॥ भय राहिलें दूर मागें ॥ झोळी सोडून पाहतां वेगें ॥ तो पाषाण देखिला ॥१५०॥
म्हणे गोरखीस काय केलें ॥ भांडवल सगळे बुडविलें ॥ मनीं खेद फार जाहले ॥ बैसला कष्टी होऊनि ॥५१॥
येरु वदे काय कराल धनासी ॥ किती पाहिजे देतों तुम्हांसी ॥ लघ्वी करितां टेकडीसी ॥ जाहली अवघी कांचन ॥५२॥
पाहोनि धनाची रास ॥ विटले मत्स्येंद्राचें मानस ॥ मग म्हणे गोरखीस ॥ तूंचि माझें धन सर्व ॥५३॥
गेली मनाची कल्पना ॥ निर्भय होऊन योगिराणा ॥ मग पावोन समाधान ॥ गोरख संगें चालिला ॥५४॥
मार्गीं चालिले बहु त्वरें ॥ पुढें सुमंत राजाचें नगर ॥ रचना पाहोन मनोहर ॥ गोरख तेथें थोकला ॥५५॥
ग्रामा नेऊं नये गुरुला ॥ पाहातील सुंदरी कामिनीला ॥ चंपावती आठवेल मनाला ॥ पावेल चित्त विकारा ॥५६॥
ग्रामाबाहेर वृक्षदाटी ॥ तेथें बांधिली पर्णकुटी ॥ गुरु ठेवूनियां मठीं ॥ आपण जाय भिक्षेला ॥५७॥
सुमंतराजाची पट्टराणी ॥ पद्मा नामें असे सद्गुणी ॥ तिला राखी एक साजणी ॥ नाम तिचें गंगा असे ॥५८॥
ती दिवसा कर्मीं पद्मेला ॥ रात्रीं जाय धराला ॥ एके दिवसीं न आली घराला ॥ दीपदर्शनीं ती आली ॥५९॥
पद्मा म्हणे गंगाबाई ॥ आजि दिवसा कां आली नाहीं ॥ येरी म्हणे मौजा पहावया लवलाहीं ॥ गुंतलें होतें सतीच्या ॥६०॥
कटकांत निमाला भ्रतार ॥ दोंमासी आला समाचार ॥ चार प्रहर मिरवली सुंदर ॥ मग गेली मसणखाई ॥६१॥
बाई पतिव्रतापण कठिण ॥ हें धारिष्टाचें लक्षण ॥ तुला इतिहास सांगेन ॥ तें परिसें सुजाणे ॥६३॥
सुमंता शांडिल्या दोघी बहिणी ॥ घरें बांधोनि नांदती वनीं ॥ एक छपर द्वारें दोन्हीं ॥ वेगळेपणें नांदती ॥६४॥
एके दिवशीं पेटला वन्ही ॥ शांडिल्येचें घर गेलें जळोनी ॥ सुमंताचें घरालागोनी ॥ धक्का नाहीं लागला ॥६५॥
शांडिल्या बोले सुमंतेस ॥ तुझें माझें अढें एक असे ॥ तुझ्या घराचे काडीस ॥ धक्का नाहीं लागला ॥६६॥
तुझें जळालें नाहीं कसपट ॥ माझें कां जाहलें तळपट ॥ हा अचंबा मज वाटे ॥ काय चेटक तुजपासी ॥६७॥
सुमंता बोलें गे साजणी ॥ मी पतिव्रताशिरोमणी ॥ काय सामर्थ्य वन्हीलागोनी ॥ जाळावया मम गेह ॥६८॥
शांडिल्या म्हणे पतिव्रतापण ॥ कशास म्हणावें सांग उकलोन ॥ येरी म्हणे पति केल्यावांचून ॥ वैभव अंगीं न येची ॥६९॥
शांडिल्या बोले पदीं लागोन ॥ मातें कां देई पति करोन ॥ अंगीं चढेल भूषण ॥ मंडण होय तुज ऐसी ॥१७०॥
माझा पतिव्रतेचा थाट ॥ जगांत मिरवे थोर मुगुट ॥ जेणें पावेल अवीट ॥ करीं स्पष्ट आतांचि ॥७१॥
सुमंता वदे धरीं धीर ॥ सांगेन तैसें तूंही कर ॥ अरुणोदयीं लौकर ॥ राउळांत त्वां जावें ॥७२॥
जो पुरुष असेल राउळा आतौता ॥ तो करीं जा आपुला भर्ता ॥ होऊनियां कांता ॥ करी सेवा सर्वस्वें ॥७३॥
ऐसा सुमंता बोलली ॥ शांडिलेसी गोष्ट बिंबली ॥ मग उठोनियां प्रात:काळीं ॥ गेली राउळा त्वरेनें ॥७४॥
शोध करी राउळांत ॥ एक पुरुष बैसला गाभार्‍यांत ॥ धावून त्याचे पाय धरित ॥ म्हणे अंगना मी तुमची ॥७५॥
तो म्हणे बोलसी काय ॥ आधीं बरें शोधूनि पाहे ॥ तूं तरुणी मी वृध्द आहे ॥ संबंध कैसा घडेल ॥७६॥
माझी काया कुष्टभरित ॥ रक्तपितीनें जाहलों लोथ ॥ मक्षिकाभयें पावोनि येथ ॥ बैसलोंसें आच्छादोनी ॥७७॥
तूं सुकुमार लावण्यपुतळी ॥ माझी दशा ऐसी जाहली ॥ पाहिल्या येईल मनांत उकळी ॥ उगीच बोलोन फसूं नको ॥७८॥
येरी वदे ऐक वरा ॥ माझा सत्य संकल्प खरा ॥ मोडूं आल्या हरिहरां ॥ त्यांचें वचन मानीं ना ॥७९॥
तूं माझा निजपति ईश्वर ॥ सत्य संकल्प साचार ॥ साक्ष लिंग कर्पूरगौर ॥ अंतरात्मा तोही कीं ॥१८०॥
मग आणोनि एक पाटीला ॥ पति उचलोन आंत ठेविला ॥ प्रेमें भरोनि डोईवर घेतला ॥ हरुषें घरा पातली ॥८१॥
मेळवूनि पांच ब्राह्मण ॥ विधियुक्त केलें लग्न ॥ अष्टौप्रहर सेवा संपूर्ण ॥ मनोभावें मांडिली ॥८२॥
सुगंध तेल चिकाशाचें उटणें ॥ न्हाऊ घाली उष्ण जीवनें ॥ अंगास लावी केशर चंदन ॥ हार गुंफोनि घाली गळां ॥८३॥
घाली मिष्टान्न भोजन ॥ त्यावरी विडा देई साहित्य करोन ॥ मग पलंग श्रृंगारुन ॥ निजवी करीं धरोनियां ॥८४॥
अंगमर्दन विजणवार ॥ पालवोन निजवी सुंदरा ॥ यावरी वरुषें तेरा ॥ सेवा केलीं एकनिष्ठें ॥८५॥
एक दिवसीं म्हणे कांते ॥ स्कंधीं वाहोन नेईं मातें ॥ नगर पाहावया हेत ॥ उदेला असे अंतरीं ॥८६॥
येरी आज्ञा शिरीं वंदोनि ॥ पाठीवर घेतलें पतीलागोनी ॥ नगरामाजी नेवोनि ॥ चारी रस्ते दाविले ॥८७॥
वेश्या राखिली रायान ॥ अंगणीम उभी अळंकर करुन ॥ तिच्या पतीनें पाहोन ॥ वासना जाहली भोगावया ॥८८॥
तो नगरांतून बाई निघाली ॥ वनीं आपुल्या घरा आली ॥ नित्यनेम सारुन वेल्हाळी ॥ भोजनासि पती बैसविला ॥८९॥
तेव्हां रुसोन बैसला पती ॥ हात जोडोनि विनवी सती ॥ अपराध ठेवोनी मजप्रती ॥ दंड केला पाहिजे ॥९०॥
पति बोले परिसें गृहिणी ॥ म्यां वेश्या पाहोनि नयनीं ॥ ती भोगावी हें मनीं ॥ हेत माझा गुंतला ॥९१॥
त्वां जावोनि तिच्या सदना ॥ बोध करावा तिच्या मना ॥ माझी पुरवी वासना ॥ तेव्हां संतोष मज वाटे ॥९२॥
येरी वदे बहुत बरवें ॥ तिचा प्रयत्न करीन मनोभावें ॥ तुम्हीं सुखें भोजन करावें ॥ माझा उपाव तितुका करीन ॥९३॥
मग उठोनियां मध्यरात्रीं ॥ आली वेश्येच्या गृहाप्रती ॥ सारवून तिच्या भिंती ॥ झाडोनि सडा घातला ॥९४॥
पाणी आणोनि भरिले रांजण ॥ तारतखाना उपसोन ॥ मनीं कंटाळा न धरोन ॥ तेथें रांगोळ्या घातल्या ॥९५॥
ऐसें करोनियां जाय नित्य ॥ वेश्या आश्चर्य करी चित्तांत ॥ कोण प्राणी येवोनि येथ ॥ एवढे सायास मांडिले ॥९६॥
यापरी जाहले षण्मास ॥ सतीनें केले सायास ॥ वेश्या जपोनि रात्रीस ॥ एक दिवसीं बैसली ॥९७॥
मध्यरात्रीं सती येऊन ॥ नित्यनेम करुन निघतां जाण ॥ वेश्या त्वरेनें धांवोन ॥ पदर धरिला सतीचा ॥९८॥
तूं कोण सखे साजणी ॥ मध्यनिशींत येथें येवोनी ॥ सडा सारवण वाहसी पाणी ॥ इतुके सायास कां करिसी ॥९९॥
मी अमंगळ अपवित्र वेश्या ॥ तुझी पवित्र दिसे दशा ॥ माझ्या शिरीं उपकारलेशा ॥ कायनिमित्त मांडिलें ॥२००॥
येरी म्हणे मी पतिव्रता ॥ पंगू माझा असे भर्ता ॥ तूं कुमुदिनी पाहतां ॥ त्याचा मनोभृंग वेधला ॥२०१॥
परंतु पदरीं नाहीं धन ॥ पति रोगिष्ट वृध्दपण ॥ त्यासाठीं अनुष्ठान ॥ तुझी सेवा म्यां केली ॥२॥
वेश्या बोले माझिया पदरीं ॥ व्यभिचारकर्म संसारीं ॥ त्वां कष्ट केले भारी ॥ सहज होतें अनुकूळ ॥३॥
मी तों वेश्या जातीची ॥ अंकित असे श्रीमंताची ॥ वासना जाहली तुझ्या पतीची ॥ देईन भोग सत्य मानीं ॥४॥
गुज न सांगें कोणाप्रती ॥ संगें घेऊन आपुला पती ॥ त्वां यावें मध्यरात्रीं ॥ हेत पूर्ण करीन ॥५॥
तिला गोंवोनि भाकेसी ॥ आपण गेली स्वगृहासी ॥ लोटलिया मध्यनिशी ॥ पति घेऊनी चालिली ॥६॥
पाटींत ठेवून भर्ता ॥ उचलोनि घेतला डोईवरुता ॥ धैर्य सांवरोनि चाले त्वरिता ॥ काहुर गच्च दाटलें ॥७॥
त्यांत पर्जन्य वोळला भारी ॥ वायु सुटला भरारी ॥ मार्ग चुकोनियां सुंदरी ॥ अरण्यांत लोटली ॥८॥
मांडव्यऋषि शूळावर ॥ रायें भावोनि दीधला तस्कर ॥ तो धरोनियां धीर ॥ तपश्चर्या आचरे ॥९॥
तेथें भ्रमत आली सुंदरी ॥ पतीची पाटी डोईवरी ॥ पुढें जातां चांचरी ॥ धक्का शूळास लागला ॥२१०॥
शूळ रुतला हृदयासी ॥ कासावीस जाहला ऋषी ॥ शाप वदला पतिव्रतेसी ॥ सूर्य उदयीं पति मरो ॥११॥
येरी दचकली अंतरीं ॥ पाटी उतरोनि शोक करी ॥ म्हणे विधातिया नवलपरी ॥ काय अघटित दाविलें ॥१२॥
जें केलें तें वायां गेलें ॥ पुढें कर्म कैसें वोढवले ॥ पति निमेल वैधव्य आलें ॥ लागला कलंक स्वहितासी ॥१३॥
सत्य संकल्प साचार ॥ म्यां पति मानिला असेल ईश्वर ॥ तरी उदय न पावो भास्कर ॥ हा निर्धार पैं माझा ॥१४॥
साक्षी चंद्रसूर्य धरणी ॥ अंबर वन्हि पर्वत पाणी ॥ इंद्रियदेवता अंत:करणीं ॥ आत्मा राम स्वयें साक्षी ॥१५॥
ऐसा संकल्प तिणें केला ॥ पूर्वदिशेस रवि थोकला ॥ पुढें सृष्टीचा कार्य भार राहिला ॥ शर्वरी सर्व दाटली ॥१६॥
चिंता पडली देवांसी ॥ हरिहर आले तिजपासीं ॥ सुरवनितासमुदायेंसी ॥ लक्ष्मी पार्वती पातल्या ॥१७॥
सर्व पडिलीं महाविचारीं ॥ दोहींकडे संकट भारी ॥ उदय पावतां सहस्त्रकरी ॥ पति इचा मरेल ॥१८॥
ही पतिव्रता अढळ ॥ इची निष्ठा उत्तानपादबाळ ॥ ऋषिशाप तोही प्रबळ ॥ भंगू न शके विधाता ॥१९॥
पार्वती बोले वचन ॥ उदय होऊं दया सहस्त्रकिरण ॥ पति निमेल ऋषिवचनें ॥ हें तो सिध्दी जाऊंदया ॥२२०॥
आम्हीं आपुल्या सामर्थ्यें करुन ॥ पति उठवूं निश्चयान ॥ क्षण एक लागेल वैधव्यपण ॥ त्याचा अंगिकार आम्हीं करुं ॥२१॥
यापरी पार्वती वदे उत्तर ॥ उदय पावला सहस्त्रकर ॥ पति निमाला क्षणभर ॥ स्वयें सामर्थ्यें उठविला ॥२२॥
यापरी उभयतांकडे उगवलें ॥ किंचित् वैधव्य वाटून घेतलें ॥ तें सर्ववनितांस दीधलें ॥ त्याचा पर्याय तो परियेसें ॥२३॥
चारी दिवस होतां सांवळी ॥ कुंकुमालावों नये कपाळीं ॥ हे वैधव्यक्रिया वाटली ॥ स्वयें सामर्थ्यें आपुल्या ॥२४॥
वोंटी भरिली शांडिल्येची ॥ सुंदर काया केली पतीची ॥ वस्ती नेमिली कैलासाची ॥ विमानीं बैसवूनि ते नेले ॥२५॥
ऐसा पतिव्रतेचा आवांका ॥ पुराणीं वाजविला डंका ॥ हें कर्म नये फुका ॥ करणी केल्यावांचोनी ॥२६॥
ज्या रीतीचे बोल बोले ॥ तैसींच टाकी जरी पाउलें ॥ त्याचें भाग्य उदया आलें ॥ देवलोकीं मान्य तो ॥२७॥
कोणी एक असे साधू ॥ त्याचा असे अगाध बोधू ॥ घरीं कुटुंबाचा संबंधू ॥ अनुकूळ कांहीं असेना ॥२८॥
पदरीं असावें धन ॥ तेव्हा संसार शोभायमान ॥ अवघीं नीटनेटकीं जाण ॥ पुत्र दारा घर शोभे ॥२९॥
संसारिकास पाहिजे सन्मान ॥ उभयलोकीं थोरपण ॥ वस्त्रे अलंकार भूषणें ॥ तेव्हां शोभा चांगली ॥२३०॥
ज्यापासी नाहीं धन । त्याचा संसार भंडमा जाण ॥ सदा जिण्याचें विटंबण ॥ फजितीचा संसार ॥३१॥
अंधु पंगु रोगी दरिद्री ॥ हे जितांचि प्रेत संसारीं ॥ बुडोन गेले शोकसागरीं ॥ सुखाचा लेश मिळेना ॥३२॥
यावरी संतोष बरवा ॥ ज्यापासी नाहीं संसार गोंवा ॥ सदा भजे वासुदेवा ॥ अहर्निश वृत्ति आनंदमय ॥३३॥
प्रपंचास पाहिजे आशा ॥ परमार्थीं पाहिजे निराशा ॥ संसारिका व्हावा कुटुंब लैसा ॥ परमार्थासि कोणी आवडेना ॥३४॥
प्रपंचास पाहिजे धन ॥ परमार्थास पाहिजे ज्ञान ॥ संसारिकांस विषयलोभ गहन ॥ परमार्थिकां लोभ भक्तीचा ॥३५॥
एक ममतेमाजी बुडे ॥ एक चिदानंदीं बुडे ॥ एक होती नरकींचे किडे ॥ एक उघडे मोक्षपदीं ॥३६॥
असो याची वार्ता ॥ ऐक त्या साधूची कथा ॥ कुटुंब असोन निराशा ॥ कवणें परी तें परिसें ॥३७॥
भजन करी अहर्निशीं ॥ मन जाय कोणाच्या घरासी ॥ अखंड सोसी उपासासी ॥ अन्न वस्त्रांचें दुर्भिक्ष ॥३८॥
एके दिवसीं जाण ॥ तीन दिवस पडिलें लंघन ॥ मग वृत्ति सांवरोन ॥ जामातघरा तो गेला ॥३९॥
कन्येस म्हणे मी क्षुधार्थीं ॥ आज पातलों तुझ्या पंक्तीं ॥ खेद पावलासे चितीं ॥ तीन दिवस अन्न नसेचि ॥२४०॥
कन्या बोले अगा जनका ॥ चार दिवस उपवास देखा ॥ अन्नावांचोनि मुलें देखा ॥ त्राहेमान जाहलीं तीं ॥४१॥
ऐसें बोलूनियां सती ॥ घरांत पाचारिला पती ॥ म्हणे या पित्याची अतिथी ॥ कैसी सिध्दी नेईजे ॥४२॥
पति वदे अंगना ॥ घरांत साहित्य दिसेना ॥ भांडीं खापरीचीं जाणा ॥ तुझे कंठीं कांचमणी ॥४३॥
अन्न अन्न करिती घरचीं मुलें ॥ म्यां धैर्यानें माज बांधिलें ॥ तुझें पोटपाठ एक जाहलें ॥ भांडवल तेवढी तनू असे ॥४४॥
पतीस उत्तर करी चतुर ॥ मजपासी नवी चादर ॥ एक धर्मात्मा होऊन उदार ॥ काया माझी झांकिली ॥४५॥
मी उघडी असेन घरांत ॥ चादर विका बाजारांत ॥ त्या द्रव्याचें साहित्य ॥ घेऊनि त्वरां येईंजे ॥४६॥
पिता साधु आला घरासी ॥ सेवेनें करुं त्यासी ॥ पति घेऊन चादरेसी ॥ बजारांत पातला ॥४७॥
त्यापासी आला एक संन्यासी ॥ म्हणे मी नग्न वृध्द तापसी ॥ चादर दयावी पांघरावयासी ॥ तेणें सुखें राहेन ॥४८॥
संतोष पावोन चित्ता ॥ चादर अर्पिली अतिथा ॥ हरिस्मरण करितां ॥ परतोन घरा तो आला ॥४९॥
कांता पुसे सामुग्री आणिली ॥ येरु वदे चादर अर्पिली ॥ काया तपोधनाची झांकिली ॥ ऐकोन संतोषली भामिनी ॥२५०॥
म्हणे बहुत बरवें जाहलें ॥ सत्पुरुषा संतोषविलें ॥ हें कौतुक ऐकिलें ॥ पित्यानें मग तेव्हां ॥५१॥
म्हणे केवढा कन्येचा विवेक ॥ त्यामाजी जामात अधिक ॥ काय गांठ पडली ठीक ॥ सोन्यास जेवीं सुगंध ॥५२॥
जैसा विवेक आणि शांती ॥ किंवा भाव आणि भक्ती ॥ ज्ञान आणि शुध्दमती ॥ तेवीं रीत दोहींची ॥५३॥
सांबास निष्ठा भक्तीची ॥ सीमा केली पुरुषार्थाची ॥ ध्वजा मिरविली भक्तीची ॥ याहून लाभ कोणता ॥५४॥
स्वयें संतोषें आला घरा ॥ म्हणे आणावा काष्ठभारा ॥ तो विकोन बाजारा ॥ उदरपोषण करावें ॥५५॥
ऐसे विचारोन आला नगरांत ॥ गुरेंराख्यालागीं पुसत ॥ कोरडीं काष्ठें असतील जेथ ॥ तें मज दावा लोचनीं ॥५६॥
गोरक्ष बोलती तो गिरी ॥ दग्ध केला वैश्वानरीं ॥ तेथें काष्ठें असती भारी ॥ येती तितुकीं आणिजे ॥५७॥
साधु आला गिरीपासी ॥ पादस्पर्श होतांचि त्यासी ॥ कोमळ पल्लव आले त्यासी ॥ हिरवें तृण उगवलें ॥५८॥
साधूच्या स्पर्शाची थोरी ॥ सभाग्य जाहला गिरी ॥ विस्मय पावोनि तो अंतरीं ॥ उगाचि उभा राहिला ॥५९॥
साधूचा महिमा साधूस कळे ॥ मूर्खास काय कळती खुणा ॥ यालागीं त्याच्या चरणा ॥ वारंवार वंदावें ॥२६०॥
साधूचें महिमान परिसोन ॥ एक सावकार आलासे शरण ॥ सहस्त्र मोहरा अर्पून ॥ शिष्य करा मज वदे ॥६१॥
साधूनें धिक्कार करुन त्यासी ॥ द्रव्यबळें शिष्य होसी ॥ जाऊन बैसला आश्रमासी ॥ हातीं स्मरणी घेऊनी ॥६२॥
संसारश्रम जाहला साधूसी ॥ देवें आज्ञापिलें लक्ष्मीसी ॥ त्वरें जाऊनी त्याच्या घरासी ॥ साहित्य सर्व करावें ॥६३॥
मग साधु बैसला ईश्वरभजनीं ॥ लक्ष्मी उभी कर जोडोनि ॥ म्हणे मज सेवेलागुनी ॥ आज्ञा केली जगदीशें ॥६४॥
मग साधु धिक्कारुन बोलिला ॥ स्पर्श न करी मम आश्रमाला ॥ पवित्र न ठेलें विटाळशीला ॥ तेवीं तुझा संबंध ॥६५॥
वमनातुल्या त्यागोनी लक्ष्मीतें ॥ स्वस्थ बैसला आनंदभरित ॥ निष्काम म्हणावें ऐसियातें ॥ नाहीं तर शठ निरंजनी ॥६६॥
करणीवांचोनी लौकिक ॥ यशध्वजा लागेना देख ॥ ऐसा अनुभवो ठीक ॥ पद्मा बोले गंगेतें ॥६७॥
गजाचे दंत असती नीट ॥ तैसें पाहिजे सतीचें नेट ॥ जैसें ध्रुवधैर्य अचाट ॥ कोटिविघ्नीं ढळेना ॥६८॥
सती म्हणावें तीस ॥ पती जागां त्यागी देहास ॥ ऐसे बोलतां पद्मेस ॥ गंगा म्हणे बहुत बरवें ॥६९॥
कित्येक दिवस विसर पडला ॥ सुमंत शिकारीस गेला ॥ गंगेनें मागें कैवाड केला ॥ तो कैसा श्रवण करी ॥२७०॥
गंगेनें सेवकापासोन ॥ रायाचा पोशाख आणोन ॥ तो अशुध्दें भरोन ॥ गेली पद्मेचे भेटी ॥७१॥
गंगा बोले अहो बाई ॥ आजि अनर्थासी अंत नाहीं ॥ मृगयेंतें खेळतां पाहीं ॥ व्याघ्रें राव मारिला ॥७२॥
वस्त्रें त्याचिया अशुध्दें भरलीं ॥ तूतें दावाया आणिलीं ॥ पद्मा हरिहर बोलिली ॥ दिले प्राण सोडोनी ॥७३॥
विनोदाने अनर्थ केला ॥ पद्मेनें प्राण सोडिला ॥ महाशोक गेहीं मांडिला ॥ श्रुत जाहले रायासी ॥७४॥
रायें पुत्र राज्यीं स्थापिला ॥ आपण अनुताप घेतला ॥ पद्मेसाठीं शोक केला ॥ गेला वनीं निघोनी ॥७५॥
प्रधान सेवक शांत करिती ॥ न सांवरे रायाची मती ॥ सर्वांग करोनि विनंती ॥ ग्राम त्यागोनी चालिला ॥७६॥
पुढें द्रुमदाटींत ॥ बैसला होता मत्स्येंद्रनाथ ॥ न पाहोनियां त्यातें ॥ शोक अद्भुत मांडिला ॥७७॥
नाथ पुसे तूं कोण येथें ॥ कां करिसी रुदनातें ॥ राव बोले शोकभरितें ॥ गेली पद्मा मम भार्या ॥७८॥
मत्स्येंद्रास आठवली चंपावती ॥ तोही जाहला त्याचा सोबती ॥ एक चंपा एक पद्मावती ॥ दोघे रुदनीं प्रवर्तले ॥७९॥
गोरख आले भिक्षा घेऊन ॥ दोघे देखिले करितां रुदन ॥ म्हणे एक गुरुजी जाणा ॥ दुजा कोण त्यांपासीं ॥८०॥
गोरख दोघांत प्रवेशून ॥ डबी फोडिली आपटून ॥ करित बैसला रुदन ॥ हाय डबी म्हणोनी ॥८१॥
राव पुसे तूं का रडसी ॥ नाथ बोले पार नाहीं दु:खासी ॥ कोठून आणूं डबीसी ॥ फुटली ऐसी मिळेना ॥८२॥
राव बोले डब्या अनेक ॥ देईन लक्षावधी देख ॥ करुं नको वृथा शोक ॥ धरीं धीर जोगिया ॥८३॥
नाथ बोले रायाप्रती ॥ लक्षावधी देईन पद्मावती ॥ तों लावण्यलतिका युवती ॥ भोवत्या उभ्या ठाकल्या ॥८४॥
सुमंत पाहे चहुंकडे ॥ पद्मा देखे जिकडे तिकडे ॥ मग नाथाचे पायां पडे ॥ तूंचि माझा जगद्गुरु ॥८५॥
पद्मावती सहित सकळ वनिता ॥ आजपासोनि सत्य माता ॥ कृपा करीं श्रीनाथा ॥ मी अनाथ अपराधी ॥८६॥
गोरख बोले गा महेंद्रा ॥ शरण जावें श्रीमत्स्येंद्रा ॥ तेणें लाविल्या योगमुद्रा ॥ दिसे ब्रह्मचि लोचनीं ॥८७॥
हें परिसोनि राजेंद्र हांसला ॥ हा मजसारिखा रडे वनितेला ॥ रडता गुरु ज्यानें केला ॥ त्याचें काय सार्थक ॥८८॥
अंध पंगु जाहले सोबती ॥ बहिरट तिजा मिळे त्यांती ॥ मुक्यानें धरली संगती ॥ किती विनोद सांगावा ॥८९॥
एकास पाहतां नये वाईसें ॥ दुसरा धरी त्याचिया कासे ॥ उभयतां बुडती अनायासें ॥ संशय येथें नसे कीं ॥२९०॥
त्याची संसारीं ताणाताणी ॥ तो गुरु केल्या फजित दोन्ही ॥ षंढ भ्रताराचें मैथुनीं ॥ काय कांता निवेल ॥९१॥
न हेलावे अनुभवाचा लोट ॥ न वसे ज्ञानभांडार पेठ ॥ त्या गुरुची घेईंजे भेट ॥ ज्यांत भ्रष्टे मन बुध्दी ॥९२॥
ऐसा सुमंतिराव बोलिला ॥ गोरक्ष वदे भला भला ॥ मत्स्येंद्रगुरुच्या तोला ॥ ब्रह्मांडांत नसे कीं ॥९३॥
तूं म्हणसी मी तैसा हा कां रडला ॥ हा तूतें विनोद दाविला ॥ हा पूर्णब्रह्मींचा पुतळा ॥ रस वोतिला अवचितां ॥९४॥
तुर्या उन्मनीचे शेजे ॥ स्वानंद मंचकीं निजे ॥ याचा प्रताप शिवें जाणिजे ॥ अथवा जाणे हरि विरंची ॥९५॥
हाचि योगीयाची समाधी ॥ याची निजानंदाची बुध्दी ॥ यापरी तिष्ठती सकळ सिध्दी ॥ हा सुखाब्धी सुखाचा ॥९६॥
हा ज्ञानाचा कल्लोळ ॥ हा आनंदाची गुंफिला माळ ॥ हा सबाह्य अंतरीं निर्मळ ॥ नाथ सरळ प्रांजळ पवित्र ॥९७॥
मी त्याचे घरींचा गुलाम एक ॥ हा नेणसी राया विवेक ॥ मग हातीं धरुन देख ॥ मत्स्येंद्रचरणीं घातला ॥९८॥
कृपा करोनियां श्रीनाथ ॥ मस्तकीं ठेविला अभयहस्त ॥ मंत्र फुंकितां श्रवणाआंत ॥ तन्मय मुद्रा लागली ॥९९॥
जाहले त्रिविधताप भस्म ॥ अवघ्या वृत्ति जाहल्या सम ॥ सबाह्य न्याहळी पुरुषोत्तम ॥ आप आपणातें कोंदला ॥३००॥
एकवटले पंचप्राण ॥ षट्‍चक्रें गेला भेदून ॥ ब्रह्मरंध्रावर निशाण लावूनि ॥ श्रीहाट गोल्हाट जिंकिला ॥१॥
जाहली स्वरुपाची दाटी ॥ दृश्य पाहतां न पडे दृष्टी ॥ ब्रह्मास्मि बोधी पडली मिठी ॥ सोहं स्मरणीं ठसावला ॥२॥
मग नाथें करुनि सावध ॥ केला आपणाऐसा सिध्द ॥ नाम ठेविलें सहजानंद ॥ नंद संप्रदाय तेथोनी ॥३॥
मग तेथूनि गेले उत्तरखंडी ॥ सुखें विचरती ब्रह्मांडीं ॥ देश डोंगर खंडोखंडीं ॥ फिरती आपुले इच्छेनें ॥४॥
या कलीमाझारी ॥ अदयापि असती देहधारी ॥ काळही ज्यातें नमस्कारी ॥ हा महिमा सिध्दांचा ॥५॥
सांगितली समर्थांची कथा ॥ दोष जाती श्रवण करितां ॥ मारुतीची ऐकोनि वार्ता ॥ पळती भूतें ज्यापरी ॥६॥
लाभें लाभ जोडावे ॥ पुण्यें पुण्य वाढवावें ॥ जन्में जन्म तोडावे ॥ खत फाडावें दोषांचें ॥७॥
लोकमान्य प्रतिष्ठा ॥ ही मानवी जैसी विष्ठा ॥ सांडाव्या दुर्गुणी चेष्टा ॥ धरावी निष्ठा गुरुपायीं ॥८॥
उभयविधी लोकांसी ॥ नि:शंक व्हावें मानसीं ॥ भावें भजावें संतांसी ॥ नम्र सर्वांसी असावें ॥९॥
भूतीं पाहावा वासुदेव ॥ हा परमार्थाचा उपाव ॥ करावा संतांचा गौरव ॥ ही रीत असे श्रेष्ठांची ॥३१०॥
त्याग कीजे उग्रतेसी ॥ विनयें असावें जगासी ॥ मंजुळतेच्या बोलण्यासी ॥ गोड वाटेल सर्वजना ॥११॥
असावें सरळ मोकळें ॥ जेवीं आकाश दशदिशा व्यापिलें ॥ तैसें अंत:करण पसरलें ॥ स्वरुपमय जाणावें ॥१२॥
जगीं जगदीश परिपूर्ण ॥ श्रीगुरुचें मुख्य ज्ञान ॥ हेंचि जीवीं मुख्य धरुन ॥ निवांत बैसलों संतपायीं ॥१३॥
सुखें संतोष आपुल्या घरीं ॥ गुरुभजनीं असावें संसारीं ॥ संतांचें मोचे घेऊनि शिरीं ॥ निवांत राहिला शहामुनी ॥३१४॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये मत्स्येंद्रगोरखसंवादो नाम चतुश्चत्वरिंशोध्याय: ॥४४॥
॥अध्याय ४४॥ ओव्या ३१४॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP